इत्यादि वाक्यांनी शास्ताचेठायीं ने दोष सांगितले आहेत त्यांचे नित्य मनन करीत असल्यावर मनुष्य कसा बरं दुःखाने पडेल ॥१४१॥
मनुष्य क्षुधेंने व्याकुळ झाला म्हणुन विष खाईल काय ? मग मिष्टान्नें खाऊन ज्याची तृप्ति झाली आहे असा विवेकी पुरुष तें खाणार नाहीं हें सागायलाच नको ॥४२॥
प्रारब्ध कर्माच्या बलानें ज्ञान्यास भोगेच्छा होणार नाही असेंही नाहीं. परंतु जरी कदाचित झाली तरी वेठिस धरलेल्या मनुष्याप्रमाणे तो त्या विषयांचा जुलमानें भोग घेतो ॥४३॥
हें लोकांत नेहमी आढळतें की जें संसारी असुन श्रद्धावान मुमुक्षु आहेत ते आमच्या कर्माचा क्षय केव्हा होईल ? या चितेंतच नेहमी असतात ॥४४॥
चिंतेत असतात असें म्हंटलें एवढ्यावरुन ते प्रपंचाची चिंता करितात असें समजुनये "तर हा संसार माझा कधी जाईल " अशी चिंता ते करितात ही चिंता वैराग्यच म्हटेलें पाहिजे कारण संसारिक चिंता अज्ञानापासुन उप्तन्न होते परंतु या वैराग्यरुप चिंतेसज्ञानास कारण आहे ॥४५॥
विवेकास्तव ज्याच्या मनांत क्लेश उप्तन्न झाला तो केवळ जरुरी पुरता विषयोपभोग करुन तृप्त होतो. परंतु विवेक नसेल, तर अनंत भोगांनीही मनुष्याची तृप्ति होत नाही ॥४६॥
इच्छेची तृप्ति विषयोपभोगानें कंधीही ? होणार नाहीं. तुप तेल घातल्यानें अग्नि कधी तरी शांत होईल काय ? ॥४७॥
विषयाचा दोष जाणुन त्यांचें सेवन केलें असतां थोडक्यांतच तृप्ति होते; यास उदाहरण अमुक मनुष्य चोर आहे असें समजुन त्यांची संगत केली असतां तो बाधक न होतां उलटा तो मित्रच होतो ॥४८॥
योगाभ्यासेकरुन वश केलेल्या मनाला जरी अल्पभोग भिळाला तरी त्यांत क्लेश असल्यामुळे तोच पुष्कल असा मानतो ॥४९॥
यास दृष्टांत शत्रुंनी एकाद्या राजाचा देश सर्व हिरावुन घेऊन त्यास कांही दिवस कैदेंत घालुन नंतर त्याला मोकळा करुन एक लहानसेंखेडे जरी दिले तरी त्याणे त्याची तृप्ति होते परंतु परचक्राचा हल्ला ज्याला मुलीच माहीत नाही त्याला राष्ट्रांची राष्ट्रें जरी मिळाली तरे तीं थोडींच ॥१५०॥
दोष दर्शन रुप विवेक जागृत असुन प्रारब्ध कर्मापासुन भोगेच्छा उप्तन्न होते हें कसें ? अशी शंका कोनी घेऊ नये कारण ॥५१॥
प्रारब्ध कांहीं एकच प्रकारचें नाहीं इच्छा प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध असे याचे तीन प्रकार आहेत ॥५२॥
अपथ्य सेवन करणारा रोगी चोरी करणारा मनुष्य आणी राजपत्नीचेठायीं रत असलेला जार, यांना आपणावर येनार अनर्थ समजला असुनही प्रारब्ध कर्मामुळे कुष्कर्माची इच्छा होते. ॥५३॥
हें प्रारब्ध कर्म निवारण करणें ईश्वराचे देखील हातीं नाहीं. कारण, गीतेमध्यें ईश्वरानेंच प्रत्यक्ष अर्जुनाला असें सांगितलें आहे कीं ॥५४॥
मनुष्य ज्ञानी जरी असला तरी आपल्या प्रकृतीस ( प्रारब्ध कर्मास ) अनुसरुन त्याच्या सर्व चेष्टा घडतात. सर्व जीवांची अशीच स्थिति आहे मग अर्जुना, प्रारब्ध कर्मापुढे निग्रहाचेंबळ कितीसें चालतें ॥५५॥
अवश्य होणार्या गोष्टींचे जर एकाद्या उपायानें निवारण करितां आलें असतें तर नल, राम युधिष्ठिर इत्यादि महापुरुष इतकें दुःख कां भोगते ? तस्मात प्रारब्धकर्म कोणासही चुकले नाही ॥५६॥
एवढ्यावरुन म्हणजे ईश्वराने सर्व ईश्वरत्व नष्ट होतें असें कोणी समजु नये. कारण कीं प्रारब्ध कर्माचा नियमही इश्वरानेंच निर्माण केला आहे ॥५७॥
हें इच्छारुपी प्रारब्ध कर्मे झालें आतां पुढें अनिच्छा प्रारब्ध सांगतों तेंही कृष्णार्जुनाच्या संवादावरुन स्पष्ट दिसुन येतें ॥५८॥
हा मनुष्य जो आपल्या इच्छे विरुद्ध जुलमानें पापाचरण करिता तो कोणाच्या प्रेरणेनें ? ॥५९॥
अश आर्जुनाच्या प्रश्नावर भगवान म्हणतात रजो गुणापासुन उप्तन्न होणारा काम आणि त्याचा परिणाम जो क्रोध हे महा भक्षक महापापी व मोठे वैरी आहेत असं समज ॥१६०॥