चित्रदीप - श्लोक ८१ ते १००

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


दुसरी श्रुती असें सांगतें की बालाग्राच्या शंभराव्या हिश्यांच्या शंभराव्या हिश्या एवढा जीव आहे असें समजावें ॥८१॥

दिंगबरवादी आत्मा मध्यम असें म्हणता कारण चैतन्याची व्याप्ती आपादमस्तकपयंत आहे,व "आनखाग्रंप्रविष्ट" असें श्रृतिप्रमणाही आहे ॥८२॥

वरील श्रुतिसिद्ध जो नाडीप्रचर तो येथें लागू पडत नाहीं असें समजु नये. जसा देहाचा अंगरख्यांत प्रवेश हस्तद्वारा होतो त्याप्रमाणें येथेंही सुक्ष्म अवयवांनें आत्म्याचा प्रवेश कां म्हणू नये ? ॥८३॥

लहान मोठ्या देहांत याचा प्रवेश होणार नाहीं असें समजु नये. कारण आत्म्याचें अशही त्या देहाप्रमाणें कमी जास्त होतात.तेव्हा तसें होण्यास कांहीं चिंता नाहीं ॥८४॥

परंतु ज्याला अंश आहेत त्याच नाश झालाच पाहिजे. म्हनुन आत्मा सांश मानल्या स घटासारखा तोही नाशवंत होईल. आत्मा अनित्य झाल्यास कृतप्रणाश आणि अकृताभुत्यागम हे दोष कसे निवरतां येतील ? ॥८५॥

म्हणुन ज्या अर्थी आत्मा अणूही म्हणतां येत नाही आणि मध्यमही म्हणतां येत नाहीं त्या अर्थी तो आकाशाप्रमाणें व्यापाकच असला पाहिजे. त्यांचें निरंशत्व तर श्रुतिसिद्धच आहे ॥८६॥

अशीं आत्म्याच्या परिमाणाविषयीं निरनिराळीं मतें सांगुन शेवटीं आत्म्याचें विभुत्व ठर विलें. आतां त्याच्या विशेष स्वरुपाविषयीं निरनिराळ्या वाद्यांचें मत सांगतों. कोनी आत्मा चैतन्यारुप असें म्हणतात; कोणी जड असें म्हणतात; आणि कित्येक तो चिज्जड असे म्हणतात ॥८७॥

प्रभाकरमताचे लोक आणि तार्किक लोक आत्मा जड असें म्हणतात. आकाश द्रव्य असुन त्याचा गुण जसा शब्द त्याप्रमाणें आत्मा द्रव्य असुन चैतन्य हा त्याचा गुण आहे. ॥८८॥

इच्छा, द्वैष, प्रत्यत्न, धर्म अधर्म, सुख, दुःख, आणि त्यांचे संस्कार हे चैतन्याप्रमाणें आत्म्याचेच गुण आहेत असेंते म्हणतात, ॥८९॥

आत्म्याच्या आणि मनाचा संयोग झाला असतां आपल्या अद्दष्ट कर्माच्या योगानें वरील गुण उप्तन्न होतात; आणि अदृष्टाचा क्षय झाला असतां सुषुप्तीत लीन होतात ॥९०॥

असं असुन तो सचेतन कसा भासतो या शंकेचें ते असें समाधान करतात कीं, तो स्वतः जड आहे तरी चैतन्यगुण त्याचे अंगी आहे, आणि इच्छा द्वेष, प्रयत्‍न हेही पण गुण त्याचे अंगी आहेत म्हणुन तो चैतन्य रुप भासतो. तो धर्माधर्माचा कर्ता आणि सुखदुःखाचा भोक्ता आहे. ॥९१॥

ज्याप्रमाणें कर्मवशेंकरुन या देहाचेठायीं केव्हां केव्हा प्राप्त होणारीं जी सुखदुःखें त्यांच्या भोगाकरितां आत्मा राहतो असं म्हणतात, त्या प्रमाणें अन्यलोकांहीं कर्मवशें देहधारणा करण्याची इच्छा होते. असा आत्म्याविषयीं औपचारिक व्यवहार आहे. ॥९२॥

या दृष्टीनें सर्वव्यापी जो आत्मा त्याला जाणे येणें संभवतें एताद्विषयीं सर्व कर्मकांड प्रमाण आहे असें ते म्हणतात ॥९३॥

आनं दमयकोश जो सुषुप्तिकाळीं राहतो त्यांत चैतन्य स्पष्ट नाहीं तोच आमचा आत्मा. तो पंचकोशांत पहिला आहे. आणि पुर्वोक्त जे ज्ञानादिक ते त्याचे गुण आहेत ॥९४॥

आत्म्याचेठायीं अस्पष्ट चैतन्याचें अनुमान करुन आत्मा चिज्जड आहे असें भाट्ट म्हणतात . कारण निजुन उठलेल्याला जडत्वाची जी आठवण होते ती पुर्वेच्या अनुभवांवांचुन होणार नाही. म्हणुन आत्मा उभयात्मक आहे असें ते म्हणतात ॥९५॥

निजुन उठलेला असें म्हणतो कीं मी इतका वेळ जड होऊन निजलों होतों ही जाड्यस्मृति जाड्याच्या अनुभवांवांचुन कशी होईल ॥९६॥

द्रष्ट्याच्या दृष्टीच्या लोप सुषुप्तीत होत नाहीं असें श्रुतीत सांगितलें आहे म्हणुन आत्मा काजव्याप्रमाणे प्रकाश व अप्रकाश या दोहोंनी युक्त आहे ॥९७॥

याजवर सांख्यवादी असें म्हणतात कीं ज्याला अंश नाहीं त्याला उभयात्मकत्व कधीही संभवणार नाही. यास्तव आत्मा चिद्रुप आहे. ॥९८॥

जाड्यांशाची व्यवस्था कशी या प्रश्नांचे उत्तर ते असें देतात कीं तो जाड्यांश प्रकृतीचें रुप आहे तें रुप विकारी असुन त्रिगुणात्मक आहे. चैतन्याला जे बंधमोक्ष भासतात त्यास कांहीं तरी कारण पाहिजे म्हणुन प्रकृतीची कल्पना त्यांणीं केली. ॥९९॥

प्रकृति आणि पुरुष अत्यंत भिन्न असतां असंग चैतन्याला बंधमोक्ष कसे ? या शंकेचें समाधन ते असें करितात कीं तो भेद न समजल्यामुळे बंधमोक्षांचा व्यवहार चालला आहे. आणि या व्यवस्थेकरितांच तार्किकांप्रमाणे सांख्यानींहीं आत्मभेद मानला आहे. ॥१००॥

N/A


References : N/A
Last Updated : March 18, 2010