३३३१
मना ऐक एक मात । धरीं हरिनामीं हेत ॥१॥
तेणें चुकती बंधन । वाचे म्हणे नारायण ॥२॥
नारायण नाम । तेणें सर्व होय काम ॥३॥
दृढ धरी भाव । न करी आणिक उपाव ॥४॥
उपाव न करी कांहीं । शरण देवासी तूं जाई ॥५॥
एका जनार्दनीं मन । करी देवासी अर्पण ॥६॥
३३३२
मना तूं एक करीं । वाचे आठवी श्रीहरी ॥१॥
आणिक न करी साधन । वाचे म्हणे नारायण ॥२॥
सर्व काळ हाचि धंदा । वाचे आठवी गोविंदा ॥३॥
तेणें जीवा सोडवण । शरण एका जनार्दन ॥४॥
३३३३
अरे अरे मना । सत्य सत्य धरी ध्याना । पंढरीचा राणा । वेध ठेवीं तयाचा ॥१॥
तुज नाहें रे बंधन । सहज आकळे ब्रह्माज्ञान । वाउगें शोधन । नको करूं ग्रंथाचें ॥२॥
मागां तुज शिकविलें । परि तूं रे नायकशी वहिलें । तुझें हितगुज कथिलें । शुद्धि करी कांही ते ॥३॥
तूं अनिवार सर्वांसी । म्हणोनि कींव भाकितो तुजसी । शरण गुरु जनार्दनासी । एका भावें जाई तूं ॥४॥
एका जनार्दनीं शरण । जातां होईल समाधान । वाउगें नको भ्रमण । चरणीं राहे निवांत ॥५॥
३३३४
अरे माझ्या मना । नित्य भजे नारायणा ॥१॥
तेणें तुटेल बंधन । उभय लोकीं कीर्ति जाण ॥२॥
मिळेल सकळ संपत्ति । नाश पावेल विपत्ति ॥३॥
प्राप्त होय ब्रह्मापद । वाचे वदावा गोविंद ॥४॥
एका जनार्दनीं मन । सदा चिंती नारायण ॥५॥
३३३५
माझ्या मना लागो छंद । नित्य गोविंद गोविंद ॥१॥
तेणें निरसेल बंधन । मुखीं वदे नारायण ॥२॥
ब्रह्मारूप होय काया । माया जाईल विलया ॥३॥
होय सर्व सुख धणी । चुके जन्ममरण खाणी ॥४॥
म्हणे एका जनार्दन । सदा समाधान मन ॥५॥
३३३६
मनें नागविलें बहुतांपारीं । धांव धांव तूं श्रीहरी ॥१॥
आतां माझें मन । दृढ ठेवावें आकळुन ॥२॥
वाहात चालिलों मनामागें । बुडतसे प्रपंच गंगे ॥३॥
धांवे धांवे विठाबाई । एका जानर्दनीं लागे पायीं ॥४॥
३३३७
काय तुझें वेंचे देवा । मन आपुलें स्वाधीन ठेवा ॥१॥
हेंचि मागणें तुजप्रती । वारंवार हें विनंती ॥२॥
माझी ठेवा आठवण । म्हणे एका जनार्दन ॥३॥
३३३८
माझ्या मनाचें तें मन । चरणीं ठेवावें बांधून ॥१॥
मग तें जाऊं न शके कोठें । राहे तुमच्या नेहटें ॥२॥
मनासी तें बळ । देवा तुमचें सकळ ॥३॥
एका जनार्दनीं देवा । मन दृढ पायीं ठेवा ॥४॥
३३३९
ठायीं ठेविलिया मन । सहज होईल उर्तीण ॥१॥
आलों ज्या कारणा । तेंचि करवा पंढरीराणा ॥२॥
वाउगी ती आस । मनीं नसावी सायास ॥३॥
येतों काकुलती । एका जनार्दना प्रती ॥४॥
३३४०
तापलिया तापें शिणलीया मार्गीं । पोहे ठाकी वेगीं कृष्णकथा ॥१॥
कृष्णकथा गंगा सांवळें उदक । मना बुडी दे कां वोल्हावसी ॥२॥
वोल्हावलें मन इंद्रियां टवटवी । गोपिराज जीवीं सांठविलें ॥३॥
सांठविलें जीवीं जाणा याची खुणा । जरी होय करुणा सर्वांभुतीं ॥४॥
सर्वांभूतीं राम दृष्टीचें देखणें । नाहीं दुजेंपणें आडवस्ती ॥५॥
आडवस्ती नाहीं एका जनार्दनीं । श्रीरामावांचुनी । आन नेणें ॥६॥
३३४१
तुज सांगतसे मना । पाहें पंढरीचा राणा ॥१॥
नको दुजा छंद कांहीं । राहें विठ्ठलाचे पायीं ॥२॥
विषयीक वासना । सोडी सोडी सत्य जाणा ॥३॥
जेणें घडे सर्व सांग । फिटे संसाराचा पांग ॥४॥
म्हणे जनार्दनाचा एका । सुलभ उपाव नेटका ॥५॥
३३४२
जन्ममरण सांकडें निवारावया कोडें । विठ्ठल उघडें पंढरीये ॥१॥
तयाचे चरणां मिठी घाली मना । नाहीं तुज यातना जन्मकोटी ॥२॥
चंद्रभागे स्नान पुंडलीक भेटी । पूर्वजा वैकुंठीं मार्ग सोपा ॥३॥
महाद्वारीं नाचा जोडोनियां पाणी । पुढें चक्रपाणी उभा विटे ॥४॥
एका जनार्दनीं तयांसी भेटतां । मोक्ष सायुज्यता पायीं लागे ॥५॥
३३४३
मन रामीं रंगलें अवघें मनचि राम जालें । सबाह्म अभ्यंतरीं अवघें रामरुप कोंदलें ॥ध्रु०॥
चित्तचि हारपले अवघें चैतन्यचि जालें । देखतां देखतां अवघें विश्वा मावळलें ।
पहातां पहातां अवघें सर्वस्व ठकलें ॥१॥
आत्मयारामाचें ध्यान लागलें मज कैसें । क्रियाकर्म धर्म येणेचि प्रकाशे ।
सत्य मिथ्या प्रकृति पर रामचि अवघा भासे ॥२॥
भक्ति अथवा ज्ञान शांति आणिक योगास्थिति । निर्धारितां न कळे रामस्वरुपीं जडली प्रीती ।
एका जनार्दनीं अवघा रामची आदिअंतीं ॥३॥