मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग तिसरा|
अभंग ३०८३ ते ३१००

संसार - अभंग ३०८३ ते ३१००

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


३०८३

थोर गर्भीची यातना । आठवितां दुःख मना ॥१॥

नऊमास वैरी । पचे विष्ठेचें दाथरीं ॥२॥

जन्म होतांचि जननी । सुख मानी अनुदिनीं ॥३॥

बाळ वाढतसे सायासें । तों तों माउली संतोषे ॥४॥

तारूण्याच्या येतां भरा । मातेसी करी पाण उतारा ॥५॥

पावला सवें म्हातारपण । नाकीं तोंडीं लाळ जाण ॥६॥

नाठवेचि राम राम । एका जनार्दनीं तो अधम ॥७॥

३०८४

धन मानबळें नाठविसी देवा । अंतकाळीं तेव्हा कोण आहे ॥१॥

यमाचे ते दंद बैसतील माथां । मग तुज रक्षितां कोण आहे ॥२॥

माता पिता बंधु सोइरे धाईरे । जोंवरी इंद्रियें चालताती ॥३॥

सर्वस्व कामिनी म्हणविसी कांता । ती ही केश देतां रडुं लागे ॥४॥

एका जनार्दनीं जातांचि शरण । स्वप्नीं जन्ममरण नाहीं नाहीं ॥५॥

३०८५

जरा पावली निजसंधी । अनिवार येती आधी व्याधीं ॥१॥

पायीं पडतसें वेंगडी । अधारीं धरणें लागे काठीं ॥२॥

डोळांचि पडे तोंडा लाळ । नाका येत शेंबूड वोंगळ ॥३॥

चुंबन देतां पोरांप्रती । बाऊ म्हणोनि पोरें पळती ॥४॥

ऐशी दशा येईल अंगा । एका जनार्दनीं शरण रिघा ॥५॥

३०८६

बधिर जाले पैं श्रवण । जाले दंत उन्मळण ॥१॥

अझुनी काय धरिसी माया । गेलीं इंद्रियें विलया ॥२॥

नाकीं श्लेष्मांचा खाल्लोळ । तोंडावाटे पडे लाळ ॥३॥

टरपुर वाजे गुदद्वार । चरणीं सांडिली व्यापार ॥४॥

वृषण आलें गुडघ्यावरी । शिश्न लोंबें पीठचाचरी ॥५॥

कफवात पैं सुटला । शरीर कांपे चळवळा ॥६॥

लहान थोर ते हासती । फे फे वांकुल्या दाविता ॥७॥

वागतां चांचपडे भिंती । पोरें बाऊ म्हणोनी पळती ॥८॥

भार्या केली रे आवडी । तो तुजवर बोटें मोडी ॥९॥

स्त्रीये पाहिजे पुरुषभोग । तुज लगला खोकला रोग ॥१०॥

तुज जाणें निरयाकडे । ती काजळकुंका रडे ॥११॥

प्राण आला डोळियासी । कैसी स्वार्थ न सांडिसी ॥१२॥

आंगण जालें रे विदेश । किती करिसी विषयसोस ॥१३॥

आप्त म्हणती कां मरेना । पालटु जाला याचिया चिन्हा ॥१४॥

एका जनार्दनीं निष्काम । भजा भजा रे परब्रह्मा ॥१५॥

३०८७

डोळा न दिसे न्याहारी । दृष्टी जाली पाठीमोरी ॥१॥

अझुनी काइसा रे मोहो । मिथ्या विषयाचा संदेहो ॥२॥

कानीं बैसलीसे टाळी । आली यमाची उथाळी ॥३॥

अंग वाळलें कांचरी । चंद्रबिब चढलें शिरीं ॥४॥

शिश्न अंगुळी सांडुं मागें । मूत्री चोरपान्हा लागे ॥५॥

नाना विषयीं करी न सुखी । म्हणतां स्त्री प्रत्यक्ष थुंकी ॥६॥

वेश्या धन घेऊनि सांडी बोला । स्त्री वार्धक्यें घाली टोला ॥७॥

अग्नी आंचवल्या पोळी । पुत्र नाना स्नेह जाळी ॥८॥

लाळ सुटलीसे तोंडें । तरी खेळवी नातुंडें ॥९॥

मान कापुनी विषयावरी । मरण चढिलेंसें शरीरें ॥१०॥

बळ प्रौढीं स्त्रीनें धन । क्षीण जाल्या उदासीन ॥११॥

पाठी बैसविली आवडी । शेखीं नागउनी सोडी ॥१२॥

पुरुष वार्धक्य नावडे । मेल्या कानकेशा रडे ॥१३॥

दांत पडोनी सांगे गोष्टी । नाक लागतए हनुवटीं ॥१४॥

मोह ममता सांडीं काम । अखंड जपे रामराम ॥१५॥

रामनामें होइल हित । एर्‍हवीं बुडालें स्वहित ॥१६॥

एका जनार्दनीं पुरा । बालतारुण्य न रिघे जरा ॥१७॥

३०८८

बारा वर्ष बाळपणक गेलें । परि रामराम मुखीं नाहीं आलें ॥१॥

अहा रे मूढा जन्मलासी दगड । गमाविलेंक वाड आयुष्यासी ॥२॥

बारा वर्ष तारुण्य अवस्था । कामक्रोधें लाहो घेतला पुरता ॥३॥

बारा वरुषें वृद्धाप्य आलें समुळीं । जराव्याधीं देहासी कवळी ॥४॥

ऐसें आयुष्य गेलें वायांविण । एका जनार्दनीं म्हणे नाहीं घडले भजन ॥५॥

३०८९

देहो जैं पासुनी झाला । तैं पासुनी मृत्यु लागला ॥१॥

साप बेडुकातें गिळी । बेडुक मुखें माशी कवळी ॥२॥

ऐसा काळ गिळितो जना । न कळेचि बुद्धिहीना ॥३॥

मरण जाणतो बापुडीं । धरिती प्रपंचीं आवडी ॥४॥

ऐसे पामर आत्मघाती । यासी महा होये फजिती ॥५॥

असा जनीं जनार्दन । एका जनार्दनीं शरण ॥६॥

३०९०

जन्मलें तें बाळ । परी वाट पाहे काळ ॥१॥

नाहीं संतसमागम । सदाविषयाचें काम ॥२॥

मुखीं रामनाम नाहीं । सदा संसार प्रवाहीं ॥३॥

एका जनार्दनीं भुलोन । स्त्रीआधीन जाहला दीन ॥४॥

३०९१

आमिष देखोनि मीन गुंतलासे गळीं । तैसा काळ बळी पाश घाली ॥१॥

आप्त गोत्रज असोनि जवळी । नेताती वहिली यमकाळ ॥२॥

दांत विचकूनियां म्हणती गेला गेला । ऐशा अभाग्याला काय बोध ॥३॥

एका जनार्दनीं मनुष्य देहें मूढ । प्रत्यक्ष दगड अवनी भार ॥४॥

३०९२

जाणार जाणार देह हा जाणार । काय उपचार करिसी वायां ॥१॥

मृत्तिकेचें घर बांधितां खचलें । तैसें परि जाहलें न कळे तुज ॥२॥

गृहधनदारा पुत्रपौत्र वायां । स्मरें देवराया एका भावें ॥३॥

एका जनार्दनीं घेई अनुतापा । चुकवीं खेपा हे जन्ममृत्यु ॥४॥

३०९३

धनदारापुत्र अपत्यें म्हणसी माझें । परीं हे काळाचें खाजें बापा ॥१॥

गंगेलागीं पूर अवचित आला । लोटोनियां गेला मागुती जैसा ॥२॥

तैसा याचा विश्वास न धरीं तूं; मनीं । यमाची जांचणी तुजसी होय ॥३॥

एका जनार्दनीं सोडोनि देई संग । नाम तूं अभंग हरीचे वदे ॥४॥

३०९४

ज्यांचें आयुष्य नोहे लेखा । तेही देखा निमाले ॥१॥

इतरांचा पाड कोण । नेमिलें जाण न चुके तें ॥२॥

आणिलें तें उसनें साचा । देणें तयाचा प्रकार ॥३॥

शरण एका जनार्दनीं करी विनवणी सर्वांसी ॥४॥

३०९५

पिता पुत्र नातु सर्व काळें ग्रासिलें । उरले ते गेले काळमुखीं ॥१॥

सायास करूनि वाढविती माझें । परि काळाचें तें खाजें नेणती ते ॥२॥

बाळतरुण वृद्धदशातें पावती । परी न म्हणती रामराम ॥३॥

एका जनार्दनीं भुलला गव्हार । न करी स्वहिताचा ॥४॥

३०९६

एक पाठी एक पुढा । आहे मरणाचा हुडा ॥१॥

आज मेले उद्यां मरती । मागें राहाती तेही रडती ॥२॥

मरण जाणोनियां पाही । उगेच बोलती प्रवाहीं ॥३॥

ऐसी उगेच भुली पडली देखा । एका जनार्दनीं भुलले एका ॥४॥

३०९७

नको गुंतूम मायाजाळी । काळ उभा हा जवळीं ॥१॥

नाहीं तुजलागीं तत्त्वतां । सोडविणार मातापिता ॥२॥

स्त्रिया पुत्र बंदीजन । करिती तुजलागीं बंधन ॥३॥

धनवित्त कुळें । सोडितील अमंगळें ॥४॥

एका जनार्दनीं मन । ठेवी गुरुपायीं बांधोन ॥५॥

३०९८

इष्ट मित्र बंधु चुलते पुतणे । काळाचे पोसणें सर्व देख ॥१॥

यमाची यातना पडतां जीवा ती । कोणा काकुलती करसी मूढा ॥२॥

जोंवरी आहे तुज जवळी धन । तोंवरी पिशून म्हणती माझें ॥३॥

एका जनार्दनीं जवळी आला काळ । तेव्हा ते निर्बळ सर्व होती ॥४॥

३०९९

एक एक मरती पहाती । दुजियासी भ्रांति कैशी बापा ॥१॥

अरे ग्रासिलें शरीर काळे देखा । परि तया मूर्खा न कळे कांहीं ॥२॥

एका जनार्दनीं भुलला प्रपंचा । कोण दुःखा त्याच्या सोडवील ॥३॥

३१००

कन्यादान केल्या पाहें । तो आपले घरों घेउनी जाये ॥१॥

वायां कायशी तळमळ । तेथें कांहीं न चले बळ ॥२॥

आयुष्याचें अंतीं । पडसी काळाचीये हातीं ॥३॥

करी कांहीं पां विचार । कवणाचें घरदार ॥४॥

जनीं जनार्दन एकला । एका जनार्दनीं देखिला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP