३२०१
सानपणें धूरु अढळी बैसला । सानपणें केला कृतकृत्य ॥१॥
सानपणें प्रल्हादें साधियेलें काज । सानपणें सहज बळी पूजी ॥२॥
सानपणें बिभीषण शरण आला । राज्यधर केला श्रीरामें त्यासी ॥३॥
एका जनार्दनें सानपणावांचुनी । ब्रह्माज्ञान जनीं नातुडेची ॥४॥
३२०२
उपमन्यु सान देवासी कळवळ । क्षीरसिंधु तात्काळ दिला त्यासी ॥१॥
सानपणें अर्जुनें साधियेलें काज । श्रीकृष्ण निजगूज सांगतसे ॥२॥
सानपणें उद्धव झालासे विमुक्त । सानप्णें तो निश्चित तारियेला ॥३॥
सानपणें सुख गोपाळ गौळणी । एका जनार्दनीं सदोदित ॥४॥
३२०३
सानपणें तरले अनंत भक्त अपार । जाणिवेचा भार टाकूनियां ॥१॥
सानपणें शुक व्यास नारदमुनि । जाहले मुगुटमणी सानपणें ॥२॥
सानपणें गज तारिली गणिका । उद्धरिला देखा अजामिळ ॥३॥
एका जनार्दनीं सानपणावांचुनी । न चुके आयणी प्रपंचाची ॥४॥
३२०४
सानपणें साधे सर्व येत हातां । जाणीवेने तत्त्वती नागवशी ॥१॥
महापुर येतां वृक्ष तेथें जाती । लव्हाळें राहती नवल कैंचे ॥२॥
चंदनाचे संगें तरुवर चंदन । सानवण कारण संगतीचें ॥३॥
संतांचे संगतीं अभाविक तरती । एका जनार्दनीं निश्चितीं सानपणें ॥४॥
३२०५
जाणिवेच्या मागें होत कुंथाकुंथी । हे तों प्रवृत्ति निवृत्ति मार्ग दोन्ही ॥१॥
जाणीव शहाणीव येथें नाहीं काम । वाचे वदतां नाम सर्व साधे ॥२॥
जाणिव जाणपण नेणिवा नेणपण दोहींचे । अधिष्ठान एकनाम ॥३॥
एका जनार्दनीं नामक परतें आन । दुसरें साधन सीण जगीं ॥४॥
३२०६
विवाद वाद हें तो अधम लक्षण । भक्तीचें कारण न साधे येणे ॥१॥
मुख्य एक करी एकविधपण । सम दरुशनें देखें जगीं ॥२॥
नर अथवा नारी असो भलते याती । वंदावे विभूति म्हणोनियां ॥३॥
एका जनार्दनीं बोध धरी मना । होऊनियां साना सानाहुनी ॥४॥
३२०७
धांवू नको सैरा कर्माचियासाठीं । तेणें होय दृष्टी उफराटी ॥१॥
शुद्ध अशुद्धाच्या न पडे वेवादा । वाचे म्हणे सदा नारायण ॥२॥
एका जनार्दनीं ब्रह्मापर्ण कर्म । तेणें अवघे धर्म जोडतील ॥३॥
३२०८
करितां वेदशास्त्रं श्रवण । गर्वांचें भरतें होय गहन ॥१॥
करूं जातां निजकर्म । कर्मक्रिया अति दुर्गम ॥२॥
कर्म केवळ देह असे । एका जनार्दनें तें नसे ॥३॥
३२०९
चित्त समाधान । सुख दुःख सम जाणे ॥१॥
न करी आणीक उपाधी । निवारली आधि व्याधी ॥२॥
वृत्ति झाली समरस । सेवीं नित्य ब्रह्मारस ॥३॥
एका जनार्दनीं चित्त । ब्रह्मारसें झालें शांत ॥४॥
३२१०
आशेपाशीं नाहीं सुख । आशेपाशीं परम दुःख ॥१॥
आशा उपजली देवासी । तेणें नीचत्व आले त्यासी ॥२॥
आशेसाठीं जगदानी । मागें बळीसी स्वयें पाणी ॥३॥
एका जनार्दनीं आशा । तिनें गुंतविलेंक महेशा ॥४॥
३२११
निराशियाचे भेटी पाहे । वैकुंठींचा राव धांवे ॥१॥
निराशेपायीं न ये व्याधीं । निराशेपायीं सकळ सिद्धी ॥२॥
निराशाचें जेथें नांव । तेथें देव घेतसे धांव ॥३॥
निराशेचा जिव्हाळा । एक जनार्दनीं पाहे डोळा ॥४॥
३२१२
निःशेष कांहीं नेणिजे । तें शुद्ध ज्ञान म्हनिजे । मा सर्व जें जेणें जाणिजे । तें अज्ञान कैसें बा ॥१॥
ज्ञान तें कवण अज्ञान ते कवण । दोहोंचें लक्षण पाहतें पाहा ॥धृ॥
ज्ञानाचें जें ज्ञातेपण । तया नांवाची अज्ञान । अज्ञानाचें जे ज्ञान । तया नांव शुद्ध ज्ञान ॥२॥
ज्ञान तें अज्ञाना आलें । अज्ञान तें ज्ञाना गेलें । एका जनार्दनीं मुलें । बागुलाचीं दोनीं ॥३॥
३२१३
एक म्हणती आत्मा सगूण । एक म्हणताती निर्गुण ॥१॥
एक प्रतिपादिती भेद । एक प्रतिपादितसे अभेद ॥२॥
एक म्हणती मिथ्या भूत । प्रत्यक्ष दिसत जो येथें ॥३॥
ऐसें नानाभेद वाद सकळ । विचारितां अज्ञान मूळ ॥४॥
अज्ञान तें मिथ्या जाणा । शरण एकाजनार्दना ॥५॥
३२१४
सुटला म्हणतां बांधला होता । मुक्त म्हणे त्याचें अंगीं ये बद्धता ॥१॥
बद्धता येथें नाहीं मुक्त ते काई । भ्रांती दो ठाई झोंबतसे ॥२॥
स्वप्नीचेनि सुखे सुखासनीं बैसे । जागा जालिया कांहींच नसे ॥३॥
एका जनार्दनीं एकापणा तुटी । बद्ध मोक्षाची तेथें वार्ताहि नुठी ॥४॥
३२१५
अविश्वासा घरीं । विकल्प नांदे निरंतरीं ॥१॥
भरला अंगी अविश्वास । परमार्थ तेथें सदा भुस ॥२॥
सकळ दोषांचा राजा । अविश्वास तो सहजा ॥३॥
अविश्वास धरितां पोटीं । एका जनार्दनीं नाहीं भेटी ॥४॥
३२१६
मूळ नाशासी कारण । कनक आणि स्त्री जाण ॥१॥
जो न गुंते येथें सर्वथा । त्याचा परमार्थ पुरता ॥२॥
जया सुख इच्छा आहे । तेणें एकान्तासी रहावें ॥३॥
दृष्टी नाणी मनुष्यासी । तोचि परमार्थासी राशी ॥४॥
एका जनार्दनीं धन्य । त्याचा परमर्था पावन ॥५॥
३२१७
अविश्वासापुढें । परमार्थ कायसें बापुडें ॥१॥
अविश्वासाची राशी । अभिमान येतसे भेटीसी ॥२॥
सदा पोटीं जो अविश्वासासी । तोचि देखे गुणदोषासी ॥३॥
सकळ दोषां मुकुटमणी । अविश्वास तोचि जनीं ॥४॥
एका जनार्दनीं विश्वास । नाहीं त्यास भय कांहीं ॥५॥
३२१८
परमार्थ सोयरा अहोरात्र करीं । गाई निरंतरी रामकृष्ण ॥१॥
नरदेहा यातना चुकतील फेरे । वायां हावभरी होऊं नको ॥२॥
रात्रंदिवस करी नामाचाचि पाठ । मोक्षमार्ग फुकट प्राप्त होय ॥३॥
एका जनार्दनीं नामापरतें सार । न करीं विचार आन दुजा ॥४॥
३२१९
शुद्धभावें गावें नाम श्रीहरींचें । भेदभाव साचे टाकूनियां ॥१॥
भोळे भाविक ज्याचा आहे देव जवळा । टवाळास निराळा भास दिसे ॥२॥
अविश्वासियासी होय बोध वायां । ब्रह्माज्ञान तया सांगुन काय ॥३॥
एका जनार्दनीं अभाविक खळ । बोध तो सकळ जाय वायां ॥४॥
३२२०
पक्षी आंगणीं उतरती । तें कां पुरोनिया राहती ॥१॥
तैसें असावें संसारीं । जोंवरी प्राचीनाची दोरी ॥२॥
वस्तीकर वस्ती आला । प्रातःकाळीं उठोनि गेला ॥३॥
शरण एका जनार्दन । ऐसे असतां भय कवण ॥४॥