२६७१
कलीमाजें संत जाले । टिळा टोपी लाविती भले ॥१॥
नाहीं वर्माचें साधन । न कळे हृदयीं आत्मज्ञान ॥२॥
सदा सर्वदां गुरगुरी । द्वेष सर्वदां ते करी ॥३॥
भजनीं नाहीं चाड । सदा विषयीं कबाड ॥४॥
ऐसिया संतांचा सांगात । नको मजसी आदिअंत ॥५॥
भोळियाच्या पायीं । एका जनार्दनीं ठाव देई ॥६॥
२६७२
होती पोटासाठीं संत । नाहीं हेत विठ्ठली ॥१॥
तयांचा उपदेश नये कामा । कोण धर्मा वाढवी ॥२॥
घालुनी माळा मुद्रा गळां । दाविती जिव्हाळा वरवरी ॥३॥
एका जनार्दनीं ते पामर । भोगिती अघोर यातना ॥४॥