|
न. १ दही घुसळून लोणी काढून घेतल्यावर राहिलेला द्रव पदार्थ . घरी कामधेनु । पुढे ताक मागे । - राम ६३ . रसिकी घ्यावी कशास रुचि ताकी । - मोभीष्म १० . ४ . २ सत्वहीन , नीरस पेय , पदार्थ . झाला घालाया घृत - वर्ण नभाचा परासु कवि ताकी । - मोस्त्री ४ . ३९ . [ सं . तक्र ; प्रा . तक्क ] ( वाप्र . ) ताकाचे पाणी , ताकाचाथेंब - नपु . १ ताकाचा थोडा अंश ; थोडेसे ताक . २ ताक ; ताकवणी , दह्याची कवडी , दुधाची धार , लोण्याचा कण इ० दर्शवितो . ताका मिठाक गांठ - ( गो . ) १ ताक व मीठ यांची ( कशीतरी ) भेट . २ ( ल . ) काटकसर करुन कसा तरी केलेला संसार . ताकाला जाऊन भांडे , गाडगे , लपविणे - दुसर्याजवळ काही मागावयाचे झाले तरी ते उघडउघड किंवा सरळ न मागतां आढेवेढे घेऊन मागणे ; दुसर्याची याचना करण्याचे पत्करुन याचनेकरिता तोंड वेंगाडण्यास कचरणे . ताकास तूर लागू न देणे - ( एखाद्या गोष्टीचा दुसर्यास ) बिलकूल थांग लागू न देणे ; टाळटाळी करुन स्वतःच्या मनांतील विचार दुसर्यास समजूं न देणे . ता म्हणता ताकभात समजणे - १ ताकभात शब्द पूर्ण उच्चारला जाण्याच्या अगोदर किंवा त्यातील ता उच्चारल्याबरोबर पुढील क , भा , त ही अक्षरे तर्काने ओळखणे . २ ( ल . ) स्थळ , काळ , वृत्त व वर्तमान इ० कडे लक्ष देऊन कोणतीहि गोष्ट चटकन तर्काने जाणणे ; त म्हणता तपेले समजणे . ( धर्माचे ) ताक पिणे - एखादी वस्तु ( तीहि क्षुल्लक ) घरी मिळणारी असून दुसर्यापासून तिचा अभिलाष धरणे . कोण वर्तणुक कसी रोज स्वदृष्टीने पहातां । समजून पुरतेपणे ताक कां धर्माचे पितां । - होला १०८ . म्ह० जिच्या घरी ताक तिचे वरती गेले नाक = ज्या बाईच्या ताक होते तिला फार तोरा असतो . २ ताकापुरते रामायण = ताक मिळण्यापुरते गोड बोलून ताक देणार्या बाईस खूष करणे . ( ल . ) आपले काम साधण्यापुरतेच दुसर्याचे आर्जव करणे . २ जेवढे ताक ( मिळण्याचा संभव असेल ) तेवढीच खुषामत ; ताक थोडे तर खुषामतहि थोडीच . सामाशब्द - ०कण्या स्त्रीअव . गरीबीचे अन्न ; जाडेभरडे जेवण ; मीठभाकर . [ ताक + कण्या ] म्ह ० ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या =( ल . ) कितीहि उपदेश , कानउघडणी इ० केली , मूळची परस्थिति बदलली तरी जो आपला पूर्वीचा हट्ट , हेका , अवगुण सोडीत नाही त्याला उद्देशून ही म्हण योजतात . ०कण्याचा वि. ( उप . ) अगडबंब ; भोपळसुती ; झोडकाम्या . [ ताक + कण्या ] ०घाटा पु. ताक व ज्वारीचा भरडा ; जाडे भरडे अन्न ; ताककण्या ; कांदाभाकर . ज्या भक्षिती केवळ ताक घाट । - सारुह ३ . १६ . ०तई तय तव तेय तेव त्येय त्येव तोय तोव स्त्री . फोडणीचे ताक ; कढी ; मट्ठा . [ ताक + तोय = पाणी ? ] ०पाणी न. १ ( व्यापक ) दही घुसळणे ; ताक करणे , लोणी काढणे इ० व्यापार . ( क्रि० करणे ). २ ताक , दही इ० ३ जाडेभरडे अन्न ; ताककण्या . ४ ( ल . ) अल्पाहार ; थोडे जेवणखाण . शेजारी दहा पांच ब्राह्मणांची घरे आहेत तेथे समयास ताक पाणी मिळते . [ ताक + पाणी ] ०पिठ्या वि. ताक व पीठ येवढ्या सारख्या लहान बिदागीवरच पुराण सांगणारा ( पुराणिक ), कथा सांगणारा ( हरिदास ); ( सामा . ) अल्पविद्य ; बाताड्या ; तुटपुंज्या ज्ञानाचा . [ ताक + पीठ ] ०पिरा वि. १ ताक पिणारा . २ ( ल . ) घामट ; घाणेरडा ओंगळ . गौळीयांची ताकपीरे । कोण काय पोरे चांगली । - तुगा ३६८४ . [ ताक + पिणे ] मेढा मेढी स्त्री . घुसळखांब . [ ताक + मेढ = खांब ] ०वणी न. फार पाणी घातलेले , अतिशय पातळ , पाणचट ताक . [ ताक + पाणी ]
|