निरंजन माधव - बनशंकरीस्तोत्र

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


श्रीमाते ! बनशंकरी सुखकरी माहेश्वरी सुंदरी

साष्टाग प्रणिपात नम्रशिर हे ठेवोनि पायांवरी ।

आहे दीन तुझा म्हणोनि सदये ! तारी भवाच्या पुरीं

नाहीं अन्य पदावलंब मजला तूंवीण शाकंभरी ॥१॥

इच्छा हे तव पादकंज नयनीं पाहावयाची असे

हा गेहादि उपाधिबंध चरणीं बांधोनि पाडीतसे ।

यातें तोडुनि यावयास सहसा हे शक्ति नोहे मला

जे हे दुर्घट निर्मिली परशिवें मायामयी शृंखला ॥२॥

चित्तीं चिंतन मी करीन म्हणतां वित्तादि चिंता मला

नेती वोढुनि आपल्याच तिकडे द्यावें कसें म्यां तुला ।

कीजे अर्चन सांग सांग विभवाभावीं कसें तें घडे

भाग्यार्थी नृपसेवनादि करणें हें तों मना नावडे ॥३॥

नानास्तोत्र सुमंत्र जाप्य करितां चित्ता जडे कामना

त्या कामीं मन गुंततां सबळता पावे पुन्हां वासना ।

तेव्हां संसृतिमार्ग टाकुनि घडे निःसंगता कैं मला

निः संगाविण पाविजे भगवती कोण्या उपायें तुला ? ॥४॥

नाही भक्ति मनांत युक्ति न सुचे अंबे ! तवाराधनीं

नेणें इंद्रियनिग्रहादिक कथा, वैराग्य कैचे मनीं ? ।

माते ! तूं जरि तारिसील करुणा आणोनि चित्तांतरी

तेव्हां पामर मी तरेन भव हा एकाक्षणाभीतरीं ॥५॥

आतां हेच करी मनीं दृढ धरीं मी त्याच सर्वोपरीं

आहें दीन तुझ्या समर्थसदनद्वारीं भिकारी तही ।

नोहे जाण उपेक्षणीय सहसा त्रैलोक्यरक्षाकरें

द्यावें पादसरोजदर्शन मला जें जन्मजन्मा पुरें ॥६॥

तूं विद्या त्रिपुरा शिवादिजननी माया जगन्मोहिनी

तूं सर्वात्मकविश्वरुपघटना हे ही तुझ्या सदगुणी ।

तूं ब्रह्मादि सुरेंद्रधाम तुझिया योगं चिदानंदना

पावे जीवसमूह हा, भगवती सत्ता तुझी तत्त्वता ॥७॥

मी तों मूढ अनादि बंध घडला नेणोनियां आपणा

मिथ्याहंकृति मानितो जडपणें संबंध दुर्वासना ।

माझें शाश्वत सर्व, मी बुधजनीं सर्वोगुणें आगळा

ऐशी हंसति घोररुप जडली अछेद्य लोहार्गळा ॥८॥

हेंही सर्व तुझें विचित्र करणें लोकीं अविद्यापणें

तोडावा निजबंध मोहमय हा कीजे कृपा आपणें ।

द्यावें दर्शन पूर्ण भक्ति हदयीं त्वहास्यकर्मी मती

मागें माधव नंदनांघ्रियुगळें वंदोनि हे वनिती ॥९॥

॥ इतिश्रीनिरंजनमाधवविरचितं बनशंकरीनवरत्नस्तोत्रं संपूर्णमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP