निरंजन माधव - श्रीसदगुरुस्तव

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


गुरु गुणालया परापराधिनाथ सुंदरा

शिवादिकांहुनी वरिष्ठ तूंचि एक साजिरा

गुणावतार तूं धरोनि या जगासि तारिसी

सुरां मुनीश्वरां अलभ्य त्या गतीस दाविसी ॥१॥

तुझी अगाध कीर्ति वर्णना परायुषें तरीं

घडेचिना कदापि, तैं मदीय दीन वैखरीं

वदेल केंवि ? मानमात्र मी करुं किमर्थ जी ?

मनासि पैस ना घडे न वेदही समर्थ जी ॥२॥

पुराण शास्त्र मंत्र जाल तंत्र यंत्र सर्वही

तुझ्या कृपाबळेंचि सर्व रुढले यया मही

समस्त वाङ्मयामृतासि हत्सरोजकुप्पिका

तुझी विराजली जगत्रयाय तूंचि देशिका ॥३॥

गुरु जया नरा नसे तयासि काय ते दिसे

असोनि नेत्र काय ते मयूरपिछिचे तसे

महाभ्रमें मदांध मोहसागरीं निमज्जती

कलत्रपुत्रगेहवित्तचिंतनासि लागती ॥४॥

अखंड कामिनीमनांत दामिनीसमान ते

कुभोगपंक्ति सर्वही तयांसि साच वाटते ।

अनश्वरत्व नश्वरीं विलोकिताति देखतां

परस्परें जगांत याच मृत्युदुःख भोगितां ॥५॥

शरीर हेंचि आत्मभान जाहलें तयाप्रती

तदर्थ इच्छिताति सौख्य नाशवंत संपती ।

अमित्रमित्रभाव आपुल्या गुणेंचि जाणती

समस्त भूतमात्रकीं दया कदापि नेणती ॥६॥

न साधुवाद टाउका असे तयासि पामरा

तदां विवेक सद्विचार केंवि त्या घडे नरां ।

गुरांहुनी खरांहुनी तयांसि नीच बोलिजे

अपार भार वाहते प्रकासपुट जाणिजे ॥७॥

नसे जयांसि साधुसंगकामना मनांतरीं

सदैव लोभपाशबद्ध गुंतले धनांतरी ।

न वेद धर्म कर्म तार्थ यज्ञ दान साधणें

व्रतादिही न जाणताति सज्जनासि बाधणें ॥८॥

कुळांत कज्जलासमान तेचि शोभती बरे

तयांसि वाहतां धरा भरें बहूत हुंबरे ।

वृथाचि वृक्षजीवनासमान दुष्ट वांचती

पिशाचभूतराक्षसांसमान नीच नाचती ॥९॥

कलींत ते कलिप्रियत्व पावले सुशोभले

तयांसि त्यांसमान लोक वासिती भलेभले ।

मरोनि ते कूतांतधाम पावती न चूकतां

अनर्थ काळदंड दुःख भोगिती यथार्थता ॥१०॥

सुजारिणीसुतासि बापनांव ठाउकें नसे

तयापरी सुखविहीन तत्त्व जाणती कसे ।

गुरु जगांत भज्य तेचि पूज्य या जनांतरीं

सुरी नरी महोरगीं तयांसि वंदिजे शिरीं ॥११॥

तयां तरांसि निश्चयं पहा घडे अधोगती ।

गुरुचि देव धर्म सर्व तीर्थ मोक्ष याविना

नसेचि हाचि निश्चयो नमो नमो तया जना ॥१२॥

जयां गुरुत्व बोधलें तयांसि कार्य साधलें

भवार्णवासि लंघिलें सुविघ्नदुर्ग भंगिलें ।

सहा रिपूंसि जिंतिलें निजात्मतत्व चिंतिलें

परात्परासि पाहिलें प्रकृष्ट दुःख साहिलें ॥१३॥

मनोजनाश जाहला सुखात्मबोध बोधला

मनासि वेध वेधला स्वयेंचि वायु रोधला ।

गिरेसि मौन बैसलें दिठीस तेज पैसल

अनाहतध्वनीस या भरोनि कान ऐकिले ॥१४॥

उदान कंठ रोधिला अपान ऊर्ध्व चालिला

समान मध्य राहिला सुमान कुंभ कीं भला ।

त्यजोनि नीज पन्नगी स्वमार्ग ते धरी उगी

प्रवाळवर्णसाजिरी म्हणोनि वर्णिती जगीं ॥१५॥

षडैकचक्रभेदती सुकुंडली निघे झणी

पिळोनि नाडिकारसासि पुष्ट होय पीउनी ।

हदब्ज तें विकासवी चिदंबरासि दाखवी

सहस्त्र पत्र पाउनी मरंद तेथ चाखदी ॥१६॥

निजस्वरुपलाभ हा ययापरीं घडे पहा

महंत राजयोग हा प्रभाव दाखवी महा ।

अणीक एक सांगतों गुरुपुजेसि लागतों

तयासि भक्तिमार्ग तो मनांत पूर्ण जागतो ॥१७॥

नवापरीं तया घरीं सुभक्ति राबते बरी

वसोनि नित्य अंतरी तया त्यजीचना हरी ।

समस्त भूतजातही हरी दिसे यया मही

हरीविना नसे कही चराचरीं जगत्त्रयीं ॥१८॥

हरीच तोचि जाहला हरीरुपें विराजला

हरीविना दुजी परी न देखतांचि रंगला ।

त्यजोति मान कामना मदादि दंभवासना

अहंकृती कुभावना विटाळ नावडे मना ॥१९॥

जनांत मित्रता बरी ऋजुत्व भावना धरी

असोनियां सदां घरीं नसे तसा दिसे तरी ।

उदार सर्वही गुणें समानदृष्टि देखणें

स्वकर्मभोग भोगणें न लक्षिजे पुरे उणें ॥२०॥

सदां प्रतोष अंतरीं अखंड आठवी हरी

क्षमाप्रसाद सारखाचि थोरलाहनावरी ।

सुसत्ववृत्ति चांगली तयासि गोड लागली

विशेष संतमंडळी मनासि मानली भली ॥२१॥

जयावरी गुरुकृपा तयासि दुर्गुणीं त्रपा

न आतळे तमोरजादि भावना सरीसुपा ।

असाचि सूक्ष्म भक्तिचा निदान सर्व युक्तिचा

प्रभाव विष्णुशक्तिचा गडी प्रधान मुक्तिचा ॥२२॥

गुरु उदार माउली प्रशांतिसौख्यसाउली

जया नरोसि फावली तयांसि सिद्धि धावली ।

गुरु गुरु गुरु गुरु म्हणोनि जो स्मरे नरु

तरोनि मोहसागरु सुखी घडे निरंतरु ॥२३॥

गुरु चिदब्धिचंद्र हा महत्पदीं महेंद्र हा

गुरुप्रतापरुद्र हा गुरु कृपासमुद्र हा ।

गुरु स्वरुप दे स्वथा गुरुचि ब्रह्म सर्वथा

गुरुविना महाव्यथा नसे जगीं निवारिता ॥२४॥

गुरु स्मरा गुरु स्मरा गुणांबुधींत संतरा

गुरुचि एक सोयरा भवीं नसेचि दूसरा ।

गुरुचि काशिकापुरींत मंत्र दे षडक्षरी

सुतारकोपदेश हा करोनि लोक उद्धरी ॥२५॥

शिवाहुनी गुरु असे अधीक हें मला दिसे

नरोसि मोक्ष द्यावया गुरुस्वरुप घेतसे ।

शिवस्वरुप आपुलें न मोक्षदक्ष देखिलें

गुरुत्वं पूर्ण घेतले म्हणोनि कृत्य साधलें ॥२६॥

हरी विरंचि ईश हो महेंद्र चंद्र शेष हो

गुरुभि साम्य यां नये म्हणोनि वेदघोष हो

पुराणशास्त्रआगमीं अनेकधा बुधोत्तमीं

गुरुचि थोर बोलिला म्हणोनि मीं तया नमीं ॥२७॥

गुरुचि बाप माउली गुरुचि दीनसाउली

गुरुचि शिष्यवांसुरांसि कामधेनु गाउली ।

गुरुचि चिंतितार्थ दे गुरुचि तत्व तो वदे

अलभ्य मोक्षलाभ आपुल्या कृपें गुरुचि दे ॥२८॥

गुरुचि भेद नासितो जडांधकार शोषितो

गुरुचि ब्रह्म दावितो गुरुचि ध्यान लावितो

गुरुचि विश्व सर्व आत्मरुप हें बुझावितो ॥२९॥

गुरुचि मूळ दीप रे जगद्रुरुस्वरुप रे

समस्त देवही तदंश दीसताति साजिरे ।

गुरुचि पूर्णसिंधु रे तयांत देव बिंदु रे

गुरु स्वयंभ सूर्य अन्य सर्व ही मयूख रे ॥३०॥

गुरुचि रत्नमाळ रे अणीक भास व्याळ रे

गुरुनभी विशाळ सर्व लोक मेघजाळ रे ।

गुरुचि सर्व दीसतो गुरुचि सर्व भासतो

गुरुचि हा प्रकाशितो गुरुचि सर्व शोभतो ॥३१॥

गुरुचि दिव्य दृष्टि रे गुरुचि सर्व सृष्टि रे

गुरुचि ज्ञानबोध रे गुरुचि सर्व शोध रे ।

गुणांत तोचि विस्तरे मनांत तोचि संचरे

समस्त भूतमात्र चेष्टवोनि एकला उरे ॥३२॥

गुरु विराटरुप रे गुरु हिरण्यगर्भ रे

गुरुचि ॐ त्रिवर्ण पंचवर्ण मुख्यतार रे ।

गुरुचि विश्व तैजसू गुरुचि प्राज्ञ पूरुषू

गुरुविना दुजा नसे श्रुतीस घोष सर्वसु ॥३३॥

गुरुचि ध्येय ध्यान रे जगीं गुरुस मान रे ।

गुरुचि थोर सान रे महासुखा निदान रे

गुरु गुरु गुरु गुरु करीं म्हणोनि गान रे ॥३४॥

गुरुस्वरुप चिंतिजे समाधि हेचि बोलिजे

समस्त वेदपाठ नाम मंत्र जाप्य जाणिजे ।

यथार्थ सर्वतीर्थ सद्गुरुपदाब्जतोय हें

गुरुचि सेवणें अनेक अश्वमेध यज्ञ हे ॥३५॥

नमो गुरु कृपाकरा नमो गुरु गुणाकरा

नमो गुरु परात्परा नमो गुरु महत्तरा ।

नमो गुरु सनातना नमो गुरु मनोन्मना

नमो गुरु सनातना नमो गुरु निरंजना ॥३६॥

षटत्रिपद्यमालिका कवी निरंजनें निका

रचोनि पूजिल्या अखंड देशिकेंद्रपादुका ।

यिला धरील कंधरीं तयासि मुक्तिनोवरी

वरील जाण निश्चयें निजात्मबोधमंदिरीं ॥३७॥

समस्त देव तुष्टती मुनी प्रसाद अर्पिती

निधी समस्त त्या घरीं अनंत सौख्य वर्षती ।

सुकीर्तिलाभ सर्वहीं ययासि होत निश्चयीं

भजा म्हणोनि बापदेवलक्षुमीधरा तुम्ही ॥३८॥

इति श्रीमत्काविकुलतिलकनिरंजनमाधवयोगीविरचितं सदगुरुस्तोत्रं संपूर्णम् श्रीपरदेवतार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP