निरंजन माधव - व्यंकटेशस्तोत्र

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


कुलस्वामी माझा त्रिभुवनपती, वेंकटपती

सदाही सद्भावें सुरमुनि महाभक्त जपती ।

तुझ्या पायां मी या सतत नमितों, दीनशरणा

प्रभू, पंचक्लेशात्मक भवनिधीमाजि तरणा ॥१॥

त्यजोनी वैकुंठा, भुजगगिरिमाथां विलससी,

तथापि त्रैलोक्यीं भरुनि, विभु, संपूर्ण अससी ।

जनाच्या उद्धारा प्रकटुनि महीमाजि विभवा

महामाया तुझी अकळ विबुधेंद्रा विधिभवां ॥२॥

महालक्ष्मी तुझ्या हदयकमळीं नित्य निवसे

तिला विश्रामातें अणिक दुसरें स्थान न बसे ।

प्रिया तुझ्या ठायीं अचपळ गुणें साचचि रमे

जिला ब्रह्मेद्रांच्या सदनिं पळ तेंही न करमे ॥३॥

तळींचा जो होता फणिपति महातल्प घडला

स्वरुपें शैलाच्या तव पदतळीं शीघ्र जडला

नदीस्वामी तीर्थाभिध निकट देवोनि विरजा

हरिते लोकांच्या सकळ कलिसंभावित रजा ॥४॥

सदा जे वैकुंठीं हरिजन तुझे मुक्त वसती

महाद्रीच्या शृंगी तरुउपलभावें निवसती ।

तुझ्या संगीं ज्यांतें सतत रमणें, श्रीप्रियकरा !

तयां कंठे कैसें तुजविण पदीं भक्तनिकरा ॥५॥

तुझ्या ज्या वीभूती असति अणिमाद्यष्ट, महती

वसोनी प्राकारीं करिति भजकांच्या श्रमदती ।

महापीयूषाचा निधि सरस नैवेद्यपद वी

स्वयें अंगीकारी, सकळजनमौभाग्यपदवी ॥६॥

तुझ्या चारी मुक्ती विभुसदन दारींच वसती

तुझ्या सेवे येती जन सुजन त्यांलाच पुसती ।

ध्वजस्तंभाकारें गरुड निवसे सन्मुख, हरी

जनाच्या तापातें क्षण न लगतां जो परिहरी ॥७॥

महानंदाचा ही कळस झळके गोपुरवरी

तुझ्या सद्भक्तांतें क्षणि निरखितां त्यांप्रति वरी ।

सदा प्राकारत्वें प्रणव घडला साच दिसतो

दिठीं लाहे ज्यातें अमृतमय त्यालाच दिसतो ॥८॥

पहा श्वेतद्वीपें धवळ रचिल्या पर्वतशिळा

नुर तैं पापाचा मळ निरखितां कुत्सितशिळा ।

निधी नौही झाले नव दिवस नौरात्र बरवे

तदा ब्रह्मा देवांसहित मुनिसंघेंचि मिरवे ॥९॥

वनें, पुष्पें, वल्ली, फळ, जळ, असे दिव्य शिखरीं

मुरीं नाना रुपें धरुनि असिजे हे श्रुति खरी ।

चहूं वेदीं तुझी अमित महिमा वर्णित दिसे

पुराणां शास्त्रांतें तुजविण दुजा ठाव न दिसे ॥१०॥

रमाकांता ! तुझी अचळगुणसंपत्ति वदतां

गणाधीशा झाली म्हणति अमळा एकरदता ।

फणींद्राची जिव्हा चिरुनि घडली दोनि तुकडे

विधाता चौं तोंडे गणुनि बसला येकिचकडे ॥११॥

रथोत्साहीं तुझ्या विधिहर करीं वेत्रधर ते

सदा सेवेमध्यें असति, विभु, संलघ्न पुरते ।

सुरेंद्राच्या कोटी नमिति विधुसंघांबरमणी

महासंघर्षै तैं गळति मुकुटाचे वर मणी ॥१२॥

अनंतब्रह्मांडोदरगत जन उत्सव घडे

समस्तांचे दैवें, प्रभु, तव कृपाद्वार उघडे ।

जगाच्या कल्याणास्तव निघसि तूं दिव्य वहनीं,

सुधासारें दृष्टी भरति वरदा याच अहनी ॥१३॥

रथीं जेव्हां, देवा, वळघसि, महावैभवधरा,

त्रिलोकीलोकांही अतिशय घडे पीडित धरा ।

सुरां, मर्त्या, नागां, मिसळण पडे याच दिवशीं

तदा साने मोठे म्हणुनि कवणा कोण गिंवसी ? ॥१४॥

सहस्त्राक्षाचीही नयनकमळें तैं न पुरती,

महाशोभा पाहूं म्हणति अमला दिव्य पुरती, ।

तदा दों नेत्रांच्या लघुतर नरां कैं निरखवे ?

न माये ब्रह्मांडीं किति म्हणुनि तैं या हरिखवे ॥१५॥

सुरेंद्राच्या वामा वरुषति शिरीं दिव्य सुमनें

महानंदें गाती चरित भजती नित्य सुमनें

महावाद्यांचेही गजर सुरगंधव करिती

नटी नाट्यारंभीं अभिनय कळायुक्त धरिती ॥१६॥

अशा पुण्योत्साही भजति नियमें भक्त तुजला

यथाशक्ती पूजा करिति, तुळसीपुष्पसुजळां ।

समर्पोनी तूतें, नमिति चरणीं ते तव पदी

महामोदें क्रीडा करिति तुजसी त्यक्तविपदीं ॥१७॥

महानंदाचा तूं जलधि, सुरशाखी निजजनां;

समस्तांच्या चित्ता करिसि अति उत्साह भजना ।

फळाचा दाता तूं; तव पदिं जया काम निवसे,

तयाच्या हस्तीं तें परम पद संपूर्ण गिंवसे ॥१८॥

महायात्रे येथें मिळति धरणीमाजि जितुके

नरांचे नारींचे गण सधन येवोनि तितुके ।

विचित्रें ते लेणीं विविध वसनें भाषण तसें

समस्तांच्या चित्ता कुतुक परभारें करितसें ॥१९॥

विचित्रां वर्णाच्या विलसति पताका, ध्वज किती

ध्वनी वाजंत्रांच्या सुरपति निशाणासि जिकिती ।

विमानांच्या दाटी कुतुक निरखूं पाहति सती,

सुरांगंधवांच्या अतुळ विभवें ज्या विलसती ॥२०॥

त्रयस्त्रिंशत्कोटी जगतिस वसे तीर्थगणना

प्रसिद्धत्वें अन्यें न सरति कदा लेखगुणना ।

समस्तें ते येथें अहिगिरिस सौख्यें निवसती

स्वपापाच्या नाशा विचरुनि सुमोदें विलसती ॥२१॥

समाधी ये स्थानीं सहजचि सुषुप्ती मन लयें

तपें होती येथें करुनि वसतां दिव्य निलयें ।

महापापें तेही घडति सुकृतें भोग समुदा

वेंडे, देवा, तुझ्या भुजगशिखरीं कारण मुदा ॥२२॥

महाशापें कैसा अजगर घडे तुंबर मुनी ?

पडे शैली, दैवें त्रिदिव वळघे तूज नमुनी ।

पहा मोठे मोठे ऋषिवर गुहेमाजि वसती,

स्वरुपें जे मध्यदिनइनसमत्वें विलसती ॥२३॥

विधि प्रार्थी तूतें, त्रिभुवनविभूतें, सुविनयें

रचीतों मी सारें जग; तदपि मातें यश नये ।

वृथा जातो माझा श्रम, सकळ ते व्यर्थ मरतां

न जाती मुक्तीतें तव भजन तें नानुसरतां ॥२४॥

तयांतें मुक्तीची करिसि घटणा स्वल्प सुकृतें,

तदा होती माझी नियत अवघीं सार्थक कृतें ।

अशा या दीनोक्ती परिसुनि, कृपापूर्ण वचनें

तया आज्ञा केली, विधि करित जा लोकरचने ॥२५॥

असे माझ्या येथे धरणिवरि हा पन्नगगिरी;

वसें मीही साक्षात्करुनि बरवी पुण्यनगरी ।

स्वभावें जे येती नर, तरति पाहोनि मजला

पदा जाती माझ्या नियत कथितों व्यक्त तुजला ॥२६॥

किती पूर्वी त्वांही त्रिभुवननुता भक्त घडिले !

गिरिशृंगीं आले सकळ निजधामा दवडिले ।

नसे इच्छा ह्यांतें, तुजविण, निजानंदभुवनीं

प्रभू, वैकुंठींची अभिलषिति हे पुण्य अवनी ॥२७॥

स्वजन्मातें कैसे सुर सकळ धिक्कार करिती ?

जरी दीर्घायुष्यें धरिती, अति संपत्ति वरिती ।

अम्हां नाहीं कैसें जनन घडलें या कलियुगीं

महीपृष्ठी ? व्यर्थ प्रळय अनुभोगूं प्रतियुगीं ॥२८॥

असोनी आम्हांतें वदनकमळीं लंबरसना,

प्रसादाचा यीणें तरि निरखिला काय रस ना ? ।

सुधा पीतों आह्मीं तदपि हरिनैवेद्यगरिमा

नये यीतें; आह्मां कधि करिल हे मुक्त तरि मा ? ॥२९॥

असोनी हे नेत्रें शिखिवरसिखंडाक्षसम तें

न होती आम्हांतें म्हणति कधिही सौख्यसम ते ।

नसे की पुष्पांगीसहित हरि डोळां निरखिला,

सुरेज्याच्या वारी वरि सुमनवर्षे वरखिला ॥३०॥

अम्ही स्वर्गी भोगूं सुख, असुख, संपत्ति दिस ते

वृथा गेले कैसे ? विषयरसिकां फार दिसते, ।

जवांदी, कस्तूरी, घसृणरस, संयुक्त स्रपना

न देखों कीं आम्ही, वर म्हणवितों काय अपणा ? ॥३१॥

अम्ही नाहीं झालों तृणलघु तरी, काद्रवनगीं

वृथा वाहूं वोझें मणिखचित जांबूनदनगीं ।

सदा सद्भक्तांच्या पदकमळकिंजल्करजसा

न वाहोनी नेला त्रिदिवपदिंचा जन्म रजसा ॥३२॥

अम्ही नाहीं प्यालों, मुख असुनि, पादामृतरसा

कसे सोसूं आतां भवरुज महाघोरतरसा ! ।

' हरी, गोविंदा, ' हें वटुनि करताळी न पिटिली

जिणों नेणों कैशी जनिमृति अविद्याभ्रपटलीं ? ॥३३॥

अशा पश्चात्तापें तळमळीति, देवा, अमर ते

बरे कीं त्याहोनी तव निकटिचे दीन नर ते ।

तुझ्या सन्मूर्तीतें निरखिति सदां दृष्टि भरुनी

सुरांतें स्वर्गीच्या जिणिति विभवें हास्य करुनी ॥३४॥

धरा माथांची ते त्यजुनि, वरि आला फणिपती

वराहातें शंका प्रबळ गमली तैं, सुरपती ।

पुन्हा गेली पृथ्वी अधर जरि पाताळभुवनीं,

महा लागें तेव्हां श्रम मजचि, हे भूमिअवनीं ॥३५॥

तदां ये श्रीशैली; धरणि धरिली अंकफल कीं

तुझ्या या सेजारीं बसुनि जग केलें सफळ कीं ।

तुझ्या तीर्थी न्हाती, निरखिति तया लोक नयनीं,

तुम्हां ऐसें तेही पहुडति सुखें शेषशयनीं ॥३६॥

तुला पाहू आला मदन अहिशैलीं, प्रभुवरा,

स्वरुपाच्या दर्पै बहुत चढला त्यासि तिवरा ।

तुझ्या रुपा लाजे त्यजुनि निजदेहा, सुरपती,

अनंगत्वें हिंडे अझुणिवरि लोकीं रतिपती ॥३७॥

तुझ्या सौंदर्याची त्रिभुवनिं तुला एक न दिसे

महालक्ष्मी झाली पदकमळभृंगी मज दिसे ।

नखीं चंद्रज्योत्स्ना अमित निरखी भ्रांतमनसें

महानन्दें लोधे; किमपि तिज देहीं स्मरु नसे ॥३८॥

पदीं शोभा रातोत्पलदळ तसी कोमलपणें.

दिसे नाना चिन्हें ध्वज, कुलिश रेखादि टिपणें ।

प्रवाळाभाटांचा, प्रपद लसती कूर्मसम ते;

नये लोकीं कांहीं अणिक दुसरें यासि समते ॥३९॥

बरें घोटें नीलोत्पलसदृश तेही विलसती,

स्मराचे तूणार्भै अति मृदुल जंघा निवसती, ।

रणन्मंजीरश्री मुनिजनहदब्जा विकसवी;

जणों सद्वोधें तें मन नियत ठायींच बसवी ॥४०॥

उऊ केळी दंडोपम; वर नितंबें युत कटी

महामोलाचा हा पट तदुपरी पीत तकटी ।

क्वणत्कांचीदामा अमल मणियुक्ता मिरविसी

तयाची ते शोभा दिसत अमितोदर रविसी ॥४१॥

वटाच्या पत्रांची उदर समता, मार्दव, धरी

मुनिम्नत्वें नाभीर्‍हद अमृतकूपासि अधरी ।

सुरोमाळी काली दिसत बरवी भृंगपटली

विकासें कंजाच्या मज गमत आतांचि सुटली ॥४२॥

त्रिरेखा त्या रम्या , त्रिजग - उदरीं सीमसरिता

तसी वाटे मातें, त्रिभुवनपती; ध्यान करितां ।

विशालत्वें वक्षस्थळ अवगणी फार गगना

धरी ताराकारें अति धवल त्या मौक्तिकगणा ॥४३॥

भुजा चार्‍ही शाखा विलसति जशा कल्पतरुच्या

स्वदीप्तीनें केल्या मरकतमणीच्या हतरुच्या ।

सनाळें तैसी तें विलसति बरीं पाणिकमळें,

स्वभक्तांतें देती अभयवरदानें सुविमळें ॥४४॥

करें एकें संज्ञा क्षितितळचि वैकुंठ, म्हणुनी

दुजा दावी भक्तां कटिसम भवाब्धीस करुनी ।

पुन्हां दों हस्तांनीं धरि अमल दोनी अरिदरी

त्रिलोकाची दुःखें परिहरुनि, घे दीन पदरीं ॥४५॥

अनर्घ्या रत्नांची जडित दृशमुद्रांगदकडीं,

कृता नाना शोभा स्वतनुवरि भागें वरकडीं ।

पहा, श्रीवत्साचें परम धरिलें भूषण कसें,

जसें फुल्लांभोजीं अणिक दुसरें पद्म विकसे ॥४६॥

हदंभोजी पादांबुज द्विजवराचें विलसलें,

म्हणोनी लक्ष्मीतें पद अचळ तेथें गिंवसलें ।

वसे जेथें नित्योत्सवयुत सती प्रेमभरिता

त्यजी चांचल्यातें निधिस मिळतां जेंवि सरिता ॥४७॥

त्रिरेखा ते कंठीं जलजवर शोभा वरितसे

स्वदोर्दडें लक्ष्मी सदृढ परिरंभें धरितसे ।

तसा या बंधूच्या सतत निकटीं कौस्तुभ वसे

सुधाब्धीच्या बाळां वसतिस दुजा ठाव न दिसे ॥४८॥

मुखाची तों शोभा मदनशत वोंवाळुनि बरी

सहस्त्रार्ची दीपें नियत कुरवंडीस विवरी ।

म्हणों ये तैं कैसा सम तरि शशी पूर्णवदना,

समस्ता शोभेच्या विमलसुखसंपत्तिसदना ? ॥४९॥

मुखीं शोभे मंदस्मित; नयन कारुण्यविभवें

कळा चंद्री ऐशा नसति म्हणुनी तो अभिबवे ।

कलंकी तत्रापी करिल समता आस्यकमळा

घडेना, कंजाक्षा सुचति नुपमा आणिक मला ॥५०॥

सुवृत्ताकारे तें परम मुखपंकेरुह दिसे

जगीं शोभा कोणी चुबुकवर या साम्य न दिसे ।

नये त्याही बिंबा तव अधरबिंबासि समता

रदीं कुंद ज्योत्स्ना, धरि उपमितां ते असमता ॥५१॥

दधि, क्षीरा, मुक्ता, मणि, शशि, सुधा, शंख, धवला,

जिणे तुझी मंदस्मितरुचि न कीजेचि नवला ।

तिळांच्या पुष्पांची जड असम नासासि उपमा;

कळी चांप्याचीही अघड शुकतुंडा अनुपमा ॥५२॥

पुराणीं वाखाणी मुनिनयनपद्मासि समता

मला मानेना तें, कमल - उपमा ते असमता ।

तुझ्या नेत्रा भासावरुनि, जड पंकेरुह कसें ?

जगीं रुढें इंदीवर म्हणुनि तोषंचि विकसे ॥५३॥

कटाक्षस्नेहें जे अमितजनसंताप निवटी,

दिठी, देवा, तुझी सुजनहदयीं ज्ञानदिवटी

प्रकाशी ऐशी हे अमित महिमा यीसि समता

घडेना पद्माची, ह्नणुनि न वदें मी अभिमता ॥५४॥

तुझीं हीं भ्रूयुग्में स्मरधनु असें जे उपमिती

कवीतें मी मानी जडमति; नसे त्यां अनुमिती ।

स्मराच्या मातेतें तुज निरखितां मोह पडिला

मनीं सौंदर्याचा मद अमित होता, विघडला, ॥५५॥

विशाळा या भाळीं मृगमदटिळा भूषित दिसे

यया लोकीं यातें अणिक उपमा साच न दिसे ।

मुखेंदू हा तुझा अमल असतां, श्रीप्रियकरा,

कळंकत्वें शोभे तिलक जनिता तोषनिकरा ॥५६॥

बरे माथांचे हे कुरळ अळीमाळा कृति, पहा

मुखाब्जीं हे तुझ्या विलसति, रमा मानअपहा

श्रुतीं सद्रत्नांची मकरनिभ तें कुंडलयुगें;

प्रभा गल्लद्वंद्वीं प्रकट करिती तें अनुयुगें ॥५७॥

किरीटज्योत्स्ना ते अमित शशिसूर्यासम गमे

विचित्रां रत्नांनी जडित रचिलें काय निगमें ।

समस्तां वेदांतीं अति अमल जें तत्त्व विलसे,

मिसे या माथांचे मुकुट घडुनी फारचि लसे ॥५८॥

प्रभा देहीं नीळी गगनजलदाभें प्रकटली,

तमाळाची इंद्रोपलकसुदभा जेंवि नटली, ।

तथापी जे साजे मणिपदकदीप्ती सुललिता,

घनीं जैशी शोभे परम चपला ते प्रचलिता ॥५९॥

समस्तां सौंदर्या, विभू, तव वपू आस्पद असे

विलोकूं प्रत्यक्षें कथिति सुखागीश्वर असें ।

तुझ्या नाना क्रीडा करिति जगसंमोहन, परी

अरुपी तुं रुपा धरिसि नट तैसा बहुपरी ॥६०॥

तुझ्या कोणा कांही कळल, न घडे, अंत सुरसा;

पहावें तों मायारहित दिससी रम्य अरसा ।

तुझ्या ठायीं बिंबें सकळ प्रतिबिंबें त्रिजग हें;

महादशी जैसे नगर अथ रज्जू भुजग हें ॥६१॥

असें, देवा, तुझें स्वरुप अपरिछिन्न विलसे

तयातें नेणोनी जन अनुभवी दुःखबळसे ।

तसा मीही देवा भ्रमुनि तव मायागुणवशें,

अनंता जन्मांचं श्रम फळचि घेवोनि, जि, वसें ॥६२॥

तुझ्या दासाचा मी न करुनि कसा संग फसलों;

तुझ्या अज्ञानें मीं जनिमरण भोगीत बसलों ।

अविद्याक्लेशांतें अनुभवितसें नित्य नवसे

ययां कष्टें मातें किमपि तरिही सौख्य न वसे ॥६३॥

पुढें आतां, देवा, किति दिवस ऐसेंचि असिजे ?

प्रमोहाच्या तापें तनु निरयकुंडीं बहु सिजे ।

कृपा तुझी व्हावी तरिच सुटका होइल मला,

न लिंपे अज्ञानोद्भव असुखलेशा कलिमला ॥६४॥

दयाळू दीनांचा ह्नणुनि स्वपर्दी बीद धरिसी;

प्रतिज्ञा हे केव्हां तरि प्रभूवरा साच करिसी ? ।

महापापी आहें. मजहुनि जगीं कोण दुसरा,

जयाच्या अर्थी तूं करिसि निजवात्सल्यपसरा ? ॥६५॥

महास्वामी पूर्वी मजहुनि महापापनिपुणा,

मिसें स्वल्पें त्यातें पर पद दिल्हें तुल्य आपणा ।

प्रभूजी, माझा कां विसर न कळे आजि पडला ?

न कां मद्भाग्याचा अझुणिवरि ठेवा उघडला ? ॥६६॥

स्वभक्तांसाठी तूं कळकळिसि, त्यां कष्ट पडतो;

स्वकर्माच्या भोगें अतितर तयां दुःख घडतां ।

त्यजोनी वैकुंठा पळसि लवलांहे क्षितितळा

खगेंद्राच्या खांदीं बसुनि अथवा जासि सुतळा ॥६७॥

गजेंद्रासाठीं तूं झडकरुनि आलासि, वरदा

स्वचक्रें नक्राच्या विदळण करोनी मुखरदा ।

विमानीं वाहोनी निजपुरिस नेला, प्रभू, तरी

भवाब्धीच्या लोटीं घडसि सुजना तूं सुखतरी ॥६८॥

ध्रुवा बाळासाठीं परम पद निर्माण करुनि,

तया दिल्हें, देवा, अचळ अति वात्सल्य धरुनि ।

पदा नेली दुष्टा स्तनविषरसा पीउनि बकी

पवित्रा ते केली परम असतां पापझुबकी ॥६९॥

हरी, तां पांचाळी निरखुनि सभेमाजि उघडी

न लागे तों येसी सजुनि वसनें तें पळघडी ।

असी तुझी दासी असुनि, सुरनाथा, अतिदया

उपेक्षावें दीना मज उचित कीं, दिव्यउदया ? ॥७०॥

लयोदीं भक्तार्थी धरुनि झषरुपें, नरहरी,

हयास्याचा केला वध विहित, जो कां श्रुति हरी ।

महाबोधें सत्यव्रत नृपति तारोनि, सुखदा,

उपेक्षाचें मातें ? जगिं घडल हांसें खदखदां ॥७१॥

समुद्रीं देवांहीं मथन करितां मंदरगिरी

स्वपृष्ठीं वाहोनि बससि फिरतां तो गिरिगिरी; ।

अशा कूर्मा तुला नमन, अमृता पाजुनि सुरां

दिल्ही दैत्येशांतें, कपटयुवती होउनि सुरा ॥७२॥

धरा नेली दैत्यें बळ करुनि पाताळविवरीं,

महाकष्ठें ध्यानीं धरुनि महती सूकरतनू

वधोनी दुष्टांतें क्षिति बसविली तूंचि अतनू ॥७३॥

सुभक्ता प्रल्हादास्तव प्रकट खांबांत घडसी

नृसिंहाकारें तूं कडकडुनि दाढा रगडिसी ।

हिरण्याच्या पोटा चिरुनि निजजानूवरि खळा

बरें केलें देवा, रडति दिनरात्रीं खळखळां ॥७४॥

बळीच्या द्वारीं तूं सजुनि बटुवेषें सुरहिता

स्वयें भिक्षा घ्यावी विहित तुज; आशाविरहिता ।

तयाची पाताळीं स्थिति करुनि तद्वार धरीसी

स्वभक्ताचे ऐसें प्रकट यश लोकांत करिसी ॥७५॥

पुरा क्षत्री झाले धरणिवरि उन्मत्त विभवें

नव्हे त्यांचें दर्पक्षयकरण शक्रें विधिभवें ।

तदा धर्मात्मा तूं परशुधर होतां भृगुपती ।

क्षया नेले राजे, बुधविबुधचित्तांत खुपती ॥७६॥

पित्याच्या आज्ञेनें सहज फिरतां दंडकवनीं

मिसें या सीतेच्या वधुनि दशतुंडासि, अवनीं; ।

तदा केली भाराविरहित, असी कीर्ति पडली

वसे, रामा, लोकीं त्रिभुवनशिरीं हीं प्रकटली ॥७७॥

सुरांच्या त्रातारा, क्षितिवरि महाराज्य करितां

प्रजा सार्‍या तुझ्या विहरति सदानंदभरितां ।

समस्तांतें लोभें भरण करुनी, मोक्षपदवी

दिली सर्वा लोकां श्रुति स्मृति मुखें हेंचि वदवी ॥७८॥

महादैत्येंद्रांही वसुमतिस राजेश्वरकळीं

स्वसामर्थ्ये होतां, धरणि अति भारें कळकळीं ।

विधी प्रार्थी तूतें तप करुनि गोब्राह्मणहिता

म्हणे, ' धर्मा रक्षीं, वधुनि तमरुपासि अहितां ' ॥७९॥

तदा पृथ्वीपृष्टीं अवतरुनि तूं, यादवपती

सुरांचीं सत्कार्यै करुनि रिझवीला सुरपती ।

स्वकीर्तिच्या नावा रचुनि दिधल्या फार सुजना

न जावें त्यां लागे भवनिधि तरायासि विजना ॥८०॥

तुझी बाळक्रीडा त्रिभुवनजना मोहित करी

वसोनी नंदाच्या सदनिं करिसी जे हितकरी ।

यशोदा आनंदांबुधिं तुज निरीक्षोनि सतता

निमग्ना ते झाली, चरितरसकल्लोलवितता ॥८१॥

प्रभू, तूं गोपाळांसह विचरतां गोधनगनीं

तदा केला दैत्यक्षय अमित; त्या कोण विगणी ? ।

महेंद्राच्या दर्पा हरुनि धरिला पर्वत करीं

व्रजाचा कैवारी म्हणविसि महोत्पातनिकरीं ॥८२॥

फणी काळा होता दिनकरसुतानिम्नसलिलीं

असेव्या ते झाली अतितरविषोद्गारकलिलीं ।

तयातें दंडोनी अमृतमय केला सुसरिता

अशा लोकीं लीला तुजविण जगीं कोण करिता ? ॥८३॥

दवाग्नी भक्षावा, कवण असलें हे बळ धरी ?

नसे लोकीं कोणी तुजसह विरोधें छळ धरी ।

महाराजे कंसादिक अमित तुझ्या करतळी

विनाशा पावोनी, रणि पहुडले या क्षितितळीं ॥८४॥

कुरुक्षेत्रीं केले कुरुमथन तां पांडवमिसें

न दे धर्मा जो कां खळ गिळुनि सद्राज्य अमिसें ।

सुगीता पार्थातें परम उपदेशासि करुनी

महापीयूषाची जगिं विरचिली वृष्टि भरुनी ॥८५॥

क्षितीद्रांच्या कन्या हरुनि निजतेजें भुजबळें

समस्तेंही केली हतमद महाक्षत्रियबळें ।

प्रियेच्या संतोषा सुरतरुसि या मृत्युभुवनीं

प्रतिष्ठा केली, तां जिणुनि सुरवर्गा गृहवनीं ॥८६॥

उदारा त्वद्गाथा श्रवण करितां सज्जनवरीं

बसावें वैकुंठीं, म्हणति मन आश्चर्य न वरी ।

जडें, मूढें, तेही अमित तरती पामर तरी

पहा, झाली दीना कलिमलजलीं पावन तरी ॥८७॥

अहिंसाधर्मातें कलियुगजनां बोध करुनी

महापाखंडातें मिरविसि परा बुद्धि वरुनी ।

तदां तुझ्या बुद्धाकृतिस भजती लोक समुदें

न जाणो ये त्यांतें नियत तव मायाच भ्रमु दे ॥८८॥

महापापें झाला, कलिमल जगीं रुढ, सदया;

नसे तेव्हां लोकीं सुजनसुपथाचार, सुदया, ।

तदा म्लेंच्छप्राये नर वसति, त्यां पापनिरतां

स्वयें कल्कीरुपें वधिसिल पुढें काळ सरतां ॥८९॥

जधीं होतो धर्मक्षय, पथ विधीचा बिघडतो,

हरी ! तेव्हां तेव्हां धरिसि अवतारा उघड तो ।

पुन्हां स्थापी धर्मा नियतचि, अधर्मक्षय करी

असी लीला तुझी त्रिजगकलुषा पावन करी ॥९०॥

अनंता योगांच्या असति महिमाऽनंतपरिच्या

अनंतत्वें मूर्ती प्रकटति तुझ्या दिव्य हरिच्या ।

तयांचीं चारित्रें श्रुतिस वदवेनात तितुकीं

गुणाढ्या जें झालीं कवण कवणासीं मग तुकी ? ॥९१॥

असा तूं या लोकीं अति महिम, देवा, विलसितां

जगीं ख्याती तुझ्या हरि करितसे रक्षण सता ।

पुन्हां कां हे चिंता अमित मज ? जाता, परिहरी

त्वरें आतां, देवा, विमल सुख देई नरहरी ॥९२॥

सुरांच्या संताना, सुरभि निज दीना तरण कां

दरिद्रांतें चिंतामणि असुनि, नोहे हरण कां ? ।

विपत्तीअज्ञानोद्भव परिहरीं पंच कलुपें

महाकष्टें, दुष्टें, जड, निवटि विज्ञानकुलिशें ॥९३॥

तुझी माया आतां करुनि उपसंहार, मजला

प्रभू, दे सदभिक्षा; परम पुरुषा, याचित तुला ।

सुवैराग्यें चित्तें तवपदजनीं संगति घडो

तुझ्या भक्तिप्रेमें निजजननसंताप विघडो ॥९४॥

तुझ्या रुपीं अंतः करण रत हो काम घसरो

भवभ्रांतीचा हा परम वळसा सर्वहि सरो ।

मुरो पायीं माझे मन नमन तूंतें सुरपती

पतीतोद्धारा तूं गरुडगिरिवासा यदुपती ॥९५॥

समस्ता सृष्टीच्या नियत करिता, तूंचि धरिता

प्रभू, नाना माया स्रजिसि अति आश्चर्यभरिता ।

पराद्धातीं सारे करुनि निजरुपांत विलया

चिदानंदा, एका, उरसि, जगदानंद लिलया ॥९६॥

महाभूतीं, भूतीं, प्रकृतिपुरुषीं, तत्त्वनिवहीं

तुझ्या ठायीं सर्वी प्रकटुनि असावेचि प्रवहीं ।

समस्तां जीवांच्या हदयिं वससी तूं, चितिमया

तुझीं स्तोत्रं आम्हां करवसि किती, जी, श्रुतिमया ? ॥९७॥

क्षमा कीजे मी जें तुज अमित वाचाळ वदलों

तुझ्या निंदाव्याजें जरि असन चित्तांत मुदलों,

प्रसन्नादृष्टीनें परमकरुणेने निरखिजे

जसा देखे मातें मनिंच अपल्या पामर खिजे ॥९८॥

क्षमापूर्णा, तूर्णा करुनि करुणा तूं करि धरी

मदिया दैन्यातें परिहरुनि धन्या करी धरीं ।

कृपाळा, गोपाळा, दशरथसुता, नंदकुमरा

असीं नामें वाचे वदविं अति दुर्लभ्य असरां ॥९९॥

मुकुंदा, गोविंदा, प्रतिपद असी नामलतिका

मुखी राहो; गावो तव चरितगाथा महतिका ।

गुणाढ्या, सर्वाढ्या, परम पद सौवर्ण मुखरी

तटी झाले मातें विदित कथितां वेदमुखरीं ॥१००॥

असों यावी आतां, विभु, मजवरी पूर्ण ममता

विचित्रा या भूतीं मज घडविजे सर्वसमता ।

महाशांतीचा तूं वर वरद होई निज जना

कृपेनें तूं लावी निजचरणकल्हार - भजना ॥१०१॥

शतश्लोकीं माळा विरचुनि पदें मुक्त समते

पदीं पुण्यश्लोकार्पण करितसे सद्रुरुमतें ।

प्रसादत्वें यीचे ग्रहण करितां सज्जनवरीं ॥१०२॥

मनीं ज्याला आहे त्रिविध पुरुषार्थी अभिरुची

अनायासें पावा, न करुनि महाकष्ट कुरुची ।

सुवाग्रत्नज्योत्स्ना लखलखित जिव्हाग्रपरळीं

स्वसंतोषें नीराजन करुनि भावें अविरळीं ॥१०३॥

अहो वाक्पुप्पाळी भरुनि रसनेच्या करतळीं

समर्पा हे पुष्पांजुळि हरिपदाब्जीं क्षितितळीं ।

घडावें धन्यत्वें सकळ सुजनामाजि विभवें

तदां तुम्हां बाधा कधिसहि नव्हे या कलिभवें ॥१०४॥

हरीच्या भक्तांते कधि अशुभवार्ताचि न घडे

सदा ऐकों कानीं श्रुतिगदित हे बोल उघडे ।

यशा आयुष्याची धनकनकअन्नें विपुलता;

असो कन्यापुत्रांसहित विततां संततिलता ॥१०५॥

रणीं लाभे त्यातें जय भय न बाधी नृपकुळीं

असावें तद्वर्श्ये सकुळ; घडती साच अकुळीं ।

रिपूंच्या नाशार्थी पठण करितां, षडिपुंसहि

जिणे, ऐशी याची अतुळ महिमा हे श्रुतिसही ॥१०६॥

अहो या स्तोत्राची वदवल किती दिव्य करणी ?

समस्तां श्लोकीं हे अतिमुखर शोभे शिखरिणी ।

गुणज्ञांनी घ्यावी तरिच गिंवसे सदुचि यिची

अभक्तां, मूढांतें, असुखफल देणार रुयिची ॥१०७॥

हा श्रीवेंकटराजसुस्तव असे, सद्भक्ततोषा करी,

दे सज्ञान, विरक्ति, भक्ति, सुजना आनंदरत्नाकरीं ।

ठेवी, नित्य महोत्सवें म्हणुनियां देवाचिये सन्निधी

सायंप्रात पढोनि नित्य मिळवा त्या अष्टसिद्धी निधी ॥१०८॥

योगी - निरंजन, रमापति, वेंकटेशा

स्तोत्रे स्तवोनि भवबंधकरी विनाशा ।

प्रार्थी समस्त सुजनां मम दोष, देवा,

टाकोनि सन्निध करा विभु वासुदेवा ॥१०९॥

॥ इति श्रीमन्निरंजनमाधवयोगीविरचितं श्रीमद्वेंकटेशस्तोत्रम् ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP