श्रीज्याची ललना, भुजंग शयना, पुत्रत्व पद्मासना,
पक्षी तो वहना, समुद्र सदना, वाणी रती या सुना ।
कंठीं कौस्तुभ भूषणा सुखघना प्राधान्य पंचानना
सारें विश्वकुटुंब राज्य गणना त्रैलोक्य नारायणा ॥१॥
राजे थोर धरातळीं अतिबळी ते रावणें जिंतिले
स्वर्गीचे सुर गेहकार्यकरणीं जेणें सदा योजिले ।
पाताळीं उरगांगना हरुनिया चूडामणी घेतले
द्वारीं नित्य उभे नवग्रह, असे बंदीं किती घातले ॥२॥
मंत्राचें बळ राहिलें, ऋषिवरी यज्ञक्रिया टाकिल्या,
रोडेले अमरेंद्र भाग हरितां आंगीं शिरा वाहिल्या ।
धाकें कांपतसे सदा वसुसती भीवोनि त्या रावणा
लोकीं अन्य सदा समर्थ न दिसे त्रैलोक्यसंरक्षणा ॥३॥
जेणें शंकर अर्चिला निजकरें वाहोनि दाहा शिरें
तेणें तुष्ट पिनाकपाणि वर दे वोपी तया सादरें ।
' स्वर्गीचे सुरयक्षकिन्नर महादैत्येंद्र राजे बळी
ते होतील हतप्रभाव समुदे तूझ्या प्रतापानळीं ' ॥४॥
यक्षा जिंतुनि यानपुष्पकनिधी घेवोनि गेला घरा
आला ऐकुनि दिकपती दशदिशा त्या टाकिती सत्वरा ।
स्वर्गीचे मणि पारिजात समुदे लंकांगणीं आणिले
धेनू कामदुधा हयोत्तम करी द्वारीं बळें बांधिले ॥५॥
रागें रावण निंदिती सुरपती जावोनि विष्णुप्रती
झालें वृत्त समस्तही विनविती बोले तया श्रीपती ।
होतों दाशरथी, तुह्मी वसुमती घ्या वानराच्या बुथी
आहे दुष्ट किती वधोनि कुमती सतोषऊं ते क्षिती ॥६॥
मंत्री मेळविले अजात्मज करी संभार यज्ञीं बरा
तेव्हां राघव जन्मला, नृपतिला आनंद झाला पुरा ।
नेला अध्वररक्षणा मुनिवरें मार्गी वधी ताटिका
केली मुक्त पदीं चतुर्मुखसुना नामें अहल्या निका ॥७॥
जनकनृपतिगेर्ही भंगिलें चाप रामें
परिणिलि मग सीतादेवता सार्वभौमें ।
पथिं भृगुतनयाचा मान सिद्धीस गेला
रघुपति युवराज्यीं स्थापनीं नेम केला ॥८॥
यथातथ्य वाणी पित्याची कराया
सवें घेतली जानकी भव्यकाया ।
त्वरें चालिला दंडकारण्यपंथें
जनस्थान गोदावरी तीर्थ जेथें ॥९॥
जगन्नायकाची हरी धर्मदारा ।
दशग्रीव कापट्यवेषें उदारा ।
वधी राम वालीस सुग्रीवसंगें
तरे वारिधी जाय लंकेसि वेगें ॥१०॥
येथ राघव पातला परिघ हा शाखामृगीं घातला
बांधाया गज मातला बिसगुणें इच्छा धरी मातला ।
हा तों मानुष पूतळा निजकरीं नाराच हा धूतला
वक्षीं तीखट रुतला कपिदळीं पाडीन त्या भूतळा ॥११॥
रामासीं झगडावयासि निधडा लंकेश आला पुढां
रामें बाणसडा करानि करडा त्या नाचवीलें धडा ।
सैन्याचा रगडा सवृक्ष दगडा तो हाणितो माकडा
वाहे रक्त भडाड रावणदळीं केला शिरांचा हुडा ॥१२॥
मारी रावणकुंभकर्ण समरीं त्या मेघनादासवें
सीता सोडविली बिभीषण पदीं संस्थापिला वैभवें ।
आला तो शरयूतटासि भरता भेटे पुन्हां भूपते
शोभे राज्यपदीं सुबांधवजनीं पूर्णेदु सीतापती ॥१३॥
ऐशी हे रघुनाथकीर्तकथाशृंगारहारावळी
नामें मुक्तमणी चरित्रपदकें भक्तीसुतें गुंफिली ।
कंठीं भूषण शोभतांचि भुलल्या त्या मुक्तियोषा बळें
त्यांचा संग निरीक्षितांचि रुसल्या गेल्या कुबुद्धी पळें ॥१४॥
हे गाथा यशलाभ या क्षितितळीं सर्वार्थही भेटवी
अंतीं रामपरायणासि पदवी वैकुंठिंची दाखवी ।
केली माधवनंदनें कविवरें मंत्राद्यहारावळी
तेरा गुंफुनि पावला गुरुकृपें धन्यत्व सन्मंडळीं ॥१५॥