निरंजन माधव - श्रीहनूमंतस्तोत्र

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


वृत्त - स्रग्विणी.

 

अंजनीगर्भवैरागरीचा मणी । भक्तचिंतार्थ देणार चिंतामणी ॥

शोभतो वीर विख्यात चूडामणी । हीनदीनाजना मुख्य रक्षामणी ॥१॥

अर्जुनाच्या ध्वजस्तंभिचा जो मणी । वानरस्तोमनक्षत्रतारामणी ॥

शौर्यवारांनिर्धमाजि मुक्तामणी । देखिला लोचनीं मारुती सन्मणी ॥२॥

धाक वाहे मनीं नित्य लंकापती । पापतापादि ज्या देखतां कांपती ॥

कामलोभादि दुर्वार हे लोपती । तुष्टवी सेवनें राम सीतापती ॥३॥

मारुती रामभक्ताग्रणी स्तव्य हा । ब्रह्मचर्यै विराजे सदा भव्य हा ॥

शांत हा दांत हा वीर हा शूर हा । दुष्ट रात्रिंचराच्या गणा क्रूर हा ॥४॥

हाच रुद्रावतारी प्रतापी हरी । संगरीं राक्षसांच्या कुळा संहरी ॥

जानकीशोकसंताप कर्ता दुरी । मानवां भक्तियोगेंचि हा उद्धरी ॥५॥

शंभरा योजनांचा उडे वारिधी । एकला जाय लंकेंत हा धीरधी ॥

राममुद्रा सतीच्या करीं अर्पिली । सौख्यवार्तासुधासेचनें सिंपिली ॥६॥

तोषवीली रमानायकाची प्रिया । शोकसंतप्त ते जाहली निर्भया ॥

वाटिका ते अशोकाभिधा नाशिली । कोटिशां किंकराची फळी त्रासिली ॥७॥

मारिला पुत्र तैं रावणाचा बळी । सैन्यही फार युद्धांगणीं निर्दळी ॥

जाळिली हेमलंका अलंकारिता । वाटला हाचि संवर्तसंहारिता ॥८॥

जानकीक्षेमवार्ता वदे राघवा । वानरीभार संयोगिला आघवा ॥

राम वाहोनि खांदीं बळी हा निघे । आहवीं राक्षसांचा बहू जीव घे ॥९॥

लक्षशा योजनें जो उडे अंबरीं । मस्तकीं वाहिला द्रोण मोठा गिरी ॥

आणिला लक्ष्मणा जीववायाप्रती । विघ्नकर्ता वधी काळनेमी पथीं ॥१०॥

बाळ तात्काळ उत्पन्न होतां क्षणीं । जो उडे बाळभानूचिया भक्षणीं ॥

पाहिलें ताम्र पक्वान्न तैशापरी । पांचशें योजनें लंघितां अंबरीं ॥११॥

इंद्रवज्रपहारें पडे भूतळीं । भूधराचें करी चूर्ण आंगातळीं ॥

वायु रोधी जगत्प्राण तैं निर्जरा । भीति वाटे मनीं मृत्यु आला घरा ॥१२॥

देव तेत्तीस कोटी तदा पातले । ब्रह्मरुवेंद्र ज्यांमाजि ते आगळे ॥

वायुपुत्रासि वज्रांग केलें तदा । दीर्घजीवी असो हा यशस्वी सदा ॥१३॥

यापरी देत आशीगिंरा सर्वही । हाचि पावेल सत्कारसर्वा मही ॥

तोषवीलें सुरांनीं असें वायुला । तैं पिता मोदसिंधूंत उन्मज्जला ॥१४॥

तैं घडे मारुती सर्वदेवागळा । रामदासांत हा शोभला एकला ॥

वेदशास्त्रें पुराणें जया वानिती । भाट याचे कवी सर्व वाखाणिती ॥१५॥

यासि जे वर्णिती धन्य ते या जनीं । धन्य ते लागती याचिया पूजनीं ॥

वेदसंपन्न ते धान्यरत्नें धनें । शोभती मंदिरीं पुत्रदाराजनें ॥१६॥

ऐहिकामुष्मकीं ते सुखें भोगिती । जे यया अंतरीं सादरें चिंतिती ॥

श्रीहनूमंत हें नामवाणी जपे । तो तरे या भवाब्धींत पैं साक्षपें ॥१७॥

वंदिजे पूजिजे घ्यायिजे पाहिजे । मारुती मारुती नाम हें गाइजे ॥

वातपुत्रा महावीर्यवंता हरी । अंजनीसंभवा सद्भटीं केसरी ॥१८॥

दुष्टगर्वापहारी असें चिंतिती । मानवी तेचि सर्वार्थही पावती ॥

जिंतिती या जगीं षडिपूंचीं दळें । बाधिजेना कधीं या कळीच्या मळें ॥१९॥

जाणुनि श्रेष्ठ यातें बनाजी कवी । रात्रिवारीं नमी पादपद्में स्तवी ॥

सुप्रसन्नें मनें लागला सेवना । याविना दूसरी त्या नसे कामना ॥२०॥

इतिश्रीमन्निरंजनमाधवविरचितं श्रीमद्धनुमंतस्तोत्रं संपूर्ण श्रीरामार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP