निरंजन माधव - श्रीभागीरथीस्तोत्र

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


विष्णूच्या पादपद्मीं वससि शिवजटेमाजि तूं देवगंगे

ब्रह्माच्या तोयपात्रीं विलससि अमले मृत्युसंसारभंग ।

स्वर्गी मंदाकिनी तूं म्हणविसि धरणीमाजि भागीरथी तूं

पाताळीं तुज भोगावति म्हणति शिवे ! तूं जगा मुक्तिहेतू ॥१॥

तीघां देवां त्रिलोकां तुजविण दुसरी भूषवाया असेना

उद्धराया जगातें तुजसम आणखी साच कोणी दिसेना ।

यासाठीं देव तेही पितृगण समुदें ते ऋषी दीर्घदर्शी

तुझ्या तीरींच सारे निवसति अमये ! सर्वदा पूर्णहर्षी ॥२॥

चर्माचीं वसनें जटा मिरवणें प्रेतावनीं राहणें

सर्वागी शवभस्म शुभ धरणें भिक्षान्न तें भक्षणें ।

भूतांसीं सहवास नित्य करणें मत्तापरी नाचणे

ऐसा ही शिव जाहला शिव शिवे ! त्वत्तोयसंधारणें ॥३॥

कित्ती ते खग ते किती फणिपती तें पीतवस्त्रें किती

कीत्ती कौस्तुभशंख अंबुजगदा चक्रायुधें तें किती ।

त्वत्तोयीं तुझिया तिरीं तनु किती गंगेजळीं मज्जती

ते जंतु शुभलक्षणें दृढ अशीं घेऊनियां उठती ॥४॥

गंगे ! मंगळरुपिणी तव जळीं आश्चर्य म्यां देखिलें

स्नानार्थी उदरीं प्रवेश करितां या मानवां लाधलें ।

कंठीं नीळ शरीर शुभ्र निडळीं अग्नी गळां वासुकी

वामांगीं अबळा वृषासन करीं खद्वांग ये कौतुकी ॥५॥

अंबे ! हें तव तोय चित्र विलसे वाचे नये बोलतां

केले स्नान तयासि म्यां निरखिलें होतां असें तत्वता ।

अर्धागी स्तन हेमवर्ण नयनीं फुल्लाब्ज वेणी शिरीं

अर्धागीं शशिगौर नीळगळ तो भालाक्ष मुंडे धरी ॥६॥

गंगे ! निर्मळशंबरांत तुझिया ऐसें कसें उद्भवे

एकांगीं घननीळ हेमवसनें चक्रांबुजें गौरवे ।

एकांगीं शशिखंड भूषित दिसे प्रालेयगौराकृती

स्नानें प्राणिगणासि साच वरितें हें रुप कैचें सती ॥७॥

होतों मत्त मतंग मीं वृषभ मीं मार्जार मीं श्वान मीं

होतों ग्रामवराह काक बक मीं गोमायु मानुष्य मीं ।

त्वत्तीरीं निधनासि पाउनि असे भागीरथी जे नवे

झाले शंकर तोषयुक्त वदती अन्योन्य ते आघवे ॥८॥

त्र्यैलोक्येश्वरि जान्हवी ! तव तटीं प्राणी लया पावले

तेही श्वानशृगालवायसगणीं वोढोनियां भक्षिले ।

ते गेले विधिच्या पदा मणिमयीं सत्पुष्पकीं शोभले

देवीसीं रमले सुराप्सरगणीं विद्याधरीं गायिले ॥९॥

क्षेत्रीं जे समरांगणीं निवटती कीं योगवेत्ते यती

जाती भेटुनि सूर्यमंडळ अशी वाहे निशाणें श्रुती ।

अंबे ! त्वज्जळसाम्यता न पवती संग्रामयोगस्थिती

प्राणी सेवन बिंदुमात्र करिती वैकुंठ ते पावती ॥१०॥

त्वत्तोयीं जरि स्वल्प कीकस पडे पापी कृती तो घडे

तो देवेद्रपदा चढे सुखधूसंभोग त्या आतुडे ।

जो तुझ्या सलिलीं बुडे त्रिषवणी साष्टांग पायां पडे

पूजी प्रेमदृढें शिवे ! तरि तया कां मुक्ति येना पुढें ॥११॥

स्वर्गगे ! तुझिया जळी सुरसती येती सदा मज्जना

तद्वक्षोरुहकुंभकुंकुमरजें ये पीतता जीवना ।

तेथें स्नान करोनि पूत घडती या मानवांची गणें

जाती कोटिकुळांसमेत हरिच्या सच्चित्पदाकारणें ॥१२॥

व्याध्रीकूरजरामुखीं चघळिले रोगानळे भर्जिले

नानादुःखविपत्तिदुष्कृतमहावैरीगणीं तर्जिले ।

ते तूझ्या पुलिनांगणीं भगवती ! पंचत्व जैं पावले

झाले ते तरणे नवे सुखधूचित्ता हरुं लागले ॥१३॥

यज्ञातें करणें तपानुचरणें ऐंद्री पुरी पावणें

पुण्यातीं पतनें पुन्हां जननिच्या गर्भालयीं कष्टणें ।

हें सारें जनबोलणें तंव असें भागीरथी मीं म्हणें

जों नाहीं तव तोयपान घडलें या मानवाकारणें ॥१४॥

हो कां तो यमदंड दुर्धर तसे तद्दूत भीषाकृती

हो कां वैतरणी सुदुस्तर अशी पत्रें वनेंही अती ।

कुंभीपाकमुखादि रौख महा या यातनाही तरी

गंगे ! त्वज्जलबिंदुमात्र जठरीं ना प्राशिला तोंवरी ॥१५॥

काशाला अमरीपुरी सुखकरी कैलास काशा गिरी

कां जावें हरिमंदिरीं वसतिला भागीरथी शंकरी ।

त्वत्तोयीं शफरीकुलीरमकरीमंडूकता ते बरी

नेच्छी मी दुसरी कदा गति सरिन्नाथे ! नमो सुंदरी ! ॥१६॥

झाला अंतकदंड पुंडरिकसा ते पाश झालीं बिसें

झाले ते यमदूतहीं बुजवणें शेती तृणाचें जसें ।

तो मित्रात्मज मित्र होउनि पुढें ये जान्हवीदर्शना

त्वत्तीरीं क्षणमात्र राहुनि सुखें जे सेविती जीवना ॥१७॥

झालें कीं मरणेंचि मंगळ तुझ्या तोयार्द्रदेहा जना

झालें जीवन धन्य तें तव तटीं वस्ती जया पावना ।

स्वर्गातें तृण मानिताति तुझिया गंगामृता पीउनी

येहीं काय विशेष सांग करणें लोकांतरा जाउनी ॥१८॥

विष्णू हो शिव हो विरंचिपद हो भागीरथी तूं विना

जे कां मानिति थोर त्या गति नसे मायांधका दुर्जना ।

त्वत्तोयीं करितांचि मज्जन तयां ईशत्व ये तत्क्षणीं

आयी सागरनायिकं ! न मनतीं मातें वृथा बोलणीं ॥१९॥

वोघें एक भगीरथें स्वपितरां मोक्षासि नेलें सती

गोहत्या मुनिगौतमें निरसिली एकाप्रवाहें क्षिती ।

ते अद्यापि अनंतकोटिपितरां मोक्षार्थ संपादिती

पापी या कलिचे अनेकपरिचीं ते पातले क्षाळिती ॥२०॥

गंगागंगा म्हणोनी जपति जरि सुखें अंत्यजांत प्रतोषें

गांवें लक्षावधीही वसुनि सुमनसें त्यांसि तें होय ऐसें ।

जे तुझे तीरवासी लभति पद तशा सत्पदालागि जाती

तेही तूझ्या कृपेनें हिमगिरितनये ! श्रेष्ठजाती विजाती ॥२१॥

येतां म्लेंच्छपुलिंद भिल्लशबरां त्या धीवरां अंत्यजां

त्वत्तीरीं जळसेवनार्थ अथवा हिंसार्थ हो तोयजां ।

तेही पावति सद्गतीस तुझिया गंगामृतस्पर्शनें

ताराया तुजला निवाड सहसा नाहींच हें मी म्हणे ॥२२॥

तूतें हा जन दूर राहूनि भजो तीरासि येवो सती

तोयीं मज्जन आचरो उदक हें सेवोच भागीरथी ।

त्यागो देह तुझ्या सुरम्यपुलिनीं नेसील मुक्तीप्रती

नाहीं ते यमभीति या कलिजना तूं वर्ततां या क्षिती ॥२३॥

कृष्णा हो भयमोचनी भवहरा हो भीमरा सर्वदा

कावेरी कलिनाशना तरि असो ते नर्मदा शर्मदा ।

एकांशासि तुझ्या तरी न पवती कोटींत भागीरथी

त्यातें तूं करितेसि पावन जळीं राहोनि त्यांच्या सती ॥२४॥

तूं तों विष्णुपदी तुला नर नदी सामान्य जे भाविती

त्यातें ते यमदूत बांधुनि महा दुर्यातना दाविती ।

ते होती शत जन्म कोलकुतरे गोमायु गोपुच्छहीं

होती कुक्कुट काक कंक खर ते ना सूटका त्या कहीं ॥२५॥

तूं ब्रह्मद्रवरुपिणी अजहरां त वंद्य नारायणी

तूं सर्वेश्वरशक्ति सर्वघटणी मायामळक्षाळणी ।

तूं जीवांस शिवस्वरुपकरणी संतापंसहारिणी

तूं भागीरथी ! शंभुमस्तकमणी त्रैलोक्यसंतारिणी ॥२६॥

आतां या कलिच्या जना भय नसे येतां तुझ्या दर्शना

जातीं पाउलपाउली अघगणें नासोनि सर्वात्मना ।

तूझ्या या अमृतोपमानसलिला आलोकितां वंदितां

येतें पुण्य शताश्वमेधकृत तें आपामरां सर्वथा ॥२७॥

आहेता सरिता उदंड सरितानाथासि कांता प्रिया

श्रीहैमाचलपुत्रिके ! तव तुला कैं पावती वो तिया ।

एक्या बिंदुजळेंचि विष्णुपदवी पाप्यांसिही अर्पिसी

तूझें नाम सकृत् जपे तरि तया सौख्यार्णवीं ठेविसी ॥२८॥

आम्हां केवळ आळशां निरखितां सत्कर्महीनां जडां

मायामोहमदाभिमानकलुषां अज्ञानवंतां मुढां ।

तूं तो दीनदयाळ तारक जना या भूमिलोकाप्रती

माये ! आलिप्त सत्य जाण अमुच्या भाग्येंचि भागीरथी ॥२९॥

तूं विश्रांति निजानुभूतिसुखदा होसी सदा सन्मता ।

संन्यासी निजवस्तुचिंतनबळें धामासि ज्या पावसी

अंबे ! त्वज्जळसेवनें अबुधहीं तद्रूपता लाहती ॥३०॥

देवि ! त्वत्तटमृत्तिकेसि समते येनाच चिंतामणी

भाळीं भूषवितां भवाप हरुनी देते भवत्वा जनीं ।

मात्रा हे तरि मृत्युपाशशमनीं मंदासि मंदाकिनी

मोक्षाची घटका म्हणोनि सहसा मीं वंदितों सन्मनी ॥३१॥

त्वत्तीरस्थितमृत्तिकोर्ध्वतिलकें त्वदध्याननिष्ठामनें

कंठीं श्रीतुळसीस्रजें हरिपदांभोजर्पितें पावनें ।

ऐसे हे तव भक्त शोभति सती ! प्राणप्रयाणोत्सवीं

ते झाले अतिधन्यमान्य जगतीं ते जन्मले मानवीं ॥३२॥

तूझें जैं पररुपचिंतन किजे निर्नामरुपात्मजें

सच्चिन्मात्र सुखस्वरुप भरलें विश्वांत्तरीं पूर्ण जें ।

हें तूझें द्रवरुप तारक जना प्रत्यक्ष भागीरथी

तूं आहेसि जडांसि निर्गुणपदा नेणार तूं सारथी ॥३३॥

फुल्लांभोरुहवक्रनीळनळिनें केशावळी साजिरी

नेत्र तें शफरी सुबाहुलहरी वेणीगणभ्रामरी ।

सद्वक्षोरुह चक्रवाकयुगळें सर्वाग यादावळी

ऐसी सुंदर मूर्ति मंडित दिसे भागीरथी भूतळीं ॥३४॥

जे तूतें पुजिताति भाविक तया तूं माउली पूजिसी

जे तूझ्या चरणासि लागति तयां पायांसि तूं लागली ।

भाळीं अग्निशिखा तुझ्या विरचिती तद्भाळ देशीं शिखी

तूंही ठेविसि या जगीं प्रतिकृती नाहींच तूं सारिखी ॥३५॥

तूझें जें हरिताति पंक मनुजीं तत्पंक तूं वारिसी

तूझा जे जळवोघ भेदिति तयां पापौघ तूं भेदिसी ।

गातां श्लोक तुझे यथार्थ करिसी सुश्लोक तेही जनीं

नाहीं तूसम ते कृतप्रतिकृती म्यां देखिलें लोचनीं ॥३६॥

त्वत्तीरीं नीरमात्राशन करुनि सुखी राहिजे देवगंगे

अन्यत्रीं भूपतित्वा लभुनि सरस तें मिष्ट शाल्यन्न नेघे ।

तूझ्या दिव्यामृतातें अशन करुनियां जायिजे मुक्तिधामा

राज्यांतीं दीर्घदुःखें शमन पुरवरीं भोगिती ज्या न सीमा ॥३७॥

शंभू हो हरि हो चतुर्मुख असो देवेंद्र हो जान्हवी

तूझ्या या करणीस साम्य न पवे कोणी तरी या भवीं ।

ते देती पद आपुलेचि भजकां तूं सर्व त्यांचीं पदें

देसी एकपळांत त्वन्नतजना ते नेच्छितां ही मुदें ॥३८॥

तूं माझी जननी यथार्थ अससी भागीरथीनामिका

तूं तों माधववल्लभा म्हणविसी लोकत्रयव्यापिका ।

मीं तों दीन असें स्तनंधय तुझा तूं क्षीर पाजी मला

माझ्या पूर्ण करीं मनोरथफळां तूं अंतरीं कोमला ॥३९॥

त्रैलोक्येश्वरसंपदा मज नसो शर्वत्व विष्णुत्वही

तूझ्या तीरसमीप पामर तरी होवोनि राहे मही ।

ऐसें दे पद रंक केवळ जनीं त्याहोनि सानें करी

देई तूं पदभक्ति मात्र वरदे हस्ताब्ज ठेवीं शिरीं ॥४०॥

मी तों स्तोत्र तुझें तरी करुं कसा जाणेन एका मुखें

झाले वेद सुरेंद्र शेष असल्या वर्णावया नाटके ।

सर्वाहीं निगमागमीं तव कथा व्यापोनि जे ऊरली

ते आली सरितामिसें क्षितिजना तारावया माउली ॥४१॥

मातें वेद नको न शास्त्रपठणें ते सत्क्रिया ही नसो

किंवा मुख्य धरामरत्व शतशा जन्मांत देऊं नको ।

दे तूझा तटवास मात्र सरितानाथे दयासागरे

तेणें मी न गणीन सर्व विबुधां हें मात्र मातें पुरे ॥४२॥

मी मूढाहुनि मूढ जाण विषयी पापी अकर्मी जनी

नाही आवडिही मला शिवरमानाथाचिया पूजनीं ।

माते ! एक तुझ्या धरोनि पदरा शार्दूलविक्रीडिता

काळातें न गणोनि निश्चित असें मत्तापरीं तत्त्वता ॥४३॥

केलें स्तोत्र यथामती भगवती ! ते अंगिकारीं बरी

येणें जे स्तवितील तूज करुणापांगें तयां स्वीकरी ।

दे सर्वार्थ तयासि इच्छित असे प्रार्थी बनाजी कवी

मातें ठेवि तुझ्या निरंजनपदीं ब्राह्मीं महावैभवीं ॥४४॥

इतिश्रीयोगीनिरंजनमाधवविरचित्तं भागीरथीस्तोत्रं संपूर्ण ॥

श्रीसदगुरु सुंदरकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP