श्रीगणेशाय नमः
मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ सात्यकी प्रवेशलिया धर्मरावो ॥ काय करिता जाला तो अन्वयो ॥ सांगिजे मज ॥१॥
मुनि ह्नणे गा भूपाळा ॥ इकडे धर्मे भार साजिला ॥ कौरवांसवें सकळीं मांडिला ॥ संग्राम देखा ॥२॥
सात्यकी सेनेंत प्रवेशला ॥ जेणें मार्गे पार्थ गेला ॥ तेणेंचि मार्गे चालिला ॥ तंव धांवला आचार्य ॥३॥
द्रोणें पांच बाण टाकिले ॥ येरें सप्तबाणीं निवारिले ॥ द्रोणे सारथिया विंधिलें ॥ षटशरीं देखा ॥४॥
येरें सोडोनि दशशर ॥ बोलिला द्रोणासि उत्तर ॥ ह्नणे तुजमज युद्धाचार ॥ करणें नाहीं ॥५॥
मज पार्थाजवळी जाणें ॥ मग ह्नणे सारथ्याकारणें ॥ कीं हा रथ पैल नेणें ॥ जेथें असती कर्णादी ॥६॥
ऐसा थोर संग्राम करित ॥ सात्यकी प्रवेशला सैन्यांत ॥ तंव धृतराष्ट्र असे पुसत ॥ संजयासी ॥७॥
कीं माझें सैन्य भलें ॥ नानाप्रकारीं सन्नद्धलें ॥ त्यामाजी कैसे प्रवेशले ॥ पार्थसात्यकी ॥८॥
येरु ह्नणे पापास्तव आपुले ॥ पराजयातें कौरव पावले ॥ पांडव सत्यवादी भले ॥ श्रीकृष्णभक्त ॥९॥
सात्यकी त्यांचा साह्यकर्ता ॥ त्यासी भय नाहीं सर्वथा ॥ असो मग तो दावी सारथ्या ॥ कुंजरसैन्य ॥१०॥
ह्नणे तेथ असे सखा पार्थ ॥ तरी सत्वर चालवीं रथ ॥ हे मारोनि गज समस्त ॥ भेटूं अर्जुनासी ॥११॥
ते सात्यकीयें शरधारीं ॥ धडमुंडीं निवटिले करी ॥ येक उरले ते धरत्री ॥ पळते जाहले ॥१२॥
मग जळसंधादि वीर बहुत ॥ सात्यकीयें पाडिले समस्त ॥ सैन्य जाहलें हाहाभूत ॥ कौरवांचें ॥१३॥
सर्पसदृश महाकाराळ ॥ यमदंडोपम शरजाळ ॥ शरीं भेदोनि महीतळ ॥ सिंचिलें अशुद्धें ॥१४॥
सुरवरीं देखोनि सात्यकीतें ॥ स्तविन्नलें प्रकारें बहुतें ॥ ह्नणजी आजि या वीरें येथें ॥ सीमा केली युद्धाची ॥ ॥१५॥
मुंज कांबोज सुदर्शन ॥ मद्राधिपती आणि यवन ॥ सकळांतेंही पराभवून ॥ वीर चालिला पुढारां ॥१६॥
ऐसें कौरवांचें दळ ॥ बाणीं भेदोनियां सकळ ॥ गेला पार्थापें उतावेळ ॥ सात्यकी तो ॥१७॥
इकडे द्रोणें पांडवदळ ॥ युद्धीं जर्जर केलें सकळ ॥ तंव वीरकेतु नामें पांचाळ ॥ चालिल द्रोणावरी ॥१८॥
तेथ संग्राम थोर जाहला ॥ द्रोणें वीरकेतु मारिला ॥ देखोनि भार उठावला ॥ पांडवांचा ॥१९॥
चित्र सुधन्वा वायुसुत ॥ चित्रवर्मा चित्ररथ ॥ ऐसे द्रोणावरी समस्त ॥ टाकिती बाण ॥२०॥
ते द्रोणें पराभविले ॥ तंव धृष्टद्युम्नें वाइलें ॥ युद्ध घोरांदर मांडलें ॥ इंद्रवृत्रांसमान ॥२१॥
हाणितां उभयदळींचे वीर ॥ घायाळ जाहले समग्र ॥ असंख्यवीरां संहार ॥ भविन्नला तेथें ॥२२॥
तंव धृष्टद्युम्नें स्वबळें ॥ द्रोणगुरुचें धनुष्य तोडिलें ॥ येरें आणिक घेतलें ॥ मोकलिले बाण ॥२३॥
मग धृष्टद्युम्नाचा कुमर ॥ रणीं पाडिला सुंदर ॥ सर्ववीरीं हाहाःकार ॥ केला तेव्हां ॥२४॥
यावरी संसारोनि द्रुपदु ॥ अक्षौहिणी सैन्यसिंधु ॥ झुंजावया सन्नद्धु ॥ उठावला द्रोणावरी ॥२५॥
येरें प्रेरोनि शर अपार ॥ पांचाळ पांडव समग्र ॥ द्रुपदादि सोमकवीर ॥ पळविले देखा ॥२६॥
ऐसा अनर्थ देखोनि ॥ धर्म चिंतावला मनीं ॥ आणि न देखेचि नयनीं ॥ पार्थसात्यकीतें ॥२७॥
ह्नणे सात्यकी वीर भला ॥ पार्थाजवळी धाडिला ॥ हा अन्याय थोर केला ॥ म्यांचि देखा ॥२८॥
आतां साह्यार्थ सात्यकीसी ॥ म्यां पाठवावें कोणासी ॥ मग ह्नणे सारथियासी ॥ कीं भीमाजवळी नेई रथ ॥२९॥
धर्म ह्नणे बापा भीमा ॥ तूं दुःखाब्धितारक आह्मां ॥ तरी शीघ्र जावोनि साउमा ॥ करीं पार्थशुद्धी ॥३०॥
नाइकें देवदत्तध्वनी ॥ हा पांचजन्य ऐकें श्रवणीं ॥ बरवें न वाटे माझे मनीं ॥ जाई शुद्धीलागीं ॥३१॥
यावरी भीम ह्नणे धर्मातें ॥ ते त्रैलोक्यसंहार कर्ते ॥ काय ह्नणोनि भय तयांतें ॥ परि आज्ञा प्रमाण ॥३२॥
ऐसें ह्नणोनियां वेगें ॥ जावोनि धृष्टद्युम्ना सांगें ॥ कीं तुह्मी मिळोनि अवघे ॥ रक्षा धर्मासी ॥३३॥
मग धर्मासि वंदिलें ॥ येरें आशिर्वादा दीधलें ॥ तंव महाशब्धा ऐकिलें ॥ पांचजन्याचे ॥३४॥
देवदत्त गर्जिन्नल ॥ मग धर्म भीमासि बोलिला ॥ कीं घोर संग्राम मांडला ॥ ह्नणोनि जाहला शंखनाद ॥३५॥
तैं द्रौपदी सुभद्रा धर्मासवें ॥ होतिया कौतुकार्थ बरवें ॥ त्याही ह्नणती शीघ्र जावें ॥ वृकोदरा जी ॥३६॥
भीम रथीं आरुढ होय ॥ सवें पांचाळ सोम सृंजय ॥ ऐसा चालिला लवलाहें ॥ पार्थशुद्धीसी ॥३७॥
तंव महावीर पुढें आले ॥ ते भीमसेनें निवारिले ॥ तेव्हां शक्तियुद्ध केलें ॥ दुःशासनें सक्रोध ॥३८॥
ऐसा भीम चालिला झुंजत ॥ असंख्य वीरां होत निःपात ॥ अग्रभाग पराभवित ॥ गेला पार्थाजवळी ॥३९॥
भीमें अर्जुन देखिला ॥ महासिंहनाद केला ॥ तो युधिष्ठिरें आयकिला ॥ थोर जाहला संतोषी ॥४०॥
मग भीमार्जुनांची स्तुती ॥ धर्मे केली नानायुक्तीं ॥ ह्नणे अद्यापि दैवगती ॥ पार्थ असे जीवंत ॥ ॥४१॥
ऐसा आनंद पावला ॥ इकडे कर्ण भीमा सन्नद्धला ॥ दोघां अद्भुत संग्राम जाहला ॥ शिळाधारीं ॥४२॥
कर्णे धनुष्य घेवोनी ॥ भीम हाणिला विसांबाणीं ॥ भीमें प्रेरिले लक्षोनी ॥ चौसष्ट बाण ॥४३॥
येरें चौंबाणी निवारिले ॥ मग शरजाळ प्रेरिलें ॥ भीमें कर्णधनुष्य छेदिलें ॥ विंधिला दशबाणीं ॥४४॥
कर्णे दुसरें धनुष्य घेतलें ॥ बाण असंख्यात सोडिले ॥ भीमें निवारोनि विंधिलें ॥ त्रिबाणीं कर्णा ॥४५॥
ऐसा कर्ण पराभविला ॥ पांडवां हर्ष जाहला ॥ मग सिंहनाद केला ॥ तेणें दुमदुमिला भूगोळ ॥४६॥
परि मागुती सांवरोन ॥ भीमावरी लोटला कर्ण ॥ मल्लयुद्ध अतिदारुण ॥ जाहलें दोघां ॥४७॥
चारघटिका परियंत ॥ मल्लयुद्ध जाहलें अद्भुत ॥ परि जयपराजय प्राप्त ॥ नाहीं लाधला कोणासी ॥४८॥
सैनिक ह्नणती वीर धन्य ॥ कर्ण मल्लयुद्धीं निपुण ॥ हें जाणितलें नाहीं आपण ॥ आजवरी देखा ॥४९॥
मग कर्णरक्षणानिमित्त ॥ गांधारें धाडिले बंधु सात ॥ तेही मारिले क्षणांत ॥ भीमसेनें ॥५०॥
भीमें सिंहनाद केला ॥ तेणें गांधार दुःख पावला ॥ कृतकर्म स्मरुं लागला ॥ पश्वात्तापें ॥५१॥
ह्नणे सभेंत देखतां सकळां ॥ कर्ण द्रौपदीसि बोलिला ॥ कीं पांडवां मृत्यु जाहला ॥ करीं अन्य भ्रतार ॥५२॥
तें वचन मनीं स्मरोनी ॥ भीमें वीर पाडिले रणीं ॥ संजय ह्नणे अंधा नयनीं ॥ पाहिलें मियां ॥५३॥
यावरी राया थोर वर्तलें ॥ युद्ध भीमाकर्णा जाहलें ॥ माजी कर्णे निःशस्त्र केलें ॥ भीमसेनासी ॥५४॥
तो भीमवधीं समर्थ ॥ तथापि कुंतीचें वचन पाळित ॥ कीं प्रतिज्ञा पाळणें सत्य ॥ क्षत्रियासी ॥५५॥
असो कर्ण ह्नणे भीमसेनासी ॥ तूं बहुभोजी असावें वनवासी ॥ युद्धकला काय जाणसी ॥ ऐसा निर्भर्त्सिला ॥५६॥
आतां कृष्णार्जुनांपाशीं ॥ अथवा जाई गांधारापाशीं ॥ कालिंचें बाळक तूं नेणसी ॥ संग्रामवार्ता ॥५७॥
ऐसा भीम कुडाविला ॥ तंव येंरु त्यासि बोलिला ॥ कीं कर्णा तुझा जन्म गेला ॥ परसेवकत्वें ॥५८॥
तूं दुर्बुद्धि स्वंजातिवत ॥ वृथाभिमानें अससी बोलत ॥ तुजवरी शस्त्र सोडणे व्यर्थ ॥ वाटे मज ॥५९॥
मुष्टि अथवा चरणप्रहारु ॥ देवोनि तुज चूर्ण करुं ॥ परि मज आज्ञापी युधिष्ठिरु ॥ कीं न मारावा कर्ण ॥६०॥
ऐसें नानामर्मवचनीं ॥ परस्परीं निर्भर्त्सुनी ॥ भीमसेन गेला तत्क्षणीं ॥ सात्यकीप्रती ॥६१॥
तंव कर्ण अश्वत्थामा चालिले ॥ युद्ध पार्थासवें मांडिलें ॥ माजी त्रिगर्ते मोकलिलें ॥ शरजाळ पार्थावरी ॥६२॥
तें सात्यकीयें पराभविलें ॥ त्रिगर्तादि सर्व पळविले ॥ आणि कलिंगा पराभविलें ॥ बाणजाळीं ॥६३॥
मग तो पार्थाप्रति गेला ॥ तंव श्रीकृष्ण अर्जुना बोलिला ॥ कीं सात्यकी वीरां मारोनि आला ॥ दर्शना तुझिये ॥६४॥
त्याचा पराक्रम वर्णिला ॥ तेणें पार्थ संतोषला ॥ परि पार्थ बोलों लागला ॥ कीं हें बरवें न वाटे ॥६५॥
हा येथें आला शीघु ॥ काय धर्माचा समाचारु ॥ तया धरुं पाहे गुरु ॥ ह्नणोनि रक्षणा ठेविला होता ॥६६॥
ऐसें कृष्णाप्रति बोले ॥ तंव भूरिश्रवें वाइलें ॥ सात्यकीप्रति ह्नणितलें ॥ आजि भला सांपडलासी ॥६७॥
तरी तूतें रणीं मारीन ॥ ऐसें देखती कृष्णार्जुन ॥ संतोषेल दुर्योधन ॥ खेद होईल पांडवां ॥६८॥
मग ते रण सांडोनि पळती ॥ ऐसें बोलिला नानायुक्ती ॥ सात्यकी ह्नणे तयाप्रती ॥ वृथा बोलसी अभिमानें ॥६९॥
मज हास्य असे येत ॥ आजि तुझा करीन निःपात ॥ ह्नणोनि शरवृष्टी करित ॥ सरसावला पुढारां ॥७०॥
रथाश्वसारथी परस्परें ॥ विंधोनि पाडिले वसुंधरे ॥ मग गदाशक्ति निकरें ॥ परस्परें प्रेरिती ॥७१॥
मुष्टिघातें भिडिन्नले ॥ तेणें महाशब्द जाहले ॥ सात्यकीसी क्लेशी केलें ॥ भूरिश्रवेयाणें ॥७२॥
तंव पार्था ह्नणे यदुराजा ॥ हा सात्यकी वीर तुझा ॥ परमसखा बंधु माझा ॥ जाहला निःशस्त्र ॥७३॥
ऐसें आइकोनि पार्थे ॥ अपार केलें बाणवृष्टीतें ॥ बाहु छेदिले क्षणें तेथें ॥ भूरिश्रवेयाचे ॥७४॥
तंव भूरिश्रवें तेथें ॥ सांडोनियां सात्यकीतें ॥ निंदिता जाहला कृष्णातें ॥ पार्थासही ॥७५॥
स्वयें अग्निप्रवेश मांडिला ॥ सर्व लोक दुःखी जाहला ॥ निंदा करुं लागला ॥ कृष्णार्जुनांची ॥७६॥
कौरव निंदिते जाहले ॥ तंव धनंजय काय बोले ॥ तुह्मीचि कपटें मारिलें ॥ अभिमन्यासी ॥७७॥
माझा ऐसा व्रताचार ॥ जो मजवरी टाकील शर ॥ तयाचाचि करणें संहार ॥ येरां निर्वैर असें मी ॥७८॥
ऐसें गर्जोनि पार्थ बोले ॥ तंव येक नवल वर्तलें ॥ सात्यकीयें रागें मारिलें ॥ भूरिश्रव्यासी ॥ ॥७९॥
समस्त वीरीं वारिलें ॥ परि त्याचें शिर पाडिलें ॥ कौरव पांडवींही निंदिलें ॥ सात्यकीसी ॥८०॥
हा अधर्म थोर जाहला ॥ तेव्हां सात्यकी बोलिला ॥ कीं मारिलें अभिमन्याला ॥ धर्म गेला कोठें तेव्हां ॥८१॥
मग कोणीच न बोलती ॥ ऐसी केली भूरिश्रवशांती ॥ तंव धृतराष्ट्र करी खंती ॥ ह्नणे पुढती सांगें कथा ॥८२॥
संजय बोले सवेंची ॥ भूरिश्रवा सात्यकीची ॥ व्यवस्था उत्पत्तीची ॥ ऐकें राया ॥८३॥
पूर्वी सोम अत्रीचा कुमर ॥ त्याचा बुध नामें पुत्र ॥ तयापासोनि पुढें परिकर ॥ पुरुरवा जाण ॥८४॥
त्याचा आयु नहुष जाण ॥ नहुषाचा ययाति नंदन ॥ त्याचा यदु जाहला उत्पन्न ॥ देवयानीसी ॥८५॥
यदुपासोनि जाहले ॥ ते यादव नाम पावले ॥ त्यांपासाव देखिलें ॥ शूरसेनासी ॥८६॥
शूरसेनापासोनि शौरी ॥ तोचि वसुदेव अवधारीं ॥ तेचि कुळीं होता निर्धारी ॥ सिनिराज नामें ॥८७॥
त्या सिनिरायें अवधारीं ॥ देवकीच्या स्वयंवरीं ॥ राजे जिंकोनियां समरीं ॥ वाहिलीं रथीं वधुवरें ॥८८॥
तंव सोमदत्तें वाहिलें ॥ युद्ध घोरांदर जाहलें ॥ तयाचे बाहु छेदोनि टाकिले ॥ सिनीरायें ॥८९॥
केशीं धरोनि जंव मारावें ॥ तंव सोडविलें वसुदेवें ॥ पुढें सोमदत्तें स्वभावें ॥ आराधिला शंकर ॥९०॥
शिवासि मागीतला वर ॥ कीं मज देई पुत्र झुंजार ॥ आणि सकळ यादवां जिंकणार ॥ कैलासनाथा ॥९१॥
शंभू वर देखोनि गेला ॥ यावरी कितीयेकां काळां ॥ सोमदत्तासि पुत्र जाहला ॥ महासुंदर ॥९२॥
विप्रां देवोनि भूरिदक्षिणा ॥ भूरिश्रवा ठेविलें अभिधांना ॥ तो न जिंकवेचि कवणा ॥ महावीर ॥९३॥
तंव सिनी जाहला चिंताग्रस्त ॥ तपीं आराधिला उमाकांत ॥ प्रसन्नपणें भूतनाथ ॥ सांगे तया ॥९४॥
कीं तुज तंव नाहीं पुत्र ॥ परि वसुदेवाचा कुमर ॥ सात्यकी नामें महावीर ॥ करील संहार तयाचा ॥९५॥
ह्नणोनि सात्यकी वरदकुमर ॥ यादववंशीं महावीर ॥ तेणें केला संहार ॥ भूरिश्रवेयाचा ॥९६॥
सात्यकीसी युद्ध केलें ॥ ह्नणोनि पार्थे कर छेदिले ॥ परि धडमुंड निवटिलें ॥ सात्यकीयेंची ॥९७॥
असो ऐसिया उपरी ॥ पार्थ ह्नणे गा श्रीहरी ॥ प्रतिज्ञा सत्य करणें तरी ॥ जयद्रथावरी नेई रथ ॥९८॥
सूर्याचा अस्तसमय असे ॥ तंव रथ प्रेरिला सर्वेशें ॥ तो येतां देखोनि आवेशें ॥ उठावले कौरव ॥९९॥
मद्र अश्वत्थामा दुर्योधन ॥ कृपाचार्य आणि कर्ण ॥ उभे ठाकले येवोन ॥ जयद्रथा आड ॥१००॥
तेव्हां कर्णासि गांधार ह्नणे ॥ तुवां आजी शौर्य करणें ॥ प्रतिज्ञा गेलिया अर्जुनें ॥ कीजेल अग्निप्रवेश ॥१॥
मग आपण होऊं निष्कंटक ॥ यावरी कर्ण ह्नणे देख ॥ आजि पाहती वीर सकळिक ॥ सामर्थ्य माझें ॥२॥
यमाहीपासोनि जयद्रथा ॥ भय नाहीं मज असतां ॥ ऐशा गोष्टीं करितां अवचितां ॥ काय केलें अर्जुनें ॥३॥
गांडीव रोषें टणत्कारिलें ॥ बाण असंख्यात सोडिले ॥ तेणें चातुरंगा पाडिलें ॥ वाहाविल्या रक्तनद्या ॥४॥
मग भीम सात्यकीसहित ॥ आला जयद्रथापें त्वरित ॥ परि त्या वीरांचेनि पार्थ ॥ नावरेची ॥५॥
येरें सकळवीरांसि नेटकें ॥ युद्ध करोनियां प्रत्येकें ॥ आला पराक्रमें अनेकें ॥ जयद्रथासमीप ॥६॥
तंव श्रीकृष्ण ह्नणे शीघ्र ॥ पाडींपाडीं याचें शिर ॥ परि यत्पिता बृहत्क्षेत्र ॥ पश्विमसमुद्रीं तप करी ॥७॥
त्याचिये अंजुळीमाजी ॥ बाणीं शिर पाडीं आजी ॥ कां जे तेणें वृषभध्वजीं ॥ मागीतला असे वर ॥८॥
कीं ममपुत्राचें शिर पाडील ॥ त्याचेंही पडावें तत्काळ ॥ मग पार्थे तये वेळ ॥ शरें शर सादिले ॥९॥
जयद्रथाचें शिर छेदिलें ॥ बाणीं सत्राणें उडविलें ॥ तें अंजुळीमध्यें पाडिलें ॥ बृहत्क्षेत्राचे ॥११०॥
तेणें टाकिली अर्घ्याजुळी ॥ तंव शिर पडलें महीतळीं ॥ मग त्याचेंही तत्काळीं ॥ पडलें शिर ॥११॥
परि पुराणांतर भारती ॥ असे आणिक वित्पत्ती ॥ कीं दिवस उरला अंतीं ॥ घटिका दोनी ॥१२॥
युद्धीं नागवती कौरववीर ॥ प्रतिज्ञा जाईल मावळतां भास्कर ॥ मग करील धनुर्धर ॥ अग्निप्रवेश ॥१३॥
ऐसें जाणोनि गोपाळें ॥ सुदर्शन सूर्याआड घातलें ॥ आंधारें थोर पाडिलें ॥ जाणों मावळला दिनकर ॥१४॥
जाहली प्रतिज्ञेची हानी ॥ ह्नणोनि तेथें प्रज्वळिला वन्ही ॥ कृष्ण ह्नणे धनुष्य सज्जोनी ॥ करीं प्रदक्षिणा वन्हीसी ॥१५॥
तंव पार्थ करी प्रदक्षिणा ॥ आनंद जाहला कौरवमना ॥ पहावया पार्थनिर्वाणा ॥ मिळाले भोंवते ॥१६॥
तेथें वरुतें शिर करोनी ॥ जयद्रथ पाहे रथावरुनी ॥ तंव देवें चक्र तत्क्षणीं ॥ आकर्षिलें नभींचें ॥१७॥
सूर्यबिंब काहीं देखिलें ॥ देवें पार्थासि ह्नणितलें ॥ करीं गा संधान वहिलें ॥ पैल पहा तो जयद्रथ ॥१८॥
येरें बाण सोडिला शीघ्र ॥ उडविलें सैंधवाचें शिर ॥ शरीं पिटोनि वेगवत्तर ॥ पाडिलें पितृअंजुळीं ॥१९॥
तैं एकचि कौरवसैन्यांत ॥ हाहाःकार जाहला अद्भुत ॥ पळाले झडा देतदेत ॥ सांडोनि रणभूसी ॥१२०॥
पांडव हर्षित जाहले ॥ कृष्णें पार्था वाखाणिलें ॥ वाद्यगजरें देव वर्षले ॥ पुष्पसंभारीं ॥२१॥
ऐसा जयद्रथ मारिला ॥ तंव धृतराष्ट्र बोलिला ॥ पुढें काय करिता जाहला ॥ कौरवभार ॥२२॥
मग संजयो काय बोले ॥ कृप अश्वत्थामा ते वेळे ॥ दोहींकडोनि शरजाळें ॥ जाहले प्रेरिते ॥२३॥
पार्थे सोडोनि शस्त्रास्त्रें ॥ तीं निवारिलीं परस्परें ॥ कृपाचार्य पाडिला सत्वरें ॥ मूर्छागत ॥२४॥
परि तो देखोनि मूर्छित ॥ थोर दुःखी जाहला पार्थ ॥ मग कृष्णाप्रति बोलत ॥ करुणास्वरें ॥२५॥
ह्नणे हा कृपाचार्य भला ॥ म्यां बाणीं मूर्छित केला ॥ तरी मत्पुरुषार्थ जाहला ॥ धिकधिक् आजी ॥२६॥
यासि म्यां आजी दुखविलें पाहीं ॥ तरी मजहूनि अधम नाहीं ॥ इतुक्यांत कर्ण तेठाई ॥ आला युद्धार्थ पार्थासवें ॥२७॥
पांचाल्य सात्यकी सन्नद्धले ॥ तें देखोनि पार्थ बोले ॥ प्रेरीं गा रथासि वहिलें ॥ कर्णावरी ॥२८॥
परि त्वरा करुनि कर्णे ॥ सात्यकी विरथ केला बाणें ॥ येरें निवारोनि संधानें ॥ पिटिला कर्ण ॥२९॥
यावरी सजय बोलत ॥ कृष्णाचें ऐसें मनोगत ॥ कीं सात्यकीयेंचि निभ्रांत ॥ जिंकावा कर्ण ॥१३०॥
जेव्हां सात्यकी विरथ झाला ॥ तेव्हां कृष्ण दारुका बोलिला ॥ कीं माझा रथ वहिला ॥ नेई सात्यकीजवळी ॥३१॥
मग दारुकें कृष्णरथ ॥ सात्यकीजवळ नेला त्वरित ॥ येरु आरुढोनि झुंजत ॥ नानापरी कर्णेसी ॥३२॥
सात्यकीयें तिये वेळे ॥ समरीं कर्णा विरथ केलें ॥ युद्ध घोरांदर जाहलें ॥ परस्परांसीं ॥३३॥
येरीकडे भीमसेनें ॥ सकळ कौरव पिटिले बाणें ॥ तीससंख्या मारिले तेणें ॥ गांधारीपुत्र ॥३४॥
यावरी धृतराष्ट्र ह्नणे ॥ भीमाचें कर्तुत्व सांगणें ॥ राया ऐकें सावधानें ॥ ह्नणे संजयो ॥३५॥
भीमकर्णे निर्भर्त्सिला मागें ॥ तो पार्थाजवळी जावोनि सांगे ॥ कीं कर्ण निंदितो अनेगें ॥ दुष्टोत्तरें बोलोनी ॥३६॥
मग पार्थ कर्णातें ह्नणे ॥ अरे दुर्बुद्धे ऐकणें ॥ तुज विरथ केलें होतें येणें ॥ भीमसेनें बहुवेळां ॥३७॥
परि येणें निंदिलासि नाहीं ॥ आणि तूं निंदिसी पाहीं ॥ तरी हा अधर्म सही ॥ पाहें पराक्रम माझा ॥३८॥
तुझें शिर पाडोनि आतां ॥ दाखवीन वीरां समस्तां ॥ हे पार्थ प्रतिज्ञा करितां ॥ जाहला महाशब्द ॥३९॥
अंबरमणी अस्तीं गेला ॥ श्रीकृष्ण पार्थासी बोलिला ॥ आजि दैवगत्या जाहला ॥ बोल साच ॥१४०॥
परस्परीं करिती स्तुती ॥ नानाप्रकारींच्या युक्ती ॥ मग मुरडले दिनांतीं ॥ स्वमेळिकारीं ॥४१॥
येथें पुराणांतर भारती ॥ कीं जयद्रथाचें धड रथीं ॥ वाहूनि पार्थ शीघ्रगती ॥ गेला धर्मा भेटावया ॥४२॥
अपार सैन्य पडिलें होतें ॥ तें दावीतदावीत हातें ॥ सुखें स्वानंदें स्वस्थानातें ॥ येते जाहले ॥४३॥
धर्मापुढें तिये वेळे ॥ जयद्रथकलेवर टाकिलें ॥ ह्नणे अभिमन्या कुडाविलें ॥ जाली सत्य प्रतिज्ञा ॥४४॥
धर्मे पार्थ आलिंगिला ॥ वाद्यगजर थोर जाहला ॥ ऐसा पार्थ विजयी जाहला ॥ चतुर्थदिवशीं ॥४५॥
असो येरीकडील वृत्तांत ॥ कृपाचार्य जाला सावचित्त ॥ मग गेला कौरवांत ॥ जेथें मेळा मीनलासे ॥४६॥
आतां कौरव विचारोनी ॥ काय करिती तिये रजनीं ॥ तें ऐकावें चित्त देवोनी ॥ धृतराष्ट्रा गा ॥४७॥
वैशंपायन ह्नणती भारता ॥ ऐसें वधिलें जयद्रथा ॥ यापुढें वर्तली कथा ॥ ते ऐकें सावधान ॥४८॥
सकलही पापें नासती ॥ कथा ऐकतां भारती ॥ कर जोडोनि श्रोतयांप्रती ॥ ह्नणे कवि मधुकर ॥४९॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबक मनोहरु ॥ जयद्रथवधप्रकारु ॥ त्रयोदशाध्यायीं कथियेला ॥१५०॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥