श्रीगणेशाय नमः
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
निर्विघ्नमस्तु ॥ ओंनमोजी नारायणा ॥ उत्पत्तिस्थितिलयकारणा ॥ सगुणा निर्गुणा विश्वजीवना ॥ नामातीता ॥१॥
जयजयाजी श्रीअनंता ॥ लक्ष्मीविलासा गुणभरिता ॥ चराचरामाजी व्यापकता ॥ तूंचि होसी ॥२॥
तूं मनमोक्षाचें सुमन ॥ तूं तत्वमस्यादि साधन ॥ वेदगर्भीचें जीवन ॥ नारायणा ॥३॥
जयजयाजी भक्तवत्सला ॥ धर्मश्रुंतिप्रतिपाळा ॥ कृपाळुवा महाशीळा ॥ नमोस्तुते ॥ ॥४॥
तूं परमप्रेमानंद ॥ परमात्मा विश्वकंद ॥ तूं निर्वादिया अभेद ॥ निरंतरीं ॥५॥
जयजयहो मंगळमूर्ती ॥ जय अनपेक्षा दिव्यदीप्ती ॥ परममार्गा परमगती ॥ शरण तुज मी ॥६॥
तुझी करावया स्तुती ॥ पवाडू नाहीं निंगमांप्रती ॥ लक्षानयेसि मूळप्रकृती ॥ चकित परावाचा ॥७॥
जो तूं ब्रह्मादिका देवा ॥ अचिंत्य अससी देवदेवा ॥ तो अज्ञानियां जडजीवां ॥ केवीं स्तव्य होसी ॥८॥
तुवांचि देवोनि सन्निधान ॥ उपदेशिजे आत्मज्ञान ॥ तैं निजभक्तां होय तरण ॥ कृपा तुझी ॥९॥
परि मूळीं जीवोत्धरणार्थे ॥ तुवां रचिलें सृष्टीतें ॥ मग धरिलें अवतारातें ॥ युगानुयुगीं ॥१०॥
ऐसा देव तूं सर्वकर्ता ॥ गुह्याद्रुह्य प्रकाशिता ॥ परममार्ग प्रतिष्ठिता ॥ कवीश्वरांसी ॥११॥
प्रकट व्हावया निजगुण ॥ नेत्री घातलें ज्ञानांजन ॥ दाविलें कैवल्यपद गहन ॥ भक्तांलागीं ॥१२॥
ऐसे तुझेनि सामर्थ्ये ॥ आलंकारिलें जयांतें ॥ तेचि स्तविती सिद्धांतमतें ॥ तुजलागोनी ॥१३॥
तूंचि सकळगणांचा ईश ॥ ह्नणोनि नाम साजे गणेश ॥ ज्ञानांकुशें करिसी नाश ॥ अविद्येचा ॥१४॥
ऐसी अंतरीं करितां स्तुती ॥ प्रत्यक्ष पावला श्रीगणपती ॥ ह्नणे प्रसन्न जाहलों पुढती ॥ बोलें गीताज्ञान ॥१५॥
आतां वाग्विद्या सरस्वती ॥ नमूं संसारतारक गुरुमूर्ती ॥ तैसेंच संतश्रोतयांप्रती ॥ केलें नमन ॥१६॥
मागां स्तबक जाहला नववा ॥ संकलितभाषा देशोद्भवा ॥ आतां दाहवा श्रवण करावा ॥ श्रोताजनीं ॥१७॥
श्रोतयांचे संगतिगुणीं ॥ श्रीकृष्णकथा बोलेन वाणी ॥ तेणें होईल माझे मनीं ॥ आनंदभरितें ॥ ॥१८॥
श्रोतीं होवोनि सावधान ॥ भारतकथा कीजे श्रवण ॥ तेणें उल्हासे अंतःकरण ॥ वक्तयाचें ॥१९॥
जन्मेजयराजा भारती ॥ वैशंपायन वेदमूर्ती ॥ या दोहींची सुखसंगती ॥ घडली येकीं ॥२०॥
त्या उभयतांचा आनंद ॥ हरिकथेचा ज्ञानबोध ॥ तो ऐकावा भेदाभेद ॥ ह्नणे मधुकरकवी ॥२१॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबक मनोहरु ॥ मंगलाचरणप्रकारु ॥ प्रथमोध्यायीं कथियेला ॥२२॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ ॥