श्रीगणेशाय नमः
मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ ऋषे तूं ज्ञानगंगेचा डोहो ॥ तरी पडलिया भीष्मदेवो ॥ सांगें कैसें वर्तलें ॥१॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ राया तूं श्रोतयांमाजी धन्य ॥ तरी ऐकें कथाप्रश्न ॥ जो वर्तला पुढारां ॥ ॥२॥
भीष्म पडलिया शरपंजरीं ॥ कौरवपांडवादि नृपवरीं ॥ तयासि नमोनि मेळिकारीं ॥ गेले आपुलाले ॥३॥
कौरव तरी दिन होउनी ॥ विलाप करिती तेक्षणीं ॥ मग जावोनि कर्णभुवनीं ॥ ह्नणती तया ॥४॥
अगा निर्वाणवीरोत्तमा ॥ तुझा आश्रय असे आह्मां ॥ तुवां दशदिनवरी संग्रामा ॥ वरिलें नाहीं ॥५॥
येरें कौरवां धैर्य देवोनी ॥ दुर्योधना ह्नणे वचनीं ॥ अगा धैर्य राखीं मनीं ॥ मी मारीन पांडवां ॥६॥
मग कर्णे तिये वेळीं ॥ द्रोणगुरुची प्रशंसा केली ॥ ह्नणे तो गुरु सर्वज्ञ बळी ॥ श्रेष्ठ आह्मां सकळिकां ॥७॥
तो असतां विद्यासागर ॥ मज सेनापतीचा नाहीं अधिकार ॥ यावरी द्रोणाजवळी गांधार ॥ गेला कौरवेंसीं ॥८॥
नानापरी स्तविन्नलें ॥ तेणें द्रोणचित मानवलें ॥ मग विधिमार्गे दीधलें ॥ सेनापतित्व ॥९॥
तैं नानावाद्यें लागलीं ॥ द्रोणें शकटव्यूहरचना केली ॥ पांडवसेनाही सन्नद्धली ॥ वज्रव्यूह रचोनी ॥१०॥
ययाउपरी द्रोण आपण ॥ व्यूहमध्यभागीं येऊन ॥ बोलिला साभिमान धरोन ॥ दुर्योधनासी ॥११॥
ह्नणे मज गौरव या सैन्याचें ॥ तुवां दीधलें असे साचें ॥ तरी सांगें इच्छित मनींचें ॥ तें मी करीन ॥१२॥
तंव कर्णादिकां पुसोन ॥ आचार्या ह्नणे दुर्योधन ॥ कीं धर्म जीवंत धरोन ॥ आणिजे स्वामी ॥ ॥१३॥
दुर्योधनासि ह्नणे गुरु ॥ तुझा शत्रु कुंतिकुमरु ॥ तो जिवंत धरोनि शीघ्रु ॥ आणा ह्नणसी ॥१४॥
हें कार्य कठिण बहुत ॥ तरी वधचि कां नाहीं इच्छित ॥ तूं ह्नणशील तें निभ्रांत ॥ करणीय आह्मां ॥१५॥
तूं तरी धन्य विचारवंत ॥ कीं धर्महिंसा नाहीं इच्छित ॥ येणें परी कौरवनाथ ॥ स्तविला द्रोणें ॥१६॥
तेणें गांधार संतोषला ॥ द्रोणाचार्यासि बोलिला ॥ कीं धर्माचा वध केला ॥ तरी मज जय नाहीं ॥१७॥
ह्नणोनियां निभ्रांत ॥ मी न इच्छीं धर्मघात ॥ कां जे तया वधितां पार्थ ॥ करील संहार आमुचा ॥१८॥
जयासि इंद्रादि सुरपती ॥ संग्रामीं सन्नद्ध नपुरती ॥ तंव गुरु ह्नणे तयाप्रती ॥ बोलसी साच ॥१९॥
तरी आतां ऐक राया ॥ युद्धीं गोवावें धनंजया ॥ मग मी धरीन धर्मराया ॥ हे प्रतिज्ञा सत्य माझी ॥२०॥
संजय ह्नणे अवधारीं ॥ ऐसिये प्रतिज्ञे उपरी ॥ दुर्योधनादि समग्रीं ॥ केला विचार ॥२१॥
हें पार्थासि नकळे कृत्य ॥ ऐसें विचारिती समस्त ॥ यापरि युधिष्ठिर ग्रहणार्थ ॥ केला मंत्र कौरवीं ॥२२॥
तो जासुदें समाचार ॥ धर्मासि कथिला समग्र ॥ तंव बोलिला युधिष्ठिर ॥ अर्जुनासी ॥२३॥
कीं प्रतिज्ञा केली आचार्ये ॥ ते प्रसंगीं सत्य न होय ॥ ऐसा केलापाहिजे उपाय ॥ धनुर्धरा गा ॥२४॥
तंव धर्मासी ह्नणे पार्थ ॥ जंव मी आहें जिवंत ॥ काहीं शंका मनांत ॥ नाणिजे तुह्मी ॥२५॥
पृथ्वी पडे विपरीत होवोन ॥ परि तुह्मं घेवों न पावे द्रोण ॥ कां जे संग्रामीं मज अजून ॥ नाहीं पराजय ॥२६॥
ऐसी पार्थे स्वमुखें आपुली ॥ नानापरी स्तुति केली ॥ तंव आनंदें वाद्यें लागलीं ॥ पांडवदळीं ॥२७॥
शंख दुंदुभी वाद्यभेरी ॥ डिंडिम झर्झर रणमोहरी ॥ नाद न माये दिगंतरीं ॥ गर्जिन्नलें ब्रह्मांड ॥२८॥
ऐसा पांडवभार सन्नद्धला ॥ देखोनि कौरवीं गजर केला ॥ युद्धा दळभार मिसळला ॥ उभयसैन्यें ॥२९॥
पांडवां रक्षक अर्जुन ॥ कौरवां रक्षक गुरु द्रोण ॥ तैं द्रोणापांचाळा दारुण ॥ जाहलें युद्ध ॥३०॥
जयपराजय तेवेळां ॥ येरयेरां नाहीं जाहला ॥ क्षणयेक विस्मय वाटला ॥ उभयसैन्या ॥३१॥
सवेंचि रुक्मरथस्थितं ॥ सूर्यापरीस दीप्तिमंत ॥ द्रोण सेनामुखीं वर्षत ॥ शरजाळांतें ॥३२॥
तैं द्रोणें युद्ध करितां ॥ वर्षाऋतु जाहला शोभता ॥ जाणों बाण ते विद्युल्लता ॥ माजी चमकती ॥३३॥
दोनीसैन्यांचें शोणित ॥ तेणें रणीं नदी वाहत ॥ मांसकर्दम जाण तेथ ॥ तटें उभयदळें ॥३४॥
रथ आवर्त शिरें पाषाण ॥ केश शेवाळ जळचरें चरण ॥ गृध्रसमुदाय बक जाण ॥ मिळाले प्रत्यक्ष ॥३५॥
तंव पांडवदळ उठावलें ॥ द्रोणसैन्यावरी धांवलें ॥ द्वंद्वयुद्ध असे मांडलें ॥ पाचारोनि परस्परां ॥३६॥
त्यांत शकुनियें सहदेवासी ॥ विरथ केलें मारुनि अश्वांसी ॥ आला नकुळही तयासी ॥ तैसेंचि केले ॥३७॥
वृकोदर विविंशतीसी ॥ करिता जाहला कासाविशी ॥ सात्यकीयें कृतवर्म्यासी ॥ धृष्टकेतें कृपाचार्य ॥३८॥
कार्ष्णीनें सैंधव पाचारिला ॥ ऐसा महारथियां संग्राम जाहला ॥ परस्परें पावविला ॥ जय पराजयो ॥३९॥
मग अभिमन्यें मंत्रिलें ॥ अस्त्रजाळ विस्तारिलें ॥ व्याकुळ गांधारासी केलें ॥ द्रोणासहित ॥४०॥
ऐसा पराक्रम देखोन ॥ धर्मादि पांचही धृष्टद्युम्न ॥ ह्नणती वीर धन्यधन्य ॥ त्रिजगतीमाजी ॥ ॥४१॥
तें देखोनि येकेचि वेळे ॥ द्रोणादि कौरव उठावले ॥ त्यांहीं थोर व्याकुळ केलें ॥ पांडवदळ ॥४२॥
मग आर्तायनी उठावला ॥ तो सौभद्रासीं झुंजला ॥ ऐसा द्वंद्वसंग्राम जाहला ॥ शस्त्रास्त्रेंसीं ॥४३॥
धृतराष्ट्र ह्नणे संजयातें ॥ द्वंद्वयुद्धें ऐकिलीं बहुतें ॥ परि ज्यांहीं दृष्टीं देखिलीं ते ॥ धन्य संसारीं ॥४४॥
तरी आर्तायनी सौभद्रासी ॥ युद्ध जाहलें तें आह्मासीं ॥ सांगें सकळ विस्तारेंसीं ॥ द्वंद्वरुप ॥४५॥
संजय ह्नणे अवधारीं ॥ युद्ध जाहलें परस्परीं ॥ चातुरंग समरीं शस्त्रास्त्रीं ॥ पाडिलें असंख्य ॥४६॥
सौभद्रें तये वेळां ॥ द्रोण युद्धीं आजाविला ॥ भीम गदा घेवोनि धांवला ॥ शल्यावरी ॥४७॥
भीमसेनाचें युद्ध देखिलें ॥ दोनी भार आनंदले ॥ शल्यें गदाघातें हाणिलें ॥ तेणे शल्यगदा मोडली ॥४८॥
तेणें आघातें वायुसुत ॥ क्षणैक जाहला मूर्छागत ॥ आणि शल्यही बहुत ॥ श्रांत जाहला ॥४९॥
मागुती भीम सावध जाहला ॥ गदा घेवोनि धाविन्नला ॥ तेणें भयकंप सुटला ॥ धार्तराष्ट्रांसी ॥५०॥
मग ते भयभीत देखिले ॥ भीमा पाहों नशकती वहिले ॥ ऐसे सकळ भीमें जिंकिले ॥ येकेचि वेळीं ॥५१॥
पांडवीं जयजयकार केला ॥ महायश प्रकाश जाहला ॥ कौरवभार ओसरला ॥ होवोनि दीन ॥५२॥
तंव कौरवांमाजील वीर ॥ वृषसेन बळसागर ॥ शतानिक नकुळपुत्र ॥ धाविन्नला तयावरी ॥५३॥
तेणें मर्मभेदशरीं ॥ वृषसेन व्याकुळ केला भारी ॥ परि धनुष्य छेदिलें सत्वरीं ॥ कर्णपुत्रें तयाचें ॥५४॥
आणि ध्वजातें पाडिलें ॥ तंव द्रौपदेय धाविन्नले ॥ त्यांहीं पाठीसि घातलें ॥ शतानीकासी ॥५५॥
कर्णपुत्रा तिये वेळे ॥ शरजाळीं आच्छादिलें ॥ तंव द्रोणपुत्रा धावणें जाहलें ॥ दीन कर्णात्मज देखोनी ॥५६॥
तेणें द्रौपदेयां सकळां ॥ आच्छादिलें घालोनि शरजाळा ॥ जेवीं मेघवृष्टी कुळाचळा ॥ आच्छादिजे ॥५७॥
मग कैकेय्य आणि पांचाळ ॥ मत्स्य सृंजय असे सकळ ॥ युद्ध करिती तुंबळ ॥ परस्परेंसीं ॥५८॥
कौरवदळीं महावीर ॥ द्रोण कर्ण कृप द्रोणपुत्र ॥ पांडवदळीं पार्थ वृकोदर ॥ अभिमन्यु शोभताती ॥५९॥
तंव तत्समई द्रोणाचार्या ॥ प्रतिज्ञा सत्य करावया ॥ पांडव सैन्यांत झुंजावया ॥ निघता जाहला ॥६०॥
बाणजाळीं वरुषला ॥ दळभार सर्व भंगविला ॥ आहवीं धर्मासमीप गेला ॥ दोघां वर्तला संग्राम ॥६१॥
धर्मे कंकपत्र बाण ॥ गुरुवरी सोडिले निर्वाण ॥ ते निवारुनि गुरुद्रोण ॥ छेदी धनुष्य धर्माचें ॥६२॥
जंव युधिष्ठिरापें येत ॥ तंव पांचाळाचा सुत ॥ सैन्यरक्षक महारथ ॥ उठावला झुंजारी ॥६३॥
तेणें द्रोण स्तब्ध केला ॥ जैसा वेळां समुद्र आवरिला ॥ बाळकें पराक्रम कुंठिला ॥ आचार्याचा ॥६४॥
तेणें पांडवसैन्यपती ॥ त्यासी जयशब्दें स्तविती ॥ तंव कौरव बाणघातीं ॥ उठावले ॥६५॥
त्यांहीं पांडवसैनिकांसी ॥ थोर केलें कासाविशी ॥ यावरी द्रोण धरुं धर्मासी ॥ इच्छिता जाला ॥६६॥
परि विराट द्रुपद व्याघ्रदंत ॥ कैकेय्य सात्यकी विख्यात ॥ शिबि पांचाळ समस्त ॥ सिंहसेनादि ॥६७॥
हे महारथी धर्मातें ॥ रक्षिते जाहले तेथें ॥ बाणीं वरुषले अमितें ॥ कौरवांवरी ॥६८॥
अनेकबाणीं व्याघ्रदंतें ॥ विंधिलें क्षणें द्रोणातें ॥ सिंहसेनें शरायूतें ॥ विंधिलें तथैव ॥६९॥
ऐसें सकळीं नानाप्रकारें ॥ द्रोणा व्याकुळ केलें शरें ॥ परि तें सांवरोनि येरें ॥ टणत्कारिलें धनुष्य ॥७०॥
मग बाणजाळीं वर्षोनी ॥ सकळां समरीं पराभवोनी ॥ शिर पाडिलें छेदोनी ॥ सिंहसेनाचें ॥७१॥
आणि भल्लप्रहारें शीघ्र ॥ पाडिलें व्याघ्रदंताचें शिर ॥ जावोनि राहिला धर्मासमोर ॥ क्रूरपणें यम जैसा ॥७२॥
तेणें पांडवदळीं थोरु ॥ प्रवर्तला हाहाःकारु ॥ ह्नणती धर्मासि नेईल गुरु ॥ धरोनि आतां ॥७३॥
तंव धनुर्धर पातला ॥ कौरवां संहार भविन्नला ॥ नदी वाहविता जाहला ॥ शोणिताची ॥७४॥
आचार्य केला व्याकुळ ॥ बाणीं भरिला ब्रह्मांडगोळ ॥ ऐसा पार्थ अतुर्बळ ॥ भुवनत्रयीं ॥ ॥७५॥
तंव इतुकियेचि वेळां ॥ सूर्य गेला अस्ताचळा ॥ पार्थे धर्म संरक्षिला ॥ गुरुपासोनी ॥७६॥
दळभार एकवटला ॥ पार्था अग्रभागीं केला ॥ पांचाळदिकीं अनंत स्तविला ॥ वाद्यगजरें ॥७७॥
श्रीकृष्णानेंही स्तविलें ॥ ह्नणे पार्थाचें धन्य जियाळें ॥ ऐसे संतोष पावले ॥ पांडवसैनिक ॥७८॥
इकडे द्रोणमुख्य कौरव ॥ होवोनियां हतप्रभाव ॥ मेळिकारीं गेले सर्व ॥ आपुलाले ॥७९॥
असो हें तिये प्राप्तरजनीं ॥ युयुत्सु विचारी अंतःकरणीं ॥ की भीष्म पडोनियां रणीं ॥ द्रोणगुरुही पराभविला ॥८०॥
तरी राहतां कौरवांत ॥ आपुला होईल प्राणांत ॥ पांडवां जय निभ्रांत ॥ यास्तव तयां मिळावें ॥८१॥
मग स्वरथीं आरुढोनी ॥ सहपरिवारें जावोनी ॥ भेटोनि धर्माचिये मनीं ॥ सकळ आणिला वृत्तांत ॥८२॥
समस्त पांडव आनंदले ॥ तया वस्त्रालंकार दीधले ॥ ह्नणती गा भलें विचारिलें ॥ केलें धर्मसाहाय्य ॥८३॥
ऐसें प्रथमदिनीं वर्तलें ॥ रात्रीं सैनिक विसावले ॥ ययापुढें कैसें वर्तलें ॥ तें सांगिजेल मधुकर ॥८४॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबक मनोहरु ॥ द्रोणप्रथमदिनयुद्धप्रकारु ॥ नवमाध्यायीं कथियेला ॥८५॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥ शुभंभवतु ॥