श्रीगणेशाय नमः
मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ जालिया अभिमन्याचा क्षयो ॥ पुढें वर्तला कथान्वयो ॥ तो मज सांगिजे ॥१॥
वैशंपायन ह्नणती राया ॥ सर्व वीर शस्त्रें टाकोनियां ॥ शोकाक्रांत होवोनियां ॥ आले धर्माजवळी ॥२॥
शोक मांडिला युधिष्ठिरें ॥ ह्नणे माझिये आज्ञें लेंकुरें ॥ चक्रव्यूह भेदिला सत्वरें ॥ मारोनि वीर असंख्य ॥३॥
आतां सुभद्रापार्थ बहुसाल ॥ दुःखें काय बोलतील बोल ॥ तरी मी महाचांडाळ ॥ कैसें मुख दावूं तयां ॥४॥
मी जयाशेसाठीं काहीं ॥ युक्तायुक्त चिंतिलें नाहीं ॥ लोभ पापाचें मूळ सही ॥ अनर्थकारक ॥५॥
जो शयनासनभोजनीं ॥ पुढें करावा प्रीती करोनी ॥ तो आजि पुत्रचूडामणी ॥ म्यां दवडिला युद्धांत ॥६॥
जो याचकांलागीं समस्तां ॥ इच्छिले पदार्थ पुरविता ॥ रक्षवेचिना तया सुता ॥ आजी आह्मां ॥७॥
धिक् हें आमुचें जीवित ॥ ऐसा शोक केला बहुत ॥ तेणें विलापें अश्रुपात ॥ स्त्रवती नेत्रीं ॥८॥
असो ऐसा विलाप करितां ॥ तेथें व्यास आले अवचितां ॥ तयांप्रतीं जाहला बोलता ॥ धर्मराज ॥९॥
ह्नणे हें बाळक म्यां बळें ॥ संग्रामासी पाठविलें ॥ परि सर्वी मिळोनि मारिलें ॥ अहा जाहलें ओखटें ॥१०॥
मग व्यासें तिये अवसरीं ॥ सांत्वन केलें नानापरी ॥ पुरातन इतिहास उत्तरीं ॥ सांगता जाहला ॥११॥
जो पूर्वी अकंपनरायाप्रती ॥ नारद बोलिला वेदमूर्ती ॥ तोचि आइकावा श्रोतीं ॥ दत्तचित्तें ॥१२॥
हें आख्यान शोकनाशक ॥ सर्वत्र मंगळकारक ॥ तुष्टिपुष्टी आरोग्यदायक ॥ राज्यलक्ष्मी प्रयच्छितें ॥१३॥
व्यास ह्नणती धर्मा अवधारीं ॥ पूर्वी कृतयुगामाझारी ॥ अकंपन राज्य करी ॥ हरिनामा पुत्र त्याचा ॥१४॥
तो महावीर पराक्रमी ॥ झुंजतां पडला संग्रामीं ॥ अकंपनें दुःखऊमीं ॥ साहोनि केला क्रियापर ॥१५॥
तंव नारदें तेथें बिजें केलें ॥ रायें स्वदुःख निवेदिलें ॥ ह्नणे मज सांगा वहिलें ॥ कीं मृत्यु कवण हा ॥१६॥
यावरी नारद बोलिले वचनें ॥ पूर्वी सृष्टी केली चतुराननें ॥ परि चिंतावला भूमीकारणें ॥ भारें दाटली ह्नणोनियां ॥१७॥
तंव ब्रह्ममुखापासोनी ॥ चिंतेस्तव निघाला वन्ही ॥ त्याचिये ज्वाळां करोनी ॥ व्यापिलें त्रैलोक्य ॥१८॥
सर्व जाळिलें चराचर ॥ ह्नणोनि विधिपें गेला रुद्र ॥ ह्नणे गा प्रजासृष्टी समग्र ॥ तुवांचि रचिली ॥१९॥
आणि तूंचि आतां जाळितोसी ॥ ह्नणोनि कृपा आली मजसी ॥ तंव ब्रह्मा ह्नणे शिवासी ॥ मीतरी कोपविवर्जित ॥२०॥
परि पृथ्वी जाहली भाराक्रांत ॥ ह्नणोनि मजसी कोप प्रवर्त ॥ यावरी ह्नणे मृडानीनाथ ॥ तेज आपुलें आंवरीं ॥२१॥
येरें आंवरिला क्रोधाग्नी ॥ मग त्याचिये मुखापासोनी ॥ उत्पन्न जाहली कामिनी ॥ महाविक्राळ ॥२२॥
ते गेली दक्षिणेप्रती ॥ तिये विधिईशान बोलाविती ॥ प्रजा मारीं ऐसें ह्नणती ॥ अवयस्कपणें ॥२३॥
येरीनें रुदन मांडिलें ॥ ते अश्रु ब्रहयानें धरिले ॥ मग ते स्त्री त्याप्रती बोले ॥ कीं सांगतां अधर्म ॥२४॥
बाळ बाळिका वधु तरुणें ॥ पुत्र कलत्र पति मारणें ॥ हें उचित नव्हे तंव ह्नणे ॥ ब्रह्मा तियेसी ॥२५॥
याचि निमित्तें तुज जाण ॥ आह्मीं केलेंसे निर्माण ॥ तंव तियेनें केलें प्रार्थन ॥ बहुतांपरी ॥२६॥
यावरी तीतें प्रतिउत्तर ॥ नेदितीच ब्रह्मा शंकर ॥ येरियें येकागुष्ठीं उग्र ॥ तपश्वर्या मांडिली ॥२७॥
ऐशी वरुषें परियंत ॥ तियें तप केलें बहुत ॥ तंव ब्रह्मा तियेसि ह्नणत ॥ प्रसन्न जाहलों ॥२८॥
मग ते ह्नणे अवधारीं ॥ मी प्रजासंहार न करीं ॥ ऐसा वर सुष्ठोत्तरीं ॥ द्यावा मज ॥२९॥
ब्रह्मा ह्नणे तियेतें ॥ हें पाप न लागे तूतें ॥ तूं साहाह्य घेई सांगातें ॥ यमरोगादिक ॥३०॥
तेचि मारितील नित्यानीं ॥ येरीनें शापमयें करोनी ॥ अंगिकारिलें निर्वाणी ॥ ब्रह्मवचन ॥३१॥
तरी ऐसें पूर्वीच निर्माण ॥ मग हें ऐकोनि आख्यान ॥ अकंपनें मनींहून ॥ सांडिला शोक ॥३२॥
अगा ब्रह्मदेवें निर्मितु ॥ हा जाणावा अपमृत्यु ॥ याकारणें धर्मराया तूं ॥ त्यजीं शोक ॥३३॥
यावरी व्यासांसि धर्म पुसत ॥ काहीं आणिक कथा श्रुत ॥ करा ह्नणतां मुनि बोलत ॥ कीं ऐकें सावधान ॥३४॥
पूर्वी सृंजयरायाचे गृहासी ॥ आले पर्वत आणि नारदऋषी ॥ येरें पूजोनि तयांसी ॥ बैसविले आसनीं ॥३५॥
तंव तयाची कुमरी ॥ सुंदर देखिली ऋषीश्वरीं ॥ रायासि पुसती ते अवसरीं ॥ हे कन्या कवणाची ॥३६॥
सृंजय ह्नणे माझी नंदिनी ॥ मग ते मागितली नारदमुनीं ॥ धन्य भाग्य ह्नणवोनी ॥ संतोषला सृंजय ॥३७॥
तंव पर्वतऋषी ह्नणे ॥ हे म्यां वरिली अंतःकरणें ॥ तूं मागतोसि द्वेषपणें ॥ तरी घेई शाप माझा ॥३८॥
तुज रोधेल स्वर्गद्वार ॥ तंव बोलिला ब्रह्मकुमर ॥ रायें वाचादत्त निर्धार ॥ केली मज ॥३९॥
तूं बोलसी ऐसे बोल ॥ तरी तुजही स्वर्गद्वार रोधेल ॥ ऐसे जाहले शापबोल ॥ परस्परांसी ॥४०॥
रावो मनीं खेद पावला असो पूजा केली तये वेळां ॥ प्रार्थनेंतीं पुत्र मागितला ॥ सृंजयें देखा ॥४१॥
येरीं पुत्र दीधला विशेष ॥ त्याचें मूत्र आणि पुरीष ॥ अंगींचा स्वेदही सर्वशः ॥ होय सुवर्ण ॥४२॥
परि ते कन्या पावली निधन ॥ आणि रायासि जाहला नंदन ॥ तयापासाव निघे सुवर्ण ॥ नानाप्रकारें ॥४३॥
बहुप्रकारीं धर्म केले ॥ तें चोरांसि श्रुत जाहलें ॥ त्यांहीं पुत्रा नेवोनि वहिलें ॥ मारिला वनांतरीं ॥४४॥
पोट फोडोनि सोनें पाहिलें ॥ न दिसतांचि पळोनि गेले ॥ तंव सृंजयें शोका केलें ॥ नानापरी ॥ ॥४५॥
मग तयासी ब्रह्मनंदनें ॥ सांगीतलीं सोळा आख्यानें ॥ शोक नासला त्या निरुपणें ॥ सृंजयाचा ॥४६॥
पूर्वी रामभगीरथ नासले ॥ दिलीप ययातीहि निमाले ॥ सुहोत्र पौरव पावले ॥ क्षयो देखा ॥४७॥
नाभाग शशाबिंदु अंबरीष ॥ गय रंतिदेव दौष्कर नरेश ॥ भरत पृथु वेन विशेष ॥ जामदग्यादी ॥४८॥
ऐसे पराक्रमी भूपाळ ॥ सत्यवादी धर्मशीळ ॥ हेही नासले सकळ ॥ सांगितलें नारदें ॥४९॥
ऐकें धर्मा सावधानें ॥ सांगेन षोडश आख्यानें ॥ शोकनिवृत्ती होय जेणें ॥ मोहजनित ॥५०॥
नारद ह्नणे सृंजयासी ॥ नाश जाला सुहोत्रासी ॥ तो राजा धर्मे प्रजांसी ॥ पाळीतसे सदैव ॥५१॥
नित्य आराधी देवतांतें ॥ वल्लभ सदा सर्व लोकांतें ॥ सुवर्णपर्जन्य निभ्रांतें ॥ वरुषला देशांत ॥५२॥
सुवर्णोदकें वाहती सरिता ॥ तेणें अश्वमेध जाहल करिता ॥ सहस्त्र येकां नृपनाथां ॥ जिंकिलें तेणें ॥५३॥
तोही निमाला नरेंदु ॥ ह्नणोनि शोक नको करुं ॥ तैसाचि पौरव नृपवरु ॥ निमाला ऐकें ॥५४॥
जेणें सहस्त्र श्यामकर्ण ॥ सोडिले जिंकोनि नृपनंदन ॥ शौर्ये दाहीदिशा पूर्ण ॥ भरियेल्या पैं ॥५५॥
आले देशांतरगत विप्र ॥ विद्यापारंगत समग्र ॥ नट नर्तक गायक समग्र ॥ कळापात्रें ॥५६॥
प्रइयज्ञीं अलंकारयुक्त ॥ विप्रां गज देत मदोन्मत्त ॥ तैशाचि कन्य भूमिसहित ॥ दासीयुक्त दीधल्य ॥५७॥
तेणेंचि परी धेनु बहुता ॥ सर्वालंकार पूर्णता ॥ रत्नराशी जाहला देता ॥ यज्ञांतसमयीं ॥५८॥
ज्याच्या गाथारुप कीर्ती ॥ अद्यापि स्वर्गी गाताती ॥ तोहि निमाला भूपती ॥ ह्नणोनि करणें शोक वृथा ॥५९॥
तैसाचि रामचंद्र भूपती ॥ ज्याची जगविख्यात कीर्ती ॥ तोहि नासला ह्नणोनि चित्तीं ॥ न करीं शोक ॥६०॥
भगीरथ दिलीप जाण ॥ भरत वैन्यादिकांचें आख्यान ॥ तुज श्रुत असे ह्नणोन ॥ न करीं शोक ॥६१॥
महाविख्यात मांधाता ॥ जो त्रैलोक्यासी जिंकिता ॥ तया पुण्यशीळाची कथा ॥ ऐकें सृंजया ॥६२॥
त्याचा पिता मृगया करित ॥ श्रांतवाहन जाहला तृषित ॥ ह्नणोनि वनीं गेला धांवत ॥ संत्र देखोनी ॥६३॥
मग पृषदाज्य पियाला ॥ तेणें गर्भ राहिला ॥ तो गर्भ स्वर्गलोकीं नेला ॥ अश्विनौदेवीं ॥६४॥
तंव विचारिती सुरवर ॥ हा कवणाचें सेवील क्षीर ॥ मग बोलिला सुनासीर ॥ पेईल मातें ॥६५॥
तो नाभाग त्याचे अंगुळी पासोनी ॥ नित्य दुग्धपान करोनी ॥ वाढिन्नला बारां दिनीं ॥ दिसे द्वादशवरुषांचा ॥ ॥६६॥
तेणें एकेचि रथें समस्तु ॥ जनमेजय गय पृथु ॥ असित नृगराज बृहद्रथु ॥ जिंकिले भूपाळ ॥६७॥
पृथ्वी दीधली ब्राह्मणां ॥ अमित केलें अन्नदाना ॥ भूमि गोदानें ऋषिगणां ॥ तृप्त केलें ॥६८॥
तोही नाशला नृपवरु ॥ ह्नणोनि शोक नको करुं ॥ तैसाचि ययाती नहुषपुत्रु ॥ पावला मृत्य ॥६९॥
तेणें राजसूय यज्ञ शत ॥ अश्वमेध सहस्त्रांत ॥ पुंडरीक यज्ञ निभ्रांत ॥ येक सहस्त्र केले पैं ॥७०॥
भूरिदक्षिणे करोनी ॥ विप्र संतोषवी नित्यानीं ॥ मग युद्धी दैत्य मारोनी ॥ भूमी केली चतुर्धा ॥७१॥
यज्ञ अनाथ विप्र ऋषी ॥ चारी वांटे दीधले चौघांसी ॥ देवयानी शर्मिष्ठेसी ॥ जाहले पुत्र पांच ॥७२॥
तथापि नाहीं पावला शांती ॥ पुढें राज्य देवोनि पुत्राप्रती ॥ वनीं गेला तपस्थिती ॥ ह्नणोनि शोक सांडीं ॥७३॥
अंबरीषासि जाहलें मरण ॥ जेणें सर्व वैरी मारोन ॥ नानायागीं विप्रजन ॥ तृप्त केले ॥७४॥
अन्नें वस्त्रें अलंकार ॥ छत्रें आसनें अपार ॥ विप्रां दीधलीं वर्षे सहस्त्र ॥ साम्राज्यपणें ॥७५॥
तोही पावला असे मरण ॥ ह्नणोनि शोक निःकारण ॥ आइकें सृंजया वचन ॥ ऐसें ह्नणती नारद ॥७६॥
शशबिंदु नृपनाथा ॥ सहस्त्रयेक होत्या कांता ॥ एकीएकी प्रसवली सुतां ॥ सहस्त्रसहस्त्रां ॥७७॥
तो पराक्रमी सत्यवादी ॥ सर्वगुणविद्यानिधी ॥ ते स्वपुत्र अश्वमेधीं ॥ देता जाहला ब्राह्मणां ॥७८॥
आणि एकैक रहंवर ॥ शिबिका शतशत परिकर ॥ शतशत अश्व कुंजर ॥ सुवर्णालंकारयुक्त ॥७९॥
ऐसें ब्राह्मणां दीधलें ॥ तयाही देहांत जाहलें ॥ यास्तव शोक करितां भलें ॥ नाहीं सृंजया ॥८०॥
गयरायें तप करोनी ॥ प्रसन्न केला कृपीटयोनी ॥ नानाशस्त्रास्त्रें पावोनी ॥ जिंकिलें भूमंडळ ॥८१॥
परि तेंही ब्राह्मणा देवोनी ॥ स्वयें वास केला वनीं ॥ शांती पावला निदानीं ॥ ह्नणोनि न करीं शोक ॥८२॥
ऐकें रंतिदेव नृपनाथें ॥ अश्वमेधीं ब्राह्मणातें ॥ दानें देतां देतां तेथें ॥ सरले उदक ॥८३॥
मग स्वयंपाकगृतांतुनी ॥ नदी निघाली पूर्णजीवनीं ॥ चर्मण्वती तियेलागुनी ॥ बोलिजे नांव ॥८४॥
मग तेणें उदकें करुन ॥ सुवर्ण दीधलें संकल्पोन ॥ संतोषविलें त्रिभुवन ॥ तोही मरण पावला ॥८५॥
पृथु जामदग्न्य दौष्कृती ॥ यांची त्रिभुवनी विख्याती ॥ एकवीसवेळां वसुमती ॥ केली निःक्षत्री तेणें ॥८६॥
मग ते ब्राह्मणा दीधली ॥ यागांतीं सर्वदानें केलीं ॥ शेवटीं देहशांती जाहली ॥ तयांचीही ॥८७॥
जामदग्न्य तरी अमर ॥ वनीं राहिला महावीर ॥ कांजे मिथ्यामय संसार ॥ मानिला तेणें ॥८८॥
याकारणास्तव सृंजया ॥ तुवां शोक न कीजे वायां ॥ येरें नारदा वंदोनियां ॥ जाहला निर्दुःखी ॥८९॥
हें षोडशराजआख्यान ॥ शोकमोह निवारण ॥ सृंजयासी करवीलें श्रवण ॥ नारदाहीं ॥ ॥९०॥
तेंचि धर्मा तुजकारणें ॥ म्यां कथिलें व्यास ह्नणे ॥ पुढें सामर्थ्य ब्रह्मनंदनें ॥ प्रकट केलें आपुलें ॥९१॥
तो सृंजयाचा कुमर ॥ मंत्रें उठविला वेगवत्तर ॥ मग जाहला हर्षनिर्भर ॥ सृंजयनृपती ॥९२॥
ऐसें धर्मा उपदेशोनी ॥ व्यास गेले बदरिकावनीं ॥ पुढे सांगेल वैशंपायनमुनी ॥ तेंचि बोलेल मधुकर ॥९३॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबकमनोहरु ॥ षोडशराजआख्यानप्रकारु ॥ एकादशाऽध्यायीं कथियेला ॥९४॥
श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥