कथाकल्पतरू - स्तबक १० - अध्याय ३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

भीम ह्नणे जी वनमाळी ॥ माझा पुत्र महाबळी ॥ बभ्रुनामक पाताळीं ॥ असे जाण ॥१॥

तो बोलावूं ये अवसरीं ॥ तंव देव ह्नणे पाचारी ॥ मग चिंतिली अभ्यंतरीं ॥ पद्मावती भीमें ॥२॥

गौरीप्रसादें तिये कळलें ॥ मग बभ्रूसि ह्नणितलें ॥ कीं युद्ध असे मांडलें ॥ कौरवपांडवां ॥३॥

तुज भीम पिता बोलावित ॥ तरी कुरुक्षेत्रीं जाई त्वरित ॥ ऐसा ऐकोनि वृत्तांत ॥ चालिला बभ्रू ॥४॥

येवोनि पांडवां भेटला ॥ श्रीकृष्णा नमस्कार केला ॥ तंव तो देवें देखिला ॥ त्रिबाणयुक्त ॥५॥

यावरी तया ह्नणे श्रीहरी ॥ अगा तीन बाण तुझ्या करीं ॥ तेणें करिसील झुंजारी ॥ वैरियांसि केवीं ॥६॥

येरु ह्नणे जी श्रीपती ॥ लोक तरी किती असती ॥ देवो ह्नणे त्रिजगती ॥ मीनलीसे ॥७॥

बभ्रू ह्नणे जरी त्रिलोक ॥ तरी बाणें वधीन एकएक ॥ हें ऐकोनि लक्ष्मीनायक ॥ विस्मित जाहला ॥ ॥८॥

मग कृष्ण ह्नणे तयासी ॥ याची प्रचीती दावीं आह्मासी ॥ तेव्हां येरें चमत्कारासी ॥ दाविलें देखा ॥९॥

शेंदुरे नळा भरोनी ॥ उधळिला गगनीं जाउनी ॥ मग कृष्णाजवळी येउनी ॥ बोलता जाहला ॥१०॥

कीं जया मृत्यु असे जेथें ॥ तया शेंदूर लागेल तेथें ॥ ऐसें ऐकोनि अनंतें ॥ पाहिला तळवा ॥११॥

तंव देखे शेंदूर लागला ॥ मग श्रीकृष्ण चिंतावला ॥ ह्नणे हा तंव नव्हे भला ॥ सैन्याआंत ॥१२॥

यावरी कृष्ण ह्नणे तयासी ॥ तूं गा कवणा साह्य होसी ॥ येरु ह्नणे दुर्बळासी ॥ देईन आधार ॥१३॥

अंतरीं विचारिलें देवें ॥ कीं याचें मत नव्हे बरवें ॥ हारी पावतील कौरवें ॥ तयां साह्य होईल हा ॥१४॥

हा जीवें वांचला असतां ॥ कार्य न साधे सर्वथा ॥ ह्नणोनि केली कौशल्यता ॥ यादवरायें ॥१५॥

बभ्रू मेळिकारीं पाठविला ॥ मनी त्याचा मृत्यु पाहिला ॥ तंव भीमहस्तें देखिला ॥ नाश तयासी ॥१६॥

भारता इतुकिया अवसरीं ॥ अस्तासि पावला तमारी ॥ मग भीमासि ह्नणे श्रीहरी ॥ रात्रिभागीं ॥१७॥

अगा कौरव कपटी पाहीं ॥ कपटें विंदान करितील कांहीं ॥ तरी रणखांब रक्षावा सही ॥ तुवांचि भीमा ॥१८॥

तेथें जरी आलिया कोणी ॥ तो वधावा गदा हाणोनी ॥ येरु निघाला तत्क्षणीं ॥ खांबरक्षणार्थ ॥१९॥

मग बभ्रूसि बाहोनि कृष्ण ह्नणे ॥ तुवां पूजा घेवोनि जाणें ॥ रणखांबासी वाहणें ॥ हें शीघ्र करीं कार्य ॥२०॥

येरु पूजाद्रव्यें घेवोनी ॥ चालिला रणस्तंभस्थानीं ॥ तो भीमें येतां देखोनी ॥ हाणितला गदाघायें ॥२१॥

पुत्र ऐसा नोळखे अंधारीं ॥ गदा बैसली मस्तकावरी ॥ तेणें वीर पडोनि धरित्रीं ॥ काय बोलता जाहला ॥२२॥

ह्नणे येवढे गदाघातें ॥ कवणें हाणितलें मातें ॥ भीमें पाहोनियां तयातें ॥ पुत्र आपुला ओळखिला ॥२३॥

मग कटकटा करोनी ॥ दुःखें भीम पडला धरणीं ॥ ह्नणे हें कौशल्य चक्रपाणी ॥ केलें तुवां ॥२४॥

थोर मोकलिली करुणा ॥ तें कळलें रक्षकजनां ॥ त्याहीं येवोनि पंडुनंदनां ॥ कथिलें वृत्त ॥२५॥

तये वेळीं सैन्यासहित ॥ पांडव आणि कृष्णनाथ ॥ आले भीमाजवळी तासि निवेदिलें ॥ धर्मार्जुनाहीं ॥२६॥

तये वेळीं सैन्यासहित ॥ पांडव आणि कृष्णनाथ ॥ आले भीमाजवळी त्वरित ॥ तंव तो आक्रंदत असे ॥२७॥

पार्थे धांवोनि कवळिला ॥ भीम आंगेंसीं धरियेला ॥ करुणारसें ओसंडला ॥ ब्रह्मकटाहो ॥२८॥

श्रीकृष्ण ह्नणे पांडवांसी ॥ जाहलें होणार तें बभ्रूसी ॥ परि हांसतील तुह्मांसी ॥ कौरव पिशुन ॥ ॥२९॥

कळों न द्यावें कोणासी ॥ उगें चलावें मेळिकारासी ॥ मग धर्म ह्नणे भीमासी ॥ बा न करीं रुदन ॥३०॥

जें होणार तें जाहलें ॥ नेणिजे देवें काय रचिलें ॥ ऐसें नानापरी सांत्विलें ॥ भीमाप्रती ॥३१॥

असो कराया बभ्रूचें दहन ॥ प्रवर्तले पंडुनंदन ॥ तंव तयाचा असे प्राण ॥ परी घायीं विव्हळ ॥३२॥

मग तो ह्नणे श्रीकृष्णासी ॥ माझी राहिली असोशी ॥ जयाजय कवणासी ॥ अवलोकनार्थ ॥३३॥

तरी हे उभय झुंजती रणीं ॥ तें मी पाहीन निजनयनीं ॥ यांचे जयाजय देखोनी ॥ माझी इच्छा पुरेल ॥३४॥

नंतरें मी सांडीन शरीर ॥ तरी हे इतुकें कीजे निर्धार ॥ मग संतोषोनि कृपाकर ॥ दीधला वर तयासी ॥३५॥

आपुट्याच्या तरुवरीं ॥ शय्या रचिली पंडुकुमरीं ॥ तेथें निजविला बरवियापरी ॥ बभ्रुवीर ॥३६॥

तया क्षुधातृषा न लागे ॥ ऐसें सूत्र रचिलें श्रींरगें ॥ यावरी मेळिकारा वेगें ॥ आले समस्त ॥३७॥

असो उदया येतां सहस्त्रकिरण ॥ पहावया येती जन ॥ तंव बभ्रूचा घात दारुण ॥ जाहला देखती ॥३८॥

त्यांहीं दुर्योधना कथिलें ॥ कीं भीमें बभ्रूसि मारिलें ॥ हें ऐकोनि संतोषले ॥ सकळ कौरव ॥३९॥

ह्नणती पांडवां जाहला अपशकुन ॥ निमाला भीमाचा नंदन ॥ पराभूत होतील यावरुन ॥ पंडुपुत्र ॥४०॥

परि ते मूर्ख अज्ञानी ॥ नेणती कृष्णाची करणी ॥ जेथें बसे तिये स्थानीं ॥ सर्वदा जय ॥४१॥

मुनि ह्नणे गा जन्मेजया ॥ हे पुराणांतरकथा राया ॥ तुज श्रुत केली म्यां ॥ कल्पतरुमाजी ॥४२॥

आतां संस्कृत भीष्मपर्वोक्त ॥ कथा सांगतों संकलित ॥ जे संजयें केली श्रुत ॥ धृतराष्ट्रासी ॥४३॥

संजय ह्नणे हो धृतराष्ट्रा ॥ वृत्तांत ऐकें नरेंद्रा ॥ मेळिकार जाहला दोनी भारां ॥ कुरुक्षेत्रीं ॥४४॥

दुर्योधनें तिये वेळीं ॥ दुःशासनादिकां आज्ञा केली ॥ कीं हा भीष्म असे आपुळी ॥ प्राणज्योती ॥४५॥

शिखंडिया न मारणें ॥ ऐसा नियम केला तेणें ॥ त्या शिखंडीसि कृष्णार्जुनें ॥ रक्षिजत असे ॥४६॥

भीमादिक युधिष्ठिर ॥ तयासि रक्षिती अपार ॥ तैसेच तुह्मी रक्षा समग्र ॥ या भीष्मासी ॥४७॥

पूर्वील स्त्रीरुप शिखंडिया ॥ तुह्मी यत्न कीजे माराया ॥ तो स्त्रीरुप ह्नणोनियां ॥ न मारी भीष्म ॥४८॥

यास्तव भीष्म पाहिजे रक्षिला ॥ ऐसा रात्रीं विचार जाहला ॥ तंव उदया सूर्य आला ॥ प्रातःकाळीं ॥४९॥

शंख दुंदुभी वाजंतरें ॥ वाजिन्नलीं अपारें ॥ अश्व गर्जले हिंसकारें ॥ दोही दळी ॥५०॥

शस्त्रखणखणाट जाहला ॥ दळभार सन्नद्धला ॥ नानाआयुधीं मिरवला ॥ सैन्यसंघ ॥५१॥

कौरवदळीं विख्यात ॥ आजानुबाहू गंगासुत ॥ रथीं आरुढला मंडित ॥ नानाशस्त्रीं ॥५२॥

तयापाठीं शकुनी सौबळ ॥ विंद अनुविंद कैकेय शल ॥ कृतवर्मा आणि बृहद्धळ ॥ इत्यादि क्षोणीपती ॥५३॥

ऐसे सपुत्र सपरिवार ॥ दुर्योधनाचा जयकार ॥ करावयासी समग्र ॥ उदित जाहले ॥५४॥

मध्यस्थ छत्री गंगासुत ॥ चामरमंडित ध्वजें सहित ॥ दुर्योधन सैन्य सांभाळित ॥ गजीं आरुढोनी ॥५५॥

ऐसा भार सन्नद्धला ॥ मग भीष्म भटांसि बोलिला ॥ अहो हा क्षात्रधर्म भला ॥ स्वर्गदायक ॥५६॥

नाभाग ययाति मांधाता ॥ स्वर्ग पावले हाचि आचरितां ॥ किंबहुना ब्रह्मलोकता ॥ पावले ते ॥५७॥

क्षत्रिय स्वधर्मद्वारें सत्य ॥ हे लोक पाविजेत ॥ एतद्विषयीं ऋषिमत ॥ ऐका श्लोक ॥५८॥ ]

॥ श्लोकः ॥ अधर्मः क्षत्रियस्येह यद्वयाधिमरणं गृहे ॥ यदाजौ निधनं याति सोऽस्य धर्मः सनातनः ॥१॥

॥ टीका ॥ ऐसा हा बोल ऐकतां ॥ आणि सकळ क्षोणी मिळतां ॥ येणें जाहलें सूर्यसुंता ॥ शस्त्रेंसहित ॥५९॥

तयासि वारिलें भीष्मदेवें ॥ ह्नणे जंव म्यां युद्ध करावें ॥ तंव तुवां शस्त्र न धरावें ॥ समरामाजी ॥६०॥

मग कर्ण उगाचि राहिला ॥ तया उपरी भार चालिला ॥ जयामाजी भीष्म मिरवला ॥ शोभायमान ॥६१॥

दुःशासना चित्रसेन ॥ दुर्मर्षण दुर्मर्षण दुर्विषह विकर्ण ॥ दुःसह विविंशती जाण ॥ सत्यव्रत पुरुमित्र ॥६२॥

जय शल भूरिश्रवा वीर ॥ ऐसे रथी वीससहस्त्र ॥ तथा त्यांचे अनुयायी कुमर ॥ ससैन्येंसीं ॥६३॥

कितव सौवीर कैकेय ॥ प्राच्य प्रतीच्य उदीच्य ॥ ऐसे द्वादश देशराय ॥ अभिरक्षक भीष्माचे ॥६४॥

धनुषखङ्गखेटकधार ॥ वीर असती शतसहस्त्र ॥ त्यांही मानुषगांधर्वपर ॥ केली व्यूहरचना ॥६५॥

तो व्यूह सबळ देखिला ॥ मग धर्म पार्थासि बोलिला ॥ पाहें कौरव व्यूह संचला ॥ असंभाव्य ॥६६॥

आपुली सेना लहान ॥ यास्तव मुनिवाक्य प्रमाण ॥ तें ऐकें सावधान ॥ युद्धाविषयीं ॥६७॥

आपुलें सूक्ष्मदळ देखावें ॥ तरी जुडोनि युद्ध करावें ॥ बहुत असलिया झुंजावें ॥ विस्तृतपणें ॥६८॥

तरी सूचीव्यूह करावा ॥ तंव पार्थ ह्नणे बांधवा ॥ वज्रपाय व्यूह रचावा ॥ जो इंद्रें रचिला होता ॥६९॥

यावरी ह्नणे वृकोदरु ॥ सिंहरुप व्यूह करुं ॥ जेणें पळे वैरिभारु ॥ मृगप्राय ॥७०॥

मग भीम केला अग्रेसर ॥ पाठीं रक्षक सौभद्र ॥ दोहीं भागीं परिकर ॥ नकुळसहदेवो ॥७१॥

धृष्टकेतुविराट पृष्ठीं जाण ॥ त्यांपाठी पांचाळ धृष्टद्युम्न ॥ त्यांमागें शिखंडी अर्जुन ॥ त्यांची पाठी रक्षित ॥७२॥

कैकेय्य आणि चेकितान ॥ हे पार्श्वविभागीं जाण ॥ मध्यें युधिष्ठिर आपण ॥ रथारुढ ॥७३॥

मत्तकुंजरभारव्यास ॥ द्रुपद अक्षौहिणी सहित ॥ आणि विराट सैन्ययुक्त ॥ रक्षकपृष्ठीं ॥७४॥

नानाकार ध्वज शोभती ॥ स्वर्गापर्यत दीसती ॥ त्यांत अर्जुनरथाप्रती ॥ सुंदरध्वज ॥७५॥

सुवर्णमणीमणिक्ययुक्त ॥ ज्याच्या ध्वजस्तंभीं हनुमंत ॥ ऐसा सैन्यभार चालत ॥ वायु वाजत पाठीसी ॥७६॥

हे पांडवांकडे शुभ शकुन ॥ आणि कौरवदळीं अपशकुन ॥ असो दोहींदळींचे नयन ॥ भीष्मभीम ॥७७॥

देखतां पराक्रमी समर्थ ॥ दोनीदिळीं वीर अद्भुत ॥ उभय भासती देवदैत्य ॥ सेनाप्राय ॥७८॥

परि परसेना भयंकर ॥ देखोनि विषादे युधिष्ठिर ॥ मग बोलिला उत्तर ॥ अर्जुनासी ॥७९॥

कीं अभेद्य अच्छेद्य जाण ॥ अक्षोभ्य हा गंगानंदन ॥ तेणें शास्त्रदृष्टीं निर्माण ॥ केला व्यूह ॥८०॥

देखोनि आंदोळतें मन ॥ कैसें होईल निस्तरण ॥ ऐसा राजसंक्षोभ देखोन ॥ बोलिला पार्थ ॥८१॥

स्वामी आपुले हे वीर ॥ प्रतिज्ञें करोनि अधिकतर ॥ यांचे साह्यें करोनि निर्धार ॥ जय जाणिजे आपुला ॥८२॥

जयप्राप्तीचा उपाय निश्विती ॥ नारद भीष्मद्रोण जाणती ॥ तोचि उपाय तुह्मांप्रती ॥ सांगत असें ॥८३॥

पूर्वी देवदैत्यां युद्ध मांडलें ॥ तेव्हां दैत्य अधिक देखिले ॥ आणि जय आला पाहिजे ॥ देवांलागीं ॥८४॥

ह्नणोनि ब्रह्में इंद्राप्रती ॥ सांगीतली जयस्थिती ॥ जियेवीण नव्हे गती ॥ जयप्राप्तीची ॥८५॥

सत्य कठिनत्व धर्मोत्साह ॥ धरुनि सांडावे लोभ मोह ॥ तरीच युद्धीं भेदवे व्यूह ॥ पारकेयांचा ॥८६॥

हेंचि नारदेंही आपण ॥ उपदेशिलें असे ज्ञान ॥ तरी येणें जय निर्वाण ॥ असे आपुला ॥८७॥

श्रीहरीचे प्रसादें जैसें ॥ इंद्रा त्रैलोक्य पावलेंसे ॥ तैसें आपणाही विशेषें ॥ पावेल राज्य ॥८८॥

असो या सेना मिळालिया ॥ श्रीकृष्ण ह्नणे धनंजया ॥ पैल पाहें भीष्माचार्था ॥ मंडित सुवर्णरथीं ॥८९॥

जेवीं सिंह मृगासि पाहे ॥ तैसा आपणा देखताहे ॥ अनेकसेनांसह राये ॥ रक्षिताती जयासी ॥९०॥

या सकळां मारुनि भीष्मा मारिजे ॥ तरीच जयातें लाहिजे ॥ ऐसें बोलिलें यदुरायें ॥ सारथित्वें पार्थासी ॥९१॥

ऐकें जन्मेजया नृपवरा ॥ ऐसें संजयें कथिलें धृतराष्ट्रा ॥ दळ मिळालें कुरुक्षेत्रा ॥ रणखांब घालोनी ॥९२॥

याचिये पुढें अपूर्व कथा ॥ श्रीकृष्ण उपदेशील पार्था ॥ तेथें निरुपिजेल गीता ॥ ब्रह्मविद्या ज्ञानघन ॥९३॥

कां जें भीष्में धरिलें जीवीं ॥ कीं शस्त्र घेववीन कृष्णाकरवीं ॥ नातरी संहारीन आहवीं ॥ धर्मादिकांसी ॥९४॥

तेचि समयीं कृष्णदेवें ॥ क्षात्रधर्म ब्रह्मविद्याभावें ॥ उपदेशिला तें श्रोतीं ऐकावें ॥ ह्नणे मधुकरकवी ॥९५॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबक मनोहरु ॥ उभयदळसन्नद्धप्रकारु ॥ तृतीयोऽध्यायीं कथियेल ॥९६॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ शुभंभवतु ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP