श्रीगणेशाय नमः
मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ तुमचेनि जाहला पापक्षयो ॥ तरी आतां गीतान्वयो ॥ सांगिजे मज ॥१॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ भगवद्नीता परमपावन ॥ ते तुज सांगों संकलोन ॥ भीष्मपर्वीची ॥२॥
भारतीं उद्योगपर्व सार ॥ परि भीष्मपर्व महाथोर ॥ कीं गीतोपदेशें भवसागर ॥ उतरिला देवें ॥३॥
ऐका उद्योगपर्वाधारें ॥ कौरवपांडव समभारें ॥ युद्धार्थ मिळाले वैराकारें ॥ कुरुक्षेत्रीं ॥४॥
क्षेत्रा पूर्वभागीं कौरवदळ ॥ पश्विमभागीं पांडव सकळ ॥ स्यमंतपंचकस्थळीं बहळ ॥ राहिले निवास धरोनी ॥५॥
बाळवृद्धांवेगळे सगळे ॥ चातुरंगेंसीं मीनले ॥ धर्मे भक्ष्यभोज्य दीधलें ॥ सकळांप्रती ॥६॥
उपनामें ब्रीदें दीधलीं ॥ दोनीदळें सिद्ध जाहलीं ॥ कीं सिधूच मिळाले प्रळयकाळीं ॥ ऐसी उपमा तयांसी ॥७॥
तंव इकडे हस्तनापुरी ॥ धृतराष्ट्र जाहला चिंतातुरी ॥ पुत्रनाशसंभावनेपरी ॥ विषादयुक्त बैसला ॥८॥
तयाचा शोक जाणोनी ॥ अकल्पित आले व्यासमुनी ॥ त्यांहीं बोधिलें नीतिवचनीं ॥ रायाप्रती ॥९॥
कीं संग्राम करितां नियत ॥ जय पराजय अथवा मृत्य ॥ ह्नणोनि शोक निभ्रांत ॥ न करीं राया ॥१०॥
तुजी इच्छा असेल जरी ॥ कीं संग्राम पाहीन नेत्रीं ॥ तरी ते दृष्टी अवधारीं ॥ देतों तुज ॥११॥
धृतराष्ट्र ह्नणे हो मुनी ॥ पुत्रक्षय न पाहवे नयनीं ॥ या नंतरें व्यासमुनी ॥ बोलिले धृतराष्ट्राप्रती ॥१२॥
या संजयासी ऐसें सामर्थ्य ॥ देत असें मी निश्वित ॥ कीं चरित्र युद्धस्थित ॥ ते जाणावें येणें ॥१३॥
येथेंचि बैसोनि उद्योती ॥ जेजे प्रकार युद्धीं होती ॥ ते हा देखोनि तुजप्रती ॥ निवेदील ॥१४॥
कौरवपांडवकीर्तीचा जाण ॥ मी तरी प्रस्ताव करीन ॥ ऐसें व्यासोक्त ऐकोन ॥ अंध पुसता जाहला ॥१५॥
स्वामी संग्रामसमयीं तेथें ॥ मोठा क्षय होईल निरुतें ॥ ऐसें मानसीं कल्पतें ॥ विपरीत मज ॥१६॥
तंव व्यास देव ह्नणे ॥ याचीं निमित्तें अवधारणे ॥ गीध कंक आणि ससाणें ॥ बकादि पक्षी ॥१७॥
वनींहूनि येताती ॥ घोरशब्द बोभाइती ॥ उग्रदृष्टीं पाहताती ॥ भक्षितील चातुरंगा ॥१८॥
प्रातःकाळीं सायंकाळी ॥ आकाश आच्छादे धूलिपटळीं ॥ चारीनक्षत्रें अग्निज्वाळीं ॥ धगधगिती निरंतर ॥१९॥
येणें महावीर शयन करिती ॥ दुजें कार्तिकपौर्णिमेप्रती ॥ निस्तेज आरक्त निशापती ॥ तेणें वाहती रक्तपूर ॥२०॥
अंतरिक्षस्थळीं प्रसिद्ध ॥ वराह बिडाळ करिती युद्ध ॥ तथा होताति थोर शब्द ॥ महाभयसूचक ॥२१॥
कोकिळा भास सारस ॥ मयूरादि पक्षि अशेष ॥ शब्द करिती घोररुक्ष ॥ क्षणोक्षणीं ॥२२॥
पक्षी चंक्रमण करिताती ॥ उडोनि वहनांवरी बैसती ॥ तथा अरुणोदयी होताती ॥ घुबडांचे शब्द ॥२३॥
सृष्टीमाजी अवकाळीं ॥ पडती रक्तबिंदू भूतळीं ॥ दुंदुभीशब्द अंतराळीं ॥ होतसे पुष्पवृष्टी ॥२४॥
तथा अरुंधतीची तारा ॥ आकाशीं वसिष्ठऋषीश्वरा ॥ पूर्वे होती ते अवधारा ॥ घातलें पश्वाद्भागीं ॥२५॥
रोहिणीनक्षत्रा भेदुनी ॥ उपक्रमी जाहला शनी ॥ चंद्रकलंक स्वस्थळींहुनी ॥ जाहला चंचळ ॥२६॥
वाहनांच्या नेत्रींहुनी ॥ पडती अश्रुबिंदु नित्यानीं ॥ यास्तव प्रळयकाळ जाणीं ॥ कीं होईल सैन्यक्षय ॥२७॥
आणिक व्यासमुनी मागुती ॥ दुर्निमित्तें सांगताती ॥ गाईगर्दभ बोभाती ॥ अकाळीं फलितवृक्ष ॥ ॥२८॥
गाईमृगादि समग्र ॥ तयां तीन शिंगें चारी नेत्र ॥ पंचपाद मळमूत्र ॥ स्थानें दोनीदोनी ॥२९॥
शिरें पुच्छें दोन दोन सत्य ॥ हस्त्यादिकां चारी दंत ॥ पतिव्रता प्रसवतात ॥ गरुड मयूरादी ॥३०॥
घोडिया वांसुरें प्रसवती ॥ श्वानासि लांडगीं होताती ॥ तथा स्त्रियां प्रसवती ॥ कन्या चारीपांच ॥३१॥
त्या उपजतांचि गायननृत्य ॥ रुदन करिताति विपरीत ॥ बाळकें परस्परें झुंजत ॥ दंडपाषाणीं ॥३२॥
मघानक्षत्रीं मंगळ वक्रीं ॥ बृहस्पती श्रवणक्षत्रीं ॥ शनी पडतसे अंतरीं ॥ सोडोनि स्थान ॥३३॥
पूर्वाभाद्रपदापुरोभागीं ॥ आरोहोनि उत्तरभागीं ॥ शुक्र देखिजतो स्वर्गी ॥ ऐकें धृतराष्ट्रा ॥३४॥
ऐंद्रनक्षत्र ज्येष्ठांतें ॥ आक्रमूनि असे निरुतें ॥ ध्रुवतारा प्रज्वळितें ॥ जाइजेते अपसव्यें ॥ ॥३५॥
ग्रामनगरादि प्रांती ॥ वृक्ष वातेंविण उन्मळती ॥ अग्नी सधूम होताती ॥ इंधनेंविण ॥३६॥
इत्यादि ऐशा दुश्विन्हीं ॥ होईल निक्षत्री मेदिनी ॥ ऐसें कल्पतसे ज्ञानीं ॥ आतां ऐकें शुभचिन्हें ॥३७॥
निर्मळतेज ऊर्ध्व ज्वाळा ॥ प्रदक्षिणावर्त सकळा ॥ आहुतींचा गंध मेळा ॥ ऐसा अपूर्व वन्ही ॥३८॥
पृष्ठभागीं वायसशब्द ॥ सौम्य करिती ते जयद ॥ ज्यांचे सेनेचे सुभट जोध ॥ शोभती वस्त्रालंकारीं ॥३९॥
मुखश्री उत्साहयुक्त ॥ वीरश्रीनें आलंकृत ॥ पाहवेनाचि निभ्रांत ॥ जयांकडे ॥४०॥
ते जयवंत गा भूपाळा ॥ अम्लान कंठीं पुष्पमाळा ॥ युद्धीं जाणती अस्त्रकळा ॥ तेचि विजयी ॥४१॥
संग्रामा जातां वायु उजवा ॥ गृहप्रवेशीं पाठीं असावा ॥ तो शुभदायक जाणावा ॥ आणि अशुभ सामोरील ॥४२॥
पाठीं वायु मेघ पक्षिये ॥ असलिया होय निश्वयें जय ॥ इत्यादि सांगोनि लवलाहें ॥ व्यास गेले स्वाश्रमीं ॥४३॥
हें ऐकोनियां धृतराष्ट्र ॥ क्षणयेक जाहला स्थिर ॥ मग संजयाप्रति विचार ॥ पुसों आदरिला ॥ ॥४४॥
कीं जरी भूनिमित्तें राजे ॥ प्राणांत कलह करिती ओजे ॥ तरी इयेचें प्रमाण सांगिजे ॥ सविस्तारें ॥४५॥
यावरी संजय बोले संभ्रमें ॥ भूतें द्विविधें स्थावरजंगमें ॥ त्यांत जंगमाचिया क्रमें ॥ तीनी खाणी ॥४६॥
जारज स्वेदज अंडज प्रकट ॥ यां माजी जारज श्रेष्ट ॥ यांच ग्राम्य आरण्य विशिष्ट ॥ भेद चौदा ॥४७॥
मनुष्य गाय अजा मेंढा ॥ वेसर रासभ आणि घोडा ॥ हीं सात ग्राम्य निधडा ॥ यांत श्रेष्ठ मनुष्य ॥४८॥
सिंह व्याघ्र महिष सूकर ॥ हस्ती रीस कीं वानर ॥ हीं सात आरण्यकें निर्धार ॥ यांत सिंह श्रेष्ठ ॥४९॥
असो एतद्रुप पृथ्वीनिमित्त ॥ राजे प्राणांतें न लेखित ॥ आणि पन्नासकोटी पृथ्वीवृत्त ॥ असे राया ॥५०॥
विशेषें द्वीपें असती सात ॥ तैसेचि समुद्र आणि पर्वत ॥ तो भूगोलखंडींचा वृत्तांत ॥ सांगीतल षष्ठस्तबकीं ॥५१॥
ऐसी अनंत वसुमती ॥ तियेनिमित्तें भूप भांडती ॥ प्राणांतही करिताती ॥ परस्परें ॥५२॥
असो दोनीदळांभीतरीं ॥ भीष्म योद्धा महाक्षेत्री ॥ जयाशा करितां समरीं ॥ पडिला शेवटीं धृतराष्ट्रा ॥५३॥
हे संजयवाक्य ऐकोनी ॥ अंध मूर्छित पडिला धरणीं ॥ मग मुहूर्ते सावध होवोनी ॥ पुसों आरंभिलें ॥५४॥
ह्नणे जेणें कौरवदळ ॥ दहादिवस रक्षिलें सकळ ॥ अर्बुदसंख्या पाडोनि परदळ ॥ प्रत्येकदिनीं ॥५५॥
धरिलें पितयार्थ ब्रह्मचर्य ॥ युद्धीं इंद्रादिकां अजेय ॥ तो शेवटीं कैसा गांगेय ॥ पडिला समरीं ॥५६॥
जेणें परशराम जिंकिला ॥ तो शिखंडियें कैसा मारिला ॥ हा नवलावो थोर जाहला ॥ वाटे मज ॥५७॥
केवीं सर्षपघणघातें ॥ पात जाहला मेरुतें ॥ तरी हें सांगावें मातें ॥ सविस्तर ॥५८॥
ऐसें धृतराष्ट्र वाक्य ऐकिलें ॥ मग संजयें ह्नणितलें ॥ राया हें सकळही जाहलें ॥ द्यूतास्तव ॥५९॥
तरी कवणा बोल ठेविजे ॥ जेणें द्यूतकर्म खेळिजे ॥ तयाची स्वयें शास्ती कीजे ॥ भूपाळेंची ॥६०॥
निषिद्ध कर्म आचरणें ॥ तरी प्रायश्वित्त घ्यावें तेणें ॥ पांडवीं वनवास भोगणें ॥ तेंचि तयां प्रायश्वित्त ॥६१॥
आतां दुर्योधनादिकें समग्रें ॥ अपराधास्तव येणें प्रकारें ॥ दुःखें भोगिती निर्धारें ॥ तुवां शोक न करावा ॥६२॥
असो तुवां पुसिला प्रश्न ॥ तो ऐकें सावधान ॥ युद्धाकारणें उभय सैन्य ॥ मिळालें कुरुक्षेत्रीं ॥६३॥
वैशंपायन ह्नणती गा नृपती ॥ ऐसी कथा संस्कृतभारतीं ॥ संजयें कथिली धृतराष्ट्राप्रती ॥ व्यासोक्त जाण ॥६४॥
परि पुराणांतरीचें मत ॥ सांगों संक्षेपें विशेषित ॥ गेला श्रीकृष्ण सामार्थ ॥ हस्तनापुरीं ॥६५॥
तैं नायकेचि दुर्योधन ॥ मग पांडवांजवळी येवोन ॥ सर्व वृत्तांत सांगोन ॥ ह्नणता जाहला ॥६६॥
कीं सुईअग्रीं लागे माती ॥ तेही तुह्मां कौरव न देती ॥ तरी राज्य घ्या क्षात्रवृत्तीं ॥ येथें विचार नसे आन ॥६७॥
तंव पांचही ह्नणती चक्रपाणी ॥ कैसे गोत्रज वधावे रणीं ॥ या पातकास्तव पतनीं ॥ पडणें सत्य ॥६८॥
श्रीकृष्ण ह्नणे पंडुसुतां ॥ आपुला स्वधर्म नाचरितां ॥ पतन होतसे सर्वथा ॥ आणि अपकीर्ती भुवनत्रयीं ॥६९॥
हें तुमचिया नये विचारा ॥ तरी पुनरपि वनवास करा ॥ कीं निर्देवाचिया शरीरा ॥ बळें संचरे कुबुद्धी ॥७०॥
तंव भीम ह्नणे अनंता ॥ वैकल्य लागेल समस्तां ॥ तरी करोनि संग्राम सर्वथा ॥ घेणें राज्य आपुलें ॥७१॥
कौरवीं अपाय बहुत केले ॥ ते केवीं जाती विसरले ॥ आह्मांसि तुवां रक्षिलें ॥ नानासंकटीं ॥७२॥
ऐसें भीमोक्त ऐकोन ॥ बोलता जाहला अर्जुन ॥ देवा तूंचि कृपाघन ॥ सारथी आमुचा ॥७३॥
तूं सोयरा आकांतींचा ॥ प्रतिपाळक भक्तजनांचा ॥ शब्द टाळोनि लौकिकाचा ॥ करीं हितार्थ साधन ॥७४॥
यावरी श्रीकृष्ण काय ह्नणे ॥ मी गेलों याचि कारणें ॥ लौकिक टाळाया बोलणें ॥ पडलें कौरवांसी ॥७५॥
पुनः भाट तिकडे पाठवा ॥ राज्य मागा कीं युद्धासि बोलावा ॥ तें मानवलें पांडवां ॥ आणि सकळां रायांसी ॥७६॥
यावरी भाट पाठविले ॥ ते हस्तनापुरीं पातले ॥ सकळवृत्तांतासि कथिलें ॥ दुर्योधनातें ॥७७॥
तें ऐकोनि गांधार ॥ क्रोधें खवळला थोर ॥ निशाणा घावो देवोनि भार ॥ सन्नद्ध केला ॥७८॥
महेंद्रपुरासी पातले ॥ तेथोनि भाट पामकिले ॥ त्याहीं वृत्तांता सांगितलें ॥ पांडवांसी ॥७९॥
मग सातक्षोणी दळभारेंसी ॥ पांडव गेले महेंद्रपुरासी ॥ नाद नसमाये आकाशीं ॥ वाजंत्रांचा ॥८०॥
तेव्हां महेंद्रपुरीं देखा ॥ सरिसी सारिली भूमिका ॥ रणखांब घातला निका ॥ कौरवनाथें ॥८१॥
दोनी भार उतरले ॥ दुसें मंडपदीधले ॥ भीष्मासी रणवट बांधिलें ॥ दुर्योधनें ॥८२॥
तेथ ज्ञानीं कृष्णें पाहिलें ॥ तंव अजय स्थान देखिलें ॥ ह्नणे येथें युद्ध केलें ॥ तरी नव्हे साध्य जय ॥८३॥
मग पांडवां ह्नणे हरी ॥ येथें आपणा येईल हारी ॥ यास्तव जाऊं कुरुक्षेत्रीं ॥ ते असे निष्ठुर भूमिका ॥८४॥
मग तेथोनि पांडव निघाले ॥ कुरुक्षेत्रासी पावले ॥ पाठोवाटीं सकळ आलें ॥ कौरवसैन्य ॥८५॥
पांडवीं रणखांब घातला ॥ थोर उत्साहो असे केला ॥ तें देखोनि धाकिन्नला ॥ दुर्योधन ॥८६॥
ह्नणे हे भूमिका निष्ठुर ॥ येथें जय पावती पंडुकुमर ॥ मग म्लानवदनें विचार ॥ पुसिला भीष्मासी ॥८७॥
ऐकोनि गांगेय ह्नणत ॥ मी गा दहादिवसा आंत ॥ करीन यांचा निःपात ॥ नातरी स्वयें पडेन रणीं ॥८८॥
मज पडलिया निश्वित ॥ द्रोण रक्षोनि पांचां दिवसांत ॥ करील पांडवांचा निःपात ॥ निर्धारेंसीं ॥८९॥
ऐसेही वांचती पंडुनंदन ॥ तरी दोनदिवस रक्षोनि कर्ण ॥ करील पांडवांचें हनन ॥ निश्वयेंसीं ॥९०॥
त्याचेनही न मरती जरी ॥ तरी येका दिवसाभीतरीं ॥ शल्य पांडवांचा वध करी ॥ रक्षोनि तुह्मां ॥९१॥
ऐसेही जरी पांडव उरती ॥ तरी बळदेवा स्मरा चित्तीं ॥ तो करील यांची शांती ॥ आह्मानंतरें ॥९२॥
हें अवघेयां मानवलें ॥ जयजयकारें गर्जिन्नले ॥ मग गांधारें विनविलें ॥ गांगेयासी ॥९३॥
हा अर्जुन महावीर ॥ तयाचा सारथी सर्वेश्वर ॥ तरी केवीं प्रतिज्ञानिर्धार ॥ जाईल सिद्धीसी ॥९४॥
भीष्म ह्नणे न करीं चिंत्ता ॥ दहाव्या दिनीं वधीन पार्था ॥ कां शस्त्र घेववीन सर्वथा ॥ कृष्णाकरवीं ॥९५॥
जरी पुढें करिती शिखंडिया ॥ तरी हे प्रतिज्ञा जाईल वायां ॥ ऐसें सर्वज्ञत्वें गांगेया ॥ बोलिला देखा ॥ ॥९६॥
ऐसा निश्वयो जाहला ॥ दुर्योधन युद्धा संसरला ॥ तंव नवलावो जाहला ॥ तो सांगिजेल मधुकरें ॥९७॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबक मनोहरु ॥ भीष्मप्रतिज्ञाप्रकारु ॥ द्वितीयाध्यायीं कथियेला ॥९८॥ ॥