कथाकल्पतरू - स्तबक १० - अध्याय ४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ मुने तूं ज्ञानगंगेचा डोहो ॥ तरी गीताउपदेशभावो ॥ सांगिजे मज ॥१॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ संजयाचें वाक्य ऐकोन ॥ धृतराष्ट्रें केला प्रश्न ॥ हस्तनापुरीं ॥२॥

येवोनि पुत्रांची कळवळ ॥ धृतराष्ट्र जाहला विव्हळ ॥ मग संजया उतावीळ ॥ पुसता जाहला ॥३॥

कुरुक्षेत्र तरी पुण्यस्थळ ॥ तेथें कैचें खळबळ ॥ आह्मासि असे केवळ ॥ जीवन तेंची ॥४॥

ऐसा ऐकोनियां प्रश्न ॥ संजय देत प्रतिवचन ॥ कीं श्रीकृष्णें बोधिला फाल्गुन ॥ गीतोपदेशें ॥५॥

व्यूहरचनेनें पांडवसैन्य ॥ देखोनियां दुर्योधन ॥ द्रोणाचार्या जवळी जावोन ॥ काय बोलता जाहला ॥६॥

कीं हे पांडव दुर्जय देख ॥ यांचा धृष्टद्युम्न सेनानायक ॥ भीमार्जुनादि वीर विशेष ॥ आणि सारथी श्रीकृष्ण ॥७॥

युयुधान विराट द्रुपद धृष्टकेत ॥ चेकितान काशिराज पुरुजित ॥ कुंतिभोज शैब्य युधामन्युविक्रांत ॥ उत्तमौज आणि अभिमन्य ॥८॥

प्रतिविंध्यादिक समस्त ॥ त्यांचिये दळींचे महारथ ॥ आतां आमुचे सैन्यांत ॥ ते ऐकाहो आचार्या ॥९॥

तुह्मी भीष्म कृप कर्ण ॥ समितिंजय द्रौणी विकर्ण ॥ सौमदत्ती बाल्हीक जाण ॥ ऐसे वीर महारथिये ॥१०॥

आमुचें सैन्य न्यून पाहीं ॥ याचे कारण येक अहीं ॥ भीष्म पितामह उभयांही ॥ तो आमुचा सेनापती ॥११॥

त्यांचें सेनापतित्व वृकोदरा ॥ यास्तव भीष्मातें अनुसरा ॥ याचें रक्षण तुह्मी करा ॥ सकळ मिळोनी ॥१२॥

हें वाक्य भीष्में ऐकोनी ॥ मग दुर्योधन न भियावा ह्नणोनी ॥ उत्साहकारणालागोनी ॥ केला सिंहनाद ॥१३॥

सवेंचि शंखातें वाजविलें ॥ तंव नानावाद्यशब्द जाहले ॥ ढोल पणव गोमुखीं केलें ॥ स्फुरण शंखभेरी ॥१४॥

ऐसें देखोनि पांडवसैन्यांत ॥ पांचजन्य वाजवी अनंत ॥ अर्जुनें फुंकिला देवदत्त ॥ आणि पौंड्रक भीमसेनें ॥१५॥

अनंतविजय युधिष्ठिरें देखा ॥ नकुळें वाजविलें सुघोषा ॥ सहदेवें मणिपुष्पका ॥ क्रमेंचि जाण ॥१६॥

नानावाद्यें वाजिन्नलीं ॥ ते थोर ध्वनी जाहली ॥ जाणों हदयें फुटों मांडलीं ॥ धार्तराष्ट्रांचीं ॥ ॥१७॥

त्या शब्दापुढें दिशागगनीं ॥ कांहीं ऐकिजेना श्रवणीं ॥ ऐसें युद्धार्थ सैन्य देखोनी ॥ समयीं शस्त्रसंतापाचे ॥ ॥१८॥

अविचारी हे पंडुसुत ॥ ह्नणोनियां विचारार्थ ॥ कृष्ण सकळेंद्रिय जित ॥ बोले पार्थ तयाप्रती ॥१९॥

पार्थ ह्नणे गा केशवा ॥ रथ दोहीं सैन्यामाजि स्थापावा ॥ जंवपरियंत मी पाहेन सर्वा ॥ या वीरांसी ॥२०॥

या दुष्टदुर्योधनातें ॥ हित व्यावयाचेनि अर्थे ॥ आले असती तयांतें ॥ मी पाहेन पृथकाकार ॥२१॥

यावरी श्री चक्रपाणी ॥ रथा ठेवीत मध्यें नेउनी ॥ पार्थ पाहे तंव सैन्यीं ॥ देखे आचार्य पिते ॥२२॥

पितामहादि पुत्रपौत्र ॥ मातुळ श्वशुर आणि मित्र ॥ देखोनि कृपाविव्हळगात्र ॥ बोलिला श्रीकृष्णासी ॥२३॥

कीं युद्धीं आप्तवर्ग आपुला ॥ प्राण टाकावयासि आला ॥ देखोनि देहीं कंप उपनला ॥ गात्रें शिथिल जाहली ॥२४॥

दाह होतसे त्वचेतें ॥ राहतां चित्त भ्रम पावतें ॥ थोर हाती दुर्निमित्तें ॥ तींही देखत असें ॥२५॥

राज्य करुनी ज्यांचिये प्रीतीं ॥ अष्टभोग भोगिजताती ॥ तेचि मरणार्थे राहिलेती ॥ तरी नकरचे पाप हैं ॥२६॥

हे आचार्यादिक मातें ॥ जरी मारितील स्वहस्तें ॥ तरी आपण न मारुं यांतें । नकरुं युद्धेच्छा ॥२७॥

आमुचा वधरुप अधर्म ॥ हे न जाणती अधम ॥ परि आपण विचारावा धर्म ॥ देखत देखा ॥२८॥

कुळीं वधझालिया स्त्रियांसी ॥ वर्णसंकरें मग पितरांसी ॥ लुप्तपिंडोदकक्रियांसी ॥ होतसे अधःपतन ॥२९॥

वर्णसंकर नरकासि होत ॥ ह्नणोनि हा नकरावा प्रवर्त ॥ ऐसा विषादयुक्त पार्थ ॥ सांडिले धनुष्यबाण्म ॥३०॥

ध्वजासि टेंकोनि बैसला ॥ करुणाश्रुपात करिता जाहला ॥ तो युद्धेच्छारहित देखिला ॥ श्रीकृष्णनाथें ॥३१॥

मधुदैत्यवधें कठीण ॥ हदय ऐसा जो श्रीकृष्ण ॥ तो बोलिला हास्यवदन ॥ अर्जुनासी ॥३२॥

हा कोण मोह इये समयीं ॥ पार्था तुज उपजला पाहीं ॥ पूर्वील धन्य राजे त्यांहींही ॥ हा नाहीं अवलंबिला ॥३३॥

येणें इहलोकीं बरवें नोहे ॥ युद्ध नकरितां स्वधर्म जाय ॥ हा अकीर्तिकारक पाहें ॥ नव्हे स्वर्गप्राप्ती ॥३४॥

मागां संग्रामींच बहुतां ॥ कीर्ति अर्जिलिया पार्था ॥ तरी तूं अर्जुन या नामार्था ॥ करी यत्न ॥३५॥

आठव धरोनियां मनीं ॥ हदयीचें भय सांडोनी ॥ युद्धार्थ उभा राहें रणीं ॥ घेवोनि धनुष्यबाण ॥३६॥

ऐसियावरी बोलिलें पार्थे ॥ अगा जे पूज्य पितयांचे पिते ॥ त्यांसीं झुंजेन ह्नणतांचि त्यातें ॥ होय प्रत्यवाय ॥३७॥

शब्दें ह्नणतां प्रत्यवाय थोरु ॥ तरी प्रत्यक्ष युद्ध कैसें करुं ॥ यांसी न मारितां भिक्षाआहारु ॥ करणें उचित ॥३८॥

धर्मार्थकाम तीन पुरुषार्थ ॥ एतत्स्वरुप हे समस्त ॥ मारुनि भोग होईल प्राप्त ॥ तो रक्तें मिश्रित यांचेनी ॥३९॥

तरी रुधिरमिश्रित पाहें ॥ कर्पूरादिक भोग काय ॥ सुखदायक हें बोलोनि राहे ॥ शस्त्रें टाकोनी ॥४०॥

यावरी ह्नणे हषीकेशी ॥ पार्था सांडोनि स्वधर्मासी ॥ स्वबुद्धिविलास करितोसी ॥ मीचि यांसी मारणार ॥४१॥

आणि ह्नणसी संपत्तिभोक्ता ॥ हें बोलणें मूर्खाचें सर्वथा ॥ गेलियामेलियाचा पंडितां ॥ नाहीं खेद ॥४२॥

गतप्राणाचें नधरिती दुःख ॥ तरी अगतप्राणें काय सुख ॥ आतां एतद्विषयीं विशेष ॥ ऐकें अर्जुना ॥४३॥

सोयर्‍याचे देहाचा शोक ॥ तूं करितोसी सम्यक ॥ परि हे असती अनेक ॥ आहार श्वानसृगालांचे ॥४४॥

ऐसें बोलसी तरी पाहीं ॥ मी आणि तूं राजे सर्वही ॥ जाहलों गा नाहीं कहीं ॥ ऐसें नाहीं सर्वथा ॥४५॥

ना उपजें नाचि मरें ॥ ऐसेंही नाहीं निर्धारें ॥ एवं मागां होतों खरें ॥ पुढांही होऊंची ॥४६॥

ह्नणोनि आत्मज्ञानें पाहीं ॥ जेवीं येका देहाचे ठायीं ॥ कौमार यौवन जरा तिहीं ॥ अवस्था होताती ॥४७॥

तैसा हा आत्मा निरंतर ॥ देहांतरें धरितो अपार ॥ ह्नणोनि एतदर्थी एतदर्थी निर्धार ॥ कायसा शोक ॥४८॥

इंद्रियें विषयाविष्ट होताती ॥ तेव्हां सुख नासे सर्वार्थी ॥ याचा सिद्धांत ऐस बोलती ॥ धीरपुरुष ॥४९॥

आत्मा क्षेत्रज्ञ अविनाशी सत्य ॥ त्याचें क्षेत्ररुप देह अनित्य ॥ यास्तव युद्ध करितां निभ्रांत ॥ हानी कायसी ॥५०॥

जीवात्मा विकार रहित यथार्थे ॥ पहिला विकार तो जायते ॥ अस्ति विवर्धते विपरिणमते ॥ अपक्षीयते विनश्यती ॥५१॥

ऐसे षडविकार परियेसीं ॥ आत्मा निर्विकार देहासी ॥ अनेक देह धरी मग त्यांसी ॥ तैसाचि त्यजीत असे ॥५२॥

जैसीं वस्त्रें सांडोनि जीर्णे ॥ पुरुष घेतसे नूतनें ॥ तैसीं देहें घेणें त्यजणें ॥ आत्मयासी ॥५३॥

ह्नणोनि आत्मा अच्छेद्य शस्त्रें ॥ अशोष्य वायूसि नजळे अंगारें ॥ नबुडे उदकें निर्धारें ॥ हा नित्यगत ॥५४॥

हा नित्यचि परि होतो ॥ अथवा नित्य परि नासतो ॥ ह्नणोनि पार्था तुज सांगतों ॥ नकरीं शोक ॥५५॥

कां जे उपजलिया मरण ॥ मेलियासी जन्म जाण ॥ परिहारा नाहीं निर्वाण ॥ एतदर्थी ॥५६॥

यास्तव हा आत्मा देहीं ॥ असोनि सदा अवध्य नाहीं ॥ ह्नणोनि शोक करण्यासि कहीं ॥ योग्य नव्हसी ॥५७॥

अर्जुना ऐसें असोनी ॥ क्षत्रियें युद्ध न करितां रणीं ॥ होय स्वधर्माची हानी ॥ पावे अपकीर्ती तें ॥५८॥

धर्मयुद्धेंविण क्षत्रियासी ॥ आणीक बरवें नाहीं परियेसी ॥ ह्नणोनि संग्राम जरी न करिसी ॥ तरी पावसी अपकीर्ती ॥५९॥

कीर्तिस्वधर्महीन होतां ॥ पापभोगी होसी पार्था ॥ दोहीं प्रकारीं सर्वथा ॥ भोगणें दुःख ॥६०॥

आणि जरी संग्रामीं पडसी ॥ तरी स्वर्गी भोग भोगिसी ॥ तूं मारिसी तरी पावसी ॥ राज्य भूमंडळीचें ॥६१॥

सुखदुःखाची आकस्ती ॥ न धरोनि क्षेत्री झुंजती ॥ ते निष्पापचि सर्वार्थी ॥ स्वधर्मानुष्ठानें ॥६२॥

लाभालाभांचिये ठायीं ॥ समबुद्धी धरणें पाहीं ॥ हा बुद्धियोग सही ॥ तथा सांख्ययोग ॥ ॥६३॥

इये योगीं त्वां रहावें ॥ स्वकर्मानुष्ठान करावें ॥ परि फळ न इच्छावें ॥ कर्ममार्गीचें ॥६४॥

वेदीं कर्मफळें सांगीतलीं ॥ तीं व्यवसायरुपें बोलिलीं ॥ वादरतें ह्नणोनि वहिलीं ॥ करीं त्याग ॥६५॥

कां जे त्रिगुणशब्दविशेष ॥ सात्विक राजस तामस ॥ हे त्यजीं होवोनि उदास ॥ निस्त्रैगुण्यत्वें ॥६६॥

हीं द्वंद्वें सांडोनि चारी ॥ लाभालाभ जयाजयपरी ॥ शीतोष्ण सुखदुःख शरीरीं ॥ करीं युद्धरुप स्वधर्म ॥६७॥

पार्था जो स्थिरबुद्धि नर ॥ ऐकें येथींचा विचार ॥ तो विषयांपासूनि निर्धार ॥ आंवरी इंद्रियें ॥६८॥

जे विषयवासना जीवमात्रीं ॥ तोचि लक्षणें दिवस अवधारीं ॥ परि ते स्थितप्रज्ञाची रात्री ॥ दिवस परब्रह्मी ॥६९॥

ह्नणोनि निरहंकार होउनी ॥ वर्ते सकळ कामना सांडोनी ॥ तो परमशांतीतें निर्वाणीं ॥ पावता होय ॥७०॥

शांती पावोनि निर्गुणस्थितीं ॥ पूर्वप्रकारें बर्ते सर्वार्थी ॥ तो अंतकाळीं परमगती ॥ पावे ब्रह्मसाक्षात्कार ॥७१॥

ऐसा सांख्ययोग निरुपिला ॥ दुसरा अध्याय पूर्ण जाहला ॥ मागुती अर्जुन पुसों लागला ॥ श्रीकृष्णासी ॥७२॥

कर्माहूनि अधिक बुद्धी ॥ निरुपितोसि कृपानिधी ॥ तरी कांटाकिसि कर्मोदधी ॥ माजी मज ॥७३॥

आधींच असे बुद्धीसि मोहो ॥ वरी तववाक्यें उपजला संदेहो ॥ तरी येकनिष्ठेचा सांग निर्वाहो ॥ मग ह्नणितलें गोविंदें ॥७४॥

कीं कर्मपोगियां कर्मनिष्ठा ॥ सांख्यांसि ज्ञानेंचि स्पष्टा ॥ दोनी गती असति श्रेष्ठा ॥ ऐसियापरी ॥७५॥

चित्तशुद्धयर्थ कर्मयोग ॥ तो झालिया सांख्ययोग ॥ ऐसा क्रमेंचि होयमार्ग ॥ नैष्कर्मतेचा ॥७६॥

ज्ञानेंद्रियांचें आवरण ॥ करुनि आरंभी कर्मकरण ॥ असतां अनासक्त अंतःकरण ॥ तो कर्मयोगी ॥७७॥

तूं आवश्यक कर्मे करोनी ॥ तीं सर्वेश्वरीं समर्पोनी ॥ कर्मफळांशा टाकोनी ॥ करीं निःशंक युद्ध ॥७८॥

रजोगुणापासोनि क्रोधकाम ॥ यांचें मनबुद्धिइंद्रियें धाम ॥ यांहीं आंवरुनि ज्ञानललाम ॥ मोहिलें देहीं ॥७९॥

करितां इंद्रियांचा जय ॥ मग कामाचा होय क्षय ॥ तेणें नव्हे वधबंधभय ॥ परदर्शनें ॥८०॥

हा कर्मयोग समग्र ॥ तृतीयोध्यायीं परिकर ॥ पार्था निरुपिला पवित्र ॥ देवरायें ॥८१॥

मग ह्नणे पूर्वी कथिली सूर्या ॥ हे कर्मयोगाची चर्या ॥ तेनिरुपिली मित्रवर्या ॥ तुजलागीं म्यां ॥८२॥

माझें जन्मकर्म दिव्यवंत ॥ लीलेनें धर्मसंरक्षणार्थ ॥ ऐसें जाणे जो निभ्रांत ॥ तो कर्मी न बांधवे ॥८३॥

ज्यांहीं प्रीति भयक्रोधां जिंकिले ॥ पूर्ण मत्स्वरुप ओळखिलें ॥ ते ज्ञानिये निश्वयें जाहले ॥ मत्स्वरुप ॥८४॥

मज कर्मफळाशा नाहीं ॥ ह्नणोनि कर्मे नलिपें कहीं ॥ ऐसिया मज जाणे तोही ॥ ऐसाचि होय ॥८५॥

साधुजनांतें रक्षावया ॥ पापियांतें नाशावया ॥ बरव्यापरी धर्म स्थापाया ॥ संभवें मी युगानुयुगीं ॥८६॥

जें जिये समयीं देख ॥ पावेल अन्नवस्त्रादिक ॥ तेणेंचि मानी संतोष ॥ परोत्कर्षक्षमावंत ॥८७॥

जो पुरुष द्वंद्वातीत ॥ लाभालाभीं समचित्त ॥ तो कर्ता परि कर्मी निभ्रांत ॥ बांधवेनाची ॥८८॥

द्रव्ययज्ञादि यज्ञ बहुत ॥ विधीनें कथिले वेदोक्त ॥ ते सर्व कर्मजनित ॥ जाण पार्था ॥८९॥

यास्तव द्रव्ययज्ञाहुनी ॥ ज्ञानयज्ञ श्रेष्ठ मानीं ॥ कर्मयोग ज्ञानयोग स्थानीं ॥ पावतसे विश्रांती ॥९०॥

तें ज्ञान महायोगी ज्ञानी ॥ गुरुशुश्रूषा देखोनी ॥ उपदेशिती शिष्यालागुनी ॥ जरी सुलक्षणी शिष्य असे ॥९१॥

तये ज्ञाननिष्ठेनें सत्य ॥ मोह न पाविजे संसारात ॥ हें सांगतसें संकलित ॥ ऐकें अर्जुना ॥९२॥

पापी ऐसा बाह्य दिसे ॥ परि अंतरगव्हर ज्ञानें प्रकाशे ॥ तो उतरे अनायासें ॥ संसाराब्धी ॥९३॥

काष्ठांलागीं अग्नि जैसा ॥ भस्मीभूत करी परियेसा ॥ ज्ञानाग्नी जाळी तैसा ॥ सर्वकर्मासी ॥९४॥

तरी पार्था ऐक पूर्वी ॥ तुज संदेह उपजला जीवीं ॥ तो ज्ञानखङ्गें छेदोनि आहवीं ॥ राहें उभा युद्धार्थ ॥९५॥

ऐसा कर्मब्रह्मार्पणयोग ॥ चतुर्थाध्यायीं अभंग ॥ निरुपिता जाहला श्रीरंग ॥ अर्जुनासी ॥९६॥

संन्यासकर्मयोग दोनी ॥ श्रेयस्कर असती जाणीं ॥ परि दोहींमाजी प्रथमाचरणीं ॥ मुख्य कर्मयोग ॥९७॥

जो निर्द्वषी द्वंद्वातीत ॥ आणि विषयवासनारहित ॥ तोचि सुटे गा निभ्रांत ॥ संसारबंधापासुनी ॥९८॥

कर्मयोगाहूनि जाण ॥ संन्यासयोग अति गहन ॥ ते गती कर्मयोगापासून ॥ सुखें पावे ॥९९॥

जो कर्मयोगी असूनि पाहें ॥ शुद्धमनें जितेंद्रिय होये ॥ सर्वत्र मत्स्वरुप ध्याये ॥ तो कर्मकरितां न लिपे ॥१००॥

पाहतां आणि ऐकतां ॥ आघ्राण करितां स्पर्शितां ॥ जातयेतां होत्साता ॥ भक्षितांही ॥१॥

परि मी कर्ता ऐसें न मानी ॥ इंद्रिये वर्तती विषयगुणीं ॥ ऐसें धरी जो अंतःकरणीं ॥ तो संन्यासयोगयुक्त ॥२॥

जेंजें कर्म आचरी ॥ तेंतें कृष्णार्पण करी ॥ कर्मफळ टाकी तो न लिंपे नीरीं ॥ पद्मपत्रवत ॥३॥

कर्मे न लिंपे योगी तैसा ॥ जो वासना सांडी सर्वशः ॥ नेत्र ध्रुवस्थानीं सरिसा ॥ लावी योगमार्गे ॥४॥

प्राणाचें ऊर्ध्व गमन रोधून ॥ अधोवायु अपानीं जाण ॥ त्याचें अधोगमन वारुन ॥ प्राणायाम साध्य जया ॥५॥

आसनादि ध्यानयुक्त ॥ योगाभ्यासें मोक्षेच्छावंत ॥ इच्छाभयक्रोधरहित ॥ तो पुरुष मुक्तचि सदा ॥६॥

हा प्रकृतिसंन्यासयोग पाहें ॥ पंचमीं कथिला यादवरायें ॥ धृतराष्ट्रा तोचि संजयें ॥ कथिला गा जन्मेजया ॥७॥

ब्रह्मज्ञानेच्छावंतासी ॥ कर्म मुख्य कारण परियेसीं ॥ यावरी आत्मज्ञानियासी ॥ शम कारण बोलिजे ॥ ॥८॥

ह्नणोनि जो ऐशा प्रकारीं ॥ जीवाचें जीवत्व निवारी ॥ तो आपुला आपण निर्धारीं ॥ बोलिजे बंधु ॥९॥

आत्मज्ञानाची गंधी ॥ जयासी प्राप्त नसे कधीं ॥ तो आपुला आपण निर्बुद्धीं ॥ शत्रु जाण ॥११०॥

जया ढेंकुळ आणि सुवर्ण ॥ अंत्यज आणि ब्राह्मण ॥ समबुद्धी होय तो जाण ॥ मुमुक्षुयोगिया ॥११॥

तरी कर्मयोगेंचि पाहें ॥ पहिलेन चित्तशुद्धि होय ॥ ह्नणोनि तयेचा उपाय ॥ ऐकें ऐसा ॥१२॥

पवित्र प्रदेशीं सत्वस्थान ॥ तेथ कंबलादि आसन ॥ घालावें कुशआस्तरण ॥ अति उंच नीच न व्हावें ॥१३॥

स्वयें तयावरी बैसोनी ॥ अव्यग्र चित्त करोनी ॥ सम ग्रीवा धरोनी ॥ दृष्टी स्वनासाग्रीं ॥१४॥

लक्ष न लाऊनि दिशांप्रती ॥ एकाग्र पहावें निश्वळचित्तीं ॥ अंतःकरणध्यानगती॥ लावावे प्रसन्न करोनी ॥१५॥

ऐसा माझ्या ठायीं पाहें ॥ जो प्रत्यकचित्त होय ॥ तो निर्वाणगतिलाहें ॥ पावे मज ॥१६॥

अधिक भोजनादिक ॥ तथा अभोजनादि देख ॥ निद्रा जागरण न्यूनाधिक ॥ सांडावें योगियें ॥१७॥

निस्पृह होवोनि स्वस्थचित्त ॥ जैसा दीप असे निवांत ॥ तैसा विघ्नादिकीं अचलित ॥ तेव्हां होय तो योगी ॥१८॥

जो योगाभ्यास करितां ॥ झणी योगसिद्धी न होतां ॥ मध्येंचि नासे तो मागुता ॥ जन्मे योगियांच्या कुळीं ॥१९॥

कीं श्रेष्ठकुळीं उपजोनी ॥ योगाभ्यास मागुतेनी ॥ अधिकाधिक करोनी ॥ होय जीवन्मुक ॥ ॥१२०॥

ऐसा योगियां मध्यें गणनीय ॥ जया असे श्रद्धातिशय ॥ तो माझा भक्त मत्प्रिय ॥ अधिक योगी ॥२१॥

हा आत्मसंयम योग जाण ॥ केला षष्ठाध्यायीं निरुपण ॥ पुढें ऐका ज्ञानविज्ञान ॥ अध्याय सातवा ॥२२॥

पार्था चतुःप्रकारीं मातें ॥ सुकृती भजताति निरुतें ॥ पहिला आर्त ह्नणजे पीडेतें ॥ पावला जो तो ॥२३॥

दुजा जाणावयाची इच्छा करी ॥ तिसरा अर्थार्थी अवधारीं ॥ ज्ञानातें इच्छी तो श्रेष्ठ भारी ॥ चौघांमाजी ॥२४॥

येरा तिहींचीं फळें स्वल्प ॥ ज्ञानी केवळ मत्स्वरुप ॥ मी योगमायायुक्त अलोप ॥ नाहीं सर्वा प्रत्यक्ष ॥२५॥

जरामरणभयभीत ॥ जे मज सर्वप्रकारें आश्रित ॥ ते ब्रह्मअध्यात्मअधिभूत ॥ कर्मादि सर्वविद ॥२६॥

ऐसा ज्ञानयोग ऐकोनी ॥ पुढें पार्थ विनवी देवालागुनी ॥ कीं ब्रह्मादि प्रकार मांडोनी ॥ सांगिजे मज ॥२७॥

मग ह्नणे पुरुषोत्तम ॥ अक्षर तेंचि परब्रह्म ॥ स्वभाव तेंचि अध्यात्म ॥ बोलिजे पार्था ॥२८॥

भूतांचिये भावाची गती ॥ तें कर्म जाण सुभद्रापती ॥ उत्पत्ति प्रळय स्थिती ॥ कर्तृत्व कर्म ॥२९॥

क्षर भाव तें अधिभूत ॥ पुरुष तो अधिदैवत ॥ अधियज्ञ देहाआंत ॥ मीचि जाण ॥१३०॥

प्रयाणकाळीं मनीषा नचळे ॥ भक्तियुक्त योगबळें ॥ प्राण आवेशोनि भ्रुवमेळें ॥ पावे परमपुरुषातें ॥३१॥

अर्जुना प्राण उत्क्रमणीं ॥ तिये समयीं मज जाणोनी ॥ प्राणी मन्यय होवोनी ॥ पावती मातें ॥३२॥

आब्रह्मलोक परियंत ॥ पुरुष पावोनि होती पतित ॥ परि मज पावोनि पुनरावृत्त ॥ जन्म नाहीं ॥३३॥

कां जें दिव्यसहस्त्रयुगें प्रमाण ॥ तो ब्रह्मयाचा एक दिन ॥ तितुकीच रात्रि जाण ॥ एवं अहोरात्र ॥३४॥

दिवसा अव्यक्तादि समस्त ॥ पदार्थ होताति व्यक्त ॥ रात्रीं उत्पन्न तितुकें नासत ॥ लय पावत अव्यक्तीं ॥३५॥

अव्यक्तशब्दें मूळमाया ॥ नित्यप्रकृति धनंजया ॥ ते माझी प्रवृत्ति जाणोनियां ॥ होत सृष्टिसंहार ॥३६॥

उत्पत्तिविनाशातीत ॥ जो भिन्न काहीं पदार्थ ॥ नाशितां न नासे निभ्रांत ॥ होतां होयचि ना ॥३७॥

तें अक्षर ते परमगती ॥ त्यातें पावोनि नाहीं पुनरावृत्ती ॥ तें ममस्थान उत्कटभक्तीं ॥ पाविजतें पार्था ॥३८॥

अग्निज्योंति दिन शुक्लपक्ष ॥ उत्तरायण काळीं निवृत्तपुरुष ॥ तो ब्रह्म पावे विशेष ॥ तद्देवताद्वारें ॥३९॥

तो पुनः परावर्ते ना ॥ ऐसी उत्तरायणसमर्थता ॥ षण्मास धूम रात्रि जाणा ॥ कृष्णपक्ष ॥१४०॥

दक्षिणायनकाळीं मृत ॥ तो ब्रह्म नपवूनि परावर्तत ॥ तदभिमानी देवतायुक्त ॥ तेणें द्वारें ॥४१॥

इया असती दोनी गती ॥ जगत्रयीं शाश्वतमती ॥ जाणोनि मोह न पावती ॥ योगीश्वर ॥ ॥४२॥

हे स्थानमर्यादा जाणे ॥ तोचि ज्ञाता सर्वथा ह्नणणें ॥ ह्नणोनि योगयुक्त होणें ॥ सर्वकाळ पार्था ॥४३॥

तो दिव्यपदातें पांडवा ॥ पावे संदेह न धरावा ॥ हा महापुरुषयोग आठवा ॥ संपूर्णाध्याय ॥४४॥

कल्पादि सर्व भूतें स्त्रजिता ॥ आणि कल्पांतीं संहारिता ॥ परि उदासीन राहता ॥ मी अनासक्तत्वें ॥४५॥

तीं कर्मे सृष्टयादिकें ॥ मज बांधिती ना विशेषें ॥ मनुष्य ऐसेंचि मातें देखे ॥ तो मूढ जन ॥४६॥

जे महात्मे ते निरंतर ॥ जाणोनि अद्भुत स्वरुपपर ॥ मज भजताति नामोच्चार ॥ नमस्कार करोनी ॥४७॥

भजनें करुनि सद्भक्त ॥ मज आहेति उपासित ॥ ते नपवती यातायात ॥ पावती मातेंचि पैं ॥४८॥

ज्ञानयज्ञें कितीयेक ॥ उपासिताती माझे यजक ॥ वेदोक्त सोमपानादिक ॥ कितीयेक करिताती ॥४९॥

ज्ञानयज्ञें पावती मातें ॥ कर्मयोगें कर्मफळातें ॥ ते पुण्य सरलिया मागुते ॥ लोटिजती मृत्युलोकीं ॥१५०॥

ऐसे वेदत्रयीं कर्मधर्म ॥ जे आचरती मनोधर्म ॥ ते गतागतकाम अकाम ॥ पावताती सदा ॥५१॥

जो भजे जिये देवते ॥ तो शेवटीं पावे तियेतें ॥ जे तरी भजताति मातें ॥ ते मातेंचि पावती ॥५२॥

पत्र पुष्प फळ जीवन ॥ जो मज भक्तीनें करी अर्पण ॥ तें मी प्रीतीं करीं अशन ॥ भक्तीस्तव ॥५३॥

ऐसें आहे ह्नणोन ॥ स्वविषयभोग भोगून ॥ जेंजें आचरसी तपदान ॥ तें मातेंचि समर्पी ॥५४॥

तेणें मजलाचि पावसी ॥ संसारिक दोष न पवसी ॥ हें यथार्थ परियेसीं ॥ धनुर्धरा गा ॥५५॥

जे मज आश्रयूनि असती ॥ पापयोनी शूद्र वैश्य युवती ॥ तेही परमगती पावती ॥ निश्वयेंसीं ॥५६॥

तरी पवित्र ब्राह्मण ॥ भक्तराजे ऋषि जाण ॥ मज पावती येथ कवण ॥ नवलावो असे ॥५७॥

हे राजयोगविद्या गुज ॥ नवमाध्यायीं कथिली तुज ॥ मी आदिस्वरुप बीज ॥ कारणव्यापक ॥५८॥

ऐसें नवमाध्याय परियंत ॥ जाहलें गीतापूर्वार्ध समाप्त ॥ पुढें उत्तरार्ध संकलित ॥ सांगेल कवि मधुकर ॥५९॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबक मनोहरु ॥ गीतापूर्वार्धकथनप्र ० ॥ चतुर्थाध्यायीं कथियेला ॥१६०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP