कथाकल्पतरू - स्तबक १० - अध्याय ६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मग ह्नणे जन्मेजयो ॥ मुने तूं सर्वज्ञ द्विजरावो ॥ तरी सांगें कथान्वयो ॥ पुढील मज ॥१॥

तंव वैशंपायन वक्ता ॥ ह्नणे ऐकें गा भारता ॥ कृष्णें उपदेशिलें पार्था ॥ परम गौप्य ॥२॥

तें वचन आयकोनी ॥ पार्थ गतसंदेह होवोनी ॥ कृष्णालागीं नमस्करोनी ॥ घेतले धनुष्यबाण ॥३॥

उत्साहें रथीं उभा ठेला ॥ देखोनि पांडवभार आनंदला ॥ नानावाद्यगजर जाहला ॥ व्यापिलें ब्रह्मांड ॥४॥

तिये समयीं देव किन्नर ॥ विद्याधर गंधर्व पितर ॥ स्थळींस्थळींहूनि समग्र ॥ पाहूं पातले ॥५॥

आले ऋषीश्वर सिद्धचारण ॥ इंद्रादि लोकपाळ जाण ॥ शेष वासुकी सर्पगण ॥ त्रैलोक्य मीनलें ॥६॥

इकडे धृतराष्ट्रासि ह्नणे संजयो ॥ येक जाहला नवलावो ॥ तो ऐकें कथान्वयो ॥ दत्तचित्तें ॥७॥

समुद्रवत सेना दोनी ॥ युधिष्ठिरें देखिल्या नयनीं ॥ मग शस्त्रें वेगळीं ठेवोनी ॥ सांडिलें कवच ॥८॥

असस्मात तिये वेळीं ॥ उडी टाकोनि रथाखालीं ॥ चालिन्नला भीष्माजवळी ॥ होवोनि प्राडमुख ॥९॥

ऐसियातें देखोन ॥ अर्जुनादि बंधु श्रीकृष्ण ॥ मागें चालिले मग अर्जुन ॥ ह्नणे धर्मासी ॥१०॥

स्वामी आह्मासि टाकोनी ॥ वैरियांत कां जातां चरणीं ॥ तैसेंचि भीम बोले वचनीं ॥ कैं जाइजतें स्वामिया ॥११॥

ऐसा समस्तीं वारिला ॥ परि तो नायकत चालिला ॥ तंव पांडवांप्रति बोलिला ॥ श्रीकृष्णनाथ ॥१२॥

धर्माचा आशय जाणिला आपण ॥ यासी गुरुकृपभीष्मद्रोण ॥ युद्ध करावें त्यांचिये आज्ञेनें ॥ ह्नणोनि तिकडे असे जात ॥१३॥

श्लोकः ॥ प्रणम्य च गुरुं यस्तु अभियुद्धयत मानवः घ्रुवं तस्य जयो युद्धे भवेदिति मतिर्मम ॥१॥

ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥ तंव युधिष्ठिर परौता गेला ॥ देखोनि हाहाकार वर्तला ॥ कौरवसैन्यासी ॥१४॥

ह्नणती हा कुळाधम भ्याला ॥ ह्नणोनि भीष्मा शरण आला ॥ कीं रक्षावया आपुला ॥ प्राण देखा ॥१५॥

याचे बंधु पार्थादिक ॥ जीवंत असतां सकळिक ॥ हे पडलियाविण येकायेक ॥ शरण न यावें ॥१६॥

ऐसा युधिष्ठिर निंदिला ॥ मग उत्साहो आरंभिला ॥ देवें दळभार स्थिर केला ॥ बंधूंसहित दूरस्थ ॥१७॥

इकडे धर्म भीष्मापें येवोनी ॥ दोनी चरण अभिवंदोनी ॥ बोलता जाहला नम्रवचनीं ॥ पितामहातें ॥१८॥

ह्नणे आज्ञा द्या जी सद्भावें ॥ आह्मीं तुह्मांसीं युद्ध करावें ॥ आणि आशीर्वादही द्यावे ॥ जयकारक ॥१९॥

तंव भीष्म ह्नणे धर्मासी ॥ जरी आज्ञा न घेतासी ॥ तरी अवश्य पावतासी ॥ पराभव ॥२०॥

आतां संतोषलों तुझ्या गुणीं ॥ तरी माग जें असेल मनीं ॥ येरु ह्नणे ताता रणीं ॥ करीं मज जयवंत ॥२१॥

भीष्म ह्नणे वत्सा कहीं ॥ मज न जिंकिती इंद्रादिकही ॥ परि शिखंडीहस्तें पाहीं ॥ मजसी प्राणांत ॥२२॥

जय पावसी तिये वेळीं ॥ मग गेला द्रोणाजवळी ॥ तया वंदोनि शिरकमळीं ॥ बोलिला पूर्ववत ॥ ॥२३॥

तंव द्रोण ह्नणे धर्मासी ॥ आह्मी प्राणांत झुंजों तुह्मांसी ॥ कौरवांसाठीं परियेसीं ॥ परि जयवंत तुह्मीच ॥ ॥२४॥

यावरी विनविलें युधिष्ठिरें ॥ तुह्मां जिंकिजे कोणे प्रकारें ॥ गुरु ह्नणे ऐक निर्धारें ॥ धर्मराया ॥२५॥

कोणी आप्तपुरुषापासोनी ॥ अप्रियवार्ता मीं ऐकोनी ॥ खालीं उतरेन शस्त्रें सांडोनी ॥ तेव्हांचि मरण मज ॥२६॥

यावरी कृपाचार्यासि ह्नणे ॥ स्वामी संग्राम आज्ञा देणें ॥ आणि विजयार्थी प्रसन्न होणें ॥ मग ह्नणे कृपाचार्य ॥२७॥

तूं युद्ध करीं गा निर्वाण ॥ आणिक काय मागसी वरदान ॥ तंव युधिष्ठिर अचेतन ॥ प्राथ जाहला ॥२८॥

अभिप्राय कळला कृपासी ॥ मग ह्नणे युधिष्ठिरासी ॥ अगा मी स्वयें सकळांसी ॥ अवध्य जाण ॥२९॥

परि अंतीं तूं जय पावसी ॥ मग गेला शल्यापाशीं ॥ प्रणिपात करुनि मातुळासी ॥ विनविता जाहला ॥३०॥

शल्य ह्नणे कौरवांनिमित्त ॥ मज युद्ध करणें यथार्थ ॥ परंतु जय व्हावया प्राप्त ॥ तूं मागें वर काहीं ॥३१॥

युधिष्ठिर ह्नणे होमामा ॥ आणिक काहीं न मागें तुह्मां ॥ परि कर्ण करील संग्रामा ॥ तैं कीजे तेजोभंग ॥३२॥

शल्ये ह्नणे गा तथास्तु ॥ तुझा पुरेल मनोरथु ॥ ऐसा धर्मराज नीतिमंतु ॥ पाळिली मर्यादा ॥३३॥

तंव येरीकडे चक्रपाणी ॥ कर्णा बोलिला जावोनी ॥ ह्नणे आह्मीं ऐकिलें श्रवणीं ॥ कीं तुजभीष्मा स्पर्धा असे ॥३४॥

जंव जीवंत आहे भीष्म ॥ तंव तूं न करिसी संग्राम ॥ तरी तूं आह्मांसि मिळतां नरोत्तम ॥ मग भीष्मांतें सहज मारुं ॥३५॥

तो रणीं पडलियावरी ॥ मागुता कौरवांभीतरीं ॥ तूं जावोनियां करीं ॥ साहाय्यपण ॥३६॥

कर्ण ह्नणे ययाउपरी ॥ जंव प्राण आहेत तोंवरी ॥ अंतर नेदीं निर्धारीं ॥ दुर्योधनासी ॥३७॥

हें ऐकोनियां अनंत ॥ मुरडोनि आला पांडवांत ॥ तंव येरीकडे कुंतीसुत ॥ काय करिता जाहला ॥३८॥

आपुले दळीं मुरडोनि येतां ॥ थोर शब्दें जाहला बोलता ॥ जो आह्मांसि मिळेल तत्वतां ॥ तया आह्मी मानवूं ॥३९॥

यापरि निर्धारें जाणोन ॥ करावें आमुचें साह्यपण ॥ हें ऐका आमुचें प्रार्थन ॥ ऐसें ह्नणोनि मुरडला ॥४०॥

भारता तो ऐकोनि शब्दु ॥ युयुत्सु दुर्योधनाचा बंधु ॥ त्वरें येवोनि धर्मासन्निधु ॥ बोलता जाहला ॥४१॥

ह्नणे काहीं मिष करोनी ॥ मी मिळेन तुह्मां येउनी ॥ तुह्मां निमित्त झुंजेन रणीं ॥ कौरवांसी ॥४२॥

तंव धर्म ह्नणे तयासी ॥ तूं कौरवांचा बंधु होसी ॥ परि हे अधर्मी मारितां यांसी ॥ नसे बाध ॥४३॥

तरी तूं आमुचें साह्य करीं ॥ ऐसें ह्नणोनि स्वदळाभीतरीं ॥ धर्म आला तंव नृपवरीं ॥ सांडिलें दुःख ॥४४॥

धर्मे गुर्वाज्ञा घेतली ॥ हे वार्ता सकळां कळली ॥ जयजयकारें गर्जिन्नली ॥ सर्व सेना ॥४५॥

असो यथापूर्व युद्धासी ॥ सन्नद्धले उत्साहेंसीं ॥ यावरी सर्व राजयांसीं ॥ उठावला दुर्योधन ॥४६॥

दुर्मुख दुःसह दुःशासन ॥ विविंशती पुरुमित्र दुर्मर्षण ॥ भोज चित्रसेन विकर्ण ॥ सौमदत्त जयद्रथ ॥४७॥

हे उठावले देखोनी ॥ त्यांवरी षांडवसेनेहुनी ॥ वीर मारीत आले आयणी ॥ प्रतिविंघ्यादिक ॥४८॥

नकुळ सहदेव सौभद्र ॥ धृष्टद्युम्नादि सोडिती शर ॥ तेणें गजर जाहला थोर ॥ महाशब्दांचा ॥४९॥

वीरशब्द आयुधशब्द ॥ रथचक्रधारागजशब्द ॥ अश्वपायद विविध ॥ घंटाअंकुशघातध्वनी ॥५०॥

ध्वजकिकिणीशब्द जाहला ॥ तेणें भूगोळ गर्जिन्नला ॥ तंव देवदत्त वाजविला ॥ किरीटीनें ॥ ॥५१॥

पांडवसेना उठावली ॥ ते भीष्में बाणीं पिटाळिली ॥ तैसीच पार्थे भंगविली ॥ कौरवसेना ॥५२॥

सात्यकी कृतवर्मयासीं ॥ झुंजिन्नला थोर आवेशीं ॥ अभिमन्यु बृहद्धळेंसीं ॥ गांधारेंसीं घटोत्कच ॥५३॥

नकुळ दुःशासनेंसीं ॥ सहदेवो दुर्मुखेंसीं ॥ युधिष्ठिर शल्येसीं ॥ धृष्टकेतु सोमदत्त ॥५४॥

बाल्हीका आणि धृष्टकेता ॥ अलंबुषासीं भीमसुता ॥ विराटा आणि भगदत्ता ॥ द्वंद्वयुद्ध मांडलें ॥५५॥

शिखंडी द्रोणपुत्रेंसीं ॥ बृहद्रथ कृपाचार्येसीं ॥ श्रुतसेन विकर्णेसीं ॥ सुशर्मेसीं चित्रसेन ॥५६॥

प्रतिविंध्य शकुनियेसीं ॥ सहदेवपुत्र सुदक्षिणासीं ॥ इरावत श्रुतायुषेंशीं ॥ कुंतिभोज विंदानुविंद ॥५७॥

चेदिराज करंभाष ॥ तेणें आगविला उलूक ॥ उत्तर विराटाचा लेंक ॥ वीरबाहूसीं ॥५८॥

ऐसे योद्धे सहस्त्रावधी ॥ प्रवर्तले द्वंद्वयुद्धीं ॥ पाहों आले गंधर्वादी ॥ विनोदार्थ अंतरिक्ष ॥५९॥

चालिलें युद्ध घोरांदर ॥ पितेयासी नोळखे पुत्र ॥ मामे भाचे सहोदर ॥ झुंजिन्नले सत्राणें ॥६०॥

एकाचे करपाद तुटले ॥ एक कबंधीं छेदिले ॥ धडमुंडीं निवटिले ॥ असंख्यात ॥६१॥

हें दिव्ययुद्ध वाखाणितां ॥ विस्तार होईल बहु ग्रंथा ॥ ह्नणोनि संक्षेपें ऐकें भारता ॥ संजय ह्नणे अंधासी ॥६२॥

जंव प्रहर सवादोनी ॥ शेष राहिला होता दिनमणी ॥ तंव पांच वीर आयणी ॥ उठावले कौरव ॥६३॥

भीष्म दुर्मुखभूपती ॥ कृतवर्मा शल्य विविंशती ॥ ते अमितबाणीं विंधिती ॥ पांडवसेना ॥६४॥

तेव्हां रुधिरनदीआंत ॥ सैन्य वाहावलें बहुत ॥ ऐसें देखोनि पार्थसुत ॥ उठावला भीष्मावरी ॥६५॥

दिव्ययुद्ध आरंभिलें ॥ येके बाणीं कृतवर्म्या विंधिलें ॥ आणि शल्यातें खोंचिलें ॥ पांचांबाणीं ॥६६॥

नवबाणीं भीष्म विंधिला ॥ एके बाणें ध्वज छेदिला ॥ एके बाणें शिरच्छेद केला ॥ सारथियाचा ॥ ॥६७॥

ऐसें त्याचें लाघव देखिलें ॥ देवदानव विस्मित जाहले ॥ तंव क्रोधें भीष्में विंधिलें ॥ सौभद्रासी नवबाणीं ॥ ॥६८॥

तीनबाणीं ध्वज छेदिला ॥ तितुकेनीच सारथी मारिला ॥ ऐसा भीष्माअभिमन्या जाहला ॥ संग्राम थोर ॥ ॥६९॥

त्यातें रक्षाया भीमसेन ॥ सहपुत्रविराट धृष्टद्युम्न ॥ कैकेय्य सात्यकी धांवोन ॥ आले देखा ॥७०॥

मागुतेन गंगासुतें ॥ बहुत कष्टी केलें त्यांतें ॥ तंव शल्य धांवोनि आला तेथें ॥ हत्तीवरी बैसोनी ॥७१॥

तेणें उत्तर सहस्ती मारिला ॥ ऐसा शल्य सकोप देखिला ॥ तंव तो शंखें व्याकुळ केला ॥ नानाशस्त्रीं ॥७२॥

त्यावरी भीष्म उठावला ॥ तेव्हां पांडवभार थरारला ॥ मोड होतां पार्थ धांवला ॥ रक्षावया शंखासी ॥७३॥

भीष्मत्रासें युधिष्ठिर ॥ येवोनि कृष्णासि करी विचार ॥ कीं आमुचा अपराध थोर ॥ युद्ध मांडिलें भीष्मासीं ॥७४॥

या भीष्मशरदावानळें ॥ पांडवसैन्यतृण जळालें ॥ जळतीलही उरलेसुरले ॥ तरी कैसें कीजे देवा ॥७५॥

ऐसें कृष्णेंसि बोलिलें धर्मे ॥ तंव शरीं आच्छादिलें भीष्में ॥ पांचही पांडवां सांडोनि साउमे ॥ पळालें सैन्य ॥७६॥

जेवीं माध्यान्हींचा दिनकर ॥ पाहों न शके कोणी खडतर ॥ तेवीं सकळां गंगाकुमर ॥ लक्षवेचि ना ॥७७॥

ऐसा थोर संग्राम जाहला ॥ तंव भानु अस्तमाना गेला ॥ पांडव दुःखी होवोनि मुरडला ॥ दळभार त्यांचा ॥७८॥

ऐशापरी पहिले दिवशीं ॥ संग्राम वर्तला उभयांसी ॥ संजय सांगे धृत्तराष्ट्रासी ॥ तें ऐकें भारता ॥७९॥

स्वस्थळीं गेलिया युधिष्ठिर ॥ जाहला चिंताविकळ अपार ॥ मेलिया वीरांचा थोर ॥ शोक केला ॥८०॥

मरतियांची चिंता करी ॥ तेणें बुडाला शोकसागरीं ॥ मग दीनत्वें बोले उत्तरीं ॥ श्रीकृष्णासी ॥८१॥

ह्नणे ऐकें जी हषीकेशी ॥ जय प्राप्त होय आह्मासी ॥ ऐसें करावें विशेषीं ॥ स्वामिनाथा ॥८२॥

हें बोलोनि चिंतेकरितां ॥ धर्म जाहला निश्वेष्टता ॥ त्यासी हर्ष व्हावया बोलता ॥ जाहला श्रीरंग ॥८३॥

अगा हे तुझे चारी बंधुजन ॥ सात्यकी द्रोणांतक प्रद्युम्न ॥ विराटादि तुझें वचन ॥ वाहताती मस्तकीं ॥८४॥

तथा शिखंडिया सर्वथा ॥ या भीष्माचा अंतक असतां ॥ कां पां करिसी थोर चिंता ॥ वृथा धर्मा ॥ ॥८५॥

ऐसें ऐकोनि आनंदला ॥ मग धृष्टद्युम्नासि बोलिला ॥ ह्नणे व्यूह रचोनि वहिला ॥ विजयीं पांडव करावें ॥ ॥८६॥

पार्थ ह्नणे क्रौंचव्यूह करीं ॥ तेणें जिंकवतील वैरी ॥ ऐसें विचारितां रात्री ॥ अतिक्रमली ॥८७॥

धृष्टद्युम्नें प्रातःकाळीं ॥ क्रौंचव्यूहरचना केली ॥ अग्नभागीं धुर स्थापिली ॥ फाल्गुनातें ॥८८॥

आणि द्रुपद महासैन्येंसीं ॥ स्थापिला मस्तकप्रदेशीं ॥ कुंतिभोजादि परियेसीं ॥ नेत्रस्थळीं ॥८९॥

भीमसेन धृष्टद्युम्न ॥ हे दोनी पक्ष जाण ॥ द्रौपदेय कीं अभिमन्य ॥ सात्यकी उदरस्थ ॥९०॥

दशार्ण दाशेरु किरात ॥ आंध्र शक हे ग्रीवास्थित ॥ पटच्चर पौंड्र निषाद सहित ॥ युधिष्ठिर पृष्ठीं ॥९१॥

रथांचिये अयुतपक्षीं ॥ लक्षपरिमाण मस्तकीं ॥ पंचवीससहस्त्र आइकीं ॥ पृष्ठभागीं ॥९२॥

एकवीस सहस्त्र ग्रीवेसी ॥ प्रतिपक्षीं कोटी परियेसीं ॥ विराट कैकेय्य काशिराजांसी ॥ स्थापिलें पृष्ठभागीं ॥९३॥

ऐसें कटक सन्नद्ध जाहलें ॥ वाद्यगजर वाजिन्नले ॥ तंव त्या व्यूहा देखोनि वहिलें ॥ ह्नणे दुर्योधन ॥९४॥

अहो भीष्मद्रोणकृपकर्णा ॥ शल्यसोमदत्तविकर्णा ॥ अश्वत्थामा तुह्मी जाणा ॥ असा महारथीये ॥९५॥

तरी सकळसैन्य मिळोन ॥ तुह्मीं रक्षावा गंगानंदन ॥ तो युद्धोत्सव देखोन ॥ ह्नणे अर्जुन कृष्णासी ॥९६॥

जेथें असे गंगासुत ॥ तेथें चालवीं माझा रथ ॥ तंव देवें प्रेरुनि त्वरित ॥ नेला भीष्माजवळी ॥९७॥

पार्थ शरधारीं ॥ वर्षला ॥ तो भीष्मदेवें विंधिला ॥ थोर संग्राम प्रवर्तला ॥ अपूर्व दोघां ॥९८॥

द्रोणें धृष्टद्युम्न विंधिला ॥ येरें तो बाण निवारिला ॥ ऐसा दिव्यसंग्राम मांडला ॥ येरीकडे ॥९९॥

द्रोणें शर सोडिला निर्वाण ॥ हाहाःकार जाहला जाण ॥ परि तो धृष्टद्युम्नें बाण ॥ तोडिला मध्येंची ॥१००॥

सकळां आश्वर्य वाटलें ॥ द्रोणें शक्तीतें सोडिलें ॥ येरें मध्येंचि तोडितां बळें ॥ कोपला द्रोण ॥१॥

मग अगणित शर सोडोन ॥ विरथ केला धृष्टद्युम्न ॥ तंव येवोनि भीमसेन ॥ पराभविला द्रोणगुरु ॥२॥

धृष्टद्युम्ना बैसविलें रथीं ॥ तंव कलिंगराजयाप्रती ॥ पाठवीतसे कौरवपती ॥ द्रोणरक्षणार्थ ॥ ॥३॥

कलिंग आणि वृकोदर ॥ युद्ध करिती घोरांदर ॥ तंव उठावले नृपभार ॥ कलिंगसाह्यार्थी ॥४॥

श्रुतायु निषाद केतुमंत ॥ अनेकसहस्त्र रथें सहित ॥ ऐसे उठावले हाणित ॥ भीमावरी ॥५॥

भीमें बहुतांचा नाश केला ॥ भूमिके मांसकर्दम जाहला ॥ तंव कलिंगात्मज उठावला ॥ शक्रदेव नामें ॥६॥

तेणें युद्ध मांडिलें अद्भुत ॥ विरथ केला वायुसुत ॥ परि भीमें चूर्ण केला त्वरित ॥ गदाघातें ॥७॥

देखोनि स्वपुत्र मारिला ॥ क्रोधें कलिंग उठावला ॥ थोर संग्राम जाहला ॥ कापिन्नला भूगोळ ॥८॥

कलिंगाचा दुसरा सुत ॥ हत्तीवरोनि भानुमंत ॥ आला बाणवृष्टी करित ॥ भीमावरी ॥९॥

त्याचे गजदंतावरी त्वरित ॥ चढोनि वेगीं वायुसुत ॥ गदाघातें भानुमंत ॥ शतचूर्ण केला ॥११०॥

हस्तींच्या ग्रीवा तोडोनी ॥ कलेवरें भोबंडी रणीं ॥ तें भ्रमण देखोनि नयनीं ॥ वीर पडती मूर्छागत ॥११॥

येकीं काळप्राय देखिलें ॥ तेणें भयें प्राण सांडिलें ॥ कितीयेक दशदिशां गेले ॥ उडोनि देखा ॥१२॥

यापरि वीरश्रीचेनि बचालिला तैसा ॥ दोनीसहस्त्र परियेसा ॥ मारिले वीर ॥१४॥

मग गजें गज मारिले ॥ रथेंकरोनि रथ मोडिले ॥ अश्वीं अश्व संहारिले ॥ भंगिले रथें रथीं ॥१५॥

अनेक सेना ऐसिया ॥ एके काळीं मारिलिया ॥ जयजयकार केला तया ॥ पांडवसैन्यें ॥१६॥

मग शंखवादन केलें ॥ ऐसें भीमसेनें जिंकिलें ॥ भयें कंपायमान जाहलें ॥ कौरवदळ ॥१७॥

सरोवरीं गजप्रवेशें ॥ उदक कंपित होय जैसें ॥ तैसें सैन्य जाहलें विशेषें ॥ तये काळीं ॥१८॥

तंव श्रुतायु केतुमंत ॥ आणि चेदिपती सैन्यासहित ॥ मिळोनि वेष्टिला वायुसुत ॥ तें देखिलें धृष्टद्युम्नें ॥१९॥

मग तो स्वयें सात्यकीसहित ॥ धर्मसैन्यभाराघेत ॥ भीमासि रक्षावया त्वरित ॥ आला जवळी ॥१२०॥

जेवीं मेघ चढे गिरिवरी ॥ तेवीं भीमसैन्याभीतरीं ॥ कोल्हाळ जाहला भारी ॥ तो आयकिला भीष्मानें ॥२१॥

मग क्रोधें उठावला ॥ त्यांसी संग्राम थोर मांडिला ॥ अश्वां निःपातिता जाहला ॥ भीमरथाचे ॥२२॥

तंव सात्यकीयें बाण सोडिला ॥ भीष्माचा सारथी विंधिला ॥ तेवढ्याचा पुरुषार्थ वानिला ॥ सकळवीरीं ॥२३॥

यापरि होतां घनचक्र ॥ पराभविला गंगाकुमर ॥ ऐसा लोटला अडीचप्रहर ॥ दिवस देखा ॥२४॥

भीष्माचा पराभव देखोनी ॥ शल्यकृपअश्वत्थामा तिन्ही ॥ महारथीं आरुढोनी ॥ आले भीष्मसाह्यार्थ ॥२५॥

तें देखोनि धृष्टद्युम्न ॥ आला सवेग रथ लोटोन ॥ संग्राम केला दारुण ॥ अश्वत्थामेयासीं ॥२६॥

प्राणांतक संग्राम जाहला ॥ तंव अभिमन्यू पातल ॥ त्यावरी लक्ष्मण उठावल ॥ पुत्र दुर्योधनाचा ॥२७॥

तो अभिमन्यें पराभविला ॥ देखोनि गांधार धांवला ॥ तेणें अभिमन्यु वेढिला ॥ तंव धावला अर्जुन ॥२८॥

ह्नणोनि अर्जुना वधावया ॥ ससैन्य पातला गांगेया ॥ तये उठावणीनें सूर्या ॥ रजें आच्छादन जाहलें ॥२९॥

तैं भूमि ना अंतरिक्ष ॥ नाहीं दिशा ना दिनेश ॥ ऐसी शरवृष्टी प्रत्यक्ष ॥ केली पार्थे ॥१३०॥

तें देखोनि कौरवसैनिक ॥ शस्त्रें सांडोनि पळाले देख ॥ शस्त्रराशी जाल्या बहुतेक ॥ रणभूमीसी ॥३१॥

मग पार्थे आणि गोविंदें ॥ शंख वाजविले आनंदें ॥ कौरवसैन्य परम खेदें ॥ पळालें दाहीदिशां ॥३२॥

रथीं प्रत्यक्ष कृष्णार्जुन ॥ करिती दिव्यशंख वादन ॥ असो पळतां देखोनि सैन्य ॥ भीष्म बोलता जाहला ॥३३॥

अगा दुर्योधना पाहीं ॥ हे जिंकूंशकवत नाहीं ॥ बाणसर्पी दंशिली सही ॥ सर्व सेना आपुली ॥३४॥

पाहें पां कितीयेक पडले ॥ कित्येक दशादिशां पळाले ॥ दिवाकरेंही गमन केलें ॥ अस्ताचळासी ॥३५॥

आतां विश्रांती करावी ॥ उदयीक झुंजारी मांडावी ॥ ऐसें ऐकोनियां सर्वी ॥ केलें गमन मेळिकारीं ॥३६॥

संजय ह्नणे राया प्रसिद्ध ॥ ऐसें द्वितीयदिनयुद्ध ॥ विजयी होवोनि पंडुजोध ॥ मुरडले देखा ॥३७॥

वैशंपायन ह्नणती रायासी ॥ कथा चित्त देवोनि परियेसीं ॥ रात्री क्रमलिया सैन्यासी ॥ भीष्में केले सन्नद्ध ॥३८॥

तो पुढील सर्व संग्राम ॥ सांगिजेल अनुक्रम ॥ मधुकर करोनि प्रणाम ॥ विनवी श्रोतयांसी ॥३९॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबक मनोहरु ॥ द्वितीयदिनयुद्धप्रकारु ॥ षष्ठोध्यायीं कथियेला ॥१४०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP