कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय २१

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जन्मेजयो ह्मणे हो ऋषी ॥ व्यतीपात सांगा मजसी ॥ केवीं आचरिजे नेमेंसीं ॥ महाव्रता त्या ॥१॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया बहुत तूं विचक्षण ॥ तरी ऐकें चित्त देऊन ॥ व्यतिपातव्रत ॥२॥

धर्म असतां सिंहासनीं ॥ तंव आले मार्कडेय मुनी ॥ त्यांचे चरणा नमस्कारुनी ॥ पूजिलें धर्में ॥३॥

अंत्र गंध सुमनीं पूजा ॥ करीतसे धर्मराजा ॥ मग कर जोडोनि ओजा ॥ करी विनंती ॥४॥

ह्मणे स्वामी मार्कडेया ॥ येक पुसणें ऋषिराया ॥ हें व्यतिपातव्रत स्वामिया ॥ सांगा मज ॥५॥

या व्रताचा विस्तारु ॥ हा सांगिजे प्रकारु ॥ आणि या व्रताचा निर्धारु ॥ असे कैसा ॥६॥

ऐसें ऐकोनियां वचन ॥ संतोषला तपोधन ॥ ह्मणे धर्मा ऐक महिमान ॥ व्यतिपाताचें ॥७॥

वैशंपायन ह्मणे भारता ॥ कीं मार्कंडेय होय सांगता ॥ या कथाश्रवणें श्रोतावक्ता ॥ पावन होय ॥८॥

महापातकें नासती ॥ पाविजे सायुज्यता मुक्ती ॥ तरी ऐकें गा भुपती ॥ येकचित्तें ॥९॥

हा व्यतिपातव्रताचा महिमा ॥ मार्कंडेय सांगे धर्मा ॥ जे आचरती घरूनि प्रेमा ॥ ते भवभया नातळती ॥१०॥

भविष्योत्तरपुराणीचें कथन ॥ प्राकृतें कीजेल निरूपण ॥ श्रोतीं होवोनि सावधान ॥ येकचित्तें ऐकावें ॥११॥

धर्माचा भाग्योदय जाहला ॥ ऋषिमार्कंडेय भेटला ॥ जेवीं तम जाई लयाला ॥ उगवतां रवी ॥१२॥

तैसा भेटतां ऋषेश्वर ॥ कृतार्थ जाहला युधिष्ठिरा ॥ करूनि पूजा नमस्कार ॥ प्रार्थिला ऋषी ॥१३॥

ह्मणे तुह्मी बहुतकाळांचे ॥ प्रवर्तक स्वधर्माचे ॥ नाना दृष्टीं पडलें तुमचे ॥ ह्मणोनियां पुसतसें ॥१४॥

येखादें व्रत अलोलिक ॥ जरी असेल पापमोचक ॥ कीं भुक्तिमुक्तिदायक ॥ तरी सांगावें जी ॥१५॥

मग ह्मणे ऋषेश्वर ॥ कोणी येक होता नृपवर ॥ पारधी खेळतां वराह थोर ॥ दृष्टीं देखिला तयानें ॥१६॥

महा कर्कश विक्राळवदन ॥ दग्ध जाहला वणव्यानें ॥ नाहीं आहार जीवन ॥ कीं पल्वल भूमी ॥१७॥

ऐसा तो निर्जळवनीं ॥ वराह कोंडला वणव्यांनीं ॥ अंग पोळलें तेणें करूनी ॥ पावो भूमीं न ठेववे ॥१८॥

पडिला उठे उभा राहे ॥ श्र्वासोश्र्वास देत आहे ॥ पायांतळी पोळताहे ॥ न पळवेची ॥१९॥

यापरि दुःखित देखोनि त्यासी ॥ कृपा उपजली रायासी ॥ खेद पावोनियां मानसीं ॥ मग पुसे तयातें ॥२०॥

तुज कोण गा कर्म घडलें ॥ जेणें दुःख हें प्राप्त जाहलें ॥ तंव वराहें बोलिलें ॥ कीं शुभाशुभ भोगावें ॥२१॥

जैसें कर्म आचरावें ॥ तैसें लागे फळ भोगावें ॥ कोणीं कोणातें न रुसावें ॥ आचारण ऐसें ॥२२॥

हर्षे कर्म करिती कुडें ॥ फळ भोगितां दिसे बापुडें ॥ राया सत्कर्म जया घडे ॥ ते सुखातें पावती ॥२३॥

मग पूर्वजन्म स्मरोनि तत्वता ॥ वराह सांगे आपुली कथा ॥ ह्मणे ऐक गा नृपनाथा ॥ चरित्र माझें ॥२४॥

पूर्वीं मी होतां वैश्यवाणी ॥ समर्थ नाहीं मजहूनि कोणी ॥ सर्व संपत्ती असोनी ॥ परि दयाधर्म नाठवे ॥२५॥

प्रपंचकाजीं महा कुशळ ॥ स्वयें विवेक जाणें सकळ ॥ सर्व शास्त्रें करतळामळ ॥ परि कृपण धर्मासीं ॥२६॥

बहुश्रुतपण असे अंगीं ॥ धर्माधर्म कळे मजलागीं ॥ ऐसें कोणीही नसे जगीं ॥ उप्तन्नभोगीं धनाढ्य ॥२७॥

पुण्यकाळ पर्वणीसी ॥ धर्मवासना नुपजे मनासी ॥ मित्रभावें पालवीं सर्वासी ॥ परि नेदीं कोणा अणुमात्र ॥२८॥

कीं सत्तर आणि दोनी ॥ खोडीं लोपिजे सूर्यमणी ॥ तैसा धर्मिष्ठ नसतां प्राणी ॥ लोपे सर्वस्वें ॥२९॥

धर्मही सर्वांचा सखा ॥ धर्म पुण्याचा पाठिराखा ॥ धर्म साह्य जालिया देखा ॥ नाहीं भय काळाचें ॥३०॥

वनीं रणीं शत्रुमेळीं ॥ महार्णवीं बुडतां जळीं ॥ सुषुप्तिसमयीं विषम काळीं ॥ धर्म रक्षक ॥३१॥

त्या धर्मासि जाहलों मी विमुख ॥ विषयांचें मानुनि सुख ॥ तेणें पावलों कर्मदुःख ॥ पुढे ऐक राया ॥३२॥

कोण येके काळवेळीं ॥ व्यतीपाताचे पर्वकाळीं ॥ दुर्बळ ब्राह्मण मजजवळी ॥ आला देखा ॥३३॥

समर्थता माझी ऐकोनी ॥ ठाकोनि आला दुरूनी ॥ आशीर्वाद केला मजलागुनी ॥ परि मी नायकेंची ॥३४॥

पत्र पुष्प फळ जळ काही ॥ त्यासि अणुमात्र दीधलें नाहीं ॥ कीं मधुर वचन तेंही ॥ केलें नाहीं शांतमनें ॥३५॥

अगा ब्राह्मणाचें हेळण ॥ जे करिती दुष्ठजन ॥ त्यांसी निश्चयें अधःपतन ॥ बोलिलें असे ॥३६॥

जिहीं देवासि हाणिली लाथ ॥ तें अद्यापि भूषण मिरवत ॥ ह्मणोनि ब्राह्मण भूदैवत ॥ सत्य राया ॥३७॥

क्षोभ जालिया ब्राह्मणाचा ॥ ठावो पुसिला यादवांचा ॥ तेथें पाड काय इतरांचा ॥ ह्मणे वराह ॥३८॥

ऐसें जाणोनि मी मंद ॥ द्रव्यमंदे जाहलों अंध ॥ थोर घडला अपराध ॥ ब्राह्मणाचा ॥३९॥

मग तो निराशेनें क्षोभला ॥ सर्वांगासी कंप सुटला ॥ तेणें मजसी शाप दीधला ॥ तो ऐक राया ॥४०॥

ह्मणे तूं वनीं वराह होसी ॥ तेथें वणवेंकरूनि जळशी ॥ जळ छायेविण पीडसी ॥ दुःख भोगिसी दारूण ॥४१॥

माझा केला आशाभंग ॥ तेणें जळेल तुझें अंग ॥ भोगिशी नाना दुःखभोग ॥ तैसेचि तूं ॥४२॥

मग मी होवोनि सावधान ॥ तयासि केलें प्रार्थन ॥ कीं उःशाप द्या जी कृपा करून ॥ ऐकोनि येरू बोलिला ॥४३॥

ह्मणे तूं जालिया जातिस्मर ॥ तेणेंचि होईल उद्धार ॥ ऐसा कर्मभोग अपार ॥ निवेदिला तेणें ॥४४॥

ऐकोनि खेद उपजला रायासी ॥ मग ह्मणे त्या वराहासी ॥ कीं याची निर्गती असे कैसी ॥ तें सांगिजे आतां ॥४५॥

प्रयत्‍न असेल जो काहीं ॥ तो सर्वथा करीन पाहीं ॥ सामर्थ्य असे माझे देहीं ॥ ऐसें सत्यमानीं गा ॥४६॥

जो सामर्थ्य असोनि वंची ॥ वोळखी न धरी समयाची ॥ तरी थोर हानी होय त्याची ॥ न लाभे यश ॥४७॥

देह गेह संपत्ति सत्ता ॥ हीं क्षणभंगुर विचारितां ॥ परि धन्य ते लाविती स्वहिता ॥ जाणोनि अनित्य ॥४८॥

ह्मणोनियां वारंवार ॥ वराहासी ह्मणे नृपवर ॥ या दूषणासि जावया थोर ॥ कोण पुण्य असे ॥४९॥

तंव तो वराह ह्मणत ॥ राया व्यतिपात महाव्रत ॥ तुज घडलें असेल सत्य ॥ तरी तें पुण्य देईकां ॥५०॥

तये पुण्यें गा नृपनाथा ॥ हा देह सुटेल सर्वथा ॥ मुक्त होईन निरसेल व्यथा ॥ तंव राजा पुसे त्यासी ॥५१॥

कीं व्यतीपात ह्मणिजे काय ॥ त्यासी उप्तती कैशी आहे ॥ व्रतें फळ कोणतें होय ॥ दान कीजे कवणेपरी ॥५२॥

हें कीतीकां दीवसां येतें ॥ कीती दिवस आचरावें तें ॥ हें त्वां विदित्त करावें मातें ॥ सर्वही गा ॥५३॥

मग येरू ह्मणे हो नृपवरा ॥ बृहस्पतीची पत्‍नी तारा ॥ ते बळें भोगितां शीतकरा ॥ क्रोधावला बृहस्पती ॥५४॥

तो चंद्रासि वारूं गेला ॥ तंव तयासही क्रोध आला ॥ दोहींचे क्रोधदृष्टीं जन्मला ॥ पुरुष येक ॥५५॥

तयाचें शंखासारिखें वक्त्र ॥ दीर्घनासिक अष्ट नेत्र ॥ चतुर्मुख विस्तीर्ण उर ॥ शतयोजनें उंच ॥५६॥

महाक्रूर पसरलें मुख ॥ पिंगट शिंखा श्मश्रु देख ॥ दंत विक्राळ विशेष ॥ घोररूपी ॥५७॥

घुसृण शरीर दीप्तिवंत ॥ जाणो सोमार्क मूर्तिमंत ॥ त्रैलोक्य भक्षावया दांत ॥ सरसावला कीं ॥५८॥

मग तो सोमसुर्याहीं वारिला ॥ तंव विक्राळ पुरुष बोलिला ॥ कीं क्षुधेनें ममदेह पीडला ॥ द्या आहारू ॥५९॥

सोमसूर्य ह्मणती तयासी ॥ कीं व्यतीपात बोलिजे तुजसी ॥ आख्या होईल निर्धारेंसीं ॥ जन्मलासि यथाकाळीं ॥६०॥

आतां या दिवसाचिये ठाई । तुझेनि उद्देशें जे पाहीं ॥ जन करिती स्नानदान काहीं ॥ त्याचें पुण्य तुं भक्षीं ॥६१॥

हा तयासि आहार देउन ॥ आणिक काय बोलिले वचन ॥ कीं जे करीती स्नानदान जप हवन ॥ तुज स्मरूनी ॥६२॥

ते पुत्रपौत्रीं संपत्ती ॥ पावती पुष्टी तुष्टी कीतीं ॥ होय राज्यलक्ष्मीची प्राप्ती ॥ वल्लभ त्रिजगीं ॥६३॥

चंद्रग्रहणीं शतगुण ॥ सूर्यग्रहणीं सहस्त्र जाण ॥ विषुवीं दहासहस्त्र जाण ॥ ऐसा महिमा ॥६४॥

असो हें ऐकोनि नृपनाथें ॥ वराहासि पुसिलें आतें ॥ कीं व्रत करावें कैसें तें ॥ सांगें मजला ॥६५॥

येरु ह्मणे मार्गशीर्ष कीं फाल्गुन ॥ वैशाख अथवा ज्येष्ठ जाण ॥ व्यक्तीपाताचा पाहोनि दिन ॥ स्नान करावें विधियुक्त ॥६६॥

पंचगव्य घेवोनि प्रथमतः ॥ मग व्हावें शुचिष्मंत ॥ घटावरी पात्र शर्करायुक्त ॥ प्रतिमा त्यांत ठेवावी ॥६७॥

अष्टभुजा सुवर्णाची ॥ पूजा कीजे त्या प्रतिमेची ॥ षोडशोपचारेंयथा रुची ॥ फलतांबूलेंसीं ॥६८॥

करूनि प्रदक्षिणा नमना ॥ मग तें द्यावें ब्राह्मणा ॥ विधि संपादिल्या जाणा ॥ रविचंद्रां प्रीत्यर्थ ॥६९॥

ऐसें यथाशक्ति करून ॥ करावें प्रतिमेचें पूजन ॥ मग कीजे ब्राह्मणभोजन ॥ गोदानेंसीं ॥७०॥

तयां पुत्र पौत्र संपत्ती ॥ धनधान्य वृद्धी त्रिजगतीं ॥ स्त्रियां पुरुष आचरितां प्रीतीं ॥ पूर्ण होती मनोरथ ॥७१॥

हें व्रत घेती नेमेंसीं ॥ इतरजनीं प्रतिमासासीं ॥ स्नान दान निश्वयेंसीं ॥ भावें करावें ॥७२॥

मासा वाल गुंज जव ॥ सुवर्ण द्यावें धरूनि भाव ॥ त्याची वाढ होय अभिनव ॥ अर्वखर्व परियंत ॥७३॥

जे तरी निःकांचन दुर्बळ ॥ तिहीं गंध पत्र पुष्प फळ ॥ हिरण्य अथवा नारिकेळ ॥ द्यावें भावें ॥७४॥

आधी व्याधी तुटे रोग ॥ इहलोकींचे पावती भोग ॥ देहांतीं घडे ठाव स्वर्ग ॥ ऐसा महिमा व्रताचा ॥७५॥

असो मग रायें करूनि हें व्रत ॥ त्याचें संपादिलें सुकृत ॥ तं वराहासि देतां जाहला मुक्त ॥ कुश्वळ देह टाकुनी ॥७६॥

दिव्य देह जाहलिया प्राप्ती ॥ मग चालिला स्वर्गाप्रती ॥ सर्वासि दाविली ऐसी प्रचीती ॥ विश्वासाची ॥७७॥

मग रावो नगरासि आला ॥ यथाविधि आचरूं लागला ॥ तेणें विष्णूपद पावला ॥ महिमें व्रताच्या ॥७८॥

ह्मणोनि युधिष्ठिरा ऐक ॥ हें व्रत असे अलोलिक ॥ पापक्षयें सुखदायक ॥ नाहीं दुजें ऐसें ॥७९॥

ऋषि ह्मणे गा भूपती ॥ दशरथें केली हेचि भक्ती ॥ आणीकही दुजे करीताती ॥ नृप पृथ्वीचे ॥८०॥

जे कामना धरिजे मनीं ॥ ते पावतसे तत्क्षणीं ॥ ऐसें धर्में ऐकतां श्रवणीं ॥ धरिलें हें व्रत ॥८१॥

यथाशक्ति कीजे दान ॥ तें होय मेरुसमान ॥ ऐसें मार्कंडेयें निरूपण ॥ केलें धर्माप्रती ॥८२॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया तूं अससी सुजाण ॥ तुझिये पुसीजें प्रमाण ॥ सांगीतलें हें ॥८३॥

खगपुष्प हेचि पूजा ॥ प्रीतीं पावों गरुडध्वजा ॥ काया वाचा मनकेशिं राजा ॥ त्याविण नव्हे ॥८४॥

आतां असो हा येथ प्रश्न ॥ षष्ठस्तबक जाहला संपूर्ण ॥ कथारसाचा ज्ञानघन ॥ अभिनव हा ॥८५॥

मग ह्मणे राजा भारत ॥ वैशंपायना तूं हंसवत ॥ अंबुक्षीराचा येकांत ॥ निवडिला तुवां ॥८६॥

कमळकळिकेचा तंतु ॥ येखादा आकळी बुद्धिमंतु ॥ परि तुझे ज्ञानाचा अंतु ॥ न कळे कवणा ॥८७॥

ऐकोनि ह्मणे मुनीश्वरू ॥ तूं श्रोतयांमाजी पुरंदरु ॥ तुझेनि जोडला हा कल्पतरु ॥ मानवांसी ॥८८॥

ऋषि ह्मणे गा भारता ॥ मज तृप्ती जाहली बोलतां ॥ आतां विनवीतसे कविता ॥ श्रोतयांसी ॥८९॥

कीं हा अभिनव कल्पतरु ॥ अमृताचा क्षीरसागरु ॥ आला कराया पाहुणेरू ॥ वैष्णवांसी ॥९०॥

ना तरी हा कथाकल्पतरु ॥ प्रबोधकारी दीक्षागुरु ॥ कीं सहस्त्रकिरणीं दिनकरु ॥ मिरवे जैसा ॥९१॥

नानाजाति पुष्पांचा रसु ॥ मधुमक्षिका मेळवी अंशु ॥ तैसा म्यां रचिला नवरसु ॥ कल्पतरू हा ॥९२॥

अनंतकथांचा कल्पतरु ॥ जाणों दुसरा पुरंदरु ॥ कथारूपें याचा परिवारु ॥ अमर जैसे ॥९३॥

नातरी हा कल्पतरु ॥ पद्मरत्‍नांचा कुबेरु ॥ दुर्बळांकंठीं अलंकारु ॥ घालील कीं ॥९४॥

अथवा हा कथाकल्पतरु ॥ कमळकळिकेसि अमृतकरू ॥ कीं भक्तचकोरां संतुष्ट परिकरु ॥ करील पैं ॥९५॥

परि हेही उपमा असे थोडी ॥ कीं गगनावरती घालूनि उडी ॥ हे वैकुंठींची आणिली गुढी ॥ भक्तजनांसी ॥९६॥

येथें श्रोतीं न ठेवावें दुषण ॥ जें बोलिलों थोरपण ॥ तरी हरिनामाचि तारण ॥ मानवांसी ॥९७॥

ह्मणोनियां हा कल्पतरु ॥ मुढपाखांडियां दीक्षागुरु ॥ भूपति अथवा दिनकरु ॥ मिरवे जैसा ॥९८॥

हे श्रीहरीची गुणवाणीं ॥ मज उपदेशली स्वप्नीं ॥ करीं देवोनियां लेखणी ॥ दाविलें तेणें ॥९९॥

येरवीं मी अज्ञान सर्वथा ॥ हें तरी तुह्मीसिं विदित समस्तां ॥ मातुळापुढें मातृगोता ॥ सांगणें काय ॥१००॥

मी संतांघरींचें रंक ॥ जैसी टांकगर्भीची लाख ॥ परि तुह्मां दिसतसे कनक ॥ बाहेरीलपणें ॥१॥

मी बोलिलों थोर उपमा ॥ पदप्रसंगीं पुरुषोत्तमा ॥ परि तुह्मीं बोलावें हरिनामा ॥ अहेवसु ॥२॥

ह्मणोनियां हा कथाकल्पतरु ॥ भावें ऐकतां नारी नरु ॥ तयांसि होईल कुमरु ॥ वरद अनंताचा ॥३॥

हा जाणिजे कल्पतरु ॥ आज्ञानद्रुमाचा कुठारु ॥ कीं भवगजावरी मृगेंद्रु ॥ ग्रंथ असे हा ॥४॥

हा ऐकतां कल्पतरु ॥ पूण्यराशी महामेरु ॥ कपिलादान येक सहस्त्रु ॥ लाभे श्रवणें ॥५॥

आतां असो हे कुसरी ॥ परि प्रेम न सांडी वैखरी ॥ मज बोलवी ब्रह्मकुमरी ॥ समरस हो‍उनी ॥६॥

माझी तरी आर्ष वाणी ॥ ते म्यां अर्पिली संतचरणी ॥ तरी बाळक देखोनि जननी ॥ सुखावे कीं ॥७॥

मजसीं आरुष बोलतां ॥ आनग्रंथींची पदवार्ता ॥ अंतर पडलियाही श्रोतां ॥ न ठेवावें दूषण ॥८॥

जैसें चालतां राजबिदीं ॥ स्वेच्छा पाय पडे पदोपदीं ॥ परि तेणें ह्मणावें सुबुद्धी ॥ मागिलांचा ॥९॥

कीं विंझणा वारितां नरेंद्रा ॥ तेणें आपुलाही निवे उबारा ॥ तैसें तुह्मां सांगतां हरिचरित्रा ॥ निवालों मी ॥११०॥

नातरी मार्गीं लाविजे द्रुम ॥ तो येकविचारें असे धर्म ॥ कीं हरी क्षुधा आणि श्रम ॥ मार्गस्थांचा ॥११॥

आतां असो हा विचारु ॥ पुढें कथणें कल्पतरु ॥ तो ऐकावा प्रकारु ॥ सप्तमस्तबकाचा ॥१२॥

कौंडण्य वसिष्ठ मित्रावरूण ॥ तिन्ही प्रवरें गोत्र संपूर्ण ॥ योग सांख्य जन्मधारण ॥ अंबऋषीचें ॥१३॥

तये अंबऋषीची कांता ॥ कमळजा नामें पतिव्रता ॥ ते प्रसवली विष्णुभक्ता ॥ कृष्णकवीसीं ॥१४॥

तया प्रसन्न श्रीअनंत ॥ जो अंतरात्मा विश्र्वगत ॥ तेणें दाविला हा ग्रंथ ॥ कल्पतरु नामें ॥१५॥

गोदानदीचे दक्षिणतीरीं ॥ पद्मपुर बोलिजे द्वापारीं ॥ ग्रंथ जाहला पुण्यक्षेत्रीं ॥ नासिकस्थानीं ॥१६॥

अरूणावरूणा गोदावरी ॥ कपाळेश्वर साक्ष सुंदरीं ॥ कल्पतरू वाहिला पुण्यपत्रीं ॥ गोविंदचरणीं ॥१७॥

आतां असो हे योग्यता ॥ षष्ठस्तबक जाहला गा भारता ॥ पूर्णपुष्पें श्रुतिसत्ता ॥ ब्रह्ममौनें ॥१८॥

ह्मणोनि असो विस्तारु ॥ सांगतां शिणला सहस्त्रशिरु ॥ लेखा करिता महामेरु ॥ ठेंगणा जेथें ॥१९॥

येवढें कैसें ज्ञानमत ॥ सांगिजे हरिगुण समस्त ॥ परि बोलिलों संकलित ॥ तुमचें प्रसंगें ॥१२०॥

जैसें गंगेचें अपार नीर ॥ परि पक्षी घोंटी अणुमात्र ॥ तैसें मी बोलिलों चरित्रे ॥ माधवाचें ॥२१॥

आतां असो हे येथ कथा ॥ संपूर्ण जाहली गा भारता ॥ पुढें सप्तमस्तबक आतां ॥ परिसावा जी ॥२२॥

या कल्पतरूची पुण्यकथा ॥ श्रोता सद्भावें परिसतां ॥ मग कल्पिले मनोरथां ॥ पाविजे त्वरित ॥२३॥

मनीं चिंतिले मनोरथ ॥ श्रोतयांचे पुरती त्वरित ॥ नानापातकें अपघात ॥ चुकती येणें ॥२४॥

अपुत्रिकांसी पुत्र ॥ निर्धनासी धनसमृद्धी ॥ आणि जन्ममरणाची व्याधी ॥ बांधू न शके ॥२५॥

येणें नासती अपश्राप ॥ रोग अपघात आणिक ॥ दुःखादि हरती त्रिताप ॥ ग्रथ श्रवण करितां पैं ॥२६॥

ब्रह्महत्यादि नानादोष ॥ सकळही विलया जाती देख ॥ हरिहरस्मरणें विशेष ॥ पाविजे भुक्ति मुक्ती ॥२७॥

मनी संकल्पिजे जितुकें ॥ तें पाविजे त्वरित कौतुकें ॥ नानादोष आणि पातकें ॥ नासती सत्य ॥२८॥

आतां असो हे वित्पत्ती ॥ सहस्त्रमुखा न वर्णवे फळश्रुती ॥ तेथें मी काय मंदमती ॥ बोलावया समर्थ ॥२९॥

जें न वर्णवे चतुर्मुखा ॥ कीं सहस्त्रवदना शेषा ॥ तेथें मानविमाचा लेखा ॥ कायसा वर्णिजे ॥१३०॥

अठरापुराणांचें सार ॥ साहीशास्त्रें परिकर ॥ चारी वेद सविस्तर ॥ प्रसिद्ध जे कां ॥३१॥

इतुकियांचा मथितार्थ ॥ काढूनियां रचिला ग्रंथ ॥ माजी ऋषिवाक्य तेंचि सत्य ॥ बोलिलों असें ॥३२॥

जैसें दधि मंथन करितां ॥ घवघर्वात पाविजे नवनीता ॥ तैशा दिसती येथें कथा ॥ कल्पतरूमानी ॥३३॥

या कल्पतरूची कथा ॥ प्रीति पावो श्रीअनंता ॥ समस्तां जाहलों विनविता ॥ ह्मणे कृष्णयाज्ञावल्की ॥३४॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ व्यतीपातकथाप्रकारू ॥ एकविंशतितमाऽध्यायीं कथियेला ॥१३५॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ इति षष्ठस्तबकः समाप्तः ॥ स्तबक ओंव्या संख्या २७१८

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबक समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP