॥ श्रीगणेशाय नमः ॥
हें सांगितलें महिमंडळ ॥ संपूर्ण अतिसोज्वळ ॥ तें ऐकिलें असे सकळ ॥ जन्मेजय रायें ॥१॥
मग ह्मणे जन्मेजयो ॥ वैशंपायना तूं मतीचा डोहो ॥ थोर फेडिला संदेहो ॥ माझिये मनींचा ॥२॥
तरी आतां पुढील कथन ॥ तें सांगाजी मजलागुन ॥ कैसें केलें असे कथन ॥ व्यासदेवांनी ॥३॥
मग ह्मणे वैशंपायन ॥ बरवा केला गा प्रश्र्न ॥ जेणें सुखिया होय मग ॥ श्रोतयाचें ॥४॥
हें सप्तद्दीपावती महिमंडळ ॥ दर्पणासारिखें सोज्वळ ॥ नम्रते जैसें मुक्ताफळ ॥ ऐसें असे राया ॥५॥
जरी हें ऐकीजे महिमंडळ ॥ तरी पृथ्वीप्रदक्षिणेचें फळे फळ ॥ आणि देव भक्तीं ऐकतां फळ ॥ होइजे पावन ॥६॥
मधुसिंधूच्या पैलतीरीं ॥ लोकालोक महागिरी ॥ या दोहींमध्यें धरित्री ॥ साडेबारालक्ष गांवें ॥७॥
परि ते निर्वाण उद्दस ॥ एवं महिप्रमाण कोटि पन्नास ॥ इतुकीं योजनें अहर्निश ॥ फिरे सविता ॥८॥
तें विभागींचें महिमंडळ ॥ दर्पणासारिखें सोज्वळ ॥ समते असे मुक्ताफळ ॥ नम्रते जैसें ॥९॥
असो हा लोकालोक महागड ॥ याचे मस्तकीं न पवे मार्तंड ॥ हा त्रैलोक्याशीं अगड ॥ रचिला असे ॥१०॥
तारा ध्रुव रविचंद्र ॥ यांची दीप्ती आरुती निर्धार ॥ लोकालोकापरता अंधार ॥ अखंड तो ॥११॥
तो लोकालोक उंच पर्वत ॥ साडेबाराकोटी गांवें उदित ॥ ह्मणऊनि या परता संतता ॥ अंधकार राया ॥१२॥
त्या पर्वताच्या चहूं माथां ॥ चारी गज असती भारता ॥ तें दडपण ठेविलेंसे माथां ॥ मेदिनीसी ॥१३॥
ऋषभ आणि अपराजित ॥ पुष्कर उपमे जेवीं पर्वत ॥ चौथा वामन चौदंत ॥ चहूंदिशांप्रती ॥१४॥
आणि त्या पर्वताच्या माथां ॥ महापुरुष असे गा भारता ॥ तो त्रिभुवनीच्या जीवयंता ॥ पाळिता पैं ॥१५॥
महाविभूतीचा अंतर्यामी ॥ विधिसत्वमूर्ती तिहीं ग्रामीं ॥ पारश्र्वतीयुक्त पराक्रमी ॥ स्वामी ऋद्धिसिद्धींचा ॥१६॥
तेणें आपुलें लीलेनें भारता ॥ हें त्रैलाक्य रचिलें सत्ता ॥ आणि अंधकार असे त्यापुरता ॥ कोटि पन्नास गांवें ॥१७॥
परि त्याहीपरतें असे आकाश ॥ तो बोलिजे चैतन्यदिनेश ॥ जो स्वयंभू रात्रंदिवस ॥ नेणिजे तेथें ॥१८॥
जे आत्मबोधीं महासुकृती ॥ त्या योगियां तेथं गती ॥ हे पंचमस्कंधींची वदंती ॥ सत्य जाणा ॥१९॥
येवढा तो महातेजःपुंज ॥ तया बोलिजे मार्तंड ॥ हिरण्यगर्भ चैतन्यसूर्य ॥ बोलिजे तोची ॥२०॥
ऐशिया चैतन्यसूर्यमंडळा ॥ आणि कथिलें अंडगोळा ॥ पन्नासकोटी गा भूपाळा ॥ अंतर योजनांचें ॥२१॥
देव मनुष्य जीवजंत ॥ स्थावरजंगमादि समस्त ॥ य सर्वयोनींचा निजभूत ॥ हिरण्यगर्भ तो ॥२२॥
त्या हिरण्यगर्भाहूनि वरुता ॥ पंचवीसकोटी गांवें भारता ॥ ब्रह्मकटाहो असे परता ॥ प्रकाशापासुनी ॥२३॥
या देवलोकींची रचना मान ॥ ते ब्रह्मा बोलतां जाहला मौन ॥ परि या भूगोलाचें जाहलें ज्ञान ॥ तें सांगितलें राया ॥२४॥
जैसीं वालबीजाचीं दोनी दळें ॥ तैसें देवलोक वरी ढरकलें ॥ खालील दळ पांगुळलें ॥ भूगोल हा ॥२५॥
या दोन्हींच्या बाह्मअंतीं ॥ आकाशा जडली डांक माती ॥ वरील दळाचे मध्यप्रातीं ॥ असे सूत्रात्मा विराट ॥२६॥
जैसें ऊर्णनाभीचें तंतुमंडळ ॥ मध्यें असोनि चाळी सकळ ॥ ग्रासी पसरी तंतुजाळ ॥ स्वलीळें जैसा ॥२७॥
या दोहींदळाच्या अंतरगतीं ॥ प्रकाशें फिरतसे गर्भस्ती ॥ विराटाचेनि तेजदीप्तीं ॥ त्रैलोक्यासी ॥२८॥
उत्तरायण ते अरोहणगती ॥ दक्षिणायन अवरोहणगती ॥ वैंषुवत ते समानगती ॥ जाणा दिनंकराची ॥२९॥
ऐशा या तिहीं अयनांच्या गती वृद्धि क्षयो जाणा तीनं राती ॥ संक्रांती प्रमाणें गा गभस्ती ॥ क्रमी मंडळ ॥३०॥
कर्क सिंह कन्या वृश्र्विक धन ॥ या संक्रांती होय दिवस क्षीण ॥ आणि मेष तूळ राशींस समान ॥ असे दिवस तो ॥३१॥
कुंभ मीन मिथुन मकर ॥ या संक्रातीं दिन होय थोर ॥ तरी याचा ऐक पां विचार ॥ भारता तूं ॥३२॥
उदयाचळाचिया माथां ॥ रवि उगवे गा भारता ॥ तैं दिनरात्री होय समता ॥ आज्ञा विधीची ॥३३॥
आणि मध्यस्थान सोडूनि सविता ॥ दक्षिणेचेपुनीं उगवे सविता ॥ तैं दिन तुंटे गा भारता ॥ ऐशियापरी ॥३४॥
उत्तेरेचेपुनियां तरणी ॥ तैं वृद्धी होय दिनमणी ॥ ऐसाचि अस्ताचळाचे स्थानीं ॥ अस्त याचा ॥३५॥
रथा येक चक्र सविता ॥ फिरे मानसोत्तराच्या माथां ॥ तो कंकणाकृती गा भारता ॥ पृथ्वीयेसीं ॥३६॥
त्या रथाचा दुसरा कणा ॥ मेरुमस्त टेंकला टेंकणा ॥ जैसा कां तरी फिरे घाणा ॥ दक्षिणपंथें ॥३७॥
सूर्यरथाचा चोहटा संसारू ॥ हा भागवतींचा विचारू ॥ आंख केला असे पांडु थोरु ॥ अयनगतिलागीं ॥३८॥
ऐसा त्या मानसोत्तराच्या मांथां ॥ चाक फिरवी देव सविता ॥ तें साडेनऊकोटी गा भारता ॥ भ्रमण याचें ॥३९॥
तये रथावरील घर ॥ तें छत्तीसलक्ष गांवें उंच थोर ॥ उपरि ध्रुव आणि रथसूत्र शिर ॥ बोलिलों असें ॥४०॥
तें घर लांब लक्ष अठरा ॥ आणि रुंदी नव गा नरेंद्रा ॥ नवलक्ष आवारु दुसरा ॥ वारुवांचा ॥४१॥
उच्चैःश्रवादि सात घोडे ॥ तीन दक्षीणे चारी वामेकडे ॥ ते रूपें शेंदूर शुद्ध गाढे ॥ अनुपम्य पैं ॥४२॥
तेथें अरुणदेवो सारथी ॥ परि तो चरणेंवीण गा भूपती ॥ यासी ठेलीतसे गभस्ती ॥ गतिलागीं ॥४३॥
रथ पागुळ आणि विषम वारु ॥ येकचक्रेंसी कमी दिनकरु ॥ हें चालविता सूत्रघारु ॥ हिरण्यगर्भ तो ॥४४॥
मेरूचे पूर्वे अमरावती ॥ आणि द्क्षिणे यमपती ॥ निम्लीचनीसीं वरुणपती ॥ पश्र्चिमे तो ॥४५॥
विभावरी नामें सोमपुरी ॥ ते मेरूच्य उत्तरपाठारीं ॥ तेथें उदयो अस्ताची कुसरी ॥ आथीच ना ॥४६॥
तेथें देव गंधर्वगणा ॥ सुर्य मध्येंचि असे गा नृपनंदना ॥ सव्य करितसे प्रदक्षिणा ॥ दक्षिणपथें ॥४७॥
आतां उदयो अस्तमान ॥ ते सूर्यतेजासारिखे समान ॥ तया तेजें करी दहन ॥ दिव्यलोक ह्मणउनी ॥४८॥
इंद्रपुरीहूनि दिनकरा ॥ यमपुरी पावे घटिकां पंधरां ॥ सवादोन कोटी लक्षसाडेबारा ॥ योजनें क्रमी पंथ ॥४९॥
याचिप्रकारीं चहूंपुरां ॥ भ्रगण होतसे दिनकरा ॥ हे पृथकें गा नरेंद्रा ॥ आणीं मनासी ॥५०॥
येका मुहूर्ती गा भारता ॥ चौतीसलक्षअठरा शतां ॥ अंतर क्रमीतसे सविता ॥ योजनें मार्ग ॥५१॥
सूर्याची प्रभा मंडळवटीं ॥ येकलक्ष साडेनव कोटी ॥ वर्तुळगणितें येकवटी ॥ योजनाचें ॥५२॥
सवादोनी नक्षत्रें सविता ॥ येकमासें भोगी गा भारता ॥ हा द्दिगुणकाळ भोगी तत्वतां ॥ तो बोलिजे ऋतु ॥५३॥
जेथूनि अर्ध करी गमन ॥ तेंचि बोलिजे गा अयन ॥ अवघें क्रमी तें बोलिजे काळज्ञान ॥ पंचसंत्सरात्मक काळ ॥५४॥
सहस्त्र दोनी योजनां ॥ सूर्य क्रमी येका क्षणा ॥ हा दीपकू सुरगणां ॥ ठेविला देवें ॥५५॥
तेथें वालखिल्य अप्सरा ऋषीश्र्वर ॥ गण गंधर्व नाग विद्याधर ॥ हे स्वविती गा समग्र ॥ दिनमणीतें ॥५६॥
मासें भोग भोगी गमस्ती ॥ ते सवादोनदिवशीं भोगी निशांपती ॥ क्षयवृद्धी कळांहीं दावी निश्र्वितीं ॥ अहोरात्र पितरांचे ॥५७॥
सवादोनदिवशीं राशीप्रती ॥ चंद्र भोगी गा भूपती ॥ दीडमासें राशीप्रती ॥ भोगी मंगळ ॥५८॥
येकसंवत्सरें भोगी गुरु ॥ तीसमासीं शनैश्र्वरू ॥ मासें येकें भोगी शुक्रू ॥ राशि राया ॥५९॥
जये राशीसि भोगी बुध ॥ तये मासें तुटे संबंध ॥ आतां असो हा अनुवाद ॥ या प्रसंगाचा ॥६०॥
ध्रुवपासुनि तेरालक्ष योजनां ॥ अंतर असे विष्णुभुवना ॥ ग्रहताराऋषि प्रदक्षिणा ॥ करिती त्यासी ॥६१॥
त्या ध्रुवाची लक्षूनि मेढी ॥ नक्षत्रें फिरती परवडी ॥ ज्योतिषचक्रें पुण्यमेढी ॥ ऐक राया ॥६२॥
हें ज्योतिषचक्र गा भूपती ॥ तें शिशुमाराच्या ठायीं योजिती ॥ त्याचा देह कुंडलाकृती ॥ योजिलासे ॥६३॥
तया शिशुमाराचे पुच्छवस्तीं ॥ तेथें असे प्रजापती ॥ इंद्रदेवो धर्म आणि गार्हपती ॥ मूळीं अग्रीं ॥६४॥
दक्षिणायनींचीं नक्षत्रें ॥ तीं सव्यपाश्र्वीं असती सर्वत्रें ॥ आणि उत्तरायणींची समग्रें ॥ वामपार्श्र्वीं ॥६५॥
ऐसियाचिये मध्यपृष्ठीं ॥ तेथें ब्रह्मयाची हातवटी ॥ ते अजवीथी नामें गोमटी ॥ असे राया ॥६६॥
आणि या शिशुमाराचे उदरीं ॥ गंगा वाहतसे निरंतरीं ॥ वक्षःस्थळीं ॥ सहस्त्रकरी ॥ असे सविता ॥६७॥
ह्रुदयीं असे नारायण ॥ शिरस्थानीं त्रिनयन ॥ कटिप्रदेशीं चतुरानन ॥ सत्य जाणा ॥६८॥
तया अष्टचरण गा भुपती ॥ दोनी दोनी नक्षत्रें चरणाप्रती ॥ चक्षुःश्रवणीं दोन दोन असती ॥ नक्षत्रें राया ॥६९॥
ऐशियाचें रूप त्रिकांळी ॥ देखे किंवा मनीं आकळी ॥ तेणें यमदूतांची फळी ॥ मोडिली जाणा ॥७०॥
आतां सूर्यमंडळातळीं ॥ दहासहस्त्र गांवें वाहुटळी ॥ राहूमंडळाची मांडळी ॥ असे राया ॥७१॥
तये राहुमंडळातळी ॥ सिद्ध चारण विद्याधर वोळी ॥ यक्ष राक्षस पिशाच त्या खालीं ॥ असती अनुक्रमें ॥७२॥
मग प्रेत भूत आणि गण ॥ या दहा दहा अंतरें जाण ॥ तयां खालीं अंतरें जळघन ॥ दहासहस्त्र ॥७३॥
आतां चंद्रमंडळाचा फेरा ॥ पूर्वपश्र्विमे सहस्त्र बारा ॥ आणि दहासहस्त्र गावें दिनकरा ॥ विस्तार मंडळाचा ॥७४॥
मेघां खालीं वसुंधरा ॥ ऐशीं दहास्थानें अंबरा ॥ या सूर्याखालीं गा नरेंद्रा ॥ असती सत्य ॥७५॥
आतां पृथ्वी खालील विस्तार ॥ तो तुज सांगों गा विचार ॥ जो महागूढ अगोचर ॥ सप्तपाताळांचा ॥७६॥
तंव ह्मणे जन्मेजयो ॥ हा सांगा जी मज उपावो ॥ कैसा पाताळींचा भावो ॥ असे ऋषिवर्या ॥७७॥
मग ह्मणे ऋषेश्र्वरू ॥ हा अगम्य गूढ विचारु ॥ तरी तुज सांगों उच्चारु ॥ व्यासमुनींचा ॥७८॥
अतळ वितळ सुतळ ॥ महातळ आणि तळातळ ॥ रसातळ आणि पाताळ ॥ सातवें तें ॥७९॥
हा सप्तपाताळांचा प्रयोग ॥ यासी स्वर्गापरीस उत्तम भोग ॥ व्याधी विवर्ण संताप रोग ॥ आथीच ना ॥८०॥
येथें मणिऔषधांचे प्रकाशें ॥ व्याधीं तम अंधकार नासे ॥ दिनकरासी स्वयंप्रकाशें ॥ नेणती ते ॥८१॥
आणि त्या औषधींचें रसपान ॥ तैसेंचि त्या फाळाचें भोजन ॥ तेणें वलीपलित नेणती जन ॥ तेथील राया ॥८२॥
देहवैवर्ण्य आणि दुर्गैघ ॥ क्कम अवस्था आणि स्वेद ॥ दुःख डोहाळे व्याधिकंद ॥ नेणंती ते ॥८३॥
तेथील सकळ लोकपाळां ॥ सुदर्शनें मॄत्यु गा भूपाळा ॥ तयाविणें ते असती कळिकाळां ॥ अजिंक्य पैं ॥८४॥
तेथील स्त्रिया गा भूपती ॥ सुदर्शनाभेणें गर्भ गाळिती ॥ त्याविणें सर्वथा न मानिती ॥ आणिका कोणा ॥८५॥
प्रथम अतळींचा राजा बळिपाळ ॥ तो दैत्यकुळींचा विशाळ ॥ शाहाण्णव मायांचा गोंधळ ॥ रचिला तेणें ॥८६॥
सैरण मोहन उच्चाटन ॥ जारण मारण स्तंभन ॥ घात पात निघाले कामन ॥ जांभई पासाव ॥८७॥
तेथील स्त्रिया गा भुपाळा ॥ स्वेच्छाचारी पुंश्र्वली सकळा ॥ त्या येवोनियां भूमंडळा ॥ नेती पुरुषांसी ॥८८॥
कदापि त्या होवोनि अप्सरा ॥ जळद्वारें नेती विवरा ॥ मग भोगिती पुरुषमात्रां ॥ मानवांसी ॥८९॥
हाटक नामें कनकरसु ॥ तो येखादिया पाजिती बहुवसु ॥ मग तो भ्रमित करूनियां निश्र्वासु ॥ नेती अंतराळीं ॥९०॥
त्या हाटकरसाचेनि तेजें ॥ दहासहस्त्र गजांचें बळ ये भुजे ॥ मग त्या भोगिती सुरतशेजे ॥ त्या मानवासी ॥९१॥
आतां वितळींचा राजा हाटकेश्र्वरू ॥ तेथें देव भवं भवानीवरु ॥ त्याचेनि रेतें लोटला पुरु ॥ हाटकनदीचा ॥९२॥
तये नदीचें घातुजीवन ॥ तें अग्निवातें मुरे जाण ॥ तेंचि जाहलें हाटकसुवर्ण ॥ अतितेजाचें ॥९३॥
तये सुवर्णाचे अळंकार ॥ तया लोकां लेणीं श्रृंगार ॥ अग्निविणें घडिजे सुकुमार ॥ अभंग तें ॥९४॥
आतां विरोचन विष्णूच्या कुळीं ॥ तो सुतळींचा रावो बळी ॥ तेथें देवो महाबळी ॥ त्रिविक्रम तो ॥९५॥
तो त्रिविक्रम जगन्नयगाभा ॥ परि तो बळीद्वारीं असे उभा ॥ तया पूजीतसे प्रेमलोभा ॥ बळी राव तो ॥९६॥
वामनातें दीधलें यज्ञकाळीं ॥ तो प्रसाद पावला बळी ॥ ह्मणोनि भोगितसे पाताळीं ॥ राज्यश्रीतें ॥९७॥
येकदां दिग्विजयाच्या फेरीं ॥ रावण लोटला तेथें पदाग्रीं ॥ तंव दहासहस्त्रगांवें टाकिला दूरी ॥ त्रिविक्रमदेवें ॥९८॥
तो प्रसंगें आला पाताळीं ॥ ह्मणे द्रव्य दे रे राया बळी ॥ तवं दशकंठ हाणितला वक्षःस्थळीं ॥ त्रिविक्रमें चरणें ॥९९॥
तयाखालीं तळातळीं नृपवर ॥ मय नामें दानवेंद्र ॥ तो बळिऐसाचि निर्धार ॥ त्रिपुराधिपती ॥१००॥
तेथें त्रिपुर नामें होता क्षेत्री ॥ तो शिवें वधिला दुराचारो ॥ त्याचें त्रय जाळूनि त्रिपुरारीं ॥ स्थापिला मय तेथें ॥१॥
त्या महादेवाच्या वरदा ॥ यासी निर्भय केलें सर्वदा ॥ आणि सुदर्शनाची बाधा ॥ वारिली त्याची ॥२॥
आतां त्याखालीं महातळीं ॥ क्रोधावसु राजा सर्पकुळीं ॥ तो कदुपुत्र बंधुमेळीं ॥ असे तेथें ॥३॥
तेथें सुषेण आणि कुहक ॥ कालियादि प्रधान तक्षक ॥ हे मुख्य गा राजटिळक ॥ असती क्रोधावसूचे ॥४॥
ते सर्प गरुडाचे भेणें ॥ पाताळीं ठेविले चतुराननें ॥ बंधुपरिवारीं ॥ राज्यठाणें ॥ भोगिती ते ॥५॥
तयाखालील रसातळीं ॥ दानव आणि सर्पकुळीं ॥ हिरण्यकाळिया राजमेळीं ॥ असती तेथें ॥६॥
त्या सुदर्शनाचेनि तेजदर्पें ॥ धाकें कांपती सर्पादिकें ॥ बिळें करूनि दीर्घखोंपे ॥ असती तेथें ॥७॥
आतां त्या खालील पाताळीं ॥ वासुकी राजा सर्पकुळी ॥ जो मिरविजे चंद्रमौळीं ॥ हार कंठीं ॥८॥
तेथें कंबलाश्र्वतरादिक ॥ श्र्वेत शंख आणि कुलिक ॥ शंखचूड तैसाचि एक ॥ महाशेष तो ॥९॥
धनंजय आणि धॄतराष्ट्र ॥ महाशंख शतमुख फणिवर ॥ कीं देवदत्त महाउग्र ॥ आदिनाग हे ॥११०॥
पंच दहा फणि शत ॥ आणि सहस्त्र फणी अनंत ॥ हे असती नाग समस्त ॥ पाताळभुवनीं ॥११॥
त्यांचिये माथांचे मणी ॥ ते दीप्तिमंत प्रभा तरणी ॥ त्या उजेडें होय पळणी ॥ अंधकारासी ॥१२॥
तयाखालीं तीससहस्त्र योजनां ॥ संकर्षण असे गा नृपनंदना ॥ जो अनंत जाणिजे त्रिभुवना ॥ शेषशायी ॥१३॥
त्याचे माथां भूमंडळ ॥ मोहरीचेपरी अळुमाळ ॥ त्याचे भोंवईपासूनि विक्राळ ॥ जन्मले रुद्र अकरा ॥१४॥
त्या संकर्षणदेवाची कीर्तीं ॥ स्वर्गीं ब्रह्मा सांगे देवांप्रती ॥ आणि नारद वाखाणी प्रीतीं ॥ सर्वदा तो ॥१५॥
त्या संकर्षणाचें नामकीर्तन ॥ जो स्मरे कीं करी श्रावण ॥ त्याच्या महापातका क्षाळण ॥ होय राया ॥१६॥
त्याखाली कोटि योजनें खोल ॥ हरिहरांचे पदयुगुल ॥ त्यावरी उभारिलें ब्रह्मांड ढिसाळ ॥ दामोदर हें ॥१७॥
ऐसे हे स्वर्ग मृत्यु पाताळ ॥ तुजलागीं कथिलें गा सकळ ॥ आतां ऐकें पां समूळ ॥ नरकथा ॥१८॥
संचित प्रारब्ध क्रियमाण ॥ हे कर्मगती बोलिजे त्रिगुण ॥ होताति गा विलक्षण ॥ भोगवी सर्व जीवांसी ॥१९॥
निःशेषकर्माची फळगती ॥ ते विलक्षण गा भूपती ॥ असो अठ्ठाविसां नरकांप्रती ॥ भोगवी जीव ॥१२०॥
त्रैलोक्यांचे अंतराळीं ॥ दक्षिणदिशेच्या मंडळीं ॥ अग्निष्वात्तादि पितरकुळीं ॥ अहर्निशीं ॥२१॥
ते चिंतिती शिवासी ॥ कीं सत्पुत्र हो कां स्ववंशीं ॥ तो सोडवील धर्मराशी ॥ या नरकांपासाव ॥२२॥
तरी तें पृथ्वीचिये खालीं ॥ उदकावरी गा अंतराळीं ॥ नरकस्थान मध्यमंडळीं ॥ त्रैलोक्याचे ॥२३॥
तेथें अधिपती दक्षिणदिशे ॥ राजा वैवस्वत यम असे ॥ तो पुत्रांकरवीं कर्मरोषें ॥ भोगवी नरक ॥२४॥
जैसें ज्याचें आचरण ॥ त्यापरी करिती दंडदमन ॥ ते नरक गा कोणकोण ॥ तें ऐक आतां ॥२५॥
तामिस्त्र आणि अंधतामिस्त्र ॥ रौरव महारौरव अपार ॥ सांडस कुभीपाक काळसूत्र ॥ आणि तप्तसूमीं ॥२६॥
वैतरणी आणि वज्रकंटक ॥ असिपत्रवन सूकरमुख ॥ ऐसे अकरा हे नरक देख ॥ जन्मेजया गा ॥२७॥
पर्यावर्तन अंधकूप ॥ कृमिभोजन शाल्मलीक ॥ कर्दमंधोडी अनेक ॥ आणि कंटकउक पैं ॥२८॥
पूयोद अवीचिरयपान ॥ कर्दमनिक्षेप प्राणरोधन ॥ विशसन कीं लाळभक्षण ॥ आणि क्षारकर्दम तो ॥२९॥
सूचीमुख राक्षसभोजन ॥ शूलप्रोतं अवटनिरोधन ॥ दंदशूक श्र्वानभक्षण ॥ आणि काकमुख ते ॥१३०॥
ऐसे मुख्य नरक अठ्ठावीस ॥ परि कोणकोणा भोगवी अवश्य ॥ तो दंड आणि कर्मरोष ॥ ऐक राया ॥३१॥
जो स्त्रीबाळकधन हरी तो तमिस्त्री पचिये अघोरी ॥ अन्नउदकेंवीण निरहारी ॥ दंडिजे दूतीं ॥३२॥
वरी मुद्रल वाजती लक्षकोडी ॥ तेणें मूर्च्छित पडे घडिघडी ॥ मग उभा करूनि आदळिती धोंडी ॥ तप्तगोळे ॥३३॥
जो वंचूनिया स्त्रीपुत्रां ॥ भोजन करी गा नरेंद्रा ॥ तया अंधतामिस्त्रीं घालिजे नरा ॥ महाजाचणी ॥३४॥
माराखालीं होय अचेतनु ॥ तेणें घडिघडि विसरे तनु ॥ सहस्त्रवर्षें अपमानु ॥ होय त्याचा ॥३५॥
जैसें जीव वधिले भूमंडळीं ॥ तैसा तो जाचिजे नरकस्थळीं ॥ सर्वापरिस व्यथा आगळी ॥ ह्मणोनि महारौरव तो ॥३७॥
जो मांस भक्षी घेऊनि विकत ॥ त्या करवीं स्वागींचें भक्षविती दूत ॥ ह्मणोनि मांसनिषेध गा बहुत ॥ कार्याविण पैं ॥३८॥
हा केवळ देहभराचा जाचु ॥ पितृहवनालागीं न पडे पशु ॥ आणि अयाचितासी दोषु ॥ थोडाचि असे ॥३९॥
जो पशुपक्षी द्वेषें चावळी ॥ तो काळसुत्रीं पचिजे त्रिकाळीं ॥ दहासहस्त्र तप्तमंडळीं ॥ घालिजे तो ॥४१॥
तापल्या तांबयाची शिळ ॥ तया खालीं अग्नीची ज्वाळ ॥ आणि बारा आदित्यांची कळाळ ॥ मध्यें घालिती ब्रह्मद्रोही ॥४२॥
पशुअंगींचे सर्व केश ॥ तितुकीं वर्षें भोगविती दोष ॥ तेव्हां कर्मदेहीं सांडे विश्र्वास ॥ ब्रह्मद्रोहियासी ॥४३॥
जो आपदा न लागतां शरीरीं ॥ पारकीयवृत्तीनें पोट भरी ॥ तो असिपत्रवनीं यमकिंकरीं ॥ वोढिजे प्राणी ॥४४॥
त्या पत्रांच्या देव्हढ्या धारा ॥ जैसा साहाणे लाविजे सुरा ॥ मध्यें वोढितां होय चुरा ॥ कर्मदेहाचा ॥४५॥
वरी हाणिती महामुसळीं ॥ मागुतें देह जडे तात्काळीं ॥ ऐसा ब्रह्मद्रोही यममंडळीं ॥ जाचिये राया ॥४६॥
जो अदंडिया दंडिजे भूपती ॥ आणि ब्राह्मणा शस्त्रें हाणिती ॥ तो सूकरमुखाचिया दांती ॥ करिजे खंडविखंड ॥४७॥
जैसी उंसाची कांडोरी ॥ मर्दिजेती घाणियाचे उदरीं ॥ तैसी सूकरमुखें चोंथरी ॥ होय कर्मदेहाची ॥४८॥
जाणोनि पारक्या पादुका ॥ विगुणा करिती आत्मसुखा ॥ तया अंधकूपीं जाचिये लेखा ॥ नाहीं तयाचा ॥४९॥
पशु पक्षी मृग कीटकां ॥ मुंगी मशक ढेंकूण यूका ॥ यांसी विधी तो अंधकूपा ॥ पडे नरकीं ॥१५०॥
जो पंचमहायज्ञकर्ता ॥ हे दृढ असतां अव्हेरिता ॥ तो काक पशु गा भारता ॥ मानिजे श्रोतीं ॥५१॥
तो कृमिकुंडीं घालिजे प्राणी ॥ कृमी तोडिती भोजनीं ॥ तो कृमिकुडीं होय गमन ॥ पचविती देखा ॥५३॥
जो आपदा न लागतां दिवशीं ॥ कनक चोरी पापराशी ॥ तो तोडिजे तप्तसांडसीं ॥ दूतीं यमाच्या ॥५४॥
अश्र्वमुखायेवढे सांडस ॥ त्याचें तोडूनि खाती मांस ॥ हे कनकहराचे दोष ॥ सत्य जाणा ॥५५॥
जे अगम्य स्त्रियेशीं रमती ॥ किंवा स्त्रिया पुरुषाप्रती ॥ त्या लोहाच्या करूनि तप्तमूर्तीं ॥ आलिंगविती तयां ॥५६॥
जो सर्वायोनीच्या ठायीं करी गमन ॥ तो वज्रकंटकावरी घालिती यमगण ॥ आणि मुसळीं वाजती घण ॥ मस्तकावरी ॥५७॥
जो राव सांडीधर्ममर्यादा ॥ पाखांड आचरे सर्वदा ॥ तो दंडिजे दोषबाधा ॥ वैतरणीं यमगणीं ॥५८॥
जो अठ्ठाविसां नरकांचा खंदक ॥ तो वैतरणदिंड सम्यक ॥ तेथील ऐका विवेक ॥ नदीमेळांचा ॥५९॥
मळ मूत्र नख केश ॥ रक्त वसा आणि मांस ॥ कफ पित्त आणि फोपिस ॥ वाहती तेथें ॥१६०॥
ऐसी ते नदी महाबीभत्स ॥ तेथें पचविती ते राजस ॥ वरी विदरूनि खाती राक्षस ॥ त्या पाखांडियासी ॥६१॥
जे नर वृषलीयेतें रमती ॥ नष्ट आचरण आचरती ॥ पशूचिये परी विचरती ॥ निर्लज्ज ते ॥६२॥
ते नानारक्त मळ मूत्रीं ॥ पित्त श्र्लेष्म क्षारसागरीं ॥ त्यामध्यें पचिये दुराचारी ॥ वृषलीरमतयानें ॥६३॥
तया लागीं क्षुधा तृषा जाण ॥ तेव्हां तेंचि करविती भोजन ॥ ऐशी करिती जाचण ॥ यमदूत तया ॥६४॥
जे श्र्वान ससाणे घेवोनि वनीं ॥ जीवहिंसा करिती नित्यानीं ॥ कीं चारा घालोनि पाशगुणीं ॥ पाडिती जे ॥६५॥
ते पचिजेती लालाभक्षणीं ॥ वरी दूत विंधिती वज्रबाणीं ॥ कोटिसंख्या दिनमानीं ॥ न मुंचे तो ॥६६॥
वोडंबे करी हवन ॥ पशुप्राणियां करी बंधन ॥ ते वैश्र्वनरकीं पचती दारुण ॥ दांभिकाचारी ॥६७॥
आणि करचरणांची कांडोरी ॥ पिळिजे वज्रघाणीचे पाथरीं ॥ मागुती मिळती क्षणमात्रीं ॥ कर्मकैवतें ॥६८॥
जो ब्राह्मण होऊनि साक्षात ॥ परस्त्रीठायीं अर्पी रेंत ॥ ते रेतकुंडनदीं नरकपात ॥ भोगी दारुण ॥६९॥
रेत करुनियां तप्त ॥ त्याचे मुखीं घालिती दूत ॥ आणि नेत्रीं घालिती चात ॥ वज्रलोहाचे ॥१७०॥
जो तस्करपणें पोट भरी ॥ किंवा अग्नी लावी क्षेत्रीं ॥ अथवा विष देऊनि मारी ॥ प्राणिया जो ॥७१॥
अथवा रजदूतपणें ॥ विनान्यायें दंड घेणें ॥ त्यासी यम लावी श्र्वानें ॥ वज्रदंतांची ॥७२॥
जो नर लटकी वदे साक्षी ॥ तो पचविती विंचवाचे नरकीं ॥ वरी धूम्र देतो नासिकीं ॥ नानावल्लींचे ॥७३॥
आणि शतयोजनें उंच गिरी ॥ त्यावरूनि टाकिती दुराचारी ॥ तिळप्रमाण होय कांडोरी ॥ मिळती पुनः ॥७४॥
जो ब्राह्मण वैश्य क्षेत्री ॥ एकादशीसि सुरापान करो ॥ कीं स्त्रीभोग शरीरीं ॥ आचरे जो ॥७५॥
त्यासी पातळ लोहाचा तप्तरसू ॥ मुखीं घालिती बहुवसु ॥ आणि द्वारें धरूनि श्र्वासू ॥ कोंडिती त्याचा ॥७६॥
जो धन विद्या वय आचरणें ॥ तप दान गृहस्थपणें ॥ वडिलां वंचूनि अर्थप्राणें ॥ गर्वें आथिला जो ॥७७॥
तो प्रेत पिशाचांचे परी ॥ क्षारकृमीं पचविजे अर्धशरीरीं ॥ सहस्त्रसंख्या यमकिंकरीं ॥ दंडिजे तो ॥७८॥
हो कां पुरुष अथवा युवती ॥ जीव कपटेंकरूनि भक्षिती ॥ त्याचें मांस कापोनि घालिती ॥ राक्षसांपुढें ॥७९॥
जो नरु साधतें सदा निंदी ॥ कीं गुणदोष बोले विरोधीं ॥ तो तप्तशिळा ठेवोनि पदीं ॥ चाटविती जिव्हें ॥१८०॥
जो नर निरपराधी ॥ चारा घालूनि पाडी फांदीं ॥ खेळ खेळोनि विनोदीं ॥ जाची जीवांसी ॥८१॥
त्यासी यमदूत निरंतरीं ॥ कठिण शूळ रोंविती उदरीं ॥ आणि टोंचूनिया घारी ॥ ग्रासिती त्यातें ॥८२॥
जो नर पारक्यातें पीडी ॥ आणि व्यथा उद्देगें दंडी ॥ तो नरकीं नरु आगडी ॥ घालिती पैं ॥८३॥
सप्तमुखांचें व्याळ ॥ तया ग्रासिती महाकाळ ॥ तेव्हां अपान्द्वारें मळ ॥ करवूनि सांडिती ॥८४॥
अनाथांतें गांजी विवरीं ॥ अथवा चढवी शूळाग्रीं ॥ कीं कारागृहीं पाशमंत्रीं ॥ पीडी जीवां ॥८५॥
तो यमलोकीं वज्रविवरीं ॥ धूम्रपानें पीडिजे यमकिंकरीं ॥ गळ गळूनि भांडे गात्रीं ॥ पापिष्ठ पावे ॥८६॥
जो अतीता पाहे वक्रदृष्टीं ॥ उपहासें निंदी मिटी ॥ आणि भोजन ग्रासमुष्टी ॥ देऊंन शके ॥८७॥
ऐशियातें यमकिंकर ॥ गीधांकरवीं टोंचविती नेत्र ॥ आणि जिव्हा खाती अधर ॥ अतीतनिंदकाचे ॥८८॥
जो असोनि धनवंत ॥ परि कृपणपणें वर्तत ॥ लेणीं लुगडीं उपभोग विरहित ॥ नेणें मिष्टान्न ॥८९॥
जो सर्पाचे परी राखे धन ॥ तया यमलोकीं दंडिती गण ॥ कीं सूचीमुखें दुष्ट दारुण ॥ दंडिजे प्राणी ॥१९०॥
त्यासी मूषक वज्रदंतीं ॥ वरी यमपाशीं दंडिती ॥ आणि पीडिजे दीर्घदंतीं ॥ बांधिजे तो ॥९१॥
ऐशा पापिया यमजाचणी ॥ करिजे गा यमजनीं ॥ बोलतां पैं वाणी ॥ बोलवे ना ॥९२॥
ऐसे यमलोकीं नानानरक ॥ परि अठ्ठावीस कथिले मुख्य ॥ आणि पातकेंही असंख्य ॥ असती राया ॥९३॥
परि असती जे धर्मशीळ ॥ ते स्वर्गीं भोगिती पुण्यफळ ॥ तें सरलिया महिमंडळ ॥ पुनःपावती ॥९४॥
आणि पापात्मे जे प्राणी ॥ ते जाचिती नानाजाचणीं ॥ ह्मणोनि लक्षचौर्यायशीं योनी ॥ भोगिती दुःख ॥९५॥
आणि जे अध्यात्मीं पूर्ण ज्ञाते ॥ ते पावती सायुज्यमुक्तीतें ॥ ऐसें जाण गा निश्र्वितें ॥ जन्मेजया तूं ॥९६॥
ऐसा हा महा अंडकोशु ॥ चौदाप्रकारीं जाणिजेसु ॥ हें स्थळ स्वरूप बोलिले व्यासु ॥ गोविंददेवाचें ॥९७॥
ऐसा हा राया भुगोल जाण ॥ नदी खंडें पर्वत वन ॥ समुद्र पाताळ तारागण ॥ ऐके जो कां ॥९८॥
हें मायामय स्थळरूप ॥ पुढें ऐकिजे महाद्दिप ॥ ते स्वयें होती निःपाप ॥ जाण सत्य राया ॥९९॥
आणि या सहस्त्र अष्टादशा ॥ शुकें कथिलें अभिमन्यवेशा ॥ हा भुगोल बोलिजे राजसा ॥ पंचमस्कंधीं ॥२००॥
हे श्रीभागवतींची कथा तुज कथिली गा भारता ॥ पंचमस्कंधीं पुण्यवार्ता ॥ असे राया ॥१॥
आतां असो हे भूगोलकथा ॥ पूर्ण जाहली गा भारता ॥ श्रवणमात्रें नाशी दुरितां ॥ नानादुःखराशी ॥२॥
आतां पुढील पुण्यकथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ तें ऐकावें सकळ श्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥३॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ कुंभीपाकादिनरकप्रकारू ॥ चतुर्थाध्यायीं कथियेला ॥२०४॥
॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके चतुर्थाध्यायः समाप्तः ॥