कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय १९

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

वैशंपायनां पुसे भूपती ॥ कीं एक आठवलें जी चित्तीं ॥ या हुताशनीसि कां प्रज्वलिती ॥ महाशब्दें ॥१॥

तरी कैसें आख्यान ॥ हें कोणे पुराणींचें ज्ञान ॥ तें सांगा विस्तारेंकरून ॥ वेदमूर्तीं ॥२॥

मग ह्मणती वैशंपायन ॥ परिसें राया तें वचन ॥ जें पूर्वी श्रीकृष्णालागून ॥ पुसिलें होतें धर्मरायें ॥३॥

धर्म ह्मणे गाश्रीपती ॥ ग्रामोग्रामीं हुताशनी करिती ॥ आणि महाशब्दे बोलती ॥ कवणेगुणें ॥४॥

अपशब्द कां बोलती ॥ नानाविध चेष्टा करिती ॥ तरी तें विस्तारें मजप्रती ॥ सांगा देवा ॥५॥

मग बोले मधुसुदन ॥ तुवां पुसिलें होळीचें कथन ॥ तरी ऐकें चित्त देऊन ॥ धर्मराया ॥६॥

पूर्वीं कृतयुगाचे ठाई ॥ रघुराजा अयोध्येसि पाहीं ॥ शुरवृत्ती असोनि देहीं ॥ बहुश्रुत तो ॥७॥

सकल पृथ्वी जिंकोन ॥ वश केले नृपनंदन ॥ धर्में करी प्रजापालन ॥ दुष्टांसि दंडी ॥८॥

शत्रूचें करी निर्दाळण ॥ पुत्रापरी प्रजापालन ॥ दुर्भिक्ष नाहीं वर्षे घन ॥ दुःखबाधा पळली ॥९॥

दुर्भिक्ष नसे तयाचे देशीं ॥ व्याधी नाहीं कोणासी ॥ अवकाळी अपमृत्यूसी ॥ नेणती जन ॥१०॥

अधर्म आचरितां नरं ॥ तयां शासन करी सत्वरा ॥ ऐसा राजा महाधीरा ॥ तोचि एक ॥११॥

यापीर राज्य करितां पवित्र ॥ उदेली येकी निशाचर ॥ प्रतापें आगळी महाक्रूर ॥ नामें ढुंढ पैं ॥१२॥

तये नामाचा उजवरा ॥ धूंडूनि भक्षी चराचरा ॥ ह्मणोनियां गा नरेंद्रा ॥ ढूंढा नाम ॥१३॥

महाक्रूर ते राक्षसी ॥ पीडा करी बाळकांसी ॥ पसरोनि थोर आननासी ॥ करी ग्रास ॥१४॥

तयेनें करितां अन्योन्य ॥ तेणें प्रजा दुःखी होऊन ॥ मग रायापाशीं येऊन ॥ विनविते जाहले ॥१५॥

रायें त्यांसी संबोखिलें ॥ काय जाहलें ह्मणितलें ॥ कोणें तुह्मां कष्टविलें ॥ दुःख पावलेती ॥१६॥

जेणें दुखविले प्रजाजन ॥ त्यासी मी दंड करीन ॥ ऐसें प्रीतिभावें करून ॥ पुसता जाहला ॥१७॥

मग ते सांगती जन ॥ कीं येक ढुंढा राक्षशीण ॥ ते रात्रीमाजे खाय अन्न ॥ आणि बाळकें पैं ॥१८॥

ते ढुंढा राक्षसीण ॥ नित्य गृहीचें भक्षी अन्न ॥ आणि पीडी बाळांलागुन ॥ क्रूरभावेंसीं ॥१९॥

धूंडी सकळ गृहांप्रती ॥ ह्मणोनि ढूंढा तिये ह्मणती ॥ कीं बाळकें मारीत असे ती ॥ धूंडोनिया ॥२०॥

ऐसें प्रतिदिनी करित ॥ तेणें राया आह्मी दुःखित ॥ ह्मणोनि गा शरण येथ ॥ आलों तुजसी ॥२१॥

ऐसें ऐकोनिया वचन ॥ विस्मित जाहला नृपनंदन ॥ मग वसिष्ठाआश्रमीं येऊन ॥ कर जोडोनि विनवित ॥२२॥

प्राणिपात करूनि मुनीसी ॥ पुसतसे आदरेंसी ॥ कीं ढूंढा नामक राक्षसी ॥ ही असे कोण ॥२३॥

जें प्रजासीं दुःख होये ॥ टाळावें तें सकळ रायें ॥ जरी रक्षवेना तरी काय ॥ क्षात्रघ्मां तो ॥२४॥

तयेनें काय केलें अनुष्ठान ॥ कोण देव जाहला प्रसन्न ॥ देवें काय वर इजलागुन ॥ दीधला असे ॥२५॥

ऐसें ऐकोनियां वचन ॥ वसिष्ठ सांगती आपण ॥ कीं राया हें गुह्म कथन ॥ तें सांगों तुज ॥२६॥

हें ढूंढा नामें विख्याता ॥ मालिनीराक्षसीची दुहिता ॥ तिचें चरित्र ऐकें नृपनाथा ॥ विस्तारेंसीं ॥२७॥

तियेंनें आराधिला त्रिनयन ॥ कष्ट केले अति दारुण ॥ पंचाग्नि आणि घुम्रपान ॥ लोहचूर्ण भक्षिलें ॥२८॥

मग हरु जाहला प्रसन्न ॥ तयेसि ह्मणे माग वरदान ॥ तंव ते राक्षसी बोले वचन ॥ शिवाप्रती ॥२९॥

ह्मणे शंकरा तेजोराशी ॥ जरी प्रसन्न मज जाहलासी ॥ तरी करींगा अंध सर्वासी ॥ चराचरीं या ॥३०॥

आणि म्यां त्रैलोक्य जिंकावें ॥ कशानेंही मरण न व्हावें ॥ शाप शस्त्रही आघर्वें ॥ न चालावें मजवरी ॥३१॥

सीतीं अथवा उष्णी परियेसी ॥ रात्रिभाग ना दिवसासी ॥ ग्रामांत अथवा वनासी ॥ न व्हावा मृत्यु ॥३२॥

ऐसें मज भक्ताकारणें ॥ देवा तुवां अभय देणें ॥ तंव शंभु तियेप्रति ह्मणे ॥ दीधलें सत्य ॥३३॥

परि उन्मत्त होवोनियां जन ॥ अपशब्द बोलती जाण ॥ लिंगयोनीचें करूनि गर्जन ॥ महशब्दें ॥३४॥

सीत‍उष्णाचें समानपण ॥ वसंतऋतुचें आगमन ॥ फाल्गुनशुद्धपंचमी वांचून ॥ निधन नव्हे तुजलागीं ॥३५॥

जंव जंव अपशब्द बोलती ॥ तंव तंव तुझ्या शक्ती क्षीणती ॥ मग तूं ग्रामद्वारीं अचेती ॥ पडशील जाण ॥३६॥

तुजवरी रचोनि दारुकें ॥ अग्नि लावितां विशेषें ॥ मग बहुत करिती कौतुकें ॥ सकळ जन ॥३७॥

तो देवस वेगळा करून ॥ तुं सर्वासि अवध्य जाण ॥ ऐसें बोलिला पंचवदन ॥ तियेप्रती ॥३८॥

ऐसें जाणोनि प्रसन्न पण ॥ मागुती राक्षसी बोले वचन ॥ कीं माझा संस्कार कवण ॥ करितील जगीं ॥३९॥

आणि मज भक्षावयसी ॥ देवा काय तरी देशी ॥ ऐसें ह्मणे ते राक्षसी ॥ शंकराप्रती ॥४०॥

मग ह्मणे त्रिपुरारी ॥ तुझें सुतक पंचरात्री ॥ त्यामाजी धूळी गोमयगजरीं ॥ क्रीडती उन्मत्त ॥४१॥

भलतेचि शब्द बोलती ॥ लिंगयोनीतें वर्णिती ॥ तेणें विघ्नांची होय शांती ॥ सर्वजनांचिया ॥४२॥

ऐसे उन्मत्तपणें पांच दिन ॥ तुज जाणविती जे जन ॥ आणि नारळ तुजलागुन ॥ समर्पिती जे ॥४३॥

जे नारळ समर्पिती ॥ त्यांच्या विघ्नां होय शांती ॥ ऐसें बोलोनि पशुपती ॥ जाहला अदृश्य ॥४४॥

तेंचि शिववरदान लाहोन ॥ मग हे खवळली राक्षशिण ॥ जनाहीं ठेवावें जें अन्न ॥ तें रात्रीं भक्षी समग्र ॥४५॥

ह्मणोनि गा भूपती जाण ॥ इयेसि असे वरदान ॥ आतां तिच्या वधासि कारण ॥ करीं राया ॥४६॥

सीतकाळ क्रमलियावरी ॥ मधुमांस आरंभते अवसरीं ॥ उष्णकाळाचे भीतरीं ॥ घात तिचा होईल ॥४७॥

जनीं होवोनियां उन्मत्त ॥ कांहीं रडत कांहीं हासत ॥ लिंगयोनीचें वर्णन करित ॥ महाशब्दा प्रबर्तावें ॥४८॥

जीं बाळकें असती लहान ॥ त्यांचे कंठीं भातुक्यांचे हार घालून ॥ तेणें तयांची पीडा निरसन ॥ होय सत्य ॥४९॥

ग्रामद्वारीं काष्ठे रचूनी ॥ महाशब्दातें आळवूनी ॥ लिंगयोनीचे वर्णनीं । मिळावें सकळीं ॥५०॥

हातीं घेवोनि गोफणा ॥ चहूंकडोनि यावें जाणा ॥ तेणें पडेल ते अंगना ॥ अचेतन पैं ॥५१॥

मग तयेवरी रचोनि दारुकें ॥ अग्नि लावावा विशेषें ॥ त्रिवार प्रदक्षिणोनि कौतुकें ॥ महाशब्द करावे ॥५२॥

मध्यें स्तंभ उभा करून ॥ भोंवतीं काष्ठें रचावीं आन ॥ मग लावावा कृशांन ॥ चौफेर पैं ॥५३॥

तें पडेल जिकडे खचोन ॥ ते दिशा असे द्वाड जाण ॥ ऐसें तियेसि हुत करून ॥ मग टाकावें नारिकेळ ॥५४॥
राया ते हुत जाहलियावरी ॥ मग बोलिजे हुताशनी निर्धारीं ॥ ह्मणती लोक व्यवहारीं ॥ होळी नाम ॥५५॥

ऐसी ते हुत करून ॥ सर्वजनीं खेळावें जाण ॥ प्रथमदिनी धूळ उडवून ॥ महाशब्द करावा ॥५६॥

पांचदिवस उन्मत्त होऊन ॥ रात्री करावें जागरण ॥ उन्मत्तपणे सर्व जन ॥ व्हावे देखा ॥५७॥

दुजे दिनीं गोमंय कालवून ॥ येरयेरांबरी घालून ॥ तिजे दिनीं मषीं कालवून ॥ काळी मुखें करावीं ॥५८॥

चवथे दिनीं हर्षयुक्तं ॥ ग्रामद्वारीं राखाडी अद्धुत ॥ सकाळीं मिळोनियां तेथ ॥ येरयेरांवरी उडवावी ॥५९॥

तेणें नासे सर्वविघ्न ॥ जन होतील निर्विघ्न ॥ मग पांचवे दिवशीं जाण ॥ विसर्जन करावें ॥६०॥

विसर्जन पांचवे दिनी ॥ तेथें धूप दीपें उदक शिंपूनी ॥ सकळ ग्रामजनीं मिळोनी ॥ मग स्नानें करावीं ॥६१॥

शुद्धवस्त्रे करोनि परिधान ॥ सवेंचि करावें हरिकीर्तन ॥ होळी उद्देशें ब्राह्मणभोजन ॥ करावें जनीं ॥६२॥

मग शिंपणें करावें ॥ येरयेरांवरी घालावें ॥ बाळकांवरीही शिंपावें ॥ हर्षे करूनी ॥६३॥

तेणें बाळकांसी संतोष ॥ आणि सर्वजनांसि हर्ष ॥ मग राया विघ्न निःशेष ॥ निरसे येणें ॥६४॥

युद्धें इयेचा नव्हे घात ॥ परि येणें मरेल निभ्रांत ॥ ऐसें वसिष्ठ सांगत ॥ रघुरायाप्रती ॥६५॥

ऐकतां राया जाहला हर्ष ॥ बहुत करीतसे कौतुक ॥ ह्मणे भला कथिला विवेक ॥ ऋषिवर्या हो ॥६६॥

तंव सर्वजनीं करोनि हाकारा ॥ दूत बाहती येरयेरां ॥ घेवोनियां काष्ठसंभारां ॥ ग्रामद्वारीं पातले ॥६७॥

ऐसी सामुग्री करूनी ॥ हातीं गोफणा घेउनी ॥ महाशब्दाचिये ध्वनी ॥ गर्जती जन ॥६८॥

सकळही येकसरें हांकां देती ॥ अपशब्द भलतेचि बोलती ॥ तंव राक्षसी अचेत जाहली पडती ॥ तेथें देखा ॥६९॥

तियेवरी काष्ठें रचूनी ॥ अग्नी लाविला ग्रामजनीं ॥ त्रिवार प्रदक्षिणा करूनी ॥ गजर शब्दाचा ॥७०॥

रावो आणिक सर्वजनीं ॥ महाशब्दें उच्चारूनी ॥ परमबीभत्स गाउनी ॥ पराभविली ते ॥७१॥

मग स्व‍इच्छा क्रीडती ॥ भंड‍उभंड जल्पती ॥ नानाप्रकारी ध्वनी करिती ॥ समस्त पैं ॥७२॥

शंका न धरिती कोणाची ॥ थट्टा करिती येरयेरांची ॥ ऐसें स्वेच्छा खेळतांची ॥ तये ठाया ॥७३॥

तेणें राक्षसीचा जाहला क्षयो ॥ विघ्नें निरसिलीं पहाहो ॥ तंव हांसतसे पांडवो ॥ ऐकोनियां हें ॥७४॥

मग ह्मणे श्रीकृष्ण ॥ पुढील कथा करीं गा श्रवण ॥ तओ दिलीपरायाचा नंदन ॥ आचरत काय ॥७५॥

ते मुत्यु पावली राक्षसी ॥ शांती जाहली सर्व निघ्नांसी ॥ मग रघुराजा आनंदेंसीं ॥ यज्ञकर्में आचरित ॥७६॥

श्रीकृष्ण ह्मणे गा भारता ॥ ऐसी होळिका जाहली तत्वतां ॥ हिसी पंचरात्री जागवितां ॥ विघ्ननाश होय ॥७७॥

पहिले दिनीं होळी करून ॥ दुजे दिनी गोमय कालवून ॥ शिंपावें येरयेरां लागुन ॥ तिजे दिनीं मषी ॥७८॥

ते मषी हस्ते मर्दून ॥ सकळीं करावें कृष्णवदन ॥ तेणें हरे पीडाविघ्न ॥ हे व्यासंवाणी ॥७९॥

मग चौथे दिवशी जाण ॥ ग्रामद्वारीं गर्ता करून ॥ येरयेरां द्यावें लोटून ॥ उन्मत्तपणें ॥८०॥

ऐशी राखाडी खेळतां ॥ विघ्नांसि होय शांतता ॥ कृष्ण ह्मणे सत्य पार्था ॥ येणें करूनी ॥८१॥

दिन जातां ऐसे चारी ॥ मग पांचवे दिनीं अवधारीं ॥ धूळी टाकोनि येरयेरांवरी ॥ विसर्जन करावें ॥८२॥

विसर्जूनियां हुताशनीसी ॥ दुग्ध घृत शिंपावें त्या भूमीसी ॥ आणि विसर्जूनि सूतकासी ॥ मंगलस्नान करावें ॥८३॥

तैलाभ्यंग करून ॥ धुतवस्त्राचें परिधान ॥ मग किजे ब्राह्मणपूजन ॥ यथाशक्ति दक्षिणा ॥८४॥

करूनि ऐशा आनंदाला ॥ सडे संमार्जन रंगमाळा ॥ मग चौक रेखिजे अबळा ॥ नानापरीचें ॥८५॥

तेथें मांडूनि चारी कलश ॥ भोंवतें सुतवूनियां त्यांस ॥ बैसविजे सुवासिनींस ॥ आणि बाळकां ॥८६॥

मग कालवूनि कैशरचंदन ॥ बालकांवरी शिंपावें जाण ॥ सुवासिनीसी सौभाग्यवायन ॥ समर्पावें पैं ॥८७॥

तेणें कल्याण बाळकांसी ॥ निर्विघ्न होय परियेसी ॥ ऐसें शीतळ शिमगियसी ॥ करावें राया ॥८८॥

चंदन शिंपिजे देवांवरी ॥ कीं चूतवृक्षाच्या मोहरीं ॥ मग ब्राह्मणां दीजे भूंरी ॥ यथाशक्ति ॥८९॥

आणि करावें ब्राह्मणभोजन ॥ घृतपक्कान्नें संपूर्ण ॥ ऐसा सर्वीं आनंद करून ॥ असिजे पैं ॥९०॥

कृष्ण ह्मणे गा पंडुसुता ॥ तुवां पुसिली हुताशनीकथा ॥ तरी हे तुज नृपनाथा ॥ सांगीतलीसे ॥९१॥

ऐसें सांगोनि धर्मासी ॥ देव गेला द्वारकेसी ॥ वसिष्ठ ह्मणती रघु रायासी ॥ कथानक ऐसें ॥९२॥

इकडे ह्मणती वैशंपायन ॥ परिसें गा भारता वचन ॥ तुवां पुसिलें होळीकथन ॥ तें सांगीतलेंसे ॥९३॥

हें भविष्योत्तरींचे कथन ॥ हरिपांडवसंवादन ॥ तें तुज केलें निरुपण ॥ व्यासवाणीं ॥९४॥

तंव पुसतसे राजया ॥ कीं पुनीत केलें ऋषिराया ॥ परि येक आठवलें माझिया ॥ मनासि पैं ॥९५॥

मुनीसि ह्मणे भारतराव ॥ हुताशनी होळकसुरापासाव ॥ हा मनींचा द्वैतभाव ॥ निरसा माझिये ॥९६॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया तंही सत्य वचन ॥ तरी आतां ऐकें कथन ॥ अन्वयेंसीं ॥९७॥

मदन जाळिला महारुद्रें ॥ परि बारा हौशांचें बळत्राण ॥ असो येक जव उडोन ॥ गेला उमेपाशीं ॥९८॥

ऐसा पूर्ण तेरा जव मदन ॥ तया बारा हौशांचें बळत्राण ॥ असो येक जव उडोन ॥ गेला उमेपाशीं ॥९९॥

तो जाणोनि रतिपती ॥ काठिकानखीं घाली पार्वती ॥ वरी शिंपोनियां अमृतीं ॥ रक्षिला होता ॥१००॥

ऐसें पार्वती करित ॥ तंव दिवस क्रमिले बहुत ॥ पुढें उदेला येक दैत्य ॥ होळकासुर नामें ॥१॥

तेणें जिंकोनि सकळांप्रती ॥ दैत्य चालिला निर्घाती ॥ तंव सरसावली पार्वती ॥ दैत्यावरी त्या ॥२॥

दैत्या जाणोनि महा अरी ॥ शस्त्रे हाणिला हृदयावरी ॥ तया दाविली यमपुरी ॥ क्षणामाजी ॥३॥

मग त्याचिये प्रेतावरी ॥ काष्ठें रचोनि संभारीं ॥ अग्नि लाविला चौफेरीं ॥ तयासि गा ॥४॥

मग बैसोनि दहनशेजां ॥ नग्न जाहली असे गिरिजा ॥ सवें बत्तीस सख्या वोजा ॥ नग्न होवोनी ॥५॥

योनिलिंगाचे गहन ॥ करिती अपशब्द उच्चरण ॥ तेणें बळकावला मदन ॥ बारामहिष ॥६॥

ऐसें पांच दिवस करून ॥ मग केलें विसर्जन ॥ हें दुजें जाहलें कथन ॥ फाल्गुनपौर्णिमेचें ॥७॥

तेथोनि जाहली हुतांशनी ॥ हे लिंगपुराणींची वाणी ॥ तरी दोन्ही सत्य मानीं ॥ जन्मेजया गा ॥८॥

रघुरायापासाव जाहलें ॥ हें भविष्योत्तरीं बोलिलें ॥ व्यासदेवें सांगीतलें ॥ तेंही सत्य ॥९॥

तो रघुराजा महादानी ॥ त्यापासाव व्रते जहालीं दोनी ॥ विजयादशमी कीं हुताशनी ॥ त्याचे प्रतापें ॥११०॥

तंव ह्मणे जन्मेजयो ॥ पुनोत कर्ता तूं ऋषिरावो ॥ परि येक आठवला संदेहो ॥ तो सांगिजे मज ॥११॥

तरी रघुरायापासूनी ॥ विजया दशमी जाहली कैसेनी ॥ हें आतां घालीं श्रावणीं ॥ मुनीश्वरा गा ॥१२॥

तये दशमीचिये दिवशी ॥ जाती सीमाउल्लंघनासी ॥ आणि पूजिती शमीसी ॥ कवणेम गुणें ॥१३॥

तेथील आणिती मृत्तिका ॥ हें सांगा जी ऋषीटिळका ॥ कोणे पुराणी विवेका ॥ कथिलें असे ॥१४॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ परिसें राया तें वचन ॥ आतां दसारियाचें कथन ॥ सांगो तुज ॥१५॥

तरी हे दसारियाची कथा ॥ पूर्वी धर्में पुसिली अनंता ॥ देवें सांगीतली पंडुसुता ॥ ते ऐकें आतां ॥१६॥

मागां सत्ययुगा माझारी ॥ रघुराजा महा धनुर्धारी ॥ त्याची अयोध्या नाम नगरी ॥ असे परम पवित्र ॥१७॥

राजा असे वेदपरायण ॥ महाशास्त्रज्ञ संपन्न ॥ चौदाविद्या निपुण जाण ॥ चौसष्टी कळा ॥१८॥

तंव देवदत्त नामें ब्राह्मण ॥ तो पैठणीं असे जाण ॥ त्यासी येक पुत्र सुलक्षण ॥ कौत्स नामें ॥१९॥

तो वयें प्रौढें होऊन ॥ मनीं विचारी आपण ॥ कीं वेदशास्त्राचें अभ्यसन ॥ करावें कौणाजवळी ॥१२०॥

ऐसें विचारी निजमानीं ॥ आर्त असे वेदपठणी ॥ हे रात्रंदिवस चिंतवणी ॥ करीत असे ॥२१॥

यापरी करीतसे चिंता ॥ तंव येक द्विज आला अवचिता ॥ तेणें सांगीतली पुण्यकथा ॥ वरतंतूची ॥२२॥

ह्मणे भडोजें नाम नगरी ॥ तेथें वरतंतू ऋषी सदाचारी ॥ वेदशास्त्रीं अतिकुसरी ॥ जाणे विद्या ॥२३॥

ऐकोनि कौत्स ब्रह्मचारी ॥ मनामाजी विचारी ॥ मग पित्यासि पुसोनि झडकरी ॥ निघता जाहला ॥२४॥

तो भडोजेसि आला ॥ वरतंतूचें घर पुसों लागला ॥ तंव येके विप्रें दाविला ॥ आवारु त्याचा ॥२५॥

मग गणेशा करूनि नमन ॥ वाडियांत आला जाण ॥ तंव वरतंतु ब्राह्मण ॥ बैसला असे ॥२६॥

कौत्सें घातलें दंडवत ॥ साष्टांगीं केला प्रणिपात ॥ त्राहें त्राहें ह्मणोनि हात ॥ जोडोनि उभा राहिला ॥२७॥

मग वरतंतु संबोखित ॥ सन्मानें बहु आश्वासित ॥ कोठोनि येणें जाहलें पुसत ॥ अपेक्षित काय असे ॥२८॥

तंव तो कौत्स बोलिला ॥ मनींचें सर्व सांगता जाहला ॥ ह्मणे स्वामी आर्त मजला ॥ विद्याम्यासीं ॥२९॥

ब्राह्मण संतोषें तथस्तु ह्मणत ॥ मग मुहूर्त काढोनियां तेथ ॥ वेद असे आरंभित ॥ तया कौत्सशिष्या ॥१३०॥

त्यासी वेद जाहले चारी ॥ शास्त्रेंही संपुर्ण अवधारीं ॥ चतुर्दशविद्यांचिया कुसरी ॥ जाहल्या पूर्ण ॥३१॥

कौत्स जाहला वेदोनारायण ॥ सकलविद्या परिपूर्ण ॥ मग गुरुसि नमस्कारून ॥ बोलता जाहला ॥३२॥

ह्मणे स्वामींचे कृपेंकरून ॥ विद्या जाहल्या मजसी पूर्ण ॥ तरी गुरुदक्षिणे लागून ॥ करावी आज्ञा ॥३३॥

ऐकोनि ह्मणे ब्राह्मण ॥ मज दक्षिणा पावली जाण ॥ तुज विद्या जाहली पूर्ण ॥ तेंची सुख आह्मांसी ॥३४॥

परि आग्रहें येरु बोलिला ॥ चरणीं नम्र लागला ॥ स्वामी आज्ञा किजे मजला ॥ गुरुदक्षिणेची ॥३५॥

दक्षिणेविणें नाहीं सुफळ ॥ हें शास्त्रे बोलती सकळ ॥ तरी होवोनिया कृपाळ ॥ आज्ञा देणें ॥३६॥

मग तो कंटाळोनि मुनिवर ॥ ह्मणे आग्रहें बोलसी उत्तर ॥ दक्षिणा देतोसि तरी परिकर ॥ माझें वचन ऐक गा ॥३७॥

चौदा विद्या जाहल्या संपूर्ण ॥ तरी चतुर्दश कोटी द्यावें धन ॥ तें येकाचि दात्यासि मागून ॥ आणावें पैं ॥३८॥

दहा याचूनि आणिसी ॥ तें मी नेघें परियेसीं ॥ जरी येकाचि पासूनि आणिसी ॥ तरीच घेणें ॥६९॥

ऐसें सागोनियां तयाला ॥ मग तेणें निरोप दिधला ॥ तंव तो गुरुप्रणामें निघाला ॥ कौत्स ब्राह्मण ॥१४०॥

भारता तो कौत्सऋषी ॥ हिंडों निघाला पृथ्वीसी ॥ मग मांडलीक राजयांसी ॥ याचीतसे धन ॥४१॥

ह्मणे म्या केला विद्याम्यास ॥ द्रव्य पाहिजे दक्षिणेस ॥ गुरुनें मागितलें चौदा कोटींस ॥ ह्मणोनि आलों ॥४२॥

तंव राजे ह्मणती तयासी ॥ इतुकें द्रव्य नाहीं आह्मपाशीं ॥ येक दोन कोटी देऊं तुजसी ॥ तें घेवोनि सांचविजे ॥४३॥

मग ह्मणे कौत्सऋषी ॥ ऐसी आज्ञा नाहीं मजसी ॥ येकाचेंचि आणावें पूजेसी ॥ ह्मणोनि चौदाकोटी याचिंतो ॥४४॥

ऐसें भूमंडळ हिंडतां पाहें ॥ तो विद्यापरिपूर्ण होय ॥ परि चिंताक्रांत होवोनि राहे ॥ बैसला तो ॥४५॥

येणेपरी चिंतातूर बैसला ॥ तंव रघुराजा ऐकिला ॥ जो सूर्यवंशीय असे भला ॥ अयोध्येसी ॥४६॥

ऐकोनि निघाला तो ऋषी ॥ उभा ठेला रघुरायापाशीं ॥ परि तेणें केलें यज्ञदानासी ॥ ब्राह्मणीं लुटिलें ॥४७॥

यज्ञांतीं सर्व धनसामुग्री ॥ लुटिली होती द्विजवरीं ॥ असो राजा सेवकां आज्ञा करी ॥ कीं ऋषिपूजा आणावी ॥४८॥

मग राणीनें तये वेळीं ॥ मृन्मयपात्रें आणिलीं ॥ परिळ गाडगीं घेवोनि आली ॥ राणीतेथ ॥४९॥

हातीं गाडगें परियेळ ॥ कर्णी ताडपत्र नेसली पातळ ॥ ऐसें विपरीत देखोनि विकळ ॥ जाहला ऋषी ॥१५०॥

रायें केलें चरणक्षाळण ॥ वरी राणी घाली जीवन ॥ मग विप्रचरण पुसोन ॥ आलिंगिले ह्रुदयीं ॥५१॥

उपरों केलें गंधाक्षतां ॥ धूपदीपादी समस्तां ॥ तांबूल देवोने हाय पुसता ॥ गमन ऋषीचें ॥५२॥

परि ऋषी होवोनि चकित ॥ ह्मणे राया पुरलें आर्त ॥ दात्याची सामुग्री देखोनि तेथ ॥ मागावें कायी ॥५३॥

घरीं पात्रें मृत्तिकेचीं जाण ॥ राणीवरी नाहीं वालमात्र सुवर्ण ॥ तरी काय मागों ये मागत्यालागुन ॥ ह्मणोनि मूकचि राहावें ॥५४॥

तंव ह्मणे चक्रवतीं ॥ चिंता न कीजे वेदमूर्ती ॥ जे अपेक्षा असेल चित्तीं ॥ ते सांगावी पैं ॥५५॥

आह्मी तुमचे सेवक ॥ आज्ञा करणें आवश्यक ॥ ईश्वरा उणें नाहीं देख ॥ तो पुरवील आर्त ॥५६॥

मग ह्मणे तो ब्राह्मण ॥ म्यां विद्या अभ्यासिल्या पूर्ण ॥ आतां गुरुदक्षिणा देणें ह्मणोन ॥ आलों येथें ॥५७॥

परि हें विचित्र देखोन ॥ हव्यपात्रीं तुमचें वर्तन ॥ नाहीं वालभरी सुवर्ण ॥ राणीवरी ॥५८॥

ऐशी देखोनि तपःसिद्धी ॥ स्थिर न राहे माझी बुद्धी ॥ तरी हा आपुलाचि विंधी ॥ सुजाणराया ॥५९॥

ऐकोनि ह्मणे भूपती ॥ दक्षिणा देणें आहे किती ॥ तंव सांगतसे वेदमूतीं ॥ चौदाकोटी ह्मणवोनियां ॥१६०॥

परम प्रतापी तो रघुरावो ॥ ह्मणे मनीं न धरावा संदेहो ॥ आशा पुरवील देवाधिदेवो ॥ तुमची स्वामी ॥६१॥

चारी दिवसां संधिमुहूर्ती ॥ कार्य होईल द्यावी मुदती ॥ ऐसें प्रार्थूनियां भूपती ॥ राहवी विप्रा ॥६२॥

मग बोलावोनि मंत्री सुमती ॥ त्यातें सांगतसे भूपती ॥ कीं ह्या द्विजा देणें संपत्ती ॥ कोटी चवदा ॥६३॥

तंवं बोलिला सुमंत ॥ कोठूनिही येणार नाहीं वित्त ॥ पृथ्वीचे जे राजे समस्त ॥ ते वोतले यागीं ॥६४॥

मात्र राहिलें स्वर्गभुवन ॥ इंद्रें नाहीं दीधलें धन ॥ ऐसें ऐकतां नूपनंदन ॥ काय बोले ॥६५॥

रावो ह्मणे अवधारीं ॥ स्वारी करावी इंद्रावरी ॥ ह्मणोनि सैन्या केली हाकारी ॥ शीघ्रवत ॥६६॥

आणि भूदेवां बोलावित ॥ ह्मणे मुहूर्त द्या जी त्वरीत ॥ जाणें असे आह्मां तेथ ॥ स्वर्गभुवनासी ॥६७॥

मनीं विचारिती ब्राह्मण ॥ तंव आश्विनशुद्ध दशमी जाण ॥ आणि नक्षत्र असे श्रवण ॥ तये दिवशीं ॥६८॥

उत्तम मूहूर्ता नेमिलें ॥ मकरीं चंद्र असें कळलें ॥ मग रायासि सांगीतलें ॥ तये मुहूर्ता ॥६९॥

कीं आजी चंद्र असे मकरीं ॥ तरी दक्षिणे करावी स्वारी ॥ सन्मुखचंद्रें अवधारीं ॥ गमनीं द्रव्यलाभ ॥१७०॥

ऐसें ब्राह्मणी सांगीतलें ॥ तें रायासि मानवलें ॥ मग प्रधानां ह्मणितलें ॥ कीं हाकारा सैन्य ॥७१॥

तंव्फ़ प्रधान काय करित ॥ सैन्य हाकार्‍या पाठवोनि दूत ॥ आणि वस्त्रें असे धाडित ॥ राजगृहासी ॥७२॥

रघुराजे केलें गृहदानासी ॥ इकडे दूत हाकारिती सैन्यासी ॥ तंव सैनिक सामुग्रीसी ॥ करिती त्वरें ॥७३॥

ऐसा थोर गजरु जाहला ॥ इतुक्यांत नारद तेथें पातला ॥ चरित्र पाहोनि स्वर्गीं गेला ॥ इंद्राजवळी ॥७४॥

मुनी सांगता होय इंद्रासी ॥ काय निश्चिंत बैसलासी ॥ तुजवरी चालोनि परियेसीं ॥ आला रघुरावो ॥७५॥

तो अयोध्येचा भूपती ॥ सूर्यवंशीचा असे नृपती ॥ येथें आलिया करोनि ख्यातीं ॥ घेईल स्वर्ग ॥७६॥

ऐसें नारद बोलिला ॥ मग इंद्रे गुरु बोलाविला ॥ तया सांगितलें वचनाला ॥ नारदाचे ॥७७॥

ऐकोनि बोलिला देवगुरु ॥ इंद्रा ऐक पां विचारु ॥ रघुजवळी आलासे द्विजवरु ॥ याचावया द्रव्य ॥७८॥

परि यरों केला विश्वजितयज्ञ ॥ दश दिशा जिंकोनि आणिलें सुवर्ण ॥ तें यज्ञांतीं निःशेष द्विजा जाण ॥ तेणें दीधलें ॥७९॥

ऐसी जाहली नवलपरी ॥ द्रव्य नाहीं तयाचे मंदिरीं ॥ ह्मणोनि तुह्मावरी स्वारी ॥ मांडिली तेणें ॥१८०॥

आतां तुह्मी येक करणे ॥ द्रव्य तयासी पाठविणें ॥ तरीच येथें होय नांदणें ॥ निश्विंच तुमचें ॥८१॥

मग इंद्रे काय केलें ॥ राजराजासि बोलाविलें ॥ सकळ वृत्त त्यासी कथिलें ॥ तये वेळीं ॥८२॥

ह्मणोनि तुह्मी अयोध्येवरी ॥ वर्षाव कीजे कनकधारीं ॥ संतत औट घटिकाभरी ॥ जाऊनियां ॥८३॥

ऐसें इंद्रे सांगीतलें ॥ तंव कुबेरें काय केलें ॥ हेमवर्षावासि आरंभिलें ॥ अयोध्येवरी ॥८४॥

तेथें वृक्ष असे शमीचा ॥ त्यावरी ढीग जाहला सुवर्णाचा ॥ तंव निशांतीं पूर्वदिशेचा ॥ उजळला भाग ॥८५॥

आणिक येके असे पुराणीं ॥ कीं आपुटा वृक्ष ह्मणवोनी ॥ हेंही भारता तुजलागोनी ॥ असावें विदित ॥८६॥

तो शेजीं तरुवर होता ॥ ह्मणोनि तेंही सत्य भारता ॥ आपुटाशमीची वार्ता ॥ नव्हे असत्य ॥८७॥

असो जंव रविबिंब प्रकाशलें ॥ तंव दूतीं द्रव्य देखिलें ॥ पर्वती ऐसे पसरिले ॥ ढीग तयाचे ॥८८॥

मग ते दूत धाविन्नले ॥ त्यांहीं रायासि निवेदिलें ॥ कीं द्रव्य असंभाव्य पसरिलें ॥ चहूंकडे जी ॥८९॥

ऐकोनि राया चोज जाहलें ॥ स्वयें येवोनि जंव पाहिलें ॥ तंव सुवर्णमय देखिलें ॥ आवार सकळ ॥१९०॥

मग तो बोलावूनि ब्राह्मण ॥ त्यासी ह्मणे नेई सुवर्ण ॥ येरु ह्मणे काय मजलागुन ॥ नेववे माथां ॥९१॥

मग रायें काय केलें ॥ हस्ति शकटीं द्रव्य भरिलें ॥ तें ब्राह्मणासंगें दीधलें ॥ तये वेळीं ॥९२॥

यावरी त्या वरतंतूनें ॥ चौदा कोटी घेतलें मोजून ॥ आणि उरलें तें फिरावून ॥ दीधलें राया ॥९३॥

कीं चौदाकोटींचा नेम असे ॥ अधीक मजसी घेणें नसे ॥ ह्मणे हें म्यां सांगीतलेंसे ॥ पूर्वींच कीं ॥९४॥

मज जें फिरावूनि आणिलें ॥ तें उरल्या द्रव्यांत टाकिलें ॥ तंव कौत्सऋषीसि बोलिलें ॥ रघुरायें पैं ॥९५॥

राव ह्मणे जी महाऋषी ॥ हें तुह्मी न्यावें गृहासी ॥ तुह्मां निमित्तचि परियेसीं ॥ आलें असे हें ॥९६॥

ऐसें ऐकोनि ह्मणे ब्राह्मण ॥ मज नाहीं द्रव्य कारण ॥ म्या गुरुदक्षिणे निमित्त जाण ॥ याचिलें राया ॥९७॥

आह्मां द्रव्याची नाहीं आरण ॥ आह्मीं करावे वेद पठण ॥ तुमचें भक्षूनियां अन्न ॥ करावें तप ॥९८॥

तंव रघुराजा ह्मणे त्यासी ॥ मी तरी नेघें या द्र्व्यासी ॥ असो ब्राह्मणही न स्पर्शें त्यासी ॥ ह्मणोनि तेथेचि राहिलें ॥९९॥

तेंचि हें शमीपाशीं सुवर्ण ॥ ह्मणोनि प्रतिवर्षी येऊन ॥ करोनियां शमीपूजन ॥ नेती जन तेथीचे ॥२००॥

शमींचें करोनि पुंजन ॥ मृत्तिका घ्यावी मुष्टी तीन ॥ मग ते गृहीं आणुन ॥ ठेवावी पैं ॥१॥

शमी आपुट्याची पत्रें ॥ तरवडपुष्पें मृत्तिका समग्रें ॥ तीं आणोनि परिकरें ॥ ठेवावीं गृहीं ॥२॥

तेणें द्र्व्य पावे समृद्धीसी ॥ ह्मणोनि आणावें तयासी ॥ ऐसें श्रीहरी पांडवासी ॥ सांगत असे ॥३॥

देव ह्मणे गा पंडुसुता ॥ त्वां पुसिली विजयादशमीकथा ॥ तरी हे तुज नृपनाथा ॥ सांगीतली म्या ॥४॥

ऐसें ह्मणोनि श्रीकृष्ण ॥ द्वारकेसि गेला आपण ॥ इकडे ह्मणे वैशंपायन ॥ जन्मेजयाप्रती ॥५॥

मुनि ह्मणे गा भारता ॥ तुवां पुसिली दशमीकथा ॥ तरी हे कृष्णमुखींची वार्ता ॥ सांगीतली तुज ॥६॥

ऐसेंचि करोनि अनंतव्रत ॥ कौडिण्य पावला परमार्थ ॥ तेंही आचरती समस्त ॥ अद्यापवरी ॥७॥

तैसेंचि दशमीचे परी ॥ द्र्व्य पडिलें शमीवरी ॥ ते मृत्तिका अद्यापि समग्री ॥ आणिजे पैं ॥८॥

हे रघुवंशीची कथा ॥ पंचमसर्गीं असे तत्वतां ॥ आणिक दुसरी अनुमता ॥ रामायणींचे ॥९॥

हें रामायणींचे कथन ॥ अनुबंध भविष्योत्तरपुराणा ॥ तें केलेंसे निरुपण ॥ तुजलागीं गा ॥२१०॥

हें ऐकतां दोष हरती ॥ पाविजे भुक्ती आणि मुक्ती ॥ आणि अपुत्रिकांसी संतती ॥ होय श्रवणें ॥११॥

असो याचिये पुढील कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ती ऐकावी संतश्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१२॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ हुताशनीविजयादशमीप्रकारू ॥ एकोनविंशतितमाऽध्यायीं कथियेला ॥२१३॥

॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP