कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय १५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनीसि ह्मणे राव भारत ॥ बरवा सांगीतला वृत्तांत ॥ भविष्य चुकवितां लंकानाथ ॥ परि न चुकेंचि तें ॥१॥

तंव रायासि ह्मणे ऋषी ॥ ऐसेंचि रावणें सठवीसी ॥ मरण पुसिलें तयेसी ॥ आपुलें पैं ॥२॥

मग ह्मणे राव भारत ॥ हे कैसी जाहली मात ॥ तो सांगावा वृत्तांत ॥ वैशंपायना ॥३॥

ऐकोनि ह्मणे ऋषीश्र्वर ॥ राया हा तूं ऐकें पुढार ॥ तो सांगेन सविस्तर ॥ जन्मेजया गा ॥४॥

रावणबंदीं देव समस्त ॥ तयांपासूनि क्रिया घेत ॥ तो सकळ असो वृत्तांत ॥ साठवी पाय रगडीतसे ॥५॥

मग कोणे येके दिवशीं ॥ सठवी रगडीत होती रावणासी ॥ तंव प्रसूति जाहली श्रवसीसी ॥ तिसी दिवस पांचवा ॥६॥

तेथें सठवी गेली झडकरी ॥ पहावयासी जन्मोतरी ॥ ह्मणोनि कोपला तयेवरी ॥ दशकंधर ॥७॥

येरी मागुती आली तेथून ॥ रावण कोपोनि बोले वचन ॥ ह्मणे गेलीहोतीस कोठें त्वरेन ॥ न पुसत हो ॥८॥

तंव ते बोले अबळा ॥ तुज वृत्तांत नाहीं कळला ॥ कीं स्त्रीजनीं प्रसविजे बाळा ॥ तें भविष्य मी जाणें ॥९॥

ऐसें ऐकोनि रावण ह्मणत ॥ माझें भविष्य सांग त्वरित ॥ तंव येरी त्यातें ह्मणत ॥ कीं हें नये पुसों ॥१०॥

रावण कोपला तयेवरी ॥ ह्मणे रंडे सांग झडकरी ॥ तुजसी दंड करीन नातरी ॥ बहुत जाण ॥११॥

मग ते ह्मणे रावणा ॥ कुंकुम आणीं येक्षण ॥ तंव दूत पाठवूनिया जाणा ॥ आणविलें तें ॥१२॥

तें मर्दिलें त्याचें निढळीं ॥ तंव तळहातीं अक्षरें उमटलीं ॥ येरीनें रावणासि दाखविलीं ॥ तेणें वाचिली तीं ॥१३॥

जंव तो वाची अक्षर ॥ तंव तेथे निघालें उत्तर ॥ कीं अयोध्येसी अज नरेंद्र ॥ करीतसे राज्य ॥१४॥

त्यासी पुत्र होईल दशरथ ॥ त्याचे उदरीं श्रीरघुनाथ ॥ तो करील समूळ घात ॥ या रावणाचा ॥१५॥

ऐसें लिखित वाचिलें ॥ मग येरें मनीं विचारिलें ॥ कीं फळ येणार तंव कापिलें ॥ तरीचि भलें गा ॥१६॥

ऐसें ह्मणोनि ऊठिला ॥ घावो निशाणी घातला ॥ सत्वरें हाकारा केला ॥ सर्व सैन्यासी ॥१७॥

नगरीं फिरतसे डांगोरां ॥ येका येक ह्मणती त्वरा करा ॥ दूतीं केला ऐसा हाकारा ॥ तये वेळीं ॥१८॥

रावण निघाला बाहेरी ॥ सवें अठरा अक्षौहिणी वाजंत्री ॥ सैन्य चालिलेंसे गजरीं ॥ स्वार सत्राणें ॥१९॥

ऐसा परिवारे चालिला ॥ रावण अयोध्येसि पातला ॥ नगरासमीप भार थोकला ॥ मग घाडिले भाट ॥२०॥

ह्मणे जावोनि नगरांत ॥ तुह्मी अजासि जाणवा मात ॥ कीं युद्धा आला लंकानाथ ॥ तरी त्वरेने येई कां ॥२१॥

मग ते बंदीजन जाऊन ॥ जोहारिला नृपनंदन ॥ तया सांगती निरोपवचन ॥ रावणाचें ॥२२॥

ह्मणती अगा राया परियेसीं ॥ रावण पातला युद्धासी ॥ तरी सिद्ध होवोनि रणभूमीसी ॥ आलें पाहिजे ॥२३॥

ऐसें त्यांहीं बोलतां वचन ॥ राव उठिला भद्रींहून ॥ चातुरंगसैन्या हाकारून ॥ चालिला अज ॥२४॥

दळ निघालें बाहेरी ॥ अपरिमित चालिलें गजरीं ॥ तंव तें देखोनि मनीं विचरी ॥ रावण तो ॥२५॥

ह्मणे हें सैन्य अगणित ॥ आणि माझेंही बहुत ॥ परस्परां युद्ध होतां येथ ॥ पळेल राजा ॥२६॥

मज दळेसीं नाहीं काज ॥ येकटाचि पाहिजे अज ॥ तरी येकांग करोनि झुंज ॥ ह्मणोनियां निवडिला ॥२७॥

सर्व सैन्य मागें ठेवून ॥ वेगळा जाहला रावण ॥ ईंषें उभा राहिला जाण ॥ रणभूमीसी ॥२८॥

जंव अज आला बाहेरी ॥ तंव रणीं येकला दशशिरी ॥ ह्मणोनि आपुलेंही दळ वारी ॥ अजराज तो ॥२९॥

तोही येकला निवडिला ॥ रणीं उभा ठाकला ॥ रथें रथ तगटिला ॥ बोले रावणासी ॥३०॥

ह्मणे ऐक रे दशशिरा ॥ तुज उठिला अयोध्येचा गारा ॥ तंव रावण बोले प्रत्योत्तरा ॥ अजाप्रती ॥३१॥

कीं माझिये भुजां उठली खाज ॥ त्रिभुवनीं कोठें नाहीं झुंज ॥ परि तुजजवळी ऐकिलें काज ॥ ह्मणोनि आलो ॥३२॥

ऐकतां बोलिला भूपती ॥ आह्मीं युद्ध करुं निश्र्वती ॥ परि साक्ष पाहिजे याजप्रती ॥ हारी जैत सांगावया ॥३३॥

मग बोलिला रावण ॥ येथें साक्ष आहे सैन्य ॥ तंव ह्मणे नॄपनंदन ॥ हे साक्षी कायसे ॥३४॥

हे आपुलाले पक्ष बोलती ॥ निभ्रांत साक्षी न देती ॥ येथें परावे पाहिजेती ॥ साक्षीकारणें ॥३५॥

रावण ह्मणे तरी कोण ॥ साक्षीस मिळेल अन्य जन ॥ तंव अज ह्मणे ऐक वचन ॥ स्वर्गासि जाऊं ॥३६॥

तेथें दोघे जाऊं आपण ॥ सकळदेवां साक्ष ठेवून ॥ मग करूं युद्धकंदन ॥ उभयवर्ग ॥३७॥

ऐसें बोलतां अज राजस ॥ येरु ह्मणे आह्मी राक्षस ॥ आह्मां मार्ग कैसा स्वर्गास ॥ जावसा पैं ॥३८॥

तंव बोले अयोध्यापती ॥ रथाग्वाली उत्तरें शीघ्रगती ॥ मग त्याचा बाहू धरूनि भूपती ॥ निघता जाहला ॥३९॥

ऐसे गेले देवसभेसी ॥ तंव इंद्र बैसला सकळ देवासीं ॥ तेहतीसकोटी सैन्यंसीं ॥ बृहस्पतीसहित ॥४०॥

दृष्टीं देखतां अयोध्याधीश ॥ इंद्रें सन्मानिला बहुवस ॥ परम जाहला संतोष ॥ देवेंद्रासी ॥४१॥

तंव गुरु बोले वचन ॥ येथें कां जाहलें आगमन ॥ मग बोले नृपनंदन ॥ कीं हें पुसावें रावणासी ॥४२॥

रावणा पुसे देवगुरु ॥ कीं यावयाचा काय आदरु ॥ मग ह्मणे लंकेश्र्वरू ॥ ऐका वचन ॥४३॥

माझें भविष्य वर्तविलें ॥ हें नारदें मजसी कथिलें ॥ कीं रावणाचें मरण नेमिलें ॥ या अजाचे पौत्राहातीं ॥४४॥

आतां याचा पुत्र दशरथ ॥ त्यासी होईल रघुनाथ ॥ तो वधील लंकानाथ ॥ ऐसा नेम असे पैं ॥४५॥

तरी हा मी अज मारीन ॥ मग दशरथ होईल कोठून ॥ आणि तो दशरथनंदन ॥ रघुनाथ कैंचा मग ॥४६॥

ऐकोनि गुरु ह्मणे तयासी ॥ जरी तूं युद्धा आलासी ॥ तरी आमुचा शब्द परियेसीं ॥ लंकेश्र्वरा गा ॥४७॥

आणिक ह्मणे बॄहस्पती ॥ न पहावी भविप्यगती ॥ तंव तो ह्मणे करोनि ख्याती ॥ मारीन अज ॥४८॥

गुरु ह्मणे पैल दारवंठा अडकिला ॥ तो जरी तुवां उघडा केला ॥ तरी हा अजराजचि मारिला ॥ तुवां सत्य ॥४९॥

ऐकतां रावण उठिला तवकें ॥ दारवंठा हाणिला थंडकें ॥ तंव हाक वाजली महघोषें ॥ अकस्मात ॥५०॥

ते हाकसरिसा दचकला ॥ येवोनियां सभेसि पडिला ॥ हात पाय जाहले गोळा ॥ मुखा खरशी आलीसे ॥५१॥

मग वांढोळा उमजला ॥ सायेवोनियां सावध होवोनि बैसला ॥ भोंवतें पाहों लागला ॥ भयभीतपणें ॥५२॥

देव ह्मणती काय जाहलें ॥ रावणें वृत्त सांगितलें ॥ ह्मणे जंव म्या कवाड उघडिलें ॥ तंव हाक जाहली ॥५३॥

तये हाकेसरिसा दचकलों ॥ येवोनियां सभेसि पडिलों ॥ थोर दैवें हो वांचलों ॥ प्राण गेला होताची ॥५४॥

तंव ह्मणे बृहस्पती ॥ मागुती जाई द्वाराप्रती ॥ आणि ह्मणावें कीं निगुतीं ॥ कोणीं हाक दीधली ॥५५॥

परि रावण ह्मणे तयासी ॥ मी न जाई गा द्वारापाशीं ॥ मागुती पुसावया तयासी ॥ कदाकाळीं ॥५६॥

रावण परम असे भ्याला ॥ परि तो भीतभीत पुनः गेला ॥ मग तया पुसो लागला ॥ गवाक्षासी ॥५७॥

ह्मणे कोणें दीधली हाक ॥ येथें कोण असे पुरुष ॥ तंव दारवंठा ह्मणे ऐक ॥ वचन माझें ॥५८॥

तो ह्मणे मी भस्मासुर जाण ॥ म्या उमा अभिलाषिली नेत्रेकरूनि ॥ ह्माणोनि नेत्रांवरी दोन ॥ आरा येथें ठेविल्या ॥५९॥

मघां येथें कोणी आला ॥ तेणें पायें दारवंठा हाणिला ॥ माझा नेत्र दुखविला ॥ ह्मणोनि हाक दीधली ॥६०॥

ऐकोनि ह्मणे रावण ॥ अगा तुज सुटका कैसेन ॥ मग तो सांगे आपण ॥ रावणाप्रती ॥६१॥

ह्मणे गा लंकेचा रावण ॥ तो सीता नेईल अभिलापुन ॥ तयासि मारील रघुनंदन ॥ तैं रावण येईल येथें ॥६२॥

मग मी या आरा काढून ॥ त्याचे नेत्रीं ठेवीन जाण ॥ तेव्हां मी येथून सुटेन ॥ जाण सत्य ॥६३॥

ऐसें ऐकोनि दशशिरी ॥ थोर मनीं विस्मय करी ॥ ह्मणे हे पूर्वीच जन्मोत्री ॥ वर्तली असे ॥६४॥

मज कथिलें नारदऋषीं ॥ सठवीनें दाविलें दृष्टीसी ॥ ऐसें भविष्य असे यासी ॥ काहींच न चले ॥६५॥

हें तंव न टळे होणार ॥ व्यर्थ भ्रम कीजे अपार ॥ सर्वथा हा अज नृपवर ॥ न मरे माझेनी ॥६६॥

नादबिंदूसि जाहली भेटी ॥ तैसेंचि कर्म लिहिलें ललाटीं ॥ ऐशीच असे परिपाठी ॥ सर्वजनाची ॥६७॥

भविष्य न चुके ब्रह्मादिकां ॥ तेथें माझा कोण लेखा ॥ आणिक विचारिता विवेक ॥ दुरी बहुत ॥६८॥

या अजाचिये उदरीं ॥ दशरथ जन्मेल क्षेत्री ॥ तो नव्याण्णव सहस्त्र वरुषेवरीं ॥ भोगील अपुत्रिकपण ॥६९॥

तरी नव्याण्णव सहस्त्र वरूषां ॥ तो श्रीराम जन्मेल देखा ॥ मग तो येईल येकयेका ॥ युद्धालागीं ॥७०॥

ऐसें मनीं विचारून ॥ तेथूनि निघाला रावण ॥ मग देवसभेसि येऊन ॥ बोलता जाहला ॥७१॥

ह्मणे मी जातों लंकेसी ॥ माझी पुरली असोशीं ॥ ऐसें ह्मणोनि स्वनगरासी ॥ गेला सत्वरा ॥७२॥

रावण गेला आपुले नगरा ॥ तया उपजला भयदरारा ॥ तें सकळही सुरवरां ॥ कळलें मानसीं ॥७३॥

इकडे देवांसि आज्ञा मागोन ॥ निघता जाहला नृपनंदन ॥ तो अयोध्येसी येऊन ॥ सुखें राज्य करितसे ॥७४॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया ऐकें सारव चन ॥ रावण भविष्य चुकविला जाण ॥ न चुकलेंची ॥७५॥

वाल्मीकांचे भविष्य जाण ॥ कीं विष्णुअवतार रघुनदन ॥ तैसाचि रुद्रावतार गहन ॥ हनुमंत तो ॥७६॥

यांहीं लंकेसि येऊन ॥ सर्व राक्षस टाकिले वधून ॥ मारिले रावण कुंभकर्ण ॥ हें वचन वाल्मिकांचे ॥७७॥

वाल्मिकानें भाष्य केलें ॥ पुढें साठी सहस्त्रां राम जन्मले ॥ परि तैसेंचि वर्तन जाहलें ॥ रामचरित्र ॥७८॥

ऐसे ऋषी महामुनी ॥ ज्याहीं अनागत केली करणी ॥ तैशीच वर्तली पुराणीं ॥ रामकथा हे ॥७९॥

आतां असो हें कथन ॥ हे भविष्योत्तरींचे ज्ञान ॥ रामायणीं वाल्मिकवचन ॥ असे राया ॥८०॥

मुनि ह्मणे राया भारता ॥ तुवां पुसिली रामकथा ॥ तरी ते भविष्योत्तरींच्या अनुमता ॥ कथिली तुज ॥८१॥

हे रामायणींचें कथन ॥ तुज केलें गा निरुपण ॥ कल्पतरू महा रत्‍न ॥ पुण्यराशीं ॥८२॥

तुझिये प्रश्नाचे आदरें ॥ कथा सांगितलीं सविस्तरें ॥ जे ऐकतां पापें महाथोरें ॥ भस्म होती ॥८३॥

महा पातकां होय क्षालन ॥ अपुत्रिकांसी पुत्रसंतान ॥ पुढें ऐका चित्त देऊन ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥८४॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ रावणभविष्यकथनप्रकारू ॥ पंचदशाऽध्यायीं कथियेला ॥८५॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके पंचदशोऽध्याय: समाप्त: ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP