॥ श्रीगणेशाय नमः ॥
वैशंपायन ह्मणती भारता ॥ तुवां पुसिली जे कथा ॥ ते महाप्रळयींची वार्ता ॥ सांगों तुज ॥१॥
यजुर्वेदीं असे बोलिलें ॥ प्रथमपाढां नियम केले ॥ ते तुज सांगो गा वहिले ॥ जन्मेजया ॥२॥
तया निर्गुणापासाव भलें ॥ सगुण रूप गा जाहलें ॥ तें पंचतत्वीं आथीलें विराट पैं ॥३॥
सकळ सारांचें आदिसर ॥ सर्वबीजांचे बिढार ॥ त्रिगुणात्मक मनोहर ॥ ऐसें तें रूप ॥४॥
असो ऐसी उद्भवली मूर्ती ॥ काळ क्रमिला नेणों किती ॥ मग तेथोनि जाहली उप्तत्ती ॥ अंडे तीन ॥५॥
तीं तिन्ही अंडें फोडिलीं ॥ तंव आंतूनि द्दंद्वें निघालीं ॥ जीं मूर्तिमंत वहिलीं ॥ बाळवयसा ॥६॥
राया ह्मणसी तीं कवण ॥ तरी तुज करूं गा श्रावण ॥ पहिलें अंड फोडिलें त्यांतून ॥ निघालीं दोनी अपत्यें ॥७॥
येक त्रिनेज दुजी सावित्री ॥ दुजे फोडिलें अवधारीं ॥ त्यातूनि निघालीं साजिरीं ॥ पार्वती आणि विष्णु ॥८॥
मग तिजें अंड फिलिडें ॥ तेथूनि द्दंद्द निघालें वहिलें ॥ ब्रह्मा आणि लक्षुमी बाळें ॥ दोनी राया ॥९॥
मग व्यत्यस्थें लाविलें लग्न ॥ जोडा केला निर्माण ॥ येक तामस येक सात्विक ह्मणोन ॥ मेळविलीं दोघें ॥१०॥
तीं कोण गा ह्मणविशी ॥ तरी विस्तरें परियेसीं ॥ पार्वती सात्विक रुद्र तामसी ॥ केलीं येक ॥११॥
आतां सात्विक आणि राजस ॥ लक्ष्मी आणि विष्णूस ॥ येकपक्ष केला त्यांस ॥ ते वेळीं गा ॥१२॥
मग राजस आणि तामस ॥ येक केलीं परियेस ॥ सावित्री आणि ब्रह्मयास ॥ तये वेळीं ॥१३॥
तरी जाणिजे ऐसें कथन ॥ वेदीं निरूपिलें जाण ॥ आतां आणिक निरूपण ॥ सांगू तुज ॥१४॥
तया विराटापासुन ॥ मूर्ती जालिया निर्माण ॥ तें तूं ऐकें गा वचन ॥ येकचित्तें ॥१५॥
प्रथम भवईपासूनि रुद्र ॥ तो पंचमुख त्रिनेत्र ॥ सवेंचि चालिला शीघ्र ॥ तेथो नियां ॥१६॥
मग काळांतीं कितियेका ॥ श्रद्धा उपजली आदिपुरुषा ॥ करी उप्तत्ती विवेका ॥ लागूनियां ॥१७॥
ऐसें जों घरीं निजमनीं ॥ तंव दीप्ती निघाली नाभिआंतुनी ॥ मग तया तेजापासुनी ॥ जाहली ज्योती ॥१८॥
तये ज्योतीस आला फेण ॥ बुहुदा जाहलें त्यापासुन ॥ आणि तो त्याचा सहजगुण ॥ अंड येक ॥१९॥
येथें भिन्न असे अनुमत ॥ कीं जें अंड तें कमळ सत्य ॥ तें अष्टदळ अष्टदिशाकृत ॥ उदेलें पैं ॥२०॥
मग तें पावलें विकासा ॥ पांकळिया अष्टदिशां ॥ मध्यें जन्म राजहंसा ॥ ब्रह्मयासी ॥२१॥
हें विष्णुपुराणींचें मत ॥ परि आणिक येक असे विपरीत ॥ तेंही होय गा राया सत्य ॥ प्रळयकाळीं ॥२२॥
प्रथम आदीचा विस्तारु ॥ नंतरें अनादिविचरु ॥ अनादीचा रावो ओंकारु ॥ जाहला पैं तो ॥२३॥
ओंकाराचा जाण वेद ॥ वेदाचा हव्य प्रसिद्ध ॥ तयापासोनि कथा विविध ॥ जाहले धर्म ॥२४॥
धर्मापासोनि मेघ जाहले ॥ मेघांउदरीं उदक जन्मलें ॥ तें ब्रह्मांडीं वाजिन्नलें ॥ येकविसांचिये ॥२५॥
तंव तेथें जळशयन ॥ केलें असे आदिविष्णूनें ॥ यापरी बोली निघोन ॥ लोटलीं वर्षें अनेक ॥२६॥
आणि क्षीरसागरीं पहुडतां ॥ चौदा युगें गेलीं मोजितां ॥ तीं कोणकोण गा भारता ॥ आतां ऐक ॥२७॥
अर्ध चंद्र आणि बंद ॥ चौथें जाणिजे बुहुद ॥ आणि पांचवें प्रसिद्ध ॥ मनुयुग पैं ॥२८॥
पाठीं सहावें मन्वंतर ॥ मेरु मध्य आणि धूम्र ॥ नववें असे धूमाकार ॥ युग जाणा ॥२९॥
मग तर आणि नरकाक्ष ॥ अतीत आणि असंक्ष ॥ वर्तमान असे प्रत्यक्ष ॥ चौदावें पैं ॥३०॥
ऐशीं युगें चौदांवरी ॥ सुषुप्तीं असे श्रीहरी ॥ तैं पांचतत्त्वें उदरीं ॥ सांठवूनियां ॥३१॥
तेथें सूर्य ना चंद्रमंडळ ॥ ध्रुव नक्षत्रादि सकळ ॥ हे उदरीं परि बाह्म केवळ ॥ असे विष्णू ॥३२॥
मग नाभिकमळाआंतुनी ॥ ब्रह्मा उपजला पंचवदनी ॥ त्याचे चहूं मुखां पासुनी ॥ चारी वेद ॥३३॥
ऐसा तो वेदविद ॥ पांचवा गायन उपवेद ॥ स्वरमूर्च्छना ग्रामभेद ॥ तें पांचवें मुख ॥३४॥
हे काशीखंडीं ब्रह्मयाची उप्तत्ती ॥ परि अनारिसें भागवतीं ॥ मार्कंडेयाचे अनुमती ॥ ते सांगों सर्व ॥३५॥
प्रथम ब्रह्मीं माया जाण ॥ जेवीं पर्वतीं उदेलें तृण ॥ तये मायेसि जाहलें गगन ॥ ओंकाररूप ॥३६॥
मग त्या आकाशाचे पोटीं ॥ जन्म वायूसी तेज त्यापाठीं ॥ तेजीं उदक आणि सृष्टी ॥ जीवनीं पैं ॥३७॥
ऐसीं पंचतत्त्वें जाहलीं ॥ तीं येकयेका प्रसवलीं ॥ हे सकळ स्थिति योजिली ॥ आदिपुरुषें ॥३८॥
तंव उदकें व्यापिलें भुमंडळ ॥ तैं नाभीं प्रसवलें कमळ ॥ अष्टदिशांचें अष्टदळ ॥ उदेलें येक ॥३९॥
माजीं ब्रह्मा उपजला महामुनी ॥ दृष्टीं पाहें तंव न देखे कोणी ॥ तंव धांवत आले दोनी ॥ मधुकैटभ ते ॥४०॥
या मधुकैटभांची अशेषवार्ता ॥ पंचमस्तबकीं गा भारता ॥ ते ऐकिली असेल श्रोतां ॥ सहज पूर्वीं ॥४१॥
आतां सांगो सृष्टिकथन ॥ कीं ब्रह्मा करीतसे चिंतन ॥ ह्मणे कैसें करूं स्तवन ॥ सृष्टीचें या ॥४२॥
ऐशीं जंव करी चिंतवणी ॥ तंव येक आठवलें मनीं ॥ कीं आतां करूं विनवणी ॥ आदिपुरुषाची ॥४३॥
मग प्रेमें मांडिली स्तुती ॥ जयजयाजी कमळापती ॥ त्रासव्यथेची निर्गती ॥ केली तुवां ॥४४॥
जयजयाजी विश्वंभरा ॥ परमपूज्या परात्मरा ॥ लीलालाघवी चराचरा ॥ प्रसवलासी ॥४५॥
तूं सच्चिदानंदघन ॥ बाह्माभ्यंतरीं परिपूर्ण ॥ तूंअचेतासी चेतन ॥ ज्ञानरूपा ॥४६॥
तूं कृपाळु करुणाकरा ॥ भक्तवत्सला वज्रपंजरा ॥ त्रिजगतींच्या अंकुरा ॥ गुणरहिता तूं ॥४७॥
तूं अजर अमर ओंकारबीज ॥ सर्वव्यापक तूं सहज ॥ कैवल्यपदाचें भोज ॥ तूंचि येक ॥४८॥
ऐसी जंव स्तुति करी ॥ तंव वाचा जाहली अंबरी ॥ ते बोलिली अंतरी ॥ तपतीनेवळा ॥४९॥
तें दिव्य वचन ऐ कोनी ॥ मग भोंवतें अवलोकुनी ॥ ह्मणे होतील कीं हे दोनी ॥ दैत्य ते गा ॥५०॥
तंवही दृष्टी न देखें कोणी ॥ ह्मणोनि थोर चिंतवला मनीं ॥ ह्मणे तप तें कवणेगुणीं ॥ वोळखावें ॥५१॥
मागुती शब्द पडिला कानीं ॥ तूं भय नघरीं गा मनीं ॥ मग तपाची सकल उभवणी ॥ कथिली तया ॥५२॥
त्याचिये वरदानवचनें ॥ तप मांडिलें विरिंचीनें ॥ तंव बोलिलें नारायणें ॥ तयाप्रती ॥५३॥
असे पुत्रा परियेसीं ॥ तपें निर्मिलें जळासी ॥ आतां उत्पत्तिविचारासी ॥ होई सावध ॥५४॥
ब्रह्मा विचारी निजमनीं ॥ कीं रचना करूं कैसेनी ॥ इतुक्यांत देखिले नयनीं ॥ चौघे पुत्र ॥५५॥
ते मानसापासाव जाहले ॥ ब्रह्मया सन्मुख उभे ठेले ॥ देखतां मन संतोषलें ॥ विरिंचीचें ॥५६॥
ते पुत्र चौघेजण ॥ सनक आणि सनंदन ॥ सनातन धाकुटा नंदन ॥ सनत्कुमार ॥५७॥
ऐसे देखोनि चौघे कुमर ॥ तयां विरिंची वोले उत्तर ॥ कीं तुह्मी सर्व चराचर ॥ करा उप्तती ॥५८॥
तंव ते ह्मणती जी ताता ॥ हें न घडे वो सर्वथा ॥ आह्मा ऊर्ध्वदेहिकपंथा ॥ सांगा मार्ग ॥५९॥
यया सृष्टीची रचना ॥ ते मायामय असे जाणा ॥ जेवीं वंगसंगे कांचना ॥ पडे फुटी ॥६०॥
स्थिति प्ररळ मध्यवास ॥ उत्पत्तिस्तव वृद्धिअंश ॥ तेणे भोगणें आसमास ॥ सांसारिक ॥६१॥
मग त्या सांसारिक व्यथे ॥ जाचिती गा पंचभुतें ॥ ती घालिती कर्मपंथें ॥ नेवोनियां ॥६१॥
भोगविती कीं रौरवातें ॥ ह्मणोनि स्मरिजे निरंजनातें ॥ तरी आतंचि कां तयातें ॥ विसरावें आह्मीं ॥६३॥
ऐसें नानापरी विनविती ॥ पुनःपुनः चरण वंदिती ॥ मग ते गेले ऊर्ध्वगती ॥ चौघेजण ॥६४॥
तंव ब्रह्मा तेथें एकला ॥ नावेक चिंताकांत जाहला ॥ तेणें करूनि खेद पावला ॥ शरीरासी ॥६५॥
मागुती ध्यानस्थ होय मनीं ॥ तंव पुत्र बोलती वचनीं ॥ जंव पाहे नेत्र उघडोनी ॥ तंव आठपुत्र ॥६६॥
कश्यप अत्रि वसिष्ठ प्रजापती ॥ नारद भृगु पुलस्ती ॥ आठवा दक्षभूपती ॥ तो अंगुष्ठजात ॥६७॥
ते देखिले स्त्रियांसमवेत ॥ आठही असती तेथ ॥ परि कश्यप आणि नारद सत्य ॥ पत्नीविणें ॥६८॥
मग दक्षाचिये पोटीं ॥ कन्या जाहलिया साठी ॥ इतुकें देखिलें दृष्टी ॥ विरिंचीनें ॥६९॥
देखतां संतोषलें मन ॥ जेवीं मृत्यु मागुती येत प्राण ॥ कीं निर्धनासि धन पूर्ण ॥ सांपडे जैसें ॥७०॥
नातरी दुर्भिक्षाचे अंतीं ॥ रंका पीक पावे शेतीं ॥ किंवा प्राणी अधोगती ॥ पासूनि वांचे ॥७१॥
ऐसा हर्षला चतुरानन ॥ कुमर कन्या देखोन ॥ परि सवेंचि चिंतावलें मन ॥ ब्रह्मयाचें ॥७२॥
मग विचार करी आपण ॥ ह्मणे हे उपजले सकळ जन ॥ आतां यांचें प्रतिपाळण ॥ होय कैसें ॥७३॥
मी येकला असतां ॥ सांभाळ करूं कैसा समस्तां ॥ मागुती जाहला विनविता ॥ आदिपुरुषासी ॥७४॥
जयजयाजी महद्रुता ॥ स्थावर जंगमादि अच्युता ॥ गुणातीता उभयतां ॥ तूंचि देवा ॥७५॥
जयजयाजी जगद्बासा ॥ सर्वव्यापका ब्रह्मांडाधीशा ॥ जय जय ओंकाररसा ॥ अनंता तूं ॥७६॥
जयजयहो कैवल्यदानी ॥ मंगळधामा चिंतामणी ॥ जयजयाजी शारंगपाणी ॥ श्रीनृसिंहा ॥७७॥
जयजयाजी अनंता ॥ परमपुज्या परमार्था ॥ रूपविलासा पूर्ण भरिता ॥ तूंचि देवा ॥७८॥
जयजया तूं अक्षरा अव्यक्ता अक्षयांकुरा ॥ जयजयाजी सदाचारा ॥ मुकुंदा तूं ॥७९॥
तूं शब्द ना स्पर्श ॥ तूं सुक्ष्म ना आरुंष ॥ तूं गंध ना रूपविलास ॥ तूंचि येक ॥८०॥
तूं सर्वसारांचे सार ॥ सर्वश्रुतींचें बीजाक्षर ॥ आदिअंतीचा निर्धार ॥ तूंचि येक ॥८१॥
जैं मागें सांकडें पडलें ॥ तेव्हां कर्ण्जात ते वधिले ॥ हें चरित्र असे जाहलें ॥ येवढा पें गा ॥८२॥
तुवां राहोनि अंतरीं ॥ मज प्रबोधिलें उत्तरीं ॥ कीं उप्तत्ति विस्तार करीं ॥ ह्मणवूनियां ॥८३॥
तो तूं शब्द पैं अढळ ॥ तेणें जाहलें हें सकळ ॥ आतां तुजवैणे प्रतिपाळ ॥ करील कवण ॥८४॥
ऐसी चतुर्मुखें स्तुति करितां ॥ श्रुत जाहलें आदिनाथा ॥ मग विचार विवेकता ॥ करिता होय ॥८५॥
देवें पुढील जाणोनि उप्तत्ती ॥ मनी विचारिली युक्ती ॥ तंव सत्वगुणा पासोनि मूतीं ॥ उदेली येक ॥८६॥
जैसी दीपापासोनि ज्योती ॥ कीं कांचनीं निपजे दीप्ती ॥ तैसी ते उपजली मूर्ती ॥ तये वेळीं ॥८७॥
तोही लागला स्तुति करुं ॥ देवें तया दिधला वरू ॥ कीं जेथें असे चतुर्वक्रू ॥ तेथें जावें ॥८८॥
मग तो येकविसावे स्वर्गीं ॥ विष्णुनामें पातला वेगीं ॥ तेव्हां परस्परें दोहीं वर्गीं ॥ जाहली भेटी ॥८९॥
विष्णु ह्मणे ब्रह्मयातें ॥ तूं करीं गा उप्तत्तीतें ॥ आणि मी करीन समग्रातें ॥ प्रतिपाळण ॥९०॥
वरिंची संतोषला मनीं ॥ ह्मणे म्यां चिंतिलें अंतःकरणीं ॥ तें मनीचें कार्य यत्नीं ॥ पुरविलें देवें ॥९१॥
मग दक्षाचिया कन्या तेरा ॥ त्या दीधल्या कश्यपऋषीश्र्वरा ॥ त्या अनेकांपरी पत्नी समग्रा ॥ प्रसवल्या पैं ॥९२॥
ते प्रसवली गोमटी ॥ आदितीचे देव तेतोसकोटी ॥ आणि जाहले दितिपोटीं ॥ सकळ दैत्य ॥९३॥
जयज्या तूं अक्षरा ॥ रावे जाहला तियेपासुनी ॥ तैशीच प्रसवली ब्राह्मणी ॥ चंद्रपुत्रा ॥९४॥
हें नाहीं न ह्मणावें चतुरीं ॥ बोलिलें असे ग्रंथातरीं ॥ येरवीं बोलावया वैखरीं ॥ अशक्त माझी ॥९५॥
आतां सव्यकेचे कुमर ॥ अठ्ठ्यायशीं सहस्त्र ऋषीश्वर ॥ तैसेचि विनतेचे मनोहर ॥ अरुण गरूड ॥९६॥
कदूचे छत्तीस कुळ ॥ नाग जाहले सकळ ॥ सुरभीच्या सरिता निर्मळ ॥ शाहाण्णवकोटी ॥९७॥
निःशीकेसि जाहले राक्षस ॥ दनूचे दानव बहुवस ॥ आणि षडनेत्रीचा वंश ॥ चारी खाणी ॥९८॥
राया मग तयांपासोनी ॥ जाहल्या चौर्यायशी लक्ष योनी ॥ अर्ध जाहलीं त्यां पासुनी ॥ स्थळचरें पैं ॥९९॥
बेचाळीसलक्ष जळचर ॥ तयांपासाव सर्व आकार ॥ हें सांगतां सविस्तर ॥ वाढेल ग्रंथ ॥१००॥
ऐसा कश्यपाचा विस्तारू ॥ आतां दुजा पुलस्ति कुमरु ॥ त्याचा विश्रवा लेंकरूं ॥ तया जाहलीं नव अपत्यें ॥१॥
रावण आणि कुंभकर्ण ॥ तिजा पुत्र बिभीषण ॥ चवथी जन्मली जाण ॥ त्रिजटा ते ॥२॥
पांचवी ते आसाळी ॥ साहवी क्रौचा वेल्हाळी ॥ सातवी शूर्पनखा बाळी ॥ ऐशी ते जाणा ॥३॥
कुबर मणिग्रीव दोघेजण ॥ हे विश्रव्याचे नंदन ॥ ते अलकावतीसि ठेवले रक्षण ॥ भांडारासी ॥४॥
परि त्या दुःखें व्यापिला दशाशिरें ॥ ह्मणे हे सापत्न सहोदर ॥ यांसी प्रात्प राज्यभांडार ॥ ईश्वराचें ॥५॥
ह्मणोनि तेणें येकांगुष्ठ ॥ थोर मांडिले तपकष्ट ॥ प्रत्यहीं शरि वाहोनि नी लकठ ॥ प्रसन्न केला ॥६॥
रुद्र ह्मणे माग प्रसन्न ॥ येरू ह्मणे द्यावें अलकाभुवन ॥ आणि दहाही शिरें जाण ॥ द्यावीं मज ॥७॥
रुद्र ह्मणे तथास्तुवचन ॥ मग लंका केली निर्माण ॥ तेथें राहिला असे रावण ॥ ऐशियापरी ॥८॥
हा पुलस्तीचा विस्तार ॥ परि भविष्योत्तरीं आन विचार । कीं नाभीं उपजला कुबेर ॥ ईश्वराचे ॥९॥
आतां विरिंचीचा तिजासुत ॥ तो दक्ष अंगष्ठजात ॥ त्यासी पृथ्वीचा संतत ॥ केला राज्यघर ॥११०॥
तया कन्या जाहलिया साठी ॥ रूपें सुंदरा बरवंटी ॥ त्यांत येकीनें वरिला धूर्जटी ॥ कैलासनाथ ॥११॥
सत्तावीस दीधल्या चंद्रा ॥ तेरा कश्यपऋषेश्वरा ॥ दोनी दीघल्या अंगारा ॥ अग्निकोणीं ॥१२॥
वरूणा दीधलिया तिन्ही ॥ येक दीधली वायव्यकोणीं ॥ दोनी दीधल्या नैऋत्यभूवनीं ॥ येकी प्राचीनार्थासी ॥१३॥
धर्मरावो दक्षिणभुवणनीं ॥ त्यासी दीधल्या दहाजणी ॥ हे ऐसी केली वाटणी ॥ विरिचेदेंवें ॥१४॥
ऐसा दक्षचा विस्तार ॥ आतां सांगो विरिंचीचा चौथा कुमर ॥ तंव आक्षेप करी नृपवर ॥ आणिक काहीं ॥१५॥
मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ ऋषे तूं ज्ञानाचा डोहो ॥ तेही येक पुसेन तो संदेहो ॥ फेडीं माझा ॥१६॥
यम बोलिजे दक्षिणापती ॥ त्यासी अकराजणी युवती ॥ तयांमाजी दहाहोती ॥ दक्षकन्या ॥१७॥
तरी येक ते कवणाची कवणी ॥ आणि ते प्राप्त जाहली कैसेनी ॥ हें सांगावे सकळ वचनीं ॥ चरित्र मज ॥१८॥
मज राजायासी ॥ ह्मणे ऋषी ॥ आतां दुसरी आरंभिली पुशी ॥ तरी सांगों श्रोतयांसी ॥ येकचित्तें ॥१९॥
आतां असो हे पूर्वकथा ॥ कथिली उपनिषदांची वार्ता ॥ पुढें ऐकावें सकळ श्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१२०॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ कश्यपपुलस्तिवंशविस्तारू ॥ सप्तमोऽध्यायीं कथियेला ॥१२१॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ शुभंभवतु ॥
॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥