कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय १६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

वैशंपायनासि पुसे भुपती ॥ कैसी हनुमंताची उप्तत्ती ॥ तें सांगा जी वेदमूर्तीं ॥ वैशंपायना ॥१॥

तंव बोलिले वैशंपायन ॥ राया तूं महा विचक्षण ॥ तरी तुझिये पुसीचा प्रश्न ॥ सांगेन आतां ॥२॥

पुत्रेष्टीयाग दशरथासी ॥ घडला श्रृंगीचे साह्मेंसीं ॥ मग वसिष्ठें करूनि तीन भागांसी ॥ राणियां दीधलें ॥३॥

तें कैकेयीभाग हरिला घारीं ॥ ते शापोद्वारें जाहली खेचरी ॥ असो पुरोडाश तो भक्षी वानरी ॥ अंजनी नारी केसरीची ॥४॥

यज्ञभागें तियेचे उदरीं ॥ व्हावया श्रीरामाचा कैवारी ॥ ब्रह्मानें निर्मिली ते वानरी ॥ तें अवधारीं जन्मेजया ॥५॥

उदरीं यज्ञभाग संपूर्ण ॥ त्यांचें व्हावया प्ररोहण ॥ यज्ञपुरूष स्वयें आपण ॥ अवतरला हा ॥६॥

यज्ञभाग अति बळिवंत ॥ ह्मणोनि जन्म पावला हनुमंत ॥ तयासि वायुसुत ॥ अंजनीपुत्र मारुती ॥७॥

चौघांकारणें दोन भाग ॥ सगळ्या भागाचा हनुमंत चांग ॥ यालागीं बळाचा प्रयोग ॥ अति अमोघ हनुमंता ॥८॥

राम लक्ष्मण शत्रुघ्न भरतां ॥ यज्ञभागास्तव हनुमंता ॥ तया पावांसि येकात्मता ॥ भिन्न दिसतां अभिन्नत्व ॥९॥

ऐसी ऐकतां ऋषिमात ॥ तेणें संतोषला भारत ॥ मग होवोनि हर्षयुक्त ॥ पुढें कथा पुसतसे ॥१०॥

ऋषी ह्मणे गा भूपती ॥ याची बाळपणींची ख्याती ॥ ते वर्णना सांगो तुजप्रती ॥ शक्ती अद्धुत ॥११॥

ब्रह्माचर्याची गोमटी ॥ त्यासी गर्भींचीच कांसोटी ॥ ते अंजनी माता देखे दृष्टीं ॥ कीं रामजगजेठी देखेल ॥१२॥

मारुती पुसे बाळभावें ॥ मातें म्या काय भक्षावें ॥ तंव माता ह्मणे बाळा खावें ॥ आरक्त फळ ॥१३॥

हनुमंताचें लिंगदर्शन ॥ माताही नेणे आपण ॥ ऐसें असता इतर कोण ॥ देखेल राया ॥१४॥

तो जन्मतः ही हनुमंत ॥ अग्नितेजसम दीर्प्तिमंत ॥ बालार्कप्रभा दीसत ॥ मारुतीसी ॥१५॥

जंव सूर्यादय नव्हता तेथें ॥ तंव शेजे निजवूनि हनुमंतातें ॥ अंजनी गेली वनातें ॥ फळे आणावया ॥१६॥

इकडे जागिन्नला हनुमंत ॥ रूदना करी क्षुघार्त ॥ तंव बालार्क देखे आरक्त ॥ मग फळभावें उडाला ॥१७॥

क्षुधेनें पीडला प्रबळ ॥ बालार्क दिसे वर्तुळ ॥ तो स्वयें भक्षाया तत्काळ ॥ चपळ उडाला ॥१८॥

हनुमंताची उड्डाणशक्ती ॥ ते गती न ये गरुडाप्रती ॥ वायुसुताची शीघ्रगती ॥ मनोवृत्ती थडकल्या ॥१९॥

भक्षावया बालर्कासी ॥ हनुमंत धांवला तेजोराशी ॥ तें देखोनि सुरवरांसी ॥ थोर विस्मयो ॥२०॥

परमप्रतापी महावीर्य ॥ मनोगती अति गांभीर्य ॥ ऐसें हनुमंताचें शौर्य ॥ देखोनि देव विस्मित ॥२१॥

त्याचिये समानशक्तिं ॥ कोणी नाहीं त्रिजगतीं ॥ आली बाळभावें शीघ्रगती ॥ रवि भक्षाया ॥२२॥

मनासि सांडुनिया मागें ॥ हनुमंत चालिला महावेंगे ॥ परि सूर्यकिरणांचे निदाघें ॥ भस्म न होई ॥२३॥

कीं तें जाणोनि वायु पिता ॥ प्रितीनें संजोगी निजसुता ॥ हिमांबुकणे निवविता ॥ निघे शीघ्र ॥२४॥

तो धरूं पाहे हनुमंतासी ॥ परि नाटोपे तयासी ॥ वेगीं आला रवीपाशीं ॥ फळभावें भक्षावया ॥२५॥

जंव तो आला रवीपाशीं ॥ तंव उपरागग्रह संनिकर्षीं ॥ त्यातें देखोनि मानसी ॥ कोपला हनुमान ॥२६॥

ह्मणे माझ्या ग्रासाआड ॥ कोण पातला हा मूढ ॥ राहूचें फोडिलें जाभाड ॥ ह्मणोनि पुच्छें ॥२७॥

पुच्छें हाणितां वानरें ॥ घायें जाहलें घाबरें ॥ नाकीं मुखीं रुधिरधारें ॥ जाहला बंबाळ ॥२८॥

कांपे गरगरां भोंवत ॥ राहू पडिला मूर्छागत ॥ तंव धांवोनियां केत ॥ धरी त्यासी ॥२९॥

त्या राहू आणिक केतां ॥ उभयां देहीं येकात्मता ॥ ह्मणोनि केतु हनुमंत ॥ पाहें कोपें ॥३०॥

राहूकेतू देखतां दृष्टीं ॥ हनुमंत हाणी वज्रमुष्टी ॥ तेणें धाकें पळतां पोटीं ॥ निघाले पाय ॥३१॥

ग्रह ह्मणती सिंहिकासुतां ॥ पुच्छकेतु आला तुह्माभोंवता ॥ तरी जावोनि पुरुहूंता ॥ सांगा सकळ ॥३२॥

मग तो राहू सिंहिकासुत ॥ वानरघाई रुधिराक्तं ॥ इंद्राजवळी आला धांवत ॥ करी महाशब्द ॥३३॥

ह्मणे माझी जीवनवृत्ती ॥ रविशशि ग्रहणगती ॥ ते होतां ग्रहणकाळप्राप्ती ॥ जाइजे आह्मीं ॥३४॥

परि मजहूनि बळिवंत ॥ पुच्छराहू येवोनि तेथ ॥ तेणें घायें केलें भ्रमित ॥ ह्मणोनि आलों या ठाया ॥३५॥

तरी तूं गा देवाधिदेवो ॥ माझा न देखतां अन्यायो ॥ कां धाडिला पुच्छराहो ॥ तेणें मज गांजिले ॥३६॥

हें तुवां मज न सांगतां ॥ माझिये करविलें गुप्तघाता ॥ तरी म्यां आजी काय आतां ॥ करावें सांग ॥३७॥

पुच्छराहूनें येवोनि तेथ ॥ सूर्य आकळिला समस्त ॥ आणि माझाही करिता घात ॥ परि वेगेंसीं निघालों ॥३८॥

ऐकोनि राहूचा वचनार्थ ॥ इंद्र जाहला विस्मित ॥ ह्मणे कोण राहूचे विपरीत ॥ असे कर्ता ॥३९॥

कोणीं केला नवा राहो ॥ मग त्या निर्दाळावया पहाहो ॥ घेवोनियां देवसमुदावो ॥ इंद्र आला ॥४०॥

ऐरावती सालंकार ॥ तयावरी बैसोनि इंद्र ॥ करी घेवोनि महावज्र ॥ धांविन्नला पैं ॥४१॥

राहूसि ह्मणे पाकशासन ॥ नवा राहू दाखवीं कोण ॥ जेणें तुज गांजिलें पूर्ण ॥ त्यासि संहारूं ॥४२॥

मग दावितां हनुमंतासी ॥ कंप सूटला राहूसी ॥ दडोनि ऐरावताचे पाठीसी ॥ दाखवीतसे ॥४३॥

तंव येरीकडे हनुमंत ॥ रविग्रासावया धांवत ॥ तेणें भयें सूर्य कांपत ॥ थराथरां पैं ॥४४॥

दिनमान सांडोनि सविता ॥ पळों न लाहे सर्वथा ॥ आणि निवांरू न शके हनुमंता ॥ मांडलें दुर्घट ॥४५॥

तेचि संधीमाजी राहूसी ॥ वानरें देखिलें इंद्रापाशीं ॥ धाविन्नला निर्दाळणासी ॥ रागें करूनी ॥४६॥

ह्मणे माझिया ग्रासासी ॥ हा वोडवला मध्येंच विवशी ॥ मागुती इंद्राचे साह्यासी ॥ घेवोनि आला ॥४७॥

ऐसें बोलोनि हनुमंत ॥ रवीचा सांडोनियां पंथ ॥ करावया राहूचा घात ॥ धांवे तवकें ॥४८॥

राहू पळे इंद्राकडे ॥ तंव हनुमंताची उडी पडे ॥ येरू आक्रोश करुनि रडे ॥ इंद्राजवळी ॥४९॥

तो राहू सिंहिकासुत ॥ इंद्रासि ह्मणे शरणागत ॥ वानरें पुरविला अंत ॥ धांव वेंगीं ॥५०॥

ऐकोनि राहूचा आकांत ॥ इंद्र नाभिकार देत ॥ ह्मणे भिऊं नको घरीं पुरुषार्थ ॥ त्यासी वधीन मी ॥५१॥

भारता मग तो सुरपती ॥ तेणें पेलिला ऐरावती ॥ त्यावरी धांविन्नला मारुती ॥ हस्तचपेटीं ॥५२॥

वानरा ऐरावत आकळी ॥ येरें हाणितला कुंभस्थळीं ॥ गजें दिधली आरोळी ॥ चळचळां कांपत ॥५३॥

ऐसा होतां वज्रघात ॥ घायें दुःखी ऐरावत ॥ इंद्र स्वबळें आवरित ॥ परि न परतेची ॥५४॥

पुच्छें हाणितां वानरें ॥ गजें घेतलें घायवारें ॥ शस्त्रें शक्तीनेंही नावरे ॥ केलें घाबरें इंद्रासी ॥५५॥

इंद्र देवांमाजी बळी ॥ करितां हनुमंतासी रळी ॥ शिरींचा मुकुट पाडिला तळी ॥ वानरवीरें ॥५६॥

मुकुट घ्यावा आपणापाशीं ॥ हें बाळभावें न कळे हनुमंतासी ॥ असो इंद्र केलाविशी ॥ ऐरावतासमवेत ॥५७॥

इंद्र गांजिला कपींद्रें ॥ ह्मणोनि यम धांवे कैं वारें ॥ दंडें हाणी तंव वानरें ॥ केलें विपरीत ॥५८॥

जेव्हां यम हाणी तयासी ॥ तेव्हां तो आदळे अंगेंसी ॥ थापा हाणोनि तोंडघशीं ॥ पाडिला यम ॥५९॥

घाय हाणितां प्रचंड ॥ येरू आंसडूनि घे काळदंड ॥ यमाचे फोडिलें तोंडा ॥ क्षणामाजी ॥६०॥

जो यम गाजिता जगासी ॥ हनुमंतें गांजिलें तयासी ॥ घायें मिळविलें धुळीसी ॥ न उठवे धांववया ॥६१॥

यम गांजिला दारूण ॥ त्या भेणें पळाला वरूण ॥ कुबेर घाली लोटांगण ॥ हनुमंतासी ॥६२॥

ऐसे हनुमंतें ते क्षणीं ॥ देव पराभविले रणीं । अवघे माघारे पळोनी ॥ गेले देव ॥६३॥

कीं हनुमंताचे वेगापुढें ॥ आह्मी पळावें कोणीकडे ॥ येकामागें येक दडे ॥ थोर भय देवांसी ॥६४॥

मग पाडावया इंद्रासी ॥ ऐरावत धरिला पुच्छीं ॥ तो भोवंडितां आकांशीं ॥ गजबजिले देव ॥६५॥

ऐसा हनुमंत जगजेठी ॥ तेणें इंद्र पाडितां सृष्टी ॥ जगीं येकचि बोंब उठी ॥ प्रळयकाळींची ॥६६॥

तंव लघुलाघवें सुरपती ॥ वज्रं हाणितला मारुती ॥ घावो लागतां हनुप्रती ॥ पडिला मूर्च्छित ॥६७॥

समरीं मेरूपाठारांत ॥ हनुमान पडिला मूर्च्छित ॥ तंव वायु येवोनि त्वरित ॥ उचली पुत्रा ॥६८॥

ह्मणे माझिये क्षुधित बाळासी ॥ इंद्रे हाणितलें वज्रेंसीं ॥ मूर्च्छित पांडिलें भूमीसी ॥ आतां यासी काय कीजे ॥६९॥

मग तो क्षोभोनियां पवन ॥ आकर्षिलें जगाचे प्राण ॥ ब्रह्मादिकां सकट दारूण ॥ ऋषिजनही तळमळती ॥७०॥

ऐसा वसवोनियां क्रोध ॥ अंतरीं केला प्राणरोध ॥ प्राणापान केले स्तब्ध ॥ अति विरोध भूतांसी ॥७१॥

होतां प्राणनिरोधस्थिती ॥ ठेली जाहली भूतगती ॥ कोणा नाहीं सुखप्राप्ती ॥ तळमळती अतिदुःखें ॥७२॥

मग यक्ष राक्षस गंधर्व ॥ सिद्ध चारण मानव ॥ सत्यलोका येवोनि सर्व ॥ पितामहासी वंदिती ॥७३॥

सकळही प्राणनिरोधाचे कष्ट ॥ ऋषि सांगती श्रेष्ठश्रेष्ठ ॥ तंव ब्रह्मयाचें फुगलें पोट ॥ ऐसें संकट वोढवलें ॥७४॥

ब्रह्मा सांगे समस्तासी ॥ कीं इंद्रे हाणोनि वज्रासी ॥ मूर्च्छित पाडिलें मारुतीसी ॥ ह्मणोनि वायु क्षोभला ॥७५॥

वायु पुत्रदुःखें दुःखार्ती ॥ तेणें भूतांच्या रोधिल्या शक्ती ॥ स्तंभितकेल्या प्राणवृत्ती ॥ क्षोभलेपणें ॥७६॥

राहुकैवारें सुरनाथ ॥ वज्रें हाणितला हनुमंत ॥ मग पुत्र पडतां मूर्च्छित ॥ क्षोभला वायु ॥७७॥

इकडे हनुमंत घेवोनि पुढें ॥ वायु स्फुंदस्फुंदोनि रडे ॥ ह्मणे तान्हे बाळ बापुडें ॥ इंद्रे मूढें मारिलें ॥७८॥

माझा निमाल्या हनुमंत ॥ मग देवाचा करीन घात ॥ मारीन येका क्षणांत ॥ वायु प्राणांतीं क्षोभला ॥७९॥

प्राणपती चळता वायू ॥ तो जगाचा जगदाऊ ॥ पुत्रदूःखें क्षोभला बहु ॥ तेणें अपावो मांडला ॥८०॥

प्राणापानीं नित्य सुख ॥ प्राणें प्राण्यां नित्य हरिख ॥ तो प्राण जातां प्रेतदुःख ॥ प्राणियांसी ॥८१॥

प्राण गेलिया निघोनी ॥ काष्ठप्राय होतीप्राणी ॥ दृष्टीनेंही पाहतां जनीं ॥ मानिजे विटाळ ॥८२॥

साध्वी पतिप्राणे पतिव्रता ॥ प्राणे पति राहे प्रीतिवंता ॥ प्राण गेलिया तत्वतां ॥ प्रिय प्रिये न स्पर्श ॥८३॥

असोनि प्रिय प्रेम आप्त ॥ तो नित्य भोगी जीवंत ॥ परि प्राण गेलिया मानी प्रेत ॥ पतीसी भूत स्त्री ह्मणे ॥८४॥

असतां प्रिय प्राण समस्तां ॥ तो क्षोभोनि जाय आतां ॥ यालागीं वाचवावें हनुमंत ॥ प्रार्थोनि हरीसी ॥८५॥

तंव प्राणें पडिला शूळपाणी ॥ मग वायूची करावया बुझावणी ॥ तोही आला तत्क्षणीं ॥ वाचवा ह्मणे हनुमंत ॥८६॥

असो शिव शक्त चतुरानन ॥ यांहीं आरधिका जनार्दन ॥ मग हनुमंता द्यावया जीवदान ॥ निघाले अवघे ॥८७॥

ते ब्रह्मा हरि त्रिनयन ॥ सर्वें इंद्रराजा जाण ॥ आणिक निघाले ऋषिजन ॥ महातपस्वी ॥८८॥

जेथें घेवोनि हनुमंत ॥ वायु बैसलासे रडत ॥ तये ठायीं आले समस्त ॥ प्राणनिरोधें ॥८९॥

देखोनि ब्रह्माहरिहर ॥ वायु उठिला सत्वर ॥ कडिये घेवोनि कुमर ॥ केला नमस्कार देवासी ॥९०॥

देव ह्मणती पुत्राकारणें ॥ जगचि अवघें निर्दाळणें ॥ ऐसें आपण न करणें ॥ जगत्प्राणा ॥९१॥

तंव वायु बोले क्षोभता ॥ माझा हनुमान न उठवितां ॥ तरी मी सर्वांच्या घाता ॥ करीन सत्य ॥९२॥

ऐसें ऐकोनियां वचन ॥ हासिन्नला जनार्दन ॥ ह्मणे हनुमंतासि वर प्रदान ॥ जन्ममरण यासि नाहीं ॥९३॥

रामभागाच्या द्विगुणित ॥ ऐशा पिंडें जन्मला हनुमंत ॥ त्यासी नाहीं जन्ममृत्य ॥ हा हनुमंत चिरंजीविया ॥९४॥

ऐसें बोले जनार्दन ॥ तें ऐकोनि त्रिनयन ॥ वन देतसे संतोषोन ॥ सावधान अवधारा ॥९५॥

कीं माझिये तृतीयनेत्रींचा वन्ही ॥ जाळूं न शके यालागुनी ॥ त्रिशूळ न भेदे ऐशी वाणी ॥ शिवाची पैं ॥९६॥

हरि वरदे वदे सत्वर ॥ गदा बाण चक्र दुर्धर ॥ तेणें न भेदे शरीर ॥ हनुमंताचें ॥९७॥

ब्रह्मा वदे आशिर्वादासी ॥ ब्रह्मदंड ब्रह्मपाशीं ॥ बाधा न होय हनुमंतासी ॥ हा सर्वासी अजिंक्य ॥९८॥

इंद्र वदे वरदानासी ॥ माझें वज्र लागलें हनूसी ॥ तेणें हनुमंत नाम यासी ॥ विख्यात होय ॥९९॥

माझें वज्र न बाधी पाहीं ॥ होईल हा वज्रदेही ॥ सुरां असुरां नागंवे कदाही ॥ ख्याती करील तिहीं लोकीं ॥१००॥

कुशकाशकमळपरिमळा ॥ जे सुकेना कदा काळा ॥ ते उल्हासे इंद्रे माळा ॥ घातली गळां हनुमंताचे ॥१॥

तंव सविता वदे वरदता ॥ कीं मजहूनियां अधिकता ॥ तेजोवृद्धी हनुमंता ॥ राक्षसवधाकारणें ॥२॥

जेव्हा इच्छीलं हा ज्ञानता ॥ तेव्हाचि फळ पावेल तत्वतां ॥ मी दीधली ऐसी योग्यता ॥ होवोनि प्रसन्न ॥३॥

वरूण वदे वरदान ॥ हा वरुषते जळीं मग्न ॥ होतां यासी नये मरण ॥ आणि पाशही न बाधे ॥४॥

यम वर देतसे वितंड ॥ कीं तूं सुख पावसी उदंड ॥ माझा न बाधी काळदंड ॥ आरोग्य सदा ॥५॥

धनेश वर दे मारुतीसी ॥ कीं युद्ध करितां वर्षावर्षीं ॥ कदाही श्रम न पावसी ॥ शस्त्रे अबाधित ॥६॥

आणि माझें शिल्पशास्त्र जाण ॥ तें तूं पावसी संपूर्ण ॥ ऐसें बोलोनि आपण ॥ भेटे हनुमंतासी ॥७॥

मग तो ब्रह्मदेव मानसीं ॥ संतोषोनि सांगे वायूसी ॥ कीं हनुमान भाग्याची पूर्णराशी ॥ तुझा कुमर ॥८॥

विश्वकर्मा देत वरदान ॥ कीं म्यां शस्त्रें केली निर्माण ॥ तीं यासी युद्धी बंधन ॥ न करिती कदा ॥९॥

धीर वीर महाशूर ॥ अदठ दाटूगा वज्रशरीर ॥ बाधूं न शके शस्त्रभार ॥ तुझिया पुत्रा ॥११०॥

सभाग्यता या हनुमंता ॥ हा लाजवूनि लंकानाथा ॥ शुद्धी आणानियां सीता ॥ रामासि सुखी करील ॥११॥

हा रामासि कंठाआंत ॥ नित्य दाटील गा हनुमंत ॥ सेवाबळें प्रेमयुक्त॥ श्रीरामासी ॥१२॥

ऐसी हनुमंताची ख्याती ॥ स्वयें सांगे प्रजापती ॥ तेणें जाहला वायूचित्तीं ॥ उल्हास पूर्ण ॥१३॥

महावर लाधतां हनुमंता ॥ वायूसि जाहली उल्हासता ॥ मुक्त करितां प्राणावस्था ॥ सुख जाहलें सर्वासी ॥१४॥

सुखी जाहले सुरनर ॥ गणगंधर्वऋषीश्वर ॥ संतुष्टलें चराचर ॥ जयजयकार करिती मग ॥१५॥

वर देवोनि हनुमंतासी ॥ देव गेले स्वस्थानासी ॥ मग वायुनें स्वपुत्रासी ॥ अंजनीजवळी दिधलें ॥१६॥

तैंहूनि हनुमंताची कीर्तीं ॥ विस्तारली त्रिजगतीं ॥ कीं आकळिला गभस्ती ॥ सुरवरासहित ॥१७॥

हनुमंताचें सामर्थ्य सिद्ध ॥ तया देवीं केलें वरद ॥ हें ऐकोनियां आनंद ॥ जन्मेजयासी ॥१८॥

जें सामर्थ्य श्रीरामासी ॥ तेंचि सामर्ध्य हनुमंतासी ॥ एकात्मता अहर्निशीं ॥ लोकीं दिसती देवभक्त ॥१९॥

लोकप्रेमस्वर्गार्थ ॥ राम देव हनुमान भक्त ॥ हाचि रामायणीं ग्रंथार्थ ॥ जाण राया ॥१२०॥

डोंगरी दावाग्नीची ख्याती ॥ आणि घरींच्या दीपाची दीप्तीं ॥ दोहींची समान दाहकशक्ती ॥ तेविं देवभक्त ॥२१॥

असो हनुमान असतां बाळमती ॥ अंगीं अद्धुत वसे शक्ती ॥ करीतां विनोदक्रीडास्थिती ॥ शापिलें ऋषीनीं ॥२२॥

गंगातीरीं ऋषीची वस्ती ॥ अवघे आश्रम उचलोनि हस्तीं ॥ हनुमान ठेवी दूरी पर्वतीं ॥ जेथें जळ न मिळे पैं ॥२३॥

ऋषि आपुल्या स्वसामर्थीं ॥ पुनः गंगातीरा जाती ॥ परितो उचलोनि मागुती ॥ पर्वतीं घाली ॥२४॥

पूर्णपर्वतीं ऋषि वर्तत ॥ तंव तो सगळा उंच पर्वत ॥ हनुमान घाली दुरपंथ ॥ न मिळे जळपान ॥२५॥

बालभावाच्या परवडीं ॥ ऋषींची यज्ञपात्रें फोडी ॥ कुशांसनें सकळ फाडी ॥ तोडी जानवीं ॥२६॥

ब्रह्मचारी कवळोनि पुच्छीं ॥ हनुमान उडे आकाशीं ॥ लेंकुरें करितां कासविशीं ॥ ऋषि तळमळती ॥२७॥

मारूनि गज परवडे ॥ ऋषिआश्रमीं सांडी मंडे ॥ काढितां शिष्यसमुदाय रडे ॥ कांहीं उपाय चालेना ॥२८॥

ब्रह्मयाची वरदोक्ती ॥ शाप द्यावया नाहीं शक्ती ॥ ह्मणोनि ह्मणती जंव भेटे रघुपती ॥ तंव शक्ती याची लीन होवो ॥२९॥

जेवीं आलिया तारुण्यता ॥ यौवनीं मुसमुशी वनिता ॥ तेवीं तूं भेटलिया रघुनाथा ॥ निजसामर्थ्य पावसी ॥१३०॥

ऐसें ऋषीश्वर स्थापिती ॥ तेणें लीन जाहली शक्ती ॥ मग राहिला साधुवृत्तीं ॥ ऋषींजवळी नम्रभावें ॥३१॥

पूर्वी सूर्याचें वरदान ॥ कीं जेव्हां हनुमंत वांच्छील ज्ञान ॥ तेव्हांछी यासी ज्ञान प्रसन्न ॥ होईल सत्य ॥३२॥

मुनि ह्मणे जैसा हनुमंत यती ॥ तैसीच मंदोदरी सती ॥ रावणराज्यांत गा भूपती ॥ पूण्यवंत ते ॥३३॥

ऐसी हे गा भारता ॥ कथिली भविष्योत्तरींची कथा ॥ रामायणीं ऋषिनाथा ॥ वाल्मीकवचनें ॥३४॥

हे हनुमंताची ख्याती ॥ ऐकोनि भारत भूपती ॥ मग संतोषोनि विनंती ॥ करिता जाहला ॥३५॥

ह्मणे अहो जी वेदमूर्ती ॥ मंदोदरीची कैसी उप्तत्ती ॥ आणि ते लंकापतीप्रती ॥ लाधली कैसी ॥३६॥

आतां असो हे अग्रकथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ती ऐकावी सकळश्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥३७॥

॥ इति श्रीकथाकल्पतरु ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ हनुमंतजन्मकथनप्रकारू ॥ षोडशोऽध्यायीं कथियेला ॥१३८॥

॥ श्रीसीतारामचंद्रार्पणस्तु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके षोडशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP