॥ श्रीगणेशाय नमः ॥
उत्कंठें पुसे नृपनंदन ॥ ऋषिराया ऐकें वचन ॥ मंदोदरीचें जन्मकथन ॥ जाहलें कैसें ॥१॥
तें ऐकावया उत्कंठा ॥ मनीं बहुत ऋषिश्रेष्ठा ॥ तरी सांगावी प्रतिष्ठा ॥ विस्तारूनी ॥२॥
मग ह्मणे वैशंपायन ॥ राया परियेसीं वचन ॥ मंदोदरीचें जन्मकथन ॥ सांगो तुज ॥३॥
तरी रावणमाता कैकसी ॥ ते पंचध्यान्याच्या पिठासी ॥ पंचवक्त्र भावूनि त्यासी ॥ पूजी शिवलिंग ॥४॥
पंचधान्याचें पंचवदन ॥ ऐसें भावी मनीहून ॥ पूजा करी सावधान ॥ कैकसी ते ॥५॥
पंचधान्यांचा पंचवक्त्र ॥ पूजितां अक्षयी दशवक्त्र ॥ त्यासी व्हावे पुत्रपौत्र ॥ हें फळ इच्छी पूजेचें ॥६॥
एकदा शिवरात्रीचे दिवशीं ॥ कैकसी येवोनि समुद्रतीरासी ॥ नमुनियां शिवलिंगासी ॥ करी पूजा ॥७॥
षोडशोपचारी पूजा जाहली ॥ त्यावरी बिल्वलक्षावळी ॥ ते शिवनामें वाहिली ॥ अनुपम्य पूजा ॥८॥
ते वनीं बेलाचें पत्र ॥ येकेक शिवनामें स्वतंत्र ॥ भावें पूजिला श्रीशंकर ॥ मनोहर पैं ॥९॥
ऐसें करोनि पूजन ॥ मग लाविले दोन्ही नयन ॥ कैकसी बैसे ध्याय धरून ॥ तंव अनुपम्य वर्तलें ॥१०॥
राक्षसवेषें इंद्र येऊन ॥ लिंग समुद्रीं केलें निमग्न ॥ परि सागर न करी भग्न ॥ स्थापिलें हाटकेश्वर ह्मणोनी ॥११॥
तरी त्या हाटकेश्र्वरीं ॥ पूजा होतसे अद्यापवरी ॥ बालप्रवाह गोमती सागरीं ॥ जनीं देखिजे ॥१२॥
कैकसी जंव उघडी लोचन ॥ तंव पूजालिंगा पडलें खान ॥ कीं पुत्रपौत्रीं निमे संतान ॥ ऐसें विघ्न लिंगनाशीं ॥१३॥
ह्मणोनि कैकसी रुदन करी ॥ कीं देवपुजा नेली चोरीं ॥ जळो या रावणाची थोरी ॥ कासया राज्य चालवितो ॥१४॥
ऐकतां मातेचें आर्त वचन ॥ रावण आला धांवोन ॥ तंव येरी ह्मणे लिंगा पडिलें खान ॥ आतां मुख काय दाखवूं ॥१५॥
न करितांही विसर्जन ॥ जरी लिंगा पडिलें खान ॥ तरी होय निसंतान ॥ ऐसी वाणी वृद्धांची ॥१६॥
रावण ह्मणे माते अवधारीं ॥ जें उरलें साहीं सूत्री ॥ तें रत्नलिंग आहे घरीं ॥ तरी तें पूजीं जननीये ॥१७॥
येरी ह्मणे आणिके लिंगाची थोरी ॥ बोलिली असे आगमशास्त्रीं ॥ परि पार्थिवभंगें ॥ अनाचारी ॥ हातीं धराया केविं रिघों ॥१८॥
माझें स्वकृतलिंग न येता हाता ॥ तोंवरी अन्न नेघें सर्वथा ॥ शिवदीक्षेची हेचि संस्था ॥ कीं लिंगनाशें प्राणत्याग ॥१९॥
तंव दशानन विनवी मातेसी ॥ व्यर्थ कांवो प्राण त्यागिसी ॥ मी जावोनि शिवापाशीं ॥ आत्मालिंगचि आणितों ॥२०॥
मग माता ह्मणे परियेसीं ॥ नारदें सांगीतलें मजसी ॥ आतां तें आत्म्फ़लिंग जरी आणिसी ॥ तरी तूं धन्य सुपुत्र ॥२१॥
ऐसें ऐकोनिया वचन ॥ वेगीं निघाला रावण ॥ शंकराजवळी येवोन ॥ नमन केलें साष्टांगें ॥२२॥
जवळी आलिया रावणासी ॥ परि शिव न बोले कां आलासी ॥ ऐसें वर्तलिया रावणासी ॥ उदासता वाटली ॥२३॥
मुनि ह्मणे राया भारता ॥ महादेवें रावणा न पुसतां ॥ तेणें वाटली थोर चिंता ॥ ह्मणे आतां काय कीजे ॥२४॥
तंव देखिली शिवकथा ॥ जे पार्वती जगन्माता ॥ मनीं ह्मणे हे मागेन आतां ॥ शिव प्रसन्न होतांसी ॥२५॥
रावण उभा येक प्रहर ॥ परि शिव त्यासी नव्हे सादर ॥ कोठें गुंतला श्रीशंकर ॥ रावण मनीं विचारी ॥२६॥
तंव श्रृंगी वीणा झणत्कारी ॥ शिव गुंतला तया नादांतरीं ॥ ऐसें जाणोनियां निर्धारीं ॥ रावणे अद्धुत आरंभिलें ॥२७॥
उगवूनियां आपुला माथा ॥ शिरा लाविल्या तंतुयुक्ता ॥ मग ते किन्नरी धरोनि हस्ता ॥ रावण वाजवी युक्तीनें ॥२८॥
तये वाद्याचा सुखस्वर ॥ मंजुळ मधुर अरुवार ॥ तेणें सुखावला शंकर ॥ मग वरदें बोलिला ॥२९॥
रावणासी वर माग ह्मणता ॥ तंव मोडला दिसे माथा ॥ कृपा उपजली विश्वनाथा ॥ मग वरदान दीघलें ॥३०॥
ह्मणे गा तुवां मोडोनि शिर ॥ मजसी सुखविलें अपार ॥ तरी तूं होसी दशशिर ॥ ममप्रसादें ॥३१॥
शिरा काढूनि परिकर ॥ मज सुखी केलें अपार ॥ तरी शिरांचे द्दिगुण कर ॥ होवोत तुज ॥३२॥
ऐसा वर देतां शिवें वोजा ॥ दहा शिरें वोजा ॥ दहा शिरें वीस भुजा ॥ उभाठेला राक्षसराजा ॥ अतुर्बळी दशकंठ ॥३३॥
देवो ह्मणे लंकानाथा ॥ जें आवडें तें देईन आतां ॥ पाहोनि भक्तिपंथ ॥ जाहलां प्रसन्न ॥३४॥
ऐसें भूतनांथ बोलिला ॥ तेणें रावण संतोषला ॥ परि दुष्टबुद्धी त्या चांडाळा ॥ काय मागतसे ॥३५॥
ह्मणे पार्वती लावण्यराशी ॥ ते देई भोगावयासी ॥ आणि आत्मलिंग कैकसी मातेसी ॥ दीजे पूजनार्थ ॥३६॥
ऐसें मागणें ऐकतां ॥ गेली वरदउल्हासता ॥ परम क्षोभ शिवचित्ता ॥ परि नाहीं ह्मणतां न ये ॥३७॥
मग रावणा देतां पार्वती ॥ तृतीयनेत्रें क्षोभला अती ॥ तेणेंचि लंका दाहिली ख्याती ॥ करोनि हनुमंतें ॥३८॥
असो रावणें उचलिली पार्वती ॥ आणि आत्मलिंग उचलिलें हातीं ॥ ऐसी करोनियां ख्याती ॥ निघाला लंके ॥३९॥
रावणें उचलिते जाण ॥ उमा जाहली दीनवदन ॥ चिंतेनें व्यापिलें अंतःकरण ॥ काहीं विचार सुचेना ॥४०॥
ह्मणे शिवें दीधली रावणासी ॥ आतां सुटला होय कैसी ॥ मग स्मीरला हृषीकेशी ॥ कृपाळु जो ॥४१॥
शिवासि छळितां भस्मासुरें ॥ तुवां तारिलें करुणाकरें ॥ ऐसीं ऐकोनियां उत्तरें ॥ मग अरिधारी धाविन्नला ॥४२॥
ह्मणे शिवाची निजपत्नी ॥ ते माझी असे जननी ॥ तीतें नेतो अभिलाषुनी ॥ तरी यासे गांजीन ॥४३॥
असो सोडवावया अंबिकेसी ॥ धांवोनि आला हृषीकेश ॥ तंव दोघे भेटले त्यासी ॥ गजानन आणि कार्तियेक ॥४४॥
मग छळावया रावणा ॥ विष्णु करितसे विंदाना ॥ द्विजरूपें गौचारणा ॥ सांगे गणेशासी ॥४५॥
इकडे आपण जाहला ऋषी ॥ शिष्य केला कार्तिकेयासी ॥ उल्हासें येतां रावणासी ॥ दोघे सन्मुख भेटले ॥४६॥
हरि ह्मणे कां उल्हास लंकापती ॥ तंव ह्मणे शिवें दीधली पार्वती ॥ आणि आत्मलिंग कृपामूर्ती ॥ दीघलें मज ॥४७॥
ऋषी रावणातें सांगती ॥ आत्मलिंगाची सत्य प्राप्ती ॥ परि हे नव्हे रे पार्वती ॥ शिवे तुज ठकविलं ॥४८॥
शिव देईल निजकांता ॥ हें तंव न घडे सर्वथा ॥ तुजसी ठकविलें सर्वथा ॥ पाहें इजकडे ॥४९॥
ह्मणोनि जंव्फ़ पाहे फिरोन ॥ तंव दिसे हीनदीनवदन ॥ निंद्य कुश्र्वळ परम म्लान ॥ देखे मुख ॥५०॥
नेत्रीं वाहे सदा पाणी ॥ श्र्लेष्म दाटला असे घ्राणीं ॥ मक्षिका फिरती वदनीं ॥ मुखा दुर्गैध ॥५१॥
तयेच्या देखोनियां वक्त्रा ॥ रावणा आला वोकारा ॥ ऐसा विष्णु लाघवी खरा ॥ रावणासी फसविलें ॥५२॥
ह्मणे शिवें लपविली पार्वती ॥ परम कपटी तो पशुपती ॥ ह्मणोनि धावला शिवाप्रती ॥ रावण त्वरें ॥५३॥
येकदां केंशराची गोमटी ॥ रमेनें दीधली विष्णूसि उटी ॥ त्या उदरमळीची गोरटी ॥ केली मंदोदरी ॥५४॥
ते मर्दितां सुंदर पुतळी ॥ काहीं नसतां हातातळीं ॥ उदरीं निघाली केशरमळी ॥ मंदोदरी तेचि हे ॥५५॥
परि रामायणीचें अवधारीं ॥ कीं मयासुराची हे कुमरी आणिकही असे पुराणांतरीं ॥ अनारिसें गा ॥५६॥
कीं पार्वती अंगमळीची कुमरी ॥ करूनि ठेवी गृहद्दारीं ॥ तंव शंकरें अभिलाषिली नेत्रीं ॥ कन्यका ते ॥५७॥
ह्मणोनि पार्वतीनें शापिली ॥ तेणें ते बेडकुळी जाहली ॥ सहस्त्रवर्षी उद्धरिली ॥ हरिहरचरणोदकें ॥५८॥
असतां शापयुक्त मंदोदूरी ॥ तें पार्वतीसोडवणे आला हरी ॥ तो उपकार जाणोनि गौरी ॥ हरिचरण प्रक्षालित ॥५९॥
तें हरिहरांचे चरणतीर्थ ॥ तेणें ते उद्धरिली सत्य ॥ मग देवें दीधली उचित ॥ रावणासी ॥६०॥
हें बोलिलेंसे येक मत ॥ परि विष्णुपुराणीं विष्णवंशजात ॥ ते जन्मली स्वरूपवंत ॥ विष्णुपासूनी ॥६१॥
असो विष्णूने लघुलाघवमेळीं ॥ ऐसी निर्मूनियां पुतळी ॥ घातली शिवाचे आसनतळीं ॥ घवघवींत ॥६२॥
रावण ह्मणे शिवाप्रती ॥ तुवां लपविली पार्वती ॥ हे अवदशा दीधली मजहातीं ॥ धन्य वरदा ॥६३॥
अंतरीं विचारी पशुपती ॥ तंव अभिलाषास्तव पार्वती ॥ अवदशा जाहली निश्चिती ॥ जगदीशकपटें ॥६४॥
तयेसि विष्णु जाहला साह्य ॥ तेणे केला रावणा अपाय ॥ ऐसियासी नचले उपाय ॥ काय किजे ॥६५॥
मग ह्मणे उमा तेचि सीता ॥ तिच्या अभिलाषें तत्वतां ॥ मरण येईल लंकानाथा ॥ श्रीहरिकरें ॥६६॥
परि रावण वदे आवेशां ॥ ह्मातारपणीं लोभ कैसा ॥ तुज वाटला रे महेशा ॥ मज अवदशा दीधली ॥६७॥
ऐकोनि तथास्तु ह्मणे देव ॥ आतां अवदशाच भोगील जीव ॥ रावण विषयांध वरी गर्व ॥ दाटला असे ॥६८॥
रावण ह्मणे चंद्रमौळी ॥ जे त्वां लपविली आसनातळीं ॥ ते मज द्यावी सोज्वळी ॥ कीती लपविसी ॥६९॥
तंव ते देखोनियां कांता ॥ अति विस्मयो विश्वनाथा ॥ मग ते घेवोनि जगन्माता ॥ दीधली मंदोदरी ॥७०॥
आतां असो हे उपपत्ती ॥ रावणें सांडोनि पार्वती ॥ घेवोनि मंदोदरी प्रीतीं ॥ निघाला तो ॥७१॥
स्कंधीं घेवोनि मंदोदरी ॥ आणि आत्मलिंग निजकरीं ॥ रावण निघे तंव काय करी ॥ नारायण ॥७२॥
परम पावोनियां हर्षा ॥ रावण निघे लक्षूनि लंका ॥ तंव लागली लघुशंका ॥ न घालवे पाय पुढें ॥७३॥
ह्मणे लिंग द्यावें कोणापाशीं ॥ तंव देखिलें गणपतीसी ॥ तो द्विजरूपें गाईसी ॥ राखीतहोता ॥७४॥
ह्मणे मी करीन शंकानिवृत्ती ॥ तोवंरी धरावें हें गा हातीं ॥ येरू ह्मणे गाईसि पिजेती ॥ वत्सें सकळ ॥७६॥
धेनूहीं वत्सें पाजिल्यावरी ॥ द्विज कोपतील मज भारी ॥ ह्मणोनि लिंग मी न अंगिकारीं ॥ तंव पाय धरी रावण ॥७७॥
मग गणेश नेम करी ॥ कीं तूं न येता झडकरी ॥ तरी मी ठेवीन भूमीवरी ॥ हा नेम माझा ॥७८॥
त्रिवार सिंहगर्जनेंसीं ॥ मी पाचारीन रे तुजसी ॥ मज जरी वेगें न येसी ॥ तरी मी ठेवीन ॥७९॥
ऐसा नेम करूनि देखा ॥ करूं गेला लघुशंका ॥ तंव मूत्र गुतलें दशमुखा ॥ कांहीं बळ न चाले ॥८०॥
आत्मलिंग त्यागिता देखा ॥ रावणा लागल्या अति तिडका ॥ उदरीं व्यथेचा उठला भडका ॥ शिवक्षोभें ॥८१॥
अवचट जाहलें मूत्र मुक्त ॥ परि तें सुटलें अपरिमित ॥ धारा प्रवाह वाहत॥ नदीसमुद्रांऐसा ॥८२॥
गणेशाचे सिंहगर्जनेंसी ॥ रावण गुंतला मूत्रासी ॥ मग लिंग ठेवोनि भूमीसी ॥ गाई घेवोनि गेला तो ॥८३॥
असो रावण यानंतरीं ॥ वेगें येवोनि पाहे झडकरी ॥ तंव लिंग देखे भूमीवरी ॥ सबळपणे ॥८४॥
मग येकाहातें दोंहातें ॥ बळे उपडीतां रावण कुंथे ॥ परि नुचले विसांही हातें ॥ मनी ह्मणे हें महाबळ ॥८५॥
तें भूमीसि ठेवोनि गेला ॥ ह्मणोनि गणेशा टोला दीधला ॥ तो अद्यापि असे ठेला ॥ रावणक्षोभें ॥८६॥
लिंग यावया हातासी ॥ कांही उपाय नचले त्यासी ॥ मग रावण ह्मणे माते कैकसी ॥ आतां काय सांगावें ॥८७॥
नाहीं देवपितरांचा ॥ कृपापात्र ॥ उभयपणें मी अपवित्र ॥ विष्णूनें छळिलें अपार ॥ तळमळी रावण ॥८८॥
लिंगबंधनी पंचमुद्रा ॥ शिवाला शिवदोरा प्रहरा ॥ रावणे सांडिलें आहारा ॥ पंचसमुद्रां पंचलिंगें ॥८९॥
मुरडूनियां सांडिलें वस्त्र ॥ तेथें जाहला मुरुडेश्र्वर ॥ मुद्रिका टाकितां गुप्तेश्र्वर ॥ जाहला तेथें ॥९०॥
रागें टाकितां शिवदोर ॥ तेथें जाहला मुक्तेश्वर ॥ कानडें टाकिलें तो धारेश्वर ॥ ह्मणती तया ॥९१॥
शिवशेज टाकितां साचार ॥ तेथें जाहला शेजेश्वर ॥ ऐशापरी पंचवक्त्र ॥ शंकर नांदे ॥९२॥
गोकर्ण हें तंव अनादि क्षेत्र ॥ तेथें महाबळ विश्वेश्वर ॥ तो देव असे पूर्वापार ॥ लोक ह्मणती ॥९३॥
समुद्रतीरीं गोमताचळ परिकर ॥ तेथें गोकर्णमहाबळेश्र्वर ॥ परि हा असे भिन्न प्रकार ॥ ब्रह्मयागींचा ॥९४॥
कीं ब्रह्मयाग होतां प्रबळ ॥ प्रकटला वाईमहाबळ ॥ या दोहींचें भिन्न स्थळ ॥ जाणती लोक ॥९५॥
तरी हें महाबळकथन ॥ पंचमस्तबकीं कथिलें जाण ॥ तें ऐकलें असेल आपण ॥ श्रोतेजनीं ॥९६॥
मुनि ह्मणे मंदोदरीजन्मकथा ॥ तुवां पुसिली गा भारता ॥ तरी ब्रह्मोत्तरखंडवार्ता ॥ अंशविष्णूचा ॥९७॥
आतां असो हे कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ते परिसिजे सकळ श्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥९८॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ मंदोदरीजन्मकथनप्रकारू ॥ सप्तद्शोऽध्यायीं कथियेला ॥९९॥
॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥ शुभंभवतु ॥
॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके सप्तदशोऽध्यायः समाप्तः ॥