कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय ११

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ ऋषे तूं ज्ञानसागरींचा डोहो ॥ सर्व फेडिला संदेहो ॥ माझिये मनींचा ॥१॥

परि स्वामी येक पुसणें ॥ परब्रह्म कैसें जाणणें ॥ तें सांगा जी निजवचनें ॥ मज बालकासी ॥२॥

मग ऋषी ह्मणे गा भारता ॥ म्यां पृथ्वी पाहिली भ्रमतां ॥ परि तुजसारिखा श्रोता ॥ न देखों कोठें ॥३॥

तरी राया ऐकें वचन ॥ जें ओतप्रोत परिपूर्ण ॥ तें परब्रह्म निर्गुण ॥ सांगो तुज ॥४॥

जें अलिप्त षट्‍चक्रा ॥ आनंदघन ज्ञानमात्रा ॥ तें अगोचर सर्वशास्त्रां ॥ परब्रह्म ॥५॥

द्रष्टा दृश्य दर्शन ॥ ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान ॥ हे त्रिपुटी जेथें लक्षण ॥ तें परब्रह्म ॥ ६॥

ज्ञान ह्मणों तरी नाहीं जाणीव ॥ अज्ञान ह्मणों तरी नाहीं नेणीव ॥ अभाव तरी नवलठेव ॥ आनंदाची ॥७॥

आतां अभाव तेंचि शून्य ॥ हें शून्यवांदियांचें मत जघन्यं ॥ परि हें शिरीं न घे तो धन्य ॥ ब्रह्मविद ॥८॥

आहे ह्मणोनि घ्यावें कैसे ॥ नाहीं ह्मणो तरी सांडितां हासें ॥ स्फटिकशिळेचें पोट जैसें ॥ तैसें तें चैतन्य ॥९॥

ब्रह्मगोळा व्यापूनि उरला ॥ तो गगना ऐसा गमला ॥ परि राम स्वयंप्रकाशला ॥ तो निर्मूळ पैं ॥१०॥

नभीं अभ्र नाथिलें दिसें ॥ ब्रह्मीं मायापडळ तैसें ॥ तें विरालिया अशेष अंशें ॥ केवळ ब्रह्म ॥११॥

तये मायेपासुनि समग्र ॥ जाहला चराचर विस्तार ॥ परि न करी स्पर्शमात्र ॥ निर्गुण तें ॥१२॥

ऐसें ब्रह्म निर्गुण ॥ तें सर्वेश्र्वराचेंनिजरूप पूर्ण ॥ चैतन्यसांचा ॥ अधिकार पूर्ण ॥ मूळमायेसी ॥१३॥

माया ब्रह्मींचें वीर्यजात ॥ सुबह्म निर्विकारी सत्य ॥ तेथें अन्यथा जें भासत ॥ तो विवर्तचि पैं ॥१४॥

जैसा दृष्टीपुढें दोर ॥ त्याचा न मोडतां आकार ॥ मग नाथिला भासे थोर ॥ महासर्प ॥१५॥

तो निजाकारें निर्विकृत ॥ जैसें भानुबिंब उदकांत ॥ तेथें लटिकाचि सूर्य भासत ॥ तोचि विवर्त ॥१६॥

भारता तया विवर्तासी ॥ गुणसाम्य ह्मणती ऋषी ॥ तेचि होय ईश्वरासी ॥ अवस्था उन्मनी ॥१७॥

जे तरी उन्मनी बोलिली ॥ ते चैतन्यें आधिष्टिली ॥ मग शुद्धसत्वें बोलिला ॥ महामाया ते ॥१८॥

ते मायेचें सत्वलक्षण ॥ करी ब्रह्माचें अनुसंधान ॥ त्या सत्वगुणाचें अनुसंधान ॥ ते महामाया ॥१९॥

कीं येकासि ब्रह्म ऐसें ज्ञान ॥ तेचि माया दुजिया जाण ॥ यासी ब्रह्मविवर्ताची खुण ॥ बोलिजे पैं ॥२०॥

जेवढा ब्रह्मयाचा विस्तार ॥ तेवढा मायेचा पसर ॥ नाथिलेपणाचा आकार ॥ मांडिला पैं ॥२१॥

केलें दुर्घटपणाचें भूषण ॥ जरी होतसे घटप्रमाण ॥ तयेसि नवतैसाचि ह्मणवून ॥ अघट हे ॥२२॥

हे न घडे तें ठायी घडवी ॥ आपुली जाणोनियां पंदवी ॥ परि सृष्ट्यादि व्यापारीं नाचवी ॥ चैतन्यासी ॥२३॥

हे मिथ्याभूत माया ॥ आणि विश्र्वमायामया ॥ परब्रह्म तें अद्दया ॥ प्रसिद्ध पैं ॥२४॥

जैसें स्वप्नामाजीला सुख ॥ प्राणिया आभासे अलोलिक ॥ परि तें विचारितां सकळिक ॥ होय मिथ्या ॥२५॥

तैसी हे असंभाव्य निर्वचनी ॥ आभासे मिथ्या हो‍उनी ॥ कीं गंधर्वनगर गगनी ॥ नाथिलें भासे ॥२६॥

ऐसी हे माया बोलिला ॥ ते चैतन्यें अधिष्ठिली ॥ ह्मणोनि दोर्घ होती भलीं ॥ प्रकृतिपुरुषें ॥२७॥

यया दोघांची संगती ॥ क्षण येकही भिन्न न होती ॥ कीं तमतेजाची संगती ॥ वेगळी नव्हें ॥२८॥

नातरी अंतरीं पावक सर्वातें ॥ कीं तरंगं व्यापूनि उदक वर्तें ॥ तैसें मायासत्व उपजतें ॥ चैतन्येसीं ॥२९॥

जेवीं उपजतां घटमठादिक ॥ त्यां आधींच गगन व्यापक ॥ तैसें पावे चैतन्य येक ॥ स्फूर्ति मायेसी ॥३०॥

माया व्यापक असे सकळ ॥ ते मायोपाधी केवळ ॥ परि मूळप्रकृतीसि वेगळ ॥ वर्तत असे ॥३१॥

तंव आक्षेप करी भूपती ॥ कीं प्रकृतिपुरुषें निजशक्ती ॥ सर्वेंचि ह्मणतां भिन्न प्रकृती ॥ गूढार्थपणे ॥३२॥

तरी याचा द्वितीया अर्थ ॥ माझा संदेह करीं व्यर्थ ॥ मग सांगती उक्तार्थ ॥ वैशंपायन ॥३३॥

राया पुरुषें साक्षित्वपणें ॥ मूळप्रकृतीमाजी वसणें ॥ तेथें निजप्रकाशें जाणणें ॥ प्रकृतीसी ॥३४॥

परमहंस तो ज्ञेय ज्ञाता ॥ तो वैद्य तोचि वेत्ता ॥ ऐशी असोनि अभिन्नता ॥ नटलें जग ॥३५॥

तो भास तो निराभास ॥ ते प्रकाश तो स्वयंप्रकाश ॥ परिपूर्ण असे व्यक्तीस ॥ सुनाही दोघां ॥३६॥

या दोघांचा संबंध ॥ क्षण येक न देखों भेद ॥ जैसा सायकुडीसि नव्हे भेद ॥ येकेंविण येक ॥३७॥

पुरुष जाणे वोखटें खरें ॥ परि स्त्रियेचे बुद्धी विचरे ॥ तेथें ज्ञान मुकोनि संचरे ॥ अज्ञान पैं ॥३८॥

कीं द्रव्यें भुलले मत्त प्राणी ॥ नातरी भाव तस्करामनीं ॥ पुढील होणार जाणोनी ॥ विसरे जैसा ॥३९॥

हा स्वयंज्योति विज्ञानात्मा ॥ येणें अनुग्रहीत जीवात्मा ॥ परि जीव जाणे त्या उत्तमा ॥ पुरुषासि पैं ॥४०॥

आणि प्रवृत्ति निवृत्ति मायेची ॥ करावया धणी पुरुषाची ॥ पुरुषा जाणवया मायेची ॥ दृष्टी न पुरे ॥४१॥

ऐसा असे हा सर्वेश्र्वर ॥ ह्मणोनियां शाहणा थोर ॥ त्यासि अमूर्त कीं मूर्तविचार ॥ बोलों न ये ॥४२॥

सगुण ब्रह्में चेष्टविली ॥ माया महत्वातें व्याली ॥ सृष्टी व्हावी ऐसी उपजली ॥ इच्छा तियेसी ॥४३॥

तेंचि महत्तत्व जाण ॥ येथें मायेचें शुद्धपण ॥ मग तेथें रजतम गुण ॥ जाहले सत्त्वीं ॥४४॥

ऐसी ते अक्षोम्य माया ॥ सर्वेश्र्वरा अधिष्ठिलीया ॥ मागुती ते प्रसवली तयां ॥ त्रिविधताप अहंकार ॥४५॥

ते शक्ती सहज उन्मत्ती ॥ ज्ञानक्रिया द्रव्यशक्ती ॥ प्रसवली रज सत्व तमाप्रती ॥ अनुक्रमें गा ॥४६॥

मग चैतन्य अवलोकितां ॥ द्रव्यशक्तीचेनि सहिता ॥ तम जाहला प्रसवता ॥ गगनातें पैं ॥४७॥

मग तये गगनाचे पोटीं ॥ जाहली वायुतेजांची पेटी ॥ तया पासाव उदक सृष्टी ॥ जीवनीं जाहली ॥४८॥

ऐसीं पंच महाभूतें प्रसिद्धे ॥ पंचवीस गुणांहीं सिद्धें ॥ शब्द स्पर्श रूप रस गंधें ॥ अनुक्रमें गा ॥४९॥

आतां क्रियाशक्तीचेनि संगें ॥ राजसअहंकाराचेनि योगें ॥ इद्रियांचे लागवेगें ॥ जन्मलीं पंचदश ॥५०॥

क्षोत्र नेत्र त्वचा जिव्हा घ्राण ॥ हीं पंच ज्ञानेंद्रियें जाण ॥ वाचा पाणि पाद शिश्न गुद जाण ॥ कर्मेंद्रिये हीं ॥५१॥

समान व्यान उदान ॥ अपान आणिक प्राण ॥ हा पंचदश तत्त्वगुण ॥ वर्ते राजसीं ॥५२॥

तैसेंचि सात्विक अहंकारें ॥ ज्ञानशक्तिच्या साह्याकारें ॥ अंतःकरणें जाहलीं थोरें ॥ जाणिजे चार ॥५३॥

जैसा रवि चाले आकशीं ॥ चतुर्भेदें भिन्नत्व तेजासी ॥ चारी प्रहर बोलती बहुवसीं ॥ परि येकचि दिन ॥५४॥

तैसें मन बुद्धि चित्त कारण ॥ परि येकचि अंतःकरण ॥ आतां ऐकें याचें लक्षण ॥ त्रिविध पैं ॥५५॥

सात्विकीं असे चित्तत्व ॥ तंव कर्ता भोक्ता सर्व ॥ आतां जाण राजसप्रसव ॥ सावधशब्दें ॥५६॥

तामसतत्त्वाचा विचार ॥ तो भोगी साधु हा निर्धार ॥ ऐसा त्रिविधतत्त्वांचा आकार ॥ हेचि त्रिपुटी ॥५७॥

भोग्य भोजन आणि भोक्तां ॥ ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता ॥ कार्य करण आणि कर्ता ॥ ऐसी हे त्रिपुटी ॥५८॥

भोग्य बोलिजे तामस ॥ भोगणें प्राप्त इंद्रियांस ॥ भोक्ता असे अंतःकरणास ॥ ऐसें जाणा ॥५९॥

पंच विषय पंच भूतें ॥ तामस‍अहंकारजनितें ॥ तेथें तत्त्वें असती समस्तें ॥ मिळालीं गा ॥६०॥

तंव राहो ह्मणे मुने परियेसीं ॥ तत्त्वें मिळलीं महाभूतांसी ॥ हे कथा आहे कैसी ॥ तें सांगा मज ॥६१॥

मग ह्मणे ऋषिचाळक ॥ येकयेक भूतीं साधक ॥ साधन प्रिय सन्निकर्ष ॥ येकेक भूतीं ॥६२॥

अंतःकरणाचेनि भोगें ॥ श्रोत्रेंद्रियांचेनि योगें ॥ वाचेसहित शब्द निघे ॥ गगनामाजी ॥६३॥

मन समानाचेनि आधारें ॥ त्त्वचा इंद्रियांचेनि द्वारें ॥ अपान‍इंद्रियांसहित विवरे ॥ स्वर्शगुण पवनीं ॥६४॥

बुद्धी उदानासी जाहली भेटी ॥ चक्षुरिद्रियें पाडिली मिठी ॥ पाद‍इंद्रियां सहित पोटीं ॥ रूपगूण तेजीं ॥६५॥

चित्त प्राणाचेनि आवेशें ॥ जिव्हेचेनि समरसें ॥ रसगुण उदकीं प्रवेशे ॥ शिष्टासहित ॥६६॥

अहंकार आपणाचेनि बडिवारें ॥ ज्ञानेंद्रियांचे साहाकारें ॥ वायुसहित गंधगुण संचले ॥ पृथ्वीमाजी ॥६७॥

ऐसीं विसावे भूतरूपासी ॥ च्यारी च्यारी मिळालीं येकेकासी ॥ पंचविसांची जाहलीं ऐसीं ॥ पंचमहाभूतें ॥६८॥

स्थूळ सूक्ष्म अवस्थे ॥ परस्परें मिळालीं भूतें ॥ मग विस्तारूनियां समस्तें ॥ प्रकटलीं गा ॥३९॥

देवें स्व‍इच्छें आपुले ॥ प्रपंचातें विस्तारिलें ॥ आणि या पंचभूतांचे केले ॥ भागद्दय ॥७०॥

तयांमाजी येका भागाचें ॥ आणि पंचविसां कळांचें ॥ आरंभिलें सर्वेश्र्वराचें ॥ लिंगदेह ॥७१॥

दुजा भाग जो उरला ॥ त्याचा स्थूळदेह केला ॥ पंचीकृत आरंभिला ॥ सर्वेश्र्वरें ॥७२॥

तंव ह्मणे भारतरावो ॥ या दृष्टांताचा कोण भावो ॥ ॠषि ह्मणे राया संदेहो ॥ फेडीन तुझा ॥७३॥

आतां तत्त्वें पंचवीस ॥ जीं हिरण्यगभींचें अंश ॥ तें लिंगदेह साभास ॥ जाहलें देवाचें ॥७४॥

श्रोत्र दिशा त्वचा पवन ॥ चक्षु सूर्य जिव्हा वरूण ॥ अश्र्विनौदेव ते घ्राण ॥ पांचवा अग्नी ॥७५॥

पाद उपेद्रं गुद नैऋती ॥ पाणि इंद्र शिश्र्न प्रजापती ॥ अंतःकरण श्रीपती ॥ अहंकार रुद्र ॥७६॥

मन तोचि होय चंद्रमा ॥ बुद्धि बोलिजे तरी ब्रह्मा ॥ चित्तस्थान तें उत्तमा ॥ नारायणासी ॥७७॥

जें ब्रह्मांडींचें विवरण ॥ तेचि जाणें पंचप्राण ॥ दशधाभेदें असती भिन्न ॥ बोलिजेले ॥७८॥

ऐशीं हीं पंचवीस तत्वें ॥ रचिलीं लिंगदेहा अंगवें ॥ परि हें स्थूळदेहीं न पावे ॥ विषयसुखासी ॥७९॥

आतां स्थूळदेह निर्माण ॥ तेंही नसे पंचीकरणाविण ॥ ह्मणवोनि गा पंचीकरण ॥ आरंभिलें ॥८०॥

ऐकैक भूत पंचधा भागिलें ॥ तें पांच पांचांशीं मेळविले ॥ तया नाम असे बोलिलें ॥ पंचीकृत ॥८१॥

आपुले चारी भाग वेंचिले ॥ आणि चौघाचें चारी घेतले ॥ तें जाणावें जी वहिलें ॥ पंचीकृत ॥८२॥

सर्वेश्र्वरें अवलोकिलें ॥ गंगन पंचभाग जाहलें ॥ परि आपणापें राहिलें ॥ अंतःकरणरूपें ॥८३॥

व्यान श्रोत्र शब्द वाचा ॥ आकाशभाग असे चौघांचा ॥ पवनादिकीं पृथ्वीचा ॥ अनुक्रमेसीं ॥८४॥

पंचभाग जाहले वायूचे ॥ मन समान आणि त्वचेचे ॥ स्पर्शेद्रियीं पांचांचे ॥ दीधले भाग ॥८५॥

तेज पंचधा विभागिलें ॥ बुद्धि उदाने चक्षु भले ॥ रूप पाद ऐसें पंचागळें ॥ अनुक्रमेंसीं ॥८६॥

आपाचे पांच भाग जाहले ॥ चित्त अपान जिव्हा रससारें ॥ धरणीवरी भलें मिळालें ॥ अनुक्रमें गगनापासुनी ॥८७॥

धरणी पंचभागें प्रसिद्ध ॥ तेथें अहंकाराचा शब्द ॥ प्राण घ्राण चौथा सिद्ध ॥ वायु पांचवा ॥८८॥

ऐशीं हीं पंचीकृतें ॥ विकासलीं पंचमहाभुतें ॥ गुण कर्म धर्म सहितें ॥ उपजलीं गा ॥८९॥

आतां सांगों कवणाचे कोण ॥ अनुभवीं कर्म धर्म गुण ॥ तें सकळ ऐक पां विवरण ॥ भारता तूं ॥९०॥

धर्म जाणिजे अच्छिद्रता ॥ कर्म हें अवकाश निभ्रांता ॥ शब्दगुण जाण सर्वथा ॥ गगनाचा पैं ॥९१॥

शब्द स्पर्श हे गुण दोन ॥ धर्म तो तरी चांचल्यपण ॥ शोक आनंद कर्म जाण ॥ वायूचें पैं ॥९२॥

तेजाचे असती तीन गुण ॥ शब्द स्पर्श रूप जाण ॥ कर्म जाणिजे प्रज्वलपण ॥ उष्णधर्मेंसीं ॥९३॥

शब्द रस सीतस्पर्श ॥ हे उदकगुण समरस ॥ द्रव्य कर्म तें विशेष ॥ वाहिलेपण ॥९४॥

पृथ्वी पंचगुणविध ॥ शब्द स्पर्श रस गंध ॥ कठिनत्व धर्मे प्रसिद्ध ॥ कर्म धारणादि ॥९५॥

ऐसे एकैकभूतीं येक ॥ विशेषगुण मुख्य नायक ॥ येरभूतांचा गुण अनाविक ॥ वर्ते कार्यकारणत्वें ॥९६॥

हीं पंचभूतांची पंचीकृतें ॥ कर्दम करूनि अंनतें ॥ महातेजाचे प्रभावें समस्तें ॥ शोभतीं जाहलीं ॥९७॥

मग त्याचें ब्रह्में निर्मळें ॥ देहभावें अंड रचिलें ॥ देवतामय लिंगदेह केलें ॥ स्थूळावेष्टुनी ॥९८॥

तयाचें सप्तपाताळ चरण ॥ तेथें त्रिविक्रमाचें अधिष्ठान ॥ पादतळावरी जघन ॥ वरी सत्य ॥९९॥

सप्तसागर तें उदर ॥ दिशा पोकळ ब्रह्मरंघ्र ॥ नाडीचक्र तें समग्र ॥ नानासरिता ॥१००॥

गुल्मवल्ली आणि तृण ॥ या रोमावळी जाण ॥ जळवृष्टी तें रेत पूर्ण ॥ विराटाचें ॥१॥

जनलोक तें मुख्यकमळ ॥ जठरवन्ही वडवानळ ॥ तयासमीप भूमंडळ ॥ तें नाभिस्थान ॥२॥

महलोंक तो कंठ ॥ तपोलोक तो ललाट ॥ ऐसें सप्तलोकीं मस्तक नीट ॥ ब्रह्मभुवन ॥३॥

इंद्रलोक ते हस्त ॥ स्नेह नाम जाणीजे दंत ॥ यम दाढा विख्यात ॥ वरुण जिव्हा ॥४॥

ज्योतिर्लोक तें सकळ ॥ विराटाचें वक्षस्थळ ॥ आणि राया सूर्यमंडळ ॥ नेत्र होती ॥५॥

नैऋत्यलोक गुदस्थान ॥ प्रजापती तो जाण शिश्न ॥ ऐसें हें स्थूळदेह निर्माण ॥ विराटाचें ॥६॥

हीं कर्में येका जीवासी ॥ परि तो फिरे लक्षचौर्‍यायशी ॥ सदैवपण ब्रह्माडांसी ॥ माजी सकळ जीव ॥७॥

आतां यया ब्रह्मांडगोलका ॥ असती सप्त कंचुका ॥ त्या येकाहूनि येका ॥ अधिक दशगुण ॥८॥

पृथ्वी आप तेज वायु गगन ॥ अहंकार आणि महत्त्व जाण ॥ येणेपरी सप्तावरण ॥ अनुक्रमेंसीं ॥९॥

ऐसा सप्तावरण वेष्टीत पिंड ॥ तैसेंचि जाण ब्रह्मांड ॥ ऐसीं ब्रह्मांडे उदंड ॥ निपजती मायेसी ॥११०॥

आतां असो हें सुष्टीब्रह्मांड ॥ तेथे अवस्था अखंड ॥ हा विराटाचा स्थूळ पिंड ॥ सृष्टीरचनेचा ॥११॥

हे स्थूळ सृष्टि अवस्था ॥ अभिमानी ब्रह्मा सृष्टिकती ॥ तोचि प्राणासि सर्वथा ॥ मात्रा अकार ॥१२॥

हिरण्यगभीं लिंगदेहो ॥ तेथें ब्रह्मादि तिन्ही देवो ॥ अवस्थस्थितीचें नांव ॥ स्वप्नावस्था ॥१३॥

तो हिरण्यगर्भ आणि श्रुती ॥ यांचा अभिमानी विष्णुशक्ती ॥ तया तिघांचेनि उद्धरे ती ॥ उकारमात्रा ॥१४॥

आतां कारणदेह प्रकृती ॥ ते देहासि महासुषुप्ती ॥ याचा अभिमानी देव सुषुप्ती ॥ आपण रुद्र ॥१५॥

तया तिघांचा आधारु ॥ करी मात्रा प्रकारु ॥ ऐसा ओंकाराचा विस्तारु ॥ सकळजनां ॥१६॥

हिरण्यगर्भ आणि माया ॥ हे सर्वेश्र्वराचे देहत्रया ॥ तेचि असे उप्तत्तिप्रळया ॥ अवस्था पैं ॥१७॥

सत्व रज तमोगुण ॥ हे प्रणवाचे तिन्ही चरण ॥ अकार दुजा उकार जाण ॥ आणि मकार तो ॥१८॥

त्या मंत्राचा करीं विचारु ॥ तेथें अभिमानी सूकरु ॥ ब्रह्मा विष्णु आणि रुद्रु ॥ तिघे जण ॥१९॥

हे असे वेदवाणी ॥ परि अनारिसें ब्रह्मपुराणीं ॥ कीं तळहातीं जन्मलें देव तिन्हीं ॥ मायादेवीचे ॥१२०॥

तंव ह्मणे राजा भारत ॥ हा सांगाजी उक्तार्थ ॥ मग सांगे ऋषिसुत ॥ भारताप्रती ॥२१॥

कीं मायेचें शुद्धपण ॥ निजरूपाचें करी ध्यान ॥ तंव उमटला ललाटींहून ॥ फोड येंक ॥२२॥

तये दुःखे दुश्र्वित्त जाहली ॥ ह्मणवूनि स्वरूपीं भुली पडली ॥ तंव तो फोड फुटूनि निघालीं ॥ बाळकें तिन्ही ॥२३॥

तेचि सत्व रज तम गुण ॥ तेचि विष्णु ब्रह्मा रुद्रजाण ॥ मग ब्रह्मयासी बोले वचन ॥ मायादेवी ॥२४॥

ह्मणे गा पुत्रा अवधारीं ॥ तूं माझा अंगिकार करीं ॥ ब्रह्मा ह्मणे तूं माता परी ॥ बोल अनारिसा ॥२५॥

हा न घडे हो विचार ॥ तंव येरीनें शापूनि केला अंगार ॥ याचिपरी विष्णुकुमर ॥ केला भस्म ॥२६॥

शेवटी रुद्रा लागली खंती ॥ तेणें ते अंगीं लाविली विभूती ॥ तंव माया आली त्याप्रती ॥ जाचावया ॥२७॥

ह्मणे अरेरे रुद्रा सुता ॥ तूं होयीं मज अंगिकारिता ॥ तंव तो जाहला विनविता ॥ मायेप्रती ॥२८॥

ह्मणे तुझे पाळीन वचन ॥ परि हे उठवीं दोघेजण ॥ तंव सजीव केले नंदन ॥ मायदेवीनें ॥२९॥

मुनि ह्मणे गा भारता ॥ तुवां पुसिली उप्तत्तिकथा ॥ ते सांगीतली स्वभावता ॥ समयानुसार ॥१३०॥

तरी ऐसा हा प्रपंच भला ॥ संकलितपणें सांगीतला ॥ हा सर्व विस्तार जाहला ॥ परब्रह्माचा ॥३१॥

ब्रह्म तें आदिअंतीं असे ॥ मध्यें प्रपंचाकार दिसे ॥ कीं आद्यंत बीजसाळी असें ॥ मध्यें तृणाकार ॥३२॥

बीजापासूनि होय विस्तार ॥ अंतीं बीजचि हा निर्धार ॥ अवस्थाविशेषें आकार ॥ मध्यें लटिकाची ॥३३॥

जैसीं केश नखें संल्लग्नें ॥ तीं चेतन किंवा अचेंतनें ॥ परि देहावीण कवणें ॥ निवडावीं पैं ॥३४॥

ऐसें ब्रह्म खल्विद । बोले श्रुति वेदसिद्ध ॥ जो हें जाणें तो बुध ॥ महाज्ञाता ॥३५॥

तंव रावो करी विनंती ॥ कीं शेव ब्रह्म बोलती वेदांती ॥ मग विषयसंगें कां भ्रमती ॥ भवसागरीं ॥३६॥

आतां वेशंपायन सांगेल ॥ तें जन्मेजय परिसील ॥ तेचि कथा अनुवादिजेल ॥ श्रोतयांप्रती ॥३७॥

आतां याचिये पुढील कथा ॥ ऋषि सांगेल भारता ॥ ते ऐकावी पुण्यलता ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥३८॥

॥ इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ पंचीकरणकथापरिकरू ॥ एकाद्शोऽध्यायीं कथियेली ॥१३९॥

॥ श्रीगोपालष्णार्पणमस्तु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके एकादशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP