प्रतिष्ठया सार्वभौमं, सद्मना भुवनत्रयम् ।
पूजादिना ब्रह्मलोकं, त्रिभिर्मत्साम्यतामियात् ॥५२॥
मामेव नैरपेक्ष्येण, भक्तियोगेन विन्दति ।
भक्तियोगं स लभते, एवं यः पूजयेत माम् ॥५३॥
जो मूर्तिप्रतिष्ठा करुनि ठाये । तो सार्वभौम राज्य लाहे ।
जो देवालय करी स्वयें । तो स्वामी होये तिहीं लोकीं ॥८३॥
जो करी पूजाविधान । तो पावे ब्रह्मसदन ।
ये तीनी जो करी आपण । तो मजसमान ऐश्वर्य पावे ॥८४॥
ऐसे हे तिघे साधक । पोटींहूनि सकामुक ।
कामनेसारखे लोक । ते आवश्यक पावती ॥८५॥
ज्यासी माझें निष्काम भजन । त्याचे प्राप्तीचें निजलक्षण ।
तें अत्यादरें श्रीकृष्ण । स्वानंदें पूर्ण सांगत ॥८६॥
मज मुख्यत्वें जीवीं धरुन । ज्यासी माझें निष्काम भजन ।
निष्कामता जे अनन्य । ते पुरुष जाण मी होती ॥८७॥
तो वर्तमानदेहीं असतां । माझें निजरुप होय तत्त्वतां ।
त्या आम्हां आंतौता । भेद सर्वथा असेना ॥८८॥
करितां निष्काम भजन । भक्त झाला मजसमान ।
’समान’ म्हणावया जाण । वेगळेपणा असेना ॥८९॥
एवं भक्त तो मजभीतरीं । मी भक्ताआंतबाहेरी ।
ऐसे मिळाले परस्परीं । निजभक्तजनावरी नांदत ॥३९०॥
गूळ जेवीं गोडियेसी । कां कल्लोळ जैसा सागरासी ।
ऐशिया निजभक्तीपाशीं । आम्हां तयांसी रहिवासु ॥९१॥
ऐशी निष्काम जो भक्ति करी । तो धन्य धन्य चराचरीं ।;
जो देवाद्विजांची वृत्ति हरी । तो पचे अघोरीं तें ऐक ॥९२॥