वस्त्रोपवीताभरणपत्रस्त्रग्गन्धलेपनैः।
अलंकुर्वीत सप्रेम मद्भक्तो मां यथोचितम् ॥३२॥
देवो स्वरुपें घनसांवळा । कांसे कसावा सोनसळा ।
हेमसूत्र अर्पूनि गळां । रत्नमेखळा बाणावी ॥७९॥
वांकीअंदुवांचा गजर । चरणीं नूपुरांचा झणत्कार ।
मुकुटकुंडलें मनोहर । हृदयीं गंभीर महापदक ॥२८०॥
जडित मोतिलग पत्रवेली । अतिशोभित दिसे निढळीं ।
तिलक पिंवळा तयातळीं । कंठीं झळाळी कौस्तुभ ॥८१॥
बाहीं बाहुवटे वीरकंकणें । करमुद्रिका रत्नखेवणें ।
पीतांबर झळके कोणें मानें । रविबिंब तेणें लाजविलें ॥८२॥
सांवळे अंगीं गोमटी । शुभ्र चंदनाची शोभे उटी ।
सुमनमाळा वीरगुंठीं । होत घरटीं मधुकरां ॥८३॥
वैजयंती वनमाळा । आपाद रुळे गळां ।
घवघवीत दिसे डोळां । घनसांवळा शोभत ॥८४॥
एवं वस्त्रालंकारभूषणीं । स्वयें पूजावा शार्ङगपाणी ।
पूजेहूनियां मनीं । श्रद्धा कोटिगुणीं असावी ॥८५॥
भक्त असो अतिसंपन्न। अथवा हो कां अतिनिर्धन ।
जेथ शुद्ध श्रद्धा संपूर्ण । तेथ नारायण संतुष्टे ॥८६॥
सकळ पूजेचें कारण । मुख्य श्रद्धाचि गा प्रमाण ।
अत्यंत श्रद्धें जो संपन्न । तो देवाचा पूर्ण पढियंता ॥८७॥