मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सत्ताविसावा|
श्लोक १४ वा

एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अस्थिरायां विकल्पः स्यात्, स्थण्डिले तु भवेद्‌द्वयम् ।

स्नपनं त्वविलेप्यायामन्यत्र परिमार्जनम् ॥१४॥

जंगम प्रतिमांच्या ठायीं । आवाहन विसर्जन पाहीं ।

एकीं आहे एकीं नाहीं । ऐक तेही विभाग ॥८॥

शालग्राममूर्तीसी जाण । स्वयंभ माझें अधिष्ठान ।

तेथ आवाहनविसर्जन । सर्वथा जाण लागेना ॥९॥

शालग्रामाचा कुटका । ज्याचे पूजेसी आहे फुटका ।

तेथ परमात्मा निजसखा । सर्वदा देखा नांदत ॥११०॥

इतर मूर्ती जंगमा जाण । तेथ आवाहनविसर्जन ।

साक्षेपें करावें आपण । हें विधिविधान आगमोक्त ॥११॥

स्थंडिलीं मूर्तिआवाहन । सवेंचि पूजांतीं विसर्जन ।

हें उभय भावनाविधान । स्थंडिलीं जाण आवश्यक ॥१२॥

आपले हृदयींचा चिद्धन । मूर्तीमाजीं कीजे आवाहन ।

पूजांतीं करुनि विसर्जन । देव हृदयीं जाण ठेवावा ॥१३॥

एथ आपणचि ब्रह्म परिपूर्ण । हेंचि व्हावया निजस्मरण ।

आवाहनविसर्जनें जाण । निजात्म आठवण साधका ॥१४॥

हा आगमींचा निजात्मभावो । आपणचि आपला देवो ।

आपला आपण पूजक पहा हो । हा निजात्म-आठवो निजपूजे ॥१५॥

’देव होऊनि देव पूजिजे’ । हें निजात्मता गोड खाजें ।

उपासनाकांड-व्याजें । उद्धवासी दीजे श्रीकृष्णें ॥१६॥

हे निजात्मता निजगोडी । प्रतिपदीं न लभतां रोकडी ।

उपासना-तडातोडी । कोण कोरडी सोशील ॥१७॥

हें आगमींचें निजगुह्य जाण । प्रतिपादीं सुखसंपन्न ।

साधक स्वयें होती चिद्धन । तें हें उपासन उद्धवा ॥१८॥;

ऐसें ऐकतां कृष्णवचन । उद्धव स्वानंदें झाला पूर्ण ।

धांवोनि धरिले श्रीकृष्णचरण । म्हणे समूळ निरुपण मज सांग ॥१९॥

तंव देव म्हणे स्थिर राहें । जें हें आगमोक्त गुह्य आहे ।

तें माझे कृपेंवीण पाहें । प्राप्त नोहे साधकां ॥१२०॥

आगमोक्त गुह्य गहन । असो हें माझें गुप्तधन ।;

तुवां पुशिलें पूजाविधान । ऐक सावधान उद्धवा ॥२१॥

लेप्या लेख्या ज्या मूर्ति जाण । त्यांसीं करावेंना स्नान ।

इतरां मूर्तीसी स्नपन । यथाविधान करावें ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP