एतद्वै सर्ववर्णानामाश्रमाणां च संमतम् ।
श्रेयसामुत्तमं मन्ये, स्त्रीशूद्राणां च मानद ॥४॥
एवं श्रेष्ठपरंपरा । तुवां प्रकट केली दीनोद्धारा ।
दीनदयाळु तूं खरा । याही विचारा अवधारीं ॥२६॥
आश्रमधर्मविधिविधान । तेथ अधिकारी द्विजन्मे जन ।
त्यांसी कर्मबाधा बाधी गहन । गुंतले ब्राह्मण कर्मठत्वें ॥२७॥
तैसें नव्हे तुझें भजन । भजनाधिकारी सर्व वर्ण ।
दीनोद्धारी भजन पूर्ण । स्त्रिया शूद्रजन उद्धरिले ॥२८॥
कर्मीं गुंतले उत्तमोत्तम । भजनें उद्धरिले अधमाधम ।
भजनें सर्वांसही सुगम । भजनें स्वधर्मसार्थक ॥२९॥
भजनमहिमा निःसीम । अधमा पदवी उत्तमोत्तम ।
भजनहीन जे उत्तम । ते अधमाधम स्वयें होती ॥३०॥
सर्व वर्ण आणि आश्रम । भगवद्भजनें गति उत्तम ।
हेंचि भक्तीचें निजवर्म । भक्त निष्काम जाणती ॥३१॥
करुनियां भगवद्भक्ती । भक्त स्वयें भगवद्रूप होती ।
यालागीं भक्तांतें श्रीपती । अतिप्रीतीं मानिसी ॥३२॥
तुझें भजनपूजन करितां । तूं निजभक्तांचा होसी त्राता ।
तूंचि भक्तांसी सन्मान-दाता । ते पूजनकथा मज सांग ॥३३॥