अर्चायां स्थण्डिलेऽग्नौ वा, सूर्ये वाऽप्सु हृदि द्विजे ।
द्रव्येण भक्तियुक्तोऽर्चेत्, स्वगुरुं माममायया ॥९॥
माझें पूजाअधिष्ठान । अष्टविध पूजास्थान ।
त्याचेंही निजलक्षण । ऊणखूण ते ऐक ॥६८॥
प्रिय ’प्रतिमा’ पूजास्थान । हें माझें प्रथम अधिष्ठान ।
कां पृथ्वीतळीं ’स्थंडिलीं’ जाण । पूजास्थान दुसरें ॥६९॥
’अग्नीचें तेज’ स्वरुप माझें । तें पूजास्थान जाण तिजें ।
’सूर्यमंडळीं’ जे पूजा कीजे । तें चवथें माझें पूजास्थान ॥७०॥
’उदकीं’ जें माझें पूजन । तें पांचवें पूजास्थान ।
’हृदयीं’ जें माझें आवाहन । तें पूजास्थान सहावें ॥७१॥
शालिग्राम केवळ अचेतन । ’ब्राह्मण’ माझें स्वरुप सचेतन ।
तें अखंडत्वें ब्रह्मपूर्ण । पूजासन्मान षोडशोपचारें ॥७२॥
ब्राह्मणीं ज्याचा ब्रह्मभावो । तो परम भाग्याचा स्वयमेवो ।
ब्रह्मादिकां पूज्य पहा हो । मी देवाधिदेवो स्वयें वंदीं ॥७३॥
सकळ पूज्यांमाजीं जाण । मुख्यत्वें पूज्य ब्राह्मण ।
तें सातवें पूजास्थान । उद्धवा जाण अतिश्रेष्ठ ॥७४॥;
सकळ पूज्यां पूज्यत्वें पूजा । जो वरिष्ठां वरिष्ठ वोजा ।
जो विनटता आत्मा माझा । वंद्य ’गुरुराजा’ सर्वांसी ॥७५॥
ज्याचे सद्भावें धरितां चरण । मी सुखावें ब्रह्म पूर्ण ।
ज्याचें मद्रूपें करितां स्तवन । मी परमात्मा जाण उल्हासें ॥७६॥
सद्गुरुचें नामस्मरण । निर्दळी भवभय दारुण ।
निवारोनी जन्ममरण । निववी संपूर्ण निजबोधें ॥७७॥
तो मी परमात्मा नारायण । गुरुरुपें प्रकटोनि जाण ।
परब्रह्माचें पूर्णपण । शिष्यद्वारा संपूर्ण प्रकाशक ॥७८॥
ब्रह्माचें परब्रह्मपण । सद्गुरुचेनि सत्य जाण ।
एव्हडें अगाध महिमान । अतिगहन गुरुचें ॥७९॥
एवं ’सद्गुरु’ ज्ञानधन । जो हरिहरां वंद्य पूर्ण ।
तो माझें सद्रूप अधिष्ठान । हें पूजास्थान आठवें ॥८०॥
हें आठवें पूजास्थान । अखंड आठवे आठवण ।
तेणें आठवें साङग संपूर्ण । उद्धवा जाण मी पूजिलों ॥८१॥;
एवं हीं आठही पूजास्थानें । तुज सांगितलीं सुलक्षणें ।
तेथलीं पूजेचीं लक्षणें । तेही भिन्नपणें सांगेन ॥८२॥
सकळ अधिष्ठानां गोडपण । जें पूजनीं होय संपूर्ण ।
तें पूजेचें मुख्य लक्षण । निजवर्म खूण ते ऐक ॥८३॥
सांडूनि लोकरंजव्यापार । त्यजूनि दांभिक उपचार ।
दवडूनि शठत्वाचा व्यवहार । भजनतत्पर सद्भावें ॥८४॥
ही अष्टौ महापूजास्थानें । येथ ’अमायिक’ जें जें भजन ।
तें तें अतिगोड पूजन । उद्धवा जाण निश्चित ॥८५॥
एथ निष्कपट जे जे सेवा । ते ते अतिवल्लभ देवाधिदेवा ।
आतां पूजाविधि आघवा । ऐक बरवा सांगेन ॥८६॥