तयाऽऽत्मभूतया पिण्डे, व्याप्ते संपूज्य तन्मयः ।
आबाह्यार्चादिषु स्थाप्य, न्यस्ताङगं मां प्रपूजयेत् ॥२४॥
जेवीं गृह प्रकाशी दीपस्थिती । तेवीं देह प्रकाशी जीवज्योती ।
ते सांगोपांग माझी मूर्ती । हृदयीं चिंतिती साकार ॥९३॥
जेवीं तूप तूपपणें थिजलें । तेंचि अवर्ण वर्णव्यक्ती आलें ।
तेवीं चैतन्य माझें मुसावलें । लीलाविग्रहें झालें साकार ॥९४॥
ऐशी ते माझी सगुण मूर्ती । चिन्मात्रतेजें हृदयदीप्ती ।
तिनें व्यापूनि देहाची स्थिती । चित्तीं निजभक्ती उपजवी ॥९५॥
देह जड मूढ अचेतन । तेथ मूर्ति प्रकटोनि चिद्धन ।
अचेतना करोनि सचेतन । करवी निजभजन उल्हासें ॥९६॥
जेवीं हरणुलीचें सोंग जाण । हरिणीरुपें नाचे आपण ।
तेवीं भक्तभावें नारायण । भजनपूजन स्वयें कर्ता ॥९७॥
यापरी अभेदभजन । मूर्ति पूजितां चिद्धन ।
पूज्य पूजक हे आठवण । सहजें जाण मावळे ॥९८॥
मावळल्या हा भजनभेद । उल्हासे भक्तीचा अभेदबोध ।
हा गुरुमार्ग अतिशुद्ध । प्रिय प्रसिद्ध मजलागीं ॥९९॥
जेथ माझी अभेदभक्ती । तेथ मी सर्वस्वें श्रीपती ।
आतुडलों भक्तांच्या हातीं । स्वानंदप्रीती उल्हासें ॥२००॥
जेवीं कां अफाट मेघजळा । धरण बांधोनि घालिजे तळां ।
तेवीं मज अनंताचा एकवळा । अभेदभजनाला आतुडे ॥१॥
अडवीं वर्षलें सैरा जळ । तेणें नुपजेचि उत्तम फळ ।
तेंचि तळां भरलिया प्रबळ । तेणें पिकती केवळ राजागरें ॥२॥
तैसें माझें स्वरुप वाडेंकोडें । अभेदभक्तांमाजीं आतुडे ।
तैं ब्रह्मानंदें गोंधळ पडे । शीग चढे भक्तीची ॥३॥
अभेदभक्तांच्या द्वारापाशीं । तीर्थें येती पवित्र व्हावयासी ।
सुरनर लागती पायांसी । मी हृषीकेशी त्यांमाजीं ॥४॥
अभेदभक्तांपाशीं देख । सकळ तीर्थें होती निर्दोख ।
भक्तीचें माहेर तें आवश्यक । मजही सुख त्यांचेनी ॥५॥
अभेद जे क्रियास्थिती । या नांव माझी उत्तम भक्ती ।
ऐसा अतिउल्हासें श्रीपती । उद्धवाप्रती बोलत ॥६॥
अभेदभक्ती वाडेंकोडें । श्रीकृष्ण सांगे उद्धवापुढें ।
कथा राहिली येरीकडे । तेंही धडफुडें स्मरेना ॥७॥
देव विसरला निरुपण । तंव उद्धवासी बाणली खूण ।
तोही विसरला उद्धवपण । कृष्णा कृष्णपण नाठवे ॥८॥
अभेदभजनाचा हरिख । देव भक्त झाले एक ।
दोघां पडोनि ठेलें ठक । परम सुख पावले ॥९॥
उद्धव निजबोधें परिपूर्ण । तरी पूजाविधानप्रश्न ।
एथ करावया काय कारण । ऐशी आशंका मन कल्पील ॥२१०॥
तरी उद्धवाच्या चित्तीं । उगा राहतांचि श्रीपती ।
जाईल निजधामाप्रती । यालागीं प्रश्नोक्ती तो पुसे ॥११॥
उपासनाखंड गुह्यज्ञान । आगमोक्तपूजाविधान ।
उद्धवमिषें श्रीकृष्ण । वेदार्थ आपण स्वयें बोले ॥१२॥
सकळ वेदार्थ शास्त्रविधी । ग्रंथीं श्रीकृष्ण प्रतिपादी ।
जैसी श्रद्धा तैसी सिद्धी । व्हावया त्रिशुद्धी साधकां ॥१३॥
असो हे ग्रंथव्युत्पत्ती । ऐकतां अद्वैतभक्ती ।
उद्धव निवाला निजचित्तीं । तेणें श्रीपति सुखावला ॥१४॥
संतोषें म्हणे श्रीकृष्ण । उद्धवा होईं सावधान ।
पुढिल पूजाविधान । तुज मी सांगेन यथोक्त ॥१५॥
पूज्य जक एकात्मता ध्यान । करोनियां दृढ धारण ।
तेंचि बाह्य पूजेलागीं जाण । करावें आवाहन प्रतिमेमाजीं ॥१६॥
प्रतिमेसंमुख आपण । आवाहनमुद्रा दाखवून ।
माझी चित्कळा संपूर्ण । प्रतिमेसी जाण भावावी ॥१७॥
तेव्हां मूर्तीचें जडपण । निःशेष न देखावें आपण ।
मूर्ति भावावी चैतन्यघन । मुख्य ’आवाहन’ या नांव ॥१८॥
गुरुमुखें मंत्र निर्दोष । तेणें मंत्रें मूर्तीसी न्यास ।
करावे सर्वांगीं सावकाश । शास्त्रविन्यास आगमोक्त ॥१९॥
एवं आवाहन संस्थापण । सन्निधि सन्निरोधन ।
संमुखीकरण स्वायतन । या मुद्रा आपण दावाव्या ॥२२०॥
अवगुंठन संकलीकरण । या अष्टौ मुद्रा दावूनि जाण ।
मग होऊनि सावधान । पूजाविधान मांडावें ॥२१॥