मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सत्ताविसावा|
श्लोक ४५ वा

एकनाथी भागवत - श्लोक ४५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


स्तवैरुच्चावचः स्तोत्रैः, पौराणैः प्राकृतैरपि ।

स्तुत्वा प्रसीद भगवन्निति वन्देत दण्डवत् ॥४५॥

माझीं स्तुतिस्तोत्रें पुराण । सादरें करावीं श्रवण ।

श्रोता मिळालिया आपण । कथानिरुपण सांगावें ॥३९॥

शुद्ध न ये स्तोत्रपठण । करितां अबद्ध गायन ।

पाठका दोष न लगे जाण । तेणें होय निर्दळण महादोषां ॥३४०॥

वेदींचें उपनिषत्पठण । कां ऋचामंत्रें हरीचें स्तवन ।

ये लौकिकीं उच्चावचें जाण । देवासी समान निजभावें ॥४१॥

पुराणींचें श्रेष्ठ स्तोत्र । अथवा पढतां नाममात ।

अर्थें भावार्थें साचार । समान श्रीधर मी मानीं ॥४२॥

नेणें वेद शास्त्र पुराण । केवळ भाळाभोळा जाण ।

तेणें करितां प्राकृत स्तवन । मी जनार्दन संतोषें ॥४३॥

वेदीं चुकल्या स्वरवर्ण । पाठका दोष बाधी गहन ।

प्राकृत करितां हरीचें स्तवन । दोषनिर्दळण तेणें होय ॥४४॥

शास्त्रश्रवण पुराणस्थिती । पाहिजे पंचमीसप्तमीव्युत्पत्ती ।

प्राकृत अबद्धही नामकीर्ती । भगवत्प्राप्तिप्रापक ॥४५॥

संस्कृत वाणी देवें केली । प्राकृत चोरापासून झाली ।

असोत या पक्षाभिमानी बोली । देवाची चालि निरभिमान ॥४६॥

वेदशास्त्र हो पुराण । कां प्राकृतभाषास्तवन ।

एथें भावचि श्रेष्ठ जाण । तेणें नारायण संतोषे ॥४७॥

देवासी प्रेमाचें पढियें कोड । न पाहे व्युत्पत्तीचें काबाड ।

भाविकांचा भावार्थचि गोड । तेणें भक्तांची भीड नुल्लंघी देवो ॥४८॥

एवं भावार्थें करितां स्तवन । देव होय भक्ताअधीन ।

तेणें भावार्थें करुनि नमन । हरिचरण वंदावे ॥४९॥

मुहूर्त निमेष क्षणेंक्षण । हरिचरणीं सुखावल्या मन ।

इतर व्यापार तेणें सुखें जाण । सहजें आपण वोसरती ॥३५०॥

जेणें तुटे माझें अनुसंधान । तें कर्म त्यागावें आपण ।

जेणें स्वरुपनिष्ठ होय मन । तें समाधान राखावें ॥५१॥

सप्रेम करितां नमन । नित्य नूतन समाधान ।

त्या नमनाचें लक्षण । लोटांगन दंडवत ॥५२॥

सुटल्या दंड सत्राणें । संमुख विमुख पाहों नेणे ।

तैशीं घालीं लोटांगणें । देहाभिमानें अहेतुक ॥५३॥

असतां देहाचें अनुसंधान । जो परमार्थें करी नमन ।

त्या नमस्काराचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP