यमादिभिर्योगपथैरान्वीक्षिक्या च विद्यया ।
ममार्चोपासनाभिर्वा, नान्यैर्योग्यं स्मरेन्मनः ॥२४॥
त्यजोनियां सकळ भोग । यमनियमेंसीं योगमार्ग ।
आसनस्थ होऊनि चांग । दे मुद्रा साङग ’आधारीं’ ॥२५०॥
तेव्हां अपान ऊर्ध्वमुखें वाढे । जों वरता ’स्वाधिष्ठाना’ चढे ।
प्राण प्राणायामें अडे । तो मागुता मुरडे नाभिस्थाना ॥५१॥
सम होतां प्राणापान । पिंडब्रह्मांडाचें शोधन ।
स्वयें वायु करी गा आपण । मलक्षालन शरीरीं ॥५२॥
कफ पित्त दोन्ही खाये । नाडींतें शोधीत जाये ।
जुने संचित मल पाहें । तेही लवलाहें निर्दळी ॥५३॥
नवल वायूचें प्रबळ बळ । पिंडब्रह्मांडींचे सकळ मळ ।
धोऊनि करी गा निर्मळ । पवित्रता केवळ महायोगें ॥५४॥
तेथें प्रगटे रोगाची परवडी । महाविघ्नांची पडे उडी ।
धांवती विकल्पाच्या कोडी । सिद्धींची रोकडी नागवण पावे ॥५५॥
इतुकीं अंगीं आदळतां जाण । साधक न सांडी जैं आंगवण ।
तैं सम होती प्राणापान । सत्य जाण उद्धवा ॥५६॥
प्राणापानांच्या मिळणीं । शक्ति चेतवे कुंडलिनी ।
ते प्राणापानांतें घेउनि । सुषुम्नास्थानीं प्रवेशे ॥५७॥
ते आद्यशक्ति अचाट । चढे पश्चिमेचा महाघाट ।
तेथें षड्चक्रांचा कडकडाट । पूर्वीच सपाट पवनें केला ॥५८॥
कुंडलिनी चालतां वाटा । चुकल्या आधिव्याधींच्या लाटा ।
बुजाल्या विकल्पांच्या वाटा । महाविघ्नांच्या झटा बाधूं न शकती ॥५९॥
साधितां उल्हाटशक्तीचे उलट । उघडे ब्रह्मरंघ्रींचें कपाट ।
तंव लोटले सहस्त्रदळाचे पाट । अतिचोखट चंद्रामृत ॥२६०॥
तें प्राशूनि कुंडलिनी बाळा । संतोषें सांडी गरळा ।
ते शरीरीं वोतली कळा । तेणें पालटला देहभाव ॥६१॥
शरीराकारें वोतिली कळा । तेणें देहो दिसे अतिसोज्जवळा ।
ना तो ब्रह्मरसाचा पुतळा । कीं उमलला कळा शांतिसुखाचा ॥६२॥
जीवाचें जीवन मुसावलें । कीं ब्रह्मविद्येसी फळ आलें ।
ना ते चैतन्या कोंब निघाले । तैसे शोभले अवयव ॥६३॥
त्या देहाचेनि लाघवें । जगाच्या डोळां सामावे ।
जीवामाजीं वावरों पावे । निजस्वभावें सबाह्य ॥६४॥
तो पवनाची करोनि पायरी । सुखें चाले गगनावरी ।
या नांव परम ’खेचरी’ । सिद्धेश्वरीं बोलिजे ॥६५॥
त्याचिया अंगींचिया दीप्ती । खद्योतप्राय गभस्ती ।
त्याचें चरणामृत वांछिती । अमरपति इंद्रचंद्र ॥६६॥
क्रमूनि औटपीठ गोल्हाट । भ्रमरगुंफादि शेवट ।
भेदूनि सोहंहंसाचें पीठ । परमात्मा प्रकट होऊनि ठाके ॥६७॥
हा योगाभ्यासें योग गहन । अवचटें कोणा साधे जाण ।
हा मार्ग गा अतिकठिण । स्वयें श्रीकृष्ण बोलिला ॥६८॥
हेंचि मानतें श्रीकृष्णनाथा । तरी आन साधन न सांगता ।
हा मूळश्लोकार्थ पाहातां । कळेल तत्त्वतां साधूंसी ॥६९॥
हा ऐकतां अतिगोड वाटे । परी करितां काळीज फाटे ।
तरी न साधेचि महाहटें । येथ ठकले लाठे सुरनर ॥२७०॥;
असो हें अत्यंत कठिण । तुज मी सांगेन गा आन ।
’आन्वीक्षिकी’ विद्या जाण । त्वंपदशोधनविवेकु ॥७१॥
तत्पदाहूनि वेगळा । पांचभौतिक तत्त्वांचा गोळा ।
चुकोनि व्यापका सकळा । कोठें निपजला एकदेशी ॥७२॥
अनादि मायाप्रवाहयोगें । तन्मात्राविषयसंगें ।
मनाचेनि संकल्पपांगें । वेगळें सवेगें मानलें ॥७३॥
मनें मानिला जो भेदु । त्यासी करावा अभेदबोधु ।
येचि अर्थीं स्वयें गोविंदु । विवेक विशदु दाखवी ॥७४॥
पांचभौतिक शरीर खरें । तेथ पृथ्वी प्रत्यक्ष जळीं विरे ।
पृथ्वीचा गंध जळीं भरे । तैं पृथ्वी सरे निःशेष ॥७५॥
त्या जळाचा जळरसु । शोधुनि जैं घे हुताशु ।
तैं जळाचा होय र्हासु । विरे निजनिःशेषु तेजतत्त्वीं ॥७६॥
त्या तेजाचें कारणरुप । गिळी वायूचा पूर्ण प्रताप ।
तेव्हां तेजाचें मावळे स्वरुप । वायूची झडप लागतां ॥७७॥
त्या वायूचा स्पर्शगुण । नेतां गगनें हिरुन ।
तेव्हां वायूचें नुरे भान । राहे मुसावोन गगनचि ॥७८॥
केवळ गगना नुरे उरी । तें गुणकार्येंसीं रिघे अहंकारीं ।
अहंकारु रिघे मायेमाझारीं । माया परमेश्वरीं मिथ्या होय ॥७९॥
रात्रि आपुलिया प्रौढीं । आंधारातें वाढवी वाढी ।
तेथ नक्षत्रें खद्योत कोडी । मिरविती गाढीं निजतेजें ॥२८०॥
ते रात्रि येतां सूर्यापुढें । स्वकार्येंसीं सगळी उडे ।
पाहों जातां मागेंपुढें । कोणीकडे असेना ॥८१॥
तेवीं परमेश्वरीं माया । कार्यकारणेंसीं गेली वायां ।
मिथ्यात्वेंचि न ये आया । नुरेचि दिसावया मागमोसु ॥८२॥
मायाप्रतिबिंबित चैतन्या । आणी ’जीव’ या अभिधाना ।
ते माया गेलिया जाणा । होय जीवपणा र्हासु ॥८३॥
बुडालें जीवशिवांचें भान । उडालें मनाचें मनपण ।
कोंदलें चैतन्यघन । परम समाधान साधकां ॥८४॥
करिताम त्वंपदाचें शोधन । होय तत्पदीं समाधान ।
हे ’आन्वीक्षिकी विद्या’ जाण । विवेकसंपन्न पावती ॥८५॥;
न करितां योगसाधन । न लगे त्वंपदाचें शोधन ।
याहोनि सुलभ साधन । तुज मी आन सांगेन ॥८६॥
जेथ कष्ट करितां तरी थोडे । परी योगाचे सकळ फळ जोडे ।
त्वंपदशोधन त्यापुढें । होय बापुडें लाजोनि ॥८७॥
ते माझी गा निजभक्ति । माझ्या रामकृष्णादि ज्या मूर्ती ।
पूजितां त्या अतिप्रीतीं । मी श्रीपती संतोषें ॥८८॥
तेथें माझें श्रवण माझें कीर्तन । माझें नाम माझें स्मरण ।
माझें ध्यान माझें भजन । माझें चिंतन सर्वदा ॥८९॥
हृदयीं माझें सदा ध्यान । मुखीं माझें नाम माझें स्तवन ।
श्रवणीं माझी कथा माझें कीर्तन । करीं माझें पूजन सर्वदा ॥२९०॥
चरणीं प्रदक्षिणा यात्रागमन । अष्टांगीं सर्वदा माझें नमन ।
ऐसें अनन्य माझें भजन । विनटलेंपण मद्भक्तीं ॥९१॥
ऐसे विनटले जे माझे भजनीं । त्यांसी मी विकलों चक्रपाणी ।
त्यांवेगळें पढियंतें कोणी । आन त्रिभुवनीं मज नाहीं ॥९२॥
यापरी करितां माझें भजन । न लगे योगादिकांचें स्मरण ।
मी भक्तिवेगळा श्रीकृष्ण । नातुडें जाण उद्धवा ॥९३॥;
अवचटें दैवगतीं येथ । योगियासी जैं घडे दुरित ।
तैं त्यासी न लगे कर्मप्रायश्चित्त । तेंचि सांगत श्रीकृष्ण ॥९४॥