एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यदृच्छया मत्कथादौ, जातश्रद्धस्तु यः पुमान् ।

न निर्विण्णो नातिसक्तो, भक्तियोगोऽस्य सिद्धिदः ॥८॥

हरिकथा अवघेचि ऐकती । परी माझी श्रद्धा नुपजे चित्तीं ।

कोणा एका अभिनवगती । श्रद्धाउत्पत्ती श्रवणेंचि होय ॥७८॥

आईक श्रद्धेचें लक्षण । जें जें करी कथाश्रवण ।

तें हृदयीं वाढे अनुसंधान । सप्रेम मनन उल्हासे ॥७९॥

नवल कथेची आवडी । दाटती हरिखाचिया कोडी ।

हृदयीं स्वानंदाची उभवी गुढी । एवढी गोडी श्रवणार्थी ॥८०॥

विषयांचें दोषदर्शन । मुख्यत्वें बाधक स्त्री आणि धन ।

आवरावीं रसना-शिश्र्न । हे आठवण अहर्निशीं ॥८१॥

घायीं आडकलें फळें । तें पानपेना उपचारबळें ।

तेवीं विषयदोष भोगमेळें । कदाकाळें शमेना ॥८२॥

येतां देखोनियां मरण । स्वयें होय कंपायमान ।

तेवीं विषयभोगदर्शन । देखोनि आपण चळीं कांपे ॥८३॥

एवं विषयीं दोषदर्शन । सर्वदा देखे आपण ।

परी त्यागालागीं जाण । सामर्थ्य पूर्ण आथीना ॥८४॥

सेवकीं राजा बंदीं धरिला । तया स्त्रीचंदनादि भोग दीधला ।

परी तो त्यासी विषप्राय जाहला । भोगीं उबगला अगत्यता ॥८५॥

एवं भोगितां त्या भोगासी । नित्य पाहे निजनिर्गमासी ।

तेवीं भोगितां हा विषयासी । अहर्निशीं अनुतापी ॥८६॥

यापरी जो नव्हे विषयासक्त । ना निधडा नव्हे विरक्त ।

त्यालागीं माझा भक्तिपंथ । मी बोलिलों निश्चित वेदवाक्यें ॥८७॥

येहींकरितां माझी भक्ती । माझ्या स्वरुपीं लागे प्रीती ।

सहजें होय विषयविरक्ती । एवं सिद्धिदाती भक्ति हे माझी ॥८८॥

मी वेदोक्त बोलिलों आपण । ते हे त्रिविध योग संपूर्ण ।

ज्ञान-कर्म-उपासन । वेदोक्त लक्षणविभाग ॥८९॥

तेथ कोण देखे दोषगुण । कोणासी दोंहीचें अदर्शन ।

मध्यम भागें वर्ते कोण । तेंही लक्षण अवधारीं ॥९०॥

जो आसक्त विषयांवरी । तो कर्ममार्गीचा अधिकारी ।

त्यासी गुणदोषांहातीं नाहीं उरी । हें सांगेल श्रीहरी पुढिले अध्यायीं ॥९१॥

जो कां विरक्त ज्ञानाधिकारी । तो गुणदोषांहूनि बाहेरी ।

तो पाहतां अवघे संसारीं । न देखे तिळभरी गुणदोष ॥९२॥

जग अवघें ब्रह्म पूर्ण । तेथ कैंचे दोषगुण ।

ऐसे कां जे ज्ञानसंपन्न । त्यां दोषदर्शन असेना ॥९३॥

अतिआसक्त ना विरक्त । ऐसे कां जे माझे भक्त ।

ते पूर्वी गुणदोष देखत । परी सांडित विवेकें ॥९४॥

भूतीं भूतात्मा मी परेश । तेथ देखों नये गुणदोष ।

ऐसे भजननिष्ठ राजहंस । ते गुणदोष सांडिती ॥९५॥

मी वेदार्थीं बोलिलों दोषगुण । ते दोषत्यागालागीं जाण ।

पराचे देखावे दोषगुण । हें वेदवचन असेना ॥९६॥

ऐसें करावें वेदार्थश्रवण । दोष त्यजूनि घ्यावा गुण ।

परी पुढिलांचे दोषगुण । सर्वथा आपण न देखावे ॥९७॥

जो ज्याचा गुणदोष पाहे । तो त्याचा पापविभागी होये ।

जो पुढिलांचे गुणदोष गाये । तो निरया जाये तेणें दोषें ॥९८॥;

आतां कर्माचा अधिकारु । सांगताहे शारंगधरु ।

तो जाणोनियां विचारु । कर्मादरु करावा ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP