एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


एतद्विद्वान्पुरा मृत्योरभवाय घटेत सः ।

अप्रमत्त इदं ज्ञात्वा, मर्त्यमप्यर्थसिद्धिदम् ॥१४॥

केवळ अस्थि चर्म मूत्र मळ । पाहतां देहो अतिकश्मळ ।

परी ब्रह्म परिपूर्ण निश्चळ । हें निर्मळ फळ येणें साधे ॥४६॥

ऐसे नरदेहाचें कारण । जाणोनि पूर्वील सज्ञान ।

सांडोनियां देहाभिमान । ब्रह्मसमाधान पावले ॥४७॥

देह निंद्य म्हणोनि सांडावा । तरी एवढा लाभ हारवावा ।

वंद्य म्हणोनि प्रतिपाळावा । तैं नेईल रौरवा निश्चित ॥४८॥

देह सांडावा ना मांडावा । येणें परमार्थचि साधावा ।

तें सावधान ऐक उद्धवा । गुप्त निजठेवा सांगेन ॥४९॥

जेणें देहें वाढे भवभावो । तेणेंचि देहेंकरीं पहा हो ।

होय संसाराचा अभावो । अहंभावो सांडितां ॥१५०॥

सांडावया देहाभिमान । पूर्वील साधु सज्ञान ।

होऊनि नित्य सावधान । ब्रह्मसंपन्न मद्रूपें ॥५१॥

नरदेहें ब्रह्मप्राप्ती । ऐसें मानूनि निश्चितीं ।

म्हणसी विषयभोगांचे अंतीं । ब्रह्मस्थिती साधीन ॥५२॥

ऐसें विश्वासतां आपण । रोकडी आली नागवण ।

देहासवें लागलें मरण । हरिहरां जाण टळेना ॥५३॥

एवं देहाचें अनिवार्य मरण । तें केव्हां येईल न कळे जाण ।

यालागीं पूर्वीच आपण । निजस्वार्थ जाण साधावा ॥५४॥

धरितां निजदेहाची गोडी । अवचितां आदळे यमधाडी ।

बुडे निजस्वार्थाची जोडी । तें निजनिवाडीं हरि सांगे ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP