एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


गुणदोषभिदादृष्टिमन्तरेन वचस्तव ।

निःश्रेयसं कथं नृणां, निषेधविधिलक्षणम् ॥३॥

हे गुण आणि हे दोष । उभयतां वैर लावी देख ।

तुझा वेद गा आवश्यक । होय प्रकाशक गुणदोषां ॥३५॥

वैर लावूनि वेदवाणी । वाढवी गुणदोषमांडणी ।

तेथ मोक्ष पाविजे प्राणी । वेदवचनीं घडे केवीं ॥३६॥

राऊळ बोलिलें आपण । जे न देखावे दोषगुण ।

तूंचि म्हणसी वेद प्रमाण । तैं दोषगुण देखावे ॥३७॥

एवं ऐकतां तुझें वचन । उभयतां आली नागवण ।

वेद प्रमाण कीं अप्रमाण । हें समूळ जाण कळेना ॥३८॥

तुझ्या वचना विश्वासावें । तैं गुणदोषां न देखावें ।

तुझें वेदवचन मानावें । तैं देखावें गुणदोषां ॥३९॥

ऐसे तुझेनि बोलें जाण । संशयीं पडले सज्ञान ।

मा इतर साधारण जन । त्यांची कथा कोण ये ठायीं ॥४०॥

(आशंका) माझें वचन वेदवचन । दोनी एकरुपें म्हणसी प्रमाण ।

तरी गुणदोषदर्शन । कां पां विलक्षण परस्परें ॥४१॥

माझें वेदाचें विधिविधान । नव्हतां वेदार्थाचें ज्ञान ।

म्हणशी मोक्ष न घडे जाण । वेद प्रमाण या हेतू ॥४२॥

त्या मोक्षामाजीं काय कठिण । सकळ कर्में सांडिता जाण ।

घरा मोक्ष ये आपण । सहजचि जाण न प्रार्थितां ॥४३॥

म्हणसी वेदार्थ न कळतां । कर्म करितां कां त्यागितां ।

कदा मोक्ष न ये हाता । जाण तत्त्वतां निश्चित ॥४४॥

भासला दोराचा सर्प थोर । तेथ जपतां नाना मंत्रभार ।

करितां वाजंत्र्यांचा गजर । मारितां तिळभर ढळेना ॥४५॥

तो सादरें निरीक्षितां जाण । होय त्या सर्पाचें निरसन ।

तेवीं निर्धारितां वेदवचन । भवभय जाण निरसे ॥४६॥

भवभयाची निर्मुक्तता । त्या नांव ’मोक्ष’ जाण तत्त्वतां ।

तो वेदार्थावीण हाता । न ये सर्वथा आणिकें ॥४७॥

वेदविधान न करितां । कर्म त्यागिलें उद्धततां ।

तेणें निजमोक्ष न ये हाता । परी पाखंडता अंगीं वाजे ॥४८॥

विधियुक्त जो कर्मत्यागु । करुनि संन्यास घेतल्या साङगु ।

तैं म्हणसी न पडे वेदपांगु । हाही व्यंगु विचारु ॥४९॥

श्रवणांग संन्यासग्रहण । तेथही असे विधिविधान ।

गुरुमुखें जें महावाक्य-श्रवण । तोही जाण वेदार्थ ॥५०॥

(आशंका) ॥ करितां देवांपितरांचें यजन । ते होऊनियां प्रसन्न ।

मोक्ष देतील आपण । हेंही वेदेंवीण घडेना ॥५१॥

स्वाहाकारें तृप्त सुर । स्वधाकारें तृप्त पितर ।

वेदविनियोगेंवीण देवपितर । प्रसन्नाकार कदा नव्हती ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP