कथाकल्पतरू - स्तबक १ - अध्याय १५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


N/A

श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी विश्वजनका ॥ उत्पत्तिस्थितिलयकारका ॥

भवसमुद्रीं मज बालका ॥ तारीं देवा ॥१॥

तूं अनंत तुझे भक्त अनंत ॥ तुज ऐसे महा समर्थ ॥

सकळां जाहलों शरणागत ॥ अनन्यभावें ॥२॥

असो आतां पूर्वानुसंधान ॥ सकळ यादव पावले निधन ॥

हेंचि ऋषिरायें केलें कथन ॥ जनमेजयासी ॥३॥

मग ह्मणे जनमेजयो ॥ त्वां कथिला यादवक्षयो ॥

परि आतां विश्वक्षयो ॥ सांगें मज ॥४॥

येवढें उद्भवेल विघ्न ॥ आणि सृष्टि कैसी जाहली निर्माण ॥

हें करावें संपूर्ण कथन ॥ मुनीश्वरा जी ॥५॥

रायासि ह्मणे ऋषीश्वर ॥ हा कोण जाणेल विचार ॥

परि मजप्रति व्यासगुरु थोर ॥ बोलिला असे ॥६॥

हें मार्कंडेय मुनीसि विदित ॥ तेणें ब्रह्मयासि केलें श्रुत ॥

मग विधीनें कथिलें समस्त ॥ श्रीव्यासातें ॥७॥

ते तुज सांगेन समूळकथा ॥ व्यास प्रसादें तत्वतां ॥

तरी ऐक गा भारता ॥ चित्त देवोनी ॥८॥

जें मानवांचें होय वर्ष ॥ तोचि देवांचा रात्रिदिवस ॥

आतां चतुर्युगप्रमाण परिस ॥ जनमेजया ॥९॥

कृत त्रेता द्वापार कली ॥ ऐसीं बोलिजे युगें चारी ॥

सत्रालक्ष अठ्ठावीससहस्त्रीं ॥ कृतयुग जाण ॥१०॥

त्रेता बारालक्ष शाण्णवसहस्त्र ॥ आठलक्ष चौसष्टसहस्त्र द्वापार ॥

कलि चारलक्ष बत्तीससहस्त्र ॥ प्रमाणवर्षें ॥११॥

चहूं युगांचा काल सकळिक ॥ तया बोलिजे देवयुग एक ॥

ऐसिया एकाहात्तरीं देख ॥ मन्वंतर होतसे ॥१२॥

चवदा जाहलिया मन्वंतरीं ॥ ब्रह्मयाचा दिन अवधारीं ॥

आणि तेवढीच असे रात्री ॥ तो ब्रह्मांडप्रळय ॥१३॥

यापरि होतां संवत्सर शत ॥ तें ब्रह्मयाचें आयुष्यगणित ॥

तोचि महाप्रळय सत्य ॥ ब्रह्मांडींचा ॥१४॥

कृतयुगीं धर्मचरण चारी ॥ त्रेतायुगीं एक अंतरीं ॥

चरण दोन द्वापारीं ॥ कलीं चरण एक ॥१५॥

कृतयुगीं चरण एक धरित्रीं ॥ त्रेतायुगीं युग्म निर्धारीं ॥

द्वापारीं त्रिचरण अवधारी ॥ कलीं चरण चार पैं ॥१६॥

जैं पूर्णपणें कलि व्यापत ॥ तैं होती पातकपर्वत ॥

मग धर्म होय निद्रिस्थ ॥ आदिमूर्ती ॥१७॥

जैसा पूर्ण जालिया घटु ॥ कीं नदी भरलिया वोहटु ॥

नातरी तंतु गुंतलिया पटु ॥ नासे जैसा ॥१८॥

अथवा जगतीं चढलिया कळसु ॥ कां पूर्णिमांतीं चंद्रकरां नाशु ॥

तैसा पूर्णपापें होय ग्रासु ॥ सकळ जीवां ॥१९॥

तैं हें नासे चराचर ॥ परि निर्गुण अविनाश अक्षर ॥

तया दृष्टांत द्यावया येर ॥ आथीच ना ॥२०॥

अंतीं योगमायेचे संगतीं ॥ सर्वांच्या येकवटती शक्ती ॥

तो महाप्रळय गा भूपती ॥ ऐकें आतां ॥२१॥

तेथें मिळणी बारा दिनकरां ॥ आणि सागरींच्या वडवानळा ॥

तृतीय नेत्रींच्या वैश्वानरा ॥ येकवट होय ॥२२॥

त्यांची उठे प्रळयज्वाळा ॥ मग ते शोषील सर्व जळा ॥

समुद्र वनें अष्टकुळाचळां ॥ नाश पृथ्वीसी ॥२३॥

ऐसा दाहोनि भूमंडळीं ॥ मग तो अग्नि जाय पाताळीं ॥

अमृत शोषोनि नागकुळीं ॥ करील नाश ॥२४॥

तेव्हां सकळ लोकपाळ ॥ वृक्ष फळ विमानादि सकळ ॥

रक्षा होवोनि राहे केवळ ॥ चराचराची ॥२५॥

मागुता वात अद्भुत उठी ॥ तो अग्नीतें घालील पोटीं ॥

मग रक्षा करील येकवटीं ॥ पर्जन्य तो ॥२६॥

तो वर्षेल मुसळधारीं ॥ तैं स्वर्ग मृत्यु पाताळ धरित्री ॥

उदकमय गा निरंतरीं ॥ होवोनि राहे॥२७॥

मग तेथें नाहीं दुसरें ॥ निजरुप निजे योगनिद्रे ॥

तो केशव अनंत गा निर्धारें ॥ सहस्त्रशीर्ष ॥२८॥

उदकामाजी क्षीरस्थानीं ॥ तेचि तयाची राजधानी ॥

तेथें राहोनि शेषशयनीं ॥ असे गोविंद ॥२९॥

तेथें दिव्य सहस्त्र युगें ॥ निद्रिस्थ योगमायेचेनि संगें ॥

आतां जीवदेह आंगें ॥ ऐकें राया ॥३०॥

तेचि मूळीं आदिदेवता ॥ तेथें मिळणी गा भारता ॥

जैसी नदी मिळणी दृष्टांता ॥ सागेरेंसीं ॥३१॥

प्राण चक्षु आदित्य वाता ॥ जीव देही इष्टदेवता ॥

सर्व मिळती कल्पांता ॥ आदिमूर्तीसी ॥३२॥

परि शुभाशुभ आचरण ॥ तेंचि जीवीं राहे संलग्न ॥

मागुती होय आयागमन ॥ सर्वजीवांचें ॥३३॥

ऐसा सर्व जाहलिया क्षयो ॥ उदकें ओहटे ब्रह्मकटाहो ॥

परि एक राहिला मार्कंडेयो ॥ गोविंद देखे॥३४॥

जयें प्रळयाची सर्व वार्ता ॥ देखिली असे गा भारता ॥

तो सुषुप्तिअवस्थें तत्वतां ॥ राहिला असे ॥३५॥

ऐसा प्रळयो पावे अवसान ॥ तंव तो राहिला अनन्य ॥

पुन्हां मागुती होय निर्माण ॥ भूमंडळ ॥३६॥

सप्त समुद्र द्वीपवती ॥ फळें पुष्पें सर्व वसुमती ॥

परि उदासपणें गा भूपती ॥ देखे तो पैं ॥३७॥

मग मार्कंडेयो निरंतरीं ॥ तीर्थयात्रा करी उदरीं ॥

ऐसें हिंडतां मुखाभीतरीं ॥ पडिला मुनी ॥३८॥

पाहे तंव देखे अंधकार ॥ चंद्र तारा ना दिनकर ॥

उदकमय ऋषेश्वर ॥ देखे सकळ ॥३९॥

मग भ्याला मुनिरावो ॥ ह्मणे सत्य जाहला प्रळयो ॥

ह्मणोनि स्मरण करी मार्कंडेयो ॥ श्रीहरीचें ॥४०॥

जयजया जन्मस्थितिविनाशा ॥ जयजयाजी आदिपुरुषा ॥

जयजय हो जगन्निवासा ॥ अनंता तूं ॥४१॥

जयजयाजी जगन्नाथा ॥ स्थावर जंगमा पूर्ण भरिता ॥

सगुणनिर्गुण उभयतां ॥ तूंचि देवा ॥४२॥

तंव तेज प्रगटलें तेजःपुंज ॥ जें त्रैलोक्याचें मूळबीज ॥

मग पाहतसे चोज ॥ मार्कंडेय तो ॥४३॥

तया नमस्कारुनि शिरसा ॥ मुनि ह्मणे गा दिव्यप्रकाशा ॥

तुह्मी कोण जी महापुरुषा ॥ सांगा मज ॥४४॥

तो कृपाळु सहस्त्रशिर ॥ ह्मणे मी अभेद अजर ॥

केशवरावो पुरुषाकार ॥ तोचि मी एक ॥४५॥

आणि बीजप्रमाणास ॥ मीचि होय अविनाश ॥

चंद्र सूर्य दिशा दश॥ हे अंश माझे ॥४६॥

तये वेळीं मार्कंडेयो ॥ मनीं आनंदल निर्भयो॥

तंव अदृश्य जाहला देवो ॥ सहस्त्रशिर ॥४७॥

मग ऋषि जाहला चिंतातुर ॥ ह्मणे मी येकला काय करुं ॥

तंव मुखामाजी ऋषेश्वरु ॥ पडे मागुता ॥४८॥

तयासि जाहलें स्वप्रगत ॥ मागील विसरे समस्त ॥

तीर्थयात्रा पुनरागत ॥ करी उदरीं ॥४९॥

ऐसी तीर्थ यात्रा हिंडतां ॥ मुखामाजी पडे अवचिता ॥

उदकमयचि गा भारता ॥ देखे मागुती ॥५०॥

तेथें वट एक अकल्पित ॥ उदकावरी देखे तरत ॥

आणि बाळ एक निद्रिस्थ ॥ पत्रीं तयाचे ॥५१॥

दिसती वटा तीन डहाळिया ॥ एक मुळ सहा फांटे तया ॥

आणि अठरा पारंबिया ॥ पत्रें अनंत ॥५२॥

विस्मय जाहला ऋषेश्वरा ॥ ह्मणे मी जागा कीं निदसुरा ॥

तंव बाळ बोलिला नरेंद्रा ॥ मुनिवर्यासी ॥५३॥

ह्मणेरे मार्कंडेया बालका ॥ आतां ये न धरीं शंका ॥

तंव ऋषि कोपोनियाम तवका ॥ बोले तयासी ॥५४॥

कीं एकवीसकल्प जन्मपत्रिका ॥ मज क्रमिली अविवेका ॥

तरि मज ह्मणसी निका ॥ तूं बाळक ॥५५॥

तंव मुनीसि ह्मणे वटेश्वर ॥ तवजनकें मागितला वर ॥

कीं चिरंजीव करावा कुमर ॥ माझा तुवां ॥५६॥

ह्मणोनि एकवीस कल्प गणना ॥ तूं चिरायु झालासि वरदाना ॥

बाळक ह्मणतां साभिमाना ॥ चढलासि कां ॥५७॥

ऐसें ऐकोनियां मुनी ॥ मग धाविन्नला चरणीं ॥

सद्गदीत पुसे वदनीं ॥ बाळकासी ॥५८॥

ह्मणे तूं कोण गा प्रसिद्ध ॥ येरु ह्मणे मी बाळमुकुंद ॥

हा दावाया प्रळयविनोद ॥ राखिलें तुज ॥५९॥

तरी हें माझें प्रळयचरित्र ॥ जगीं विस्तारावें समग्र ॥

आणि निर्माणाचें अगोदर ॥ सांगावें जगा ॥६०॥

मग मार्कंडेय करी स्तुती ॥ जयजयाजी कमळापती ॥

तंव अदृश्य जाहली मूर्ती ॥ बाळमुकुंदाची ॥६१॥

मागुता देखे अंधकार ॥ जाणों उदकमय सागर ॥

मग तो मुरडला ऋषेश्वर ॥ भ्यालेपणें ॥६२॥

ऐसा मुरडतां मार्कंडेय मुनी ॥ मागुती पडला मुखातुनी ॥

तीर्थयात्रा पुण्यपणीं ॥ करीत हिंडे ॥६३॥

तंव सृष्टीचा जाहला अवसर ॥ समयीं देवें केला हुंकार ॥

महाघोषें शब्द गंभीर ॥ त्रिभुवनीं जो ॥६४॥

काय ह्मणों महाशस्त्र ॥ तेणें प्रळयोदका पाडिलें छिद्र ॥

तया अवकाशें गा विवर ॥ आकाश झालें ॥६५॥

तें आकाश प्रसवे मारुता ॥ तेणें उदक आटलें भारता ॥

वायुउदकाचिया सुरता ॥ उपजला अग्नी ॥६६॥

मग अग्नीची उठली ज्वाळा ॥ तेणें शोषिलें प्रळयजळा ॥

तंव वायु अग्निसवें निर्मळा ॥ उपजलें जीवन ॥६७॥

तंव त्या हरीचें नाभिजळ ॥ तेथें उदेलें सहस्त्र कमळ ॥

कनककांती महा कीळ ॥ अनुपम्य जें ॥६८॥

तयाचीं पत्रें ते महाशैल ॥ केसर ते अष्टकुळाचळ ॥

मध्यें वर्तत गा वर्तुळ ॥ महामेरु ॥६९॥

त्याचे गर्भींचा आमोद ॥ तेचि सप्तसिंधु अगाध ॥

कमळकांती ते प्रसिद्ध ॥ पृथ्वी जाण ॥७०॥

ऐसा झाला कमळविकास ॥ तेथें उपजला महाहंस ॥

चहूंमुखीं महा घोष ॥ चौंवेदांचा ॥७१॥

तंव मधुकैटभ दोनी ॥ अठ्ठावीस युगांचे अवसानीं ॥

उपजले हरीच्या श्रवणीं ॥ मलस्त्रावें ॥७२॥

एक कृष्ण एक रक्तवर्ण ॥ महाबळी दीप्तिमान ॥

उदकीं धांडोळती तंव ब्राह्मण ॥ देखिला विरिंची ॥७३॥

ते ब्रह्मयासि ह्मणती दोनी ॥ तूं आह्मासि मिळें समरंगणीं ॥

ब्रह्मा ह्मणे मी नेणें स्वप्नीं ॥ युद्धकळा ॥७४॥

पैल निद्रिस्थ असे शयनी ॥ तो तुमची पुरवील अयनी ॥

ऐसें ऐकतां आले दोनी ॥ नारायणा जवळी ॥७५॥

ते जाणोनि दुराचारी ॥ योगमाया जागले श्रीहरी ॥

मग मांडली महामारी ॥ तिघांजणासी ॥७६॥

परम प्रचंड महावीर ॥ विष्णूसि भिडती सहोदर ॥

युद्ध जाहलें दिव्य सहस्त्र ॥ वर्षें वरी ॥७७॥

शेवटीं विष्णु बोले वचन ॥ मागारे तुह्मासि झालों प्रसन्न ॥

मग ते ह्मणती तूंचि कृपण ॥ माग आह्मासी ॥७८॥

हरीनें घेवोनि भाषदान ॥ ह्मणे मज द्या आपुले प्राण ॥

ते ह्मणती नसेल जीवन ॥ तेथें वधीं आह्मातें ॥७९॥

जेथें कवणा नाहीं मरण ॥ तेथें घेईं आमुचे प्राण ॥

हें आमुचें सत्यवचन ॥ साच करीं गोविंदा ॥८०॥

ऐसी जाणोनि सांकडी ॥ देवें केली ऊर्ध्व मांडी ॥

मग ते निवटिले धरोनि मुंडी ॥ दोनी असुर ॥८१॥

त्यांचिया मेदाची पडली घाणी ॥ उदक आटतां जाहली अवनी ॥

ह्मणोनि नाम जाहलें मेदिनी ॥ मेदास्तव ॥८२॥

मागुती ब्रह्मयानें समग्र ॥ रचिलें हें सर्व चराचर ॥

पूर्वकर्माची कीं गळसर ॥ बाधली तया ॥८३॥

मग त्या बंधुवां उभयतां ॥ देवें धाडिलें मुक्तिपंथा ॥

हे हरिवंशींची कथा ॥ कथिली तुज ॥८४॥

मधुकैटभ महा श्रोत्री ॥ हरिवंशीं महा क्षेत्री ॥

ते वधिता जाहला श्रीहरी ॥ हयग्रीवरुपें ॥८५॥

आणिक कोणे एके कल्पांतीं ॥ हिरण्य गर्भापासोनि उत्पत्ती ॥

हें विष्णुपुराणीं नानामतीं ॥ कथिलें असे ॥८६॥

ओंकार गर्भींचा मारुत ॥ तो प्रसवला घवघवीत ॥

बुहुद जाहला अकल्पित ॥ बहुतां काळें ॥८७॥

तो हिरन्य अंडवत ॥ माजी ब्रह्मासनीं निजदैवत ॥

मग पूर्ण झालिया अकल्पित ॥ पघळे अंड ॥८८॥

जारु मुराला ते जाहली सृष्टी ॥ आकाश बोलिजे ऊर्ध्व कवटी ॥

पाताळ बोलिजे तळवटीं ॥ खालील संपुट ॥८९॥

तो हिरण्यगर्भ गा भूपती ॥ ऐसिया कल्परचना होती ॥

लीलालाघवी आदिमूर्ती ॥ ईश्वराची ॥९०॥

मग रचिला स्वर्ग लोक ॥ हें उपनिषदाचें वाक्य ॥

तें ऐकावें गा सम्यक ॥ भारता तूं ॥९१॥

ब्रह्मलोक आणि प्रजापती ॥ गंधर्वादि शिवस्थिती ॥

नक्षत्रलोक निशापती ॥ आदित्य लोक पैं ॥९२॥

देवलोक अंतरिक्ष ॥ पितरलोक भूर्लोक ॥

भुवर्लोक पृथ्वीलोक ॥ उदक वहिलें ॥९३॥

मग प्रजा उद्भवल्या मानस ॥ ब्रह्मवंश जाहले बहुवस ॥

ते परमेष्ठीचे पुत्र दश ॥ सांगतों तुज ॥९४॥

मरीचि अत्रि नारद ॥ कश्यप अंगिरा पुलस्त्य विशद ॥

पुलह ऋतु वसिष्ठ प्रसिद्ध ॥ दक्षादि पैं ॥९५॥

कश्यपासि स्त्रिया तेरा ॥ त्या प्रसवल्या चराचरा ॥

तें ऐक आतां नरेंद्रा ॥ भारता तूं ॥९६॥

अदितीपासाव सुरवर ॥ दितीपासाव असुर ॥

विनता प्रसवे पक्षधर ॥ कटू अहिकुळ ॥९७॥

गण गंधर्व यक्ष किन्नरां ॥ अनुक्रमें प्रसवल्या सुंदरा ॥

आतां मनुरचना नरेंद्रा ॥ सांगों तुज ॥९८॥

स्वायंभुव स्वारोचिष सुगत ॥ उत्तम तामस रैवत ॥

चाक्षुष जाहला संभूत ॥ साहवा मनु ॥९९॥

प्रस्तुत सातवा असे वर्तत ॥ तो मनु बोलिजे वैवस्वत ॥

हा सांगितला वृत्तांत ॥ उपनिषदाचा ॥१००॥

पुढें आठवा सावर्णिक ॥ दक्ष ब्रह्म धर्म देख ॥

रुद्र देव इंद्र सम्यक ॥ हे सावर्णि मनु ॥१॥

ऐसे हे चतुर्दश मनु ॥ आतां वैवस्वत वर्तमानु ॥

तया आज्ञापी चतुराननु ॥ प्रजाकामें ॥२॥

मग तया वैवस्वता ॥ जाहली सृष्टीची अहंता ॥

वेद शक्ती अंगीं असतां ॥ उपदेशिलेंसे ॥३॥

कीं सृष्टी प्रकृतिमय ॥ रचावें तुवां चराचर ॥

ह्मणोनि उपदेशिले मंत्र ॥ सर्वबीजांचे ॥४॥

मग तो उत्तरेचिया सरीं ॥ मनवादि नाम क्षेत्रीं ॥

स्वर्गंगेचिया तीरीं ॥ मांडी अनुष्ठान ॥५॥

कंठप्रमाण उदकीं ॥ मंत्र साधिला श्रेष्ठ विशेषीं ॥

येकाग्रमनें द्वादशवर्षीं ॥ साधिला तेणें ॥६॥

तेंचि बीज सर्वसाधन ॥ उदकीं करी अघमर्षण ॥

एक संवत्सर केलें तर्पण ॥ श्रीअनंतासी ॥७॥

तैसाचि एक संवत्सरवरी ॥ दर्भ घेवोनि दक्षिणकरीं ॥

आहुती देतां वेदमंत्रीं ॥ प्रकाशली दीप्ती ॥८॥

ते आदिदेवता दीप्ती ॥ जळीं उपजली आदिशक्ती ॥

ते शतरुपा देवी बोलती ॥ हवनीं प्रथम ॥९॥

सवेंचि उपजला धान्यवंशु ॥ अखिल धान्यांचा सौरसु ॥

तो घेवोनि निघाला बीजरसु ॥ सर्वधान्यांचा ॥१०॥

तो सर्व धान्यांचा प्रकाश ॥ तेणें नाम पावला सुग्रास ॥

ह्मणोनि प्रसवे सुधारस ॥ मुखीं त्याच्या ॥११॥

हे अद्यापि असे प्रचीती ॥ साठी वरुषांचिया प्राप्ती ॥

धान्य प्रसवतसे राती ॥ सुधांशु तो ॥१२॥

मग तया साळी अंबुजा ॥ खेळ मांडिला असे सहजा ॥

कर्दमाच्या करोनि प्रजा ॥ खेळे शतरुपा ते ॥१३॥

मृत्तिकेची करोनि पुतळी ॥ शिवशक्ती क्रीडा मेळीं ॥

खेळ खेळे मनूचे राउळीं ॥ इच्छेस्तव ॥१४॥

द्विचरणी चतुष्पदें ॥ शतचरणी खडाष्टविधें ॥

विषमचरण नानाभेदें ॥ केली पुतळी कर्दमाची ॥१५॥

नानाभिन्न रंग मतीं ॥ स्वभाववशें भिन्नोक्ती ॥

बाळ लीला आदिशक्ती ॥ खेळे खेळ ॥१६॥

मग तें वंशनिर्मित धान्य॥ दोघीं केलें असे भक्षण ॥

तेणें विकासलें मन ॥ कामचेष्टेचें ॥१७॥

मग तया ब्रह्मसुता ॥ उठली विरहव्यथा ॥

देखोनि बाळेची स्वरुपता ॥ भ्रमला तो ॥१८॥

मनु तिचा अभिलाष धरी ॥ तंव ते बोले सुंदरी ॥

ह्मणे तूं पिता मी कुमरी ॥ सत्य जाण ॥१९॥

तयेसि मनु जाहला बोलता ॥ मी तुझा कैसेनि पिता ॥

तंव ते ह्मणे गा ताता ॥ अवधारिजे ॥१२०॥

तवमंत्रें शक्तिबीज ॥ उदकीं प्रसवलें तेज ॥

तेजगर्भीं उत्पत्ति मज ॥ झाली तेथें ॥२१॥

ह्मणोनीच गा वैवस्वता ॥ तूं होसी माझा पिता ॥

परि तो तया शब्दार्था ॥ नेदी उत्तर ॥२२॥

मग तेणें वैवस्वतें ॥ अविद्या धरिली स्वहस्तें ॥

अवलोकिलें भोंवतें ॥ साभिलाषें ॥२३॥

तया भेणें ते सुंदरी ॥ निघाली पुतळीच्या उदरीं ॥

ऐसीच सर्वांच्या अंतरीं ॥ प्रवेशली ते ॥२४॥

ते रिघाली गाईच्या उदरीं ॥ मनु प्रवेशे वृषभशरीरीं ॥

ऐसी च्यारीखाणी सुंदरी ॥ प्रकाशली सकळ ॥२५॥

मग निघाली अजेच्या उदरीं ॥ तयेच्या पदा भीतरीं ॥

रीघ करीतसे सुंदरी ॥ निर्धारें पैं ॥२६॥

हस्ती रासभांचे उदरीं ॥ ते लपतसे गा सुंदरी ॥

वर्तुळाकार चरण चारी ॥ प्रकाशलें सकळ ॥२७॥

मग निघाली हंस उदरीं ॥ पक्षिजाती नानापरी ॥

ते चारी खाणी सुंदरी ॥ प्रकाशलीसे ॥२८॥

मग रचिला ब्रह्मांडगोळ ॥ तो साजला सर्वकाळ ॥

हा परस्परें जाहला खेळ ॥ अविद्येचा ॥२९॥

ऐसी प्रकाशली सुंदरी ॥ तेचि बोलिजे मन्वंतरी ॥

वैवस्वताचे चरित्रीं ॥ ऐसिये परी ॥१३०॥

हें उभारलें दिसे सर्वत्र ॥ परि मृत्तिका मूळक्षेत्र ॥

शतरुपा केलें चरित्र ॥ बाळलीला पैं ॥३१॥

तोचि जाहला गा विस्तार ॥ मग व्यासमुनीनें केला आचार ॥

वर्णावर्ण धर्म पवित्र ॥ केला तिहीं ॥३२॥

ऐसें न सरे सांगतां ॥ हे उपनिषदाची कथा ॥

तरी हा उत्पत्तिप्रळयो गा भारता ॥ नाशिवंत ॥३३॥

आतां पूर्ण जाहली कथा ॥ फळश्रुती ऐकावी श्रोतां ॥

कथामात्रें महा दुरितां ॥ होइजे वेगळें ॥३४॥

हा असे कथाकल्पतरु ॥ सर्वपुण्यांचा सागरु ॥

अपत्य व्हावया निर्धारु ॥ श्रवणमात्रें ॥३५॥

यज्ञकर्माचें सुकृत ॥ गोविंदनामें लाभे सत्य ॥

आणि निर्धनाचे मनोरथ ॥ होतील पूर्ण ॥३६॥

भावें शुद्ध ऐकिजे कथा ॥ तैं सौभाग्य होय पतिव्रतां ॥

रोगांचिया दुःखव्यथा ॥ नासती सत्य ॥३७॥

अमरावतीचा कल्पतरु ॥ तो छाये निववी वीरु ॥

आणि दे भोजन आहारु ॥ उदरप्रमाण ॥३८॥

तैसा नव्हे कथाकल्पतरु ॥ हा त्रिविधताप परिहारु ॥

जयाचे प्रतिपदीं हरिहरु ॥ असे ब्रह्मा ॥३९॥

याचें जाहलिया श्रवण ॥ भवताप होती हरण ॥

आणि हरिचरणीं भजन ॥ घडे मनुष्यां ॥१४०॥

आतां ह्मणतसे कविता ॥ सावधान व्हावें श्रोता ॥

विस्तार करावया समस्ता ॥ कल्पतरु हा ॥४१॥

तुह्मीं ज्ञाते वेदमूर्ती ॥ तेथें मी कैसा मंदमती ॥

बोबडया बोलाची भारती ॥ निरोपिली तुह्मां ॥४२॥

हा कथारत्‍नसुढाळ ॥ येकवटला परम सुशीळ ॥

तरी श्रवणीं घालावें मुक्ताफळ ॥ श्रोते जनीं ॥४३॥

पंच अमृतां माजी उंच ॥ जीची उपमा तुह्मां साच ॥

ह्मणोनि वाक्यइक्षूचा रस ॥ तुह्मां योग्य ॥४४॥

सहस्त्रनाम बोलिजे श्रोतीं ॥ सर्व पातकां पळ होय पुढती ॥

हे कथा ऐकावी महंतीं ॥ प्रथम स्तबकाची ॥४५॥

आतां द्वितीय स्तबक ॥ तो ऐकिजे पुण्यश्लोक ॥

कल्पतरु नामें घोष ॥ हरिनामाचा ॥४६॥

नानापुराणींचें सार ॥ जैसी इक्षुगर्भी रसधार ॥

तें श्रोतयां वाढीन क्षीर ॥ कृष्णकृपेचें ॥४७॥

हें करावया कारण ॥ जे उद्धरावे सर्व जन ॥

ह्मणोनि रचिलें रत्‍न ॥ कल्पतरु हा ॥४८॥

जैसें तुंबिनीचें फळ ॥ लोकां हित करी केवळ ॥

आपण तरे काय नवल ॥ महापूरातें ॥४९॥

कवीचा असे भाव ऐसा ॥ जे वृद्धी करावी वेदविलासा ॥

परद्रव्याच्या द्रव्यांशा ॥ न करी तुटी ॥१५०॥

जें असे ऋषिप्रणित ॥ तेंचि बोलिजे सत्य ॥

ऐसें जाणावें यथार्थ ॥ श्रोतेजनीं ॥५१॥

प्रथम स्तबक कल्पतरु ॥ पूर्ण जाहला मनोहरु ॥

आतां द्वितीयस्तबकाचा विस्तारु ॥ दाखवा मज ॥५२॥

कौंडण्य गोत्र वसिष्ठ मैत्रावरुण ॥ प्रविण त्रिगुणयोग सांख्यधारण ॥

महाधर्मपरायण ॥ अंबऋषीचें ॥५३॥

त्या अंबऋषीची कांता ॥ कमळजा नामें पतिव्रता ॥

ते प्रसवली विष्णुभक्ता ॥ कृष्णकवीसी ॥५४॥

ते माझी धन्य पैं माता ॥ काय वर्णावी तयेसि आतां ॥

कर्पूरा सौरभ्य तरी देतां ॥ गौरव जैसा ॥५५॥

गोदेच्या दक्षिणतीरीं ॥ पद्मपुरी बोलिजे द्वापारीं ॥

ग्रंथ जाहला पुण्यक्षेत्रीं ॥ नाशिकस्थानीं ॥५६॥

अरुणा वरुणा गोदावरी ॥ कपालेश्वर साक्ष सुंदरी ॥

कल्पतरु पुण्यपवित्रीं ॥ वाहिला गोविंदचरणीं ॥५७॥

हे कल्पतरुची कथा ॥ प्रीतिपावो अनंता ॥

समस्तां जाहला विनविता ॥ कृष्णयाज्ञवल्की ॥५८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ प्रथम स्तबक मनोहरु ॥

प्रळयउत्पत्तिविस्तारु ॥ पंचदशोऽध्यायः संपूर्ण हा ॥१५९॥

श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥स्तबकओव्यासंख्या ॥२६२५॥शिवं भवतु ॥

॥ इति प्रथमस्तबकः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP