कथाकल्पतरू - स्तबक १ - अध्याय १

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥

श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसच्चिदानंदाय नमः ॥ श्रीकृष्णपरमात्मने नमः ॥

अथ कथाकल्पतरौ प्रथमस्तबकप्रारंभः ॥

ॐम् नमोजी अनंता ॥ तूं कार्य कारण कर्ता ॥

सगुणनिर्गुण उभयतां ॥ तूंचि देवा ॥१॥

जयजयाजी परात्परा ॥ जयजयाजी निर्विकारा ॥

जयजयाजी ॐकारा ॥ वेदगर्भा ॥२॥

जयजयाजी महद्भूता ॥ स्थावरजंगमपूर्णभरिता ॥

तूं शुद्धस्वरुप अच्युता ॥ कैवल्यदानी ॥३॥

ऐशिया तुज नमस्कारु ॥ स्वयंप्रकाश तूं सहस्त्रकरु ॥

ह्मणोनि आदिवंदनीं अधिकारु ॥ तुझ्या ठायीं ॥४॥

तुझें केलिया स्मरण ॥ तें सर्वांभूतीं परिपूर्ण ॥

जैसें तरुमूळींचें सिंचन ॥ पोषी पल्लवांतें ॥५॥

उत्पत्तिस्थितिलयकारण ॥ जो सर्व विघ्नांचें रक्षण ॥

भक्ताभीष्ट दे वरदान ॥ नमूं विघ्नेश तो ॥६॥

जो सौरभ्यसिद्धिचा दाता ॥ ग्रंथा जयाची पदलालिता ॥

तया नमूं गणनाथा ॥ वाग्विलासिया ॥७॥

जो धडनर मुंडकुंजर ॥ कंठीं कनककुंदाचा हार ॥

माथां मिरवे सिंदूर ॥ अरुणगिरि जैसा ॥८॥

जो उमेचा वरदसुत ॥ मुखीं मिरवी एकदंत ॥

प्रसन्न करुनियां भूतनाथ ॥ घेतला फरशु ॥९॥

जो विघ्नारण्यकुठार ॥ सरळशुंड लंबोदर ॥

मोदकाशन वरदकर ॥ भक्तजनां जो ॥१०॥

अंगीं बावनचंदनाची उटी । कनकभूषणें बाहुवटीं ॥

नागबंद झळके कटितटीं ॥ मणिशिराजे ॥११॥

चरणीं घवघवती नेपुरें ॥ वरी परिधान दिव्यांबरें ॥

मुखीं रंगलीं मनोहरें ॥ तांबूलदळें ॥१२॥

यज्ञोपवीताची धवलता ॥ ते हृदयांधकारा नाशी तत्वतां ॥

रोमावळीची सौरभता ॥ अभिनव जे ॥१३॥

माथां मिरवे मुकुट ॥ तळीं दानोदकाचा पाट ॥

तेथें अलिकुलाचा घिरट ॥ मिरवी शोभा ॥१४॥

मुकुटीं रत्‍नांचा झळाळ ॥ दूर्वांकुरांचा संघ विशाळ ॥

तया तेजें ब्रह्मांडगोळ ॥ उजळला पैं ॥१५॥

नेत्रसंकीर्ण मनोहरे ॥ जैसे रत्‍नांचे पागोरे ॥

दृष्टीं देखिले सामोरे ॥ मूषकवाहनु ॥१६॥

जयजयाजी लंबोदरा ॥ तूं वेदवेद्या ईश्वरा ॥

जयजय षडाक्षरा ॥ अयोनिसंभवा ॥१७॥

जयजयाजी गणाधीशा ॥ ज्ञानबुद्धीच्या प्रकाशा ॥

पदप्रबंधांचिया विलासा ॥ देईं चित्त ॥१८॥

हेचि तुह्मां विनवणी ॥ जे वळावी माझी वाणी ॥

पदरचनेसी अंतःकरणीं ॥ रिघावें तुवां ॥१९॥

तुझा झालिया सौरसु ॥ मुकिया प्रकाशे नवरसु ॥

मज द्यावाजी अभ्यासु ॥ ग्रंथकथनीं ॥२०॥

तुझी जालिया नवाळी ॥ करिसी अज्ञानखंडोळी ॥

ज्ञानजिव्हा बिंबली ॥ द्यावी मज ॥२१॥

ऐसा नमिला गजवदन ॥ मग स्वप्नीं जाहला प्रसन्न ॥

ह्मणे ग्रंथ करीं सुलक्षण ॥ घेईं प्रसाद ॥२२॥

आतां नमूं ते शारजा ॥ जे चतुराननाची आत्मजा ॥

प्रणिपात हो माझा ॥ अंबे तुज ॥२३॥

वेदगर्भा तूं भक्तवरदा ॥ विद्या वोळंगती सर्वदा ॥

निजभक्तां पावसी सदा ॥ ब्रह्मतनये ॥२४॥

तूं वाग्देवता वागेश्वरी ॥ हंसवाहनकुमरी ॥

ठाण मांडावें जिव्हाग्रीं ॥ माझे अंबे ॥२५॥

शंख कमळ वीणापाणी ॥ चवथा वरदहस्त हंसगामिनी ॥

शुद्ध मौक्तिकांचीं लेणीं ॥ कंठीं कुंदमाळा ॥२६॥

तूं सकळ इंद्रियांचें मूळ ॥ आणि वर्णमात्रांचें कुळ ॥

रसज्ञता ते केवळ ॥ तूंचि देवी ॥२७॥

मुखीं मिरवे तांबूल ॥ कुचकंचुकी सोज्वळ ॥

हातीं हालतसे माळ ॥ पद्माक्षांची ॥२८॥

खोप वळूनियां कुरळी ॥ माथां मालती तुरंबिली ॥

कंचुकी पीनयुगुळीं ॥ उंचावली ॥२९॥

जे प्रेमरसाची योगिणी ॥ अष्टसिद्धींची संजीवनी ॥

पराकाष्ठा उन्मनी ॥ खेचरी तूं ॥३०॥

तूं सर्व जीवांचें जीवन ॥ आणि सर्वांभूतीं परिपूर्ण ॥

ते तूं विश्वमाया आपण ॥ कुमारिके ॥३१॥

जयजयवो ब्रह्मविद्ये ॥ ज्ञानकलिके प्रबुद्धे ॥

वेदशास्र श्रुतिशब्दे ॥ व्यापक तूं ॥३२॥

जयजयवो महासिद्धि ॥ तूं ज्ञाननेत्री ज्ञाननिधी ॥

शब्दरत्‍नांचा विधी ॥ बोलवीं मज ॥३३॥

तुझा होतां ज्ञानागळा ॥ नवरसें पोखिती कळा ॥

ग्रंथ रचिला या बोला ॥ नवल काय ॥३४॥

ऐशी करितां स्तुती ॥ तंव प्रगटली सरस्वती ॥

ग्रंथ करितां सुमती ॥ प्रसन्नपणें ॥३५॥

आतां नमूं कुळदेवता ॥ ह्माळसा रेणुकामाता ॥

ज्ञानगरळा मज अपत्या ॥ घालीं अंबे ॥३६॥

जयजयवो कुळस्वामिणी ॥ मातापुरनिवासिनी ॥

ग्रंथ वंशाचिये नलिनी ॥ जीवन पूर्ण ॥३७॥

ऐशी नमिली कुळदेवता ॥ चरणावरी ठेविला माथा ॥

ह्मणे विलंबु न करीं ग्रंथा ॥ झालें प्रसन्न ॥३८॥

आतां नमूं ज्ञानगुरु ॥ जो परात्पर वृद्धाचारु ॥

तो चिंतामणी भवतारुं ॥ स्वामी माझा ॥३९॥

केलें चरणाचें स्मरण ॥ तेणें बुद्धींद्रियां ज्ञान ॥

जैसें नेत्रीं करितां अंजन ॥ दिसे निधी ॥४०॥

तया नमन चिंतामणी ॥ मज द्यावी अमृतवाणी ॥

आणि सदा अंतःकरणीं ॥ वसावें तुवां ॥४१॥

ऐसा नमिला श्रीगुरु ॥ व्यासवाल्मिक ऋषेश्वरु ॥

जेणें अष्टादश विस्तारु ॥ केलीं पुराणें ॥४२॥

आतां नमूं श्रोतां ॥ जे हरिभक्त ज्ञानवंतां ॥

सुशीळ आणि समता ॥ सर्वांभूतीं ॥४३॥

सर्वरसीं मिळे नीर ॥ उपमा साजे काश्मीर ॥

मिळालिया रंगमात्र ॥ सारिखे जे ॥४४॥

परद्रव्यासि अनादरु ॥ परनिंदेसि बधिरु ॥

परस्त्रीसि सहोदरु ॥ सत्यवादी ॥४५॥

त्या श्रोतयांचेनि संगें ॥ निवताती अष्टांगें ॥

ज्ञानमति भोगे ॥ त्यांचे प्रसादें ॥४६॥

आंगीं चंदनाचें विलेपन ॥ आणि चंद्रकरां ऐसे किरण ॥

तैं दीधलें आलिंगन ॥ श्रोताजनीं ॥४७॥

चंद्राचेनि शीतळयोगें । ऋतुकाळीं रम्य लागे ॥

परि श्रोतयांचेनि संगें ॥ निविजे सदा ॥४८॥

वर्णितां नवरस श्रोतां ॥ अनंत वाढेल कथा ॥

परि नमावें लागे दुरितां ॥ दुर्जनाशीं ॥४९॥

जैसें न करितां विकिरदान ॥ पितृपिंडास होय विघ्न ॥

कां माधोकरी वारी श्वान ॥ देऊनि ग्रासु ॥५०॥

ऐसा तो महा नष्ट ॥ जैसा अश्वशाळेसि मर्कट ॥

कां द्विजांमध्यें लघिष्ठ ॥ काग जैसा ॥५१॥

जिव्हा न शिणे पाखांडें ॥ जैसें धमनाचें चांबडें ॥

साधूंस निंदितां सांकडें ॥ नाहीं तयासी ॥५२॥

नातो बाभूळीचा तरुवर ॥ अनुपकारी वृत्तिकार ॥

त्याहून पीडाकर ॥ ग्रामकंटकु ॥५३॥

सांडूनि सुमनाची वृत्ती ॥ मक्षिका रक्तचि प्राशिती ॥

तैसा खळाचे चित्तीं ॥ दुजा भावो ॥५४॥

ऐसा तो महादुर्जन ॥ अनुपकारी कृतघ्न ॥

धर्मा घरीं जैसा श्वान ॥ अपवित्रपणें ॥५५॥

सज्जनासि छळितो साचार ॥ परि साधूंसि होतो उपकार ॥

जैसें राखेनें घांशितां पात्र ॥ स्वच्छ होतसे ॥५६॥

बिदी शुद्ध करी सूकर ॥ रजक मळ फेडी साचार ॥

तैसाचि तो उपकार ॥ दुर्जनाचा ॥५७॥

म्यां दुर्जनांसही वंदिलें ॥ पुढें ग्रंथनिरुपण आरंभिलें ॥

कृपापात्र पाहिजे केलें ॥ मज दीनासी ॥५८॥

या सकळांचा प्रसाद ॥ मज लाधला तत्वबोध ॥

व्यासमुनींचा प्रसाद ॥ करुं कथन ॥५९॥

सकळशास्त्रांचें सार ॥ जैसी इक्षुगर्भींची साखर ॥

नाना मंथोनियां क्षीर ॥ घृत जैसें कां ॥६०॥

अष्टादश व्यासोक्ती ॥ कथन केलें भारतीं ॥

आणि श्रीभागवतीं ॥ संस्कृतभाषें ॥६१॥

त्या संस्कृताचा अर्थ ॥ प्राकृतजनासि नव्हे प्राप्त ॥

ह्मणोनि आनंदभरित ॥ न होती ते ॥६२॥

जैसें कूपां मधील नीर ॥ तेथें पाहिजे पात्र दोर ॥

तृषाक्रांतासि विचार ॥ पडत असे ॥६३॥

तैशी नव्हे ती सरिता ॥ पात्रदोर नलगे सर्वथा ॥

तृप्त करी तृषार्ता ॥ मुखांजुळीनें ॥६४॥

नाना पुराणींचें मत ॥ तेथील घेतलासे अर्थ ॥

करावया कर्णगत ॥ श्रोते जनासी ॥६५॥

परोपकारा कारणें ॥ प्राणियातें उद्धरणें ॥

ह्मणोनि ग्रंथ रचणें ॥ आरंभिलें ॥६६॥

चातकाचे अल्प उदरीं ॥ उदक न माय शिंपीभरी ॥

परि चिंतन तो करी ॥ पर्जन्याचें ॥६७॥

पहाहो कीं मधमाशी ॥ रस मेळवी सायासीं ॥

सुखरुप स्वजनासी ॥ करावया ॥६८॥

मज तुमचा आधारु ॥ आणि श्रीहरीचा अभय करु ॥

ग्रंथा लाधला वरु ॥ अभयवचनें ॥६९॥

येर्‍हवीं मज बोलतां ॥ येवढी कैंची योग्यता ॥

हृदयीं प्रेरितो कथा ॥ अनंत तो ॥७०॥

तुह्मा संतांच्या प्रसादें ॥ गाईन श्रीहरीचीं ब्रीदें ॥

तेणें जन्ममरणाचे बाधे ॥ होईन वेगळा ॥७१॥

मज उपसितां शब्दसिंधु ॥ येखादा राहिला स्वरबिंदु ॥

तया दोषाचा बाधु ॥ न ठेविजे ॥७२॥

कीं हें केलें असे प्राकृत ॥ परि मूळीं नाहीं विसंगत ॥

हें जाणोनियां उचित ॥ वंद्य कीजे ॥७३॥

गीर्वाण श्रमाहीं प्राप्त जालें ॥ प्राकृत सहजीं हाता आलें ॥

परि आनंदा नव्हे वहिलें ॥ न्यून कांहीं ॥७४॥

कीं येक मोलाचा सोनटका ॥ दुसरा सांपडला फुका ॥

कशीं लावितां देखा ॥ समानची ॥७५॥

ह्मणोनि हा कथाकल्पतरु ॥ देवें करविला पुण्याचा सागरु ॥

उद्धरील पातकी नरु ॥ श्रवणमात्रें ॥७६॥
हें कथानक ऐकतां ॥ तोडी भवबंधनव्यथा ॥

आणि वैकुंठा जातां ॥ वेळ न लागे ॥७७॥

हें श्रीहरीचें कथन ॥ जो ऐके भावें करुन ॥

तो पावे दिव्य भुवन ॥ वैकुंठीचें ॥७८॥

ज्या कथेचिया श्रवणा ॥ पूर्ण होती मनकामना ॥

भुक्तिमुक्ति भोग नाना ॥ श्रवणें होती ॥७९॥

आतां असो हे योग्यता ॥ वायां कां वाढवावें ग्रंथा ॥

सावधान श्रोतां ॥ द्यावें चित्त ॥८०॥

या कथारुपी अमृता ॥ तुह्मीं घ्यावें इच्छापूर्णता ॥

श्रीहरिच्यानामामृता ॥ घन वर्षे ॥८१॥

पाताळभुवनीं वासुकीसी ॥ कंबलाश्वतर कथन नेमेसीं ॥

तेचि कथा स्वर्गीं सुरपतीसी ॥ सांगे बृहदश्च ॥८२॥

तेचि कथा बद्रिकाश्रमीं ॥ सूत सांगे नित्यनेमीं ॥

भक्तिपूर्वक मनोधर्मी ॥ ऋषींप्रती ॥८३॥

तेचि कथा कैलासीं ॥ ईश्वर सांगे उमेसी ॥

वटाचिये छायेशीं ॥ ऋषि ऐकती ॥८४॥

तेचि कथा बादरायण ॥ परीक्षितीसि सांगे आपण ॥

सातां दिवसां संपूर्ण ॥ श्रीभागवत ॥८५॥

कथा तेचि वैशंपायन ॥ जनमेजयासि सांगे विस्तारुन ॥

तो वरिष्ट वैशंपायन ॥ व्यासशिष्य ॥८६॥

श्रीकृष्ण गेलिया निजधामासी ॥ कोण राहिला त्यांचे वंशीं ॥

आरंभीं याचि प्रश्नासी ॥ केलें रायें ॥८७॥

तेचि कथा पुढिले अवसरीं ॥ तुह्मी ऐका सावधानपरी ॥

खेळ खेळेल वैखरी ॥ जगदीशकृपें ॥८८॥

हे कथा कर्णीं ऐकतां ॥ निवारील संकटव्यथा ॥

पुत्र आणि सुकृता ॥ करील वृद्धी ॥८९॥

अठरा पर्वें भारता ॥ वैशंपायन सांगता ॥

तयाहूनि विशेषता ॥ कल्पतरुसी ॥९०॥

नानाकथांचा विस्तारु ॥ तया नाम कल्पतरु ॥

हा जाणावा पुण्यसागरु ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥९१॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ प्रथमस्तबक मनोहरु ॥

मंगलाचरण विस्तारु ॥ प्रथमोध्यायीं कथियेला ॥९२॥

श्रीमज्जगदीश्वरापर्णमस्तु ॥ श्रीराधारमणार्पणमस्तु ॥ ओव्यासंख्या ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP