कथाकल्पतरू - स्तबक १ - अध्याय १४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

बुद्धिप्रेरक यदुनायक ॥ सर्गस्थित्यंतकारक ॥

परि कर्मानुसार सकळिक ॥ वागवी जीव ॥१॥

असो पूर्वील अनुसंधान ॥ वज्र मरतां पाकशासन ॥

आनंदें सकळांसि घेऊन ॥ वज्रपुरीं आला ॥२॥

मग सुरपती आणि श्रीपती ॥ तिजा येऊनि बृहस्पती ॥

राज्यभागाचा विचार करिती ॥ तिन्हीदेव ॥३॥

वज्रनाभा नाहीं बंधु सुत ॥ तरी राज्याधिकारी दुहित ॥

प्रधान करावा जयंत ॥ इंद्रपुत्र ॥४॥

तीन भाग देऊं दुहितां ॥ एकभाग जयंता ॥

ह्मणोनि पुत्रां समस्तां ॥ बोलाविलें ॥५॥

एकसहस्त्र महा पुरें ॥ च्यारकोटी उपनगरें ॥

ग्रामखेडीं अवांतरें ॥ असंख्यात ॥६॥

विजय नामें मन्मथकुमर ॥ तयासि केला राज्यधर ॥

चौथा भाग तया समग्र ॥ दीधला असे ॥७॥

चंद्रप्रभू तो गदसुत ॥ आणि गुणवंत सांबसुत ॥

तया दोघांसि दोन भागांत ॥ दीधलीं राज्यें ॥८॥

जो भाग उरला चौथा ॥ तो दीधला इंद्रसुता ॥

अश्व रथ गज समस्तां ॥ दीधले चौघां ॥९॥

ऐसें करितां इंद्रकृष्ण ॥ तंव पावला चतुरानन ॥

तयासि भेटविला नंदन ॥ मन्मथाचा ॥१०॥

मग आणिलें गंगोदक ॥ विजया केला राज्याभिषेक ॥

सिंहासन छत्र सम्यक ॥ दीधलें तया ॥११॥

ब्रह्मवाचा मुखमंत्रीं ॥ विजया स्थापित श्रीहरी ॥

चंद्रार्कवरी राज्य करीं ॥ ब्रह्मा ह्मणे ॥१२॥

आणिक बोलला चतुरानन ॥ तुह्मांसि त्रैलोक्यीं गमन ॥

श्रीकृष्णबीजाचें कारण ॥ राहील येथें ॥१३॥

मग बोलिला गोविंद ॥ जोंवरि आहे त्रैलोक्यसंबंध ॥

तोंवरि असो गोत्रकंद ॥ यदुवंशाचा ॥१४॥

जयंतासि ह्मणे गोपिनाथ ॥ तुज निरविला कामसुत ॥

प्रजा परिवार समस्त ॥ पाळावा तुवां ॥१५॥

जो ऐरावताचा सुत ॥ श्र्वेतवर्ण आणि चौदंत ॥

तो देववी कृष्णनाथ ॥ तयालागीं ॥१६॥

मग बोलाविली प्रभावती ॥ चंद्रावती आणि गुणवंती ॥

तयांसि सांगितली स्थिती ॥ चतुर्भागांची ॥१७॥

तंव बोले प्रभावती ॥ चंद्रावती आणि गुणवंती ॥

कीं भ्रतार ठेवावे श्रीपती ॥ सहा मास ॥१८॥

मदनासि ह्मणे श्रीहरी ॥ गद सांब हो ऐका उत्तरीं ॥

तुह्मीं रहावें पुत्रांजवळी ॥ षण्मास येथें ॥१९॥

राज्य लावावें सुयुक्तीं ॥ दुष्टांची करावी शांती ॥

मग यावें द्वारावती ॥ निघोनियां ॥२०॥

सकळां केला पाहुणेर ॥ स्वर्गा गेले ब्रह्मा इंद्र ॥

विजयी होवोनि सार्ङगधर ॥ द्वारके आला ॥२१॥

आतां असो हे विजयकथा ॥ वज्र वधिला गा भारता ॥

पुढील ऐकावें पूर्ण श्रोतां ॥ चित्त देवोनी ॥२२॥

मग जाहले षण्मास पूर्ण ॥ हृदयीं आठवूनि कृष्णचरण ॥

आले स्त्रियापुत्र ठेवोन ॥ द्वारकेलागीं ॥२३॥

तंव पुरली अवतारव्यथा ॥ मुसळगर्भींची आली कथा ॥

शाप जाहला अवचिता ॥ यादव पुत्रां ॥२४॥

करोनियां मावेचा गर्भ ॥ स्त्री वेषें नटवोनि सांब ॥

ह्मणती कन्येचा कीं पुत्रगर्भ ॥ सांगा ऋषीहो ॥२५॥

कपट जाणोनि ऋषि आवेशें ॥ ह्मणती याचे गर्भी जो असे ॥

तेणेंचि यादववंश नासे ॥ निःसंशय ॥२६॥

मग ते भिवोनि सागरतीरीं ॥ मुसळ मर्दोनि शिळेवरी ॥

उरलें वसू जळाभीतरीं ॥ टाकिलें तिहीं ॥२७॥

तें गिळिलें झषप्रवरीं ॥ तोचि मीन धरोनि धीवरीं ॥

लोह लाविलें बाणाग्रीं ॥ लुब्‌धकव्याधें ॥२८॥

मुसळ अंकुरलें जीवनीं ॥ त्याचें उठिलें तृण वनीं ॥

एरक नामें करुनी ॥ यादवक्षया ॥२९॥

तंव द्वारके जाहले उत्पात ॥ मेघ वर्षला शोणित ॥

तें जाणवलें दुर्निमित्त ॥ गोपालकृष्णा ॥३०॥

भेटों आले ब्रह्मा इंद्र ॥ सकळ देवांसहित रुद्र ॥

हरीसि करिती नमस्कार ॥ अंतराळीं ॥३१॥

देव ह्मणती गोपिनाथा ॥ वैकुंठीं वास करणें आतां ॥

दैत्य वधोनि पुरली अहंता ॥ अवताराची ॥३२॥

देवांसि ह्मणे चक्रपाणी ॥ समस्तां करोनि सोडवणी ॥

निजभुवना सातांदिनीं ॥ येतों त्वरित ॥३३॥

मग नमूनि यदुनंदना ॥ देव गेले निजभुवना ॥

परि हे वार्ता द्वारके कवणा ॥ नाहीं श्रुत ॥३४॥

संकर्षणासि ह्मणे कृष्ण ॥ रामा अवतार करीं पूर्ण ॥

आपणा न्यावया सुरगण ॥ आले होते ॥३५॥

तरि हें व्यासासि सांगूं आतां ॥ आणि बोलावूं धाडावें पार्था ॥

हस्तनापुरीं पाठवूं मागुता ॥ घेवोनि शक्ती ॥३६॥

उद्धवाहस्तीं देऊन पत्र ॥ व्यासांकडे धाडिला शीघ्र ॥

आणि हस्तनावतीस अक्रूर ॥ धाडिला देवें ॥३७॥

व्यासें पाहिलें लिखितपत्र ॥ तंव तें कृष्णाचें हस्ताक्षर ॥

मग उदकें भरिले नेत्र ॥ व्यासदेवें ॥३८॥

ऋषि पाहे ज्ञानदृष्टीं ॥ ह्मणे देहावसनाचे शेवटीं ॥

आतां श्रीकृष्णाची भेटी ॥ केविं होय ॥३९॥

तेथें होईल अन्योन्य ॥ आटतील गोत्रज जन ॥

तें पहावया आपणा लागुन ॥ नव्हे योग्य ॥४०॥

व्यास ह्मणती गा उद्धवा ॥ आमुचा आशिर्वाद सांगावा ॥

अनुष्ठान सारोनि देवा ॥ भेटों येतों ॥४१॥

ऐसें ऐकोनि उत्तर ॥ उद्धव पावला द्वारके शीघ्र ॥

तंव धर्मासि दीधलें पत्र ॥ अक्रूरदेवें ॥४२॥

धर्मरायें पत्र पाहून ॥ अक्रूर देखिला दीनवदन ॥

तंव जाणवली अवतारखुण ॥ समाप्तीची ॥४३॥

उदकें भरिले लोचन ॥ दुःखित जाहलें अंतःकरण ॥

अंगीं लावितां चंदन ॥ ऊष्ण वाटे ॥४४॥

मग धर्म ह्मणे गा पार्था ॥ तुवां जावें द्वारके आतां ॥

परि दुरोनीच करावी वार्ता ॥ यदुनंदनासी ॥४५॥

इकडे यादवां सांगे श्रीहरी ॥ वेगीं सांडावी द्वारकापुरी ॥

उदकमय सप्तरात्रीं ॥ होईल जाणा ॥४६॥

मग जुंपोनि अश्वरथ ॥ प्रभासा आले समस्त ॥

अंतरीं होवोनि दुःखित ॥ सांडिली द्वारका ॥४७॥

इकडे नगराभीतरीं ॥ एकलाचि राहिला श्रीहरी ॥

जैसा इंद्रियें सांडोनि अंतरीं ॥ आत्मा वसे ॥४८॥

दृष्टीं पाहे सर्व रचना ॥ सोळासहस्त्र अंतर्भुवना ॥

दुःख जाहलें त्रैलोक्यजीवना ॥ नाशसमयीं ॥४९॥

ते सांगतां कृष्णव्यथा ॥ बोलों न ये गा भारता ॥

जें जें जाहलें गोपिनाथा ॥ तयेवेळीं ॥५०॥

जैसें बाळदशेच्या दशनां ॥ निघतां व्यथा होय वदना ॥

तैसें जाहलें नारायणा ॥ तये वेळीं ॥५१॥

कीं कुलीन कन्या पतिव्रता ॥ तारुण्यभर आणि सकामता ॥

ते पति निमालिया व्यथा ॥ पावे जैसी ॥५२॥

नातरी पुत्र प्रसवे माता ॥ सुलक्षण आणि स्वरुपता ॥

तो निमालिया दुःखिता ॥ होय जैसी ॥५३॥

अथवा बहु कष्ट करुन ॥ कृपणें मेळविलें जें धन ॥

तें गेलिया दुःख दारुण ॥ जैसें होय ॥५४॥

तैसें होतसे मुरारी ॥ दृष्टीं पाहतां द्वारकापुरी ॥

मृत्युलोकींची सामुग्री ॥ न्याहाळीत ॥५५॥

सोळासहस्त्र अंतःपुरां ॥ कुळगोत्र कुमरी कुमरां ॥

तयां सांडितां शार्ङगधरा ॥ झळंबे माया ॥५६॥

दृष्टीं पाहे दामोदरें ॥ कनकरत्‍नांचीं परिकरें ॥

आणि गोमतीचीं तीरें ॥ हंसमिथुनेंसीं ॥५७॥

नाना धन आणि भोजना ॥ चहूंजातींचिया अंगना ॥

ऐसें वैभव त्रिलोकीं कवणा ॥ नसे देखा ॥५८॥

ह्मणे स्वर्ग मृत्यु पाताळ ॥ हें माझेंचि गा सकळ ॥

परि भूमंडळींचें मायाजाळ ॥ अनारिसें हें ॥५९॥

ऐसी करितां चिंतवणी ॥ दुःखें अंग टाकिलें धरणीं ॥

तों आला मित्र शिरोमणी ॥ उद्धव तेथें ॥६०॥

ते जाणोनि दुःखचेष्टा ॥ उद्धव ह्मणे जी वैकुंठा ॥

आजिंची अनारिसी निष्ठा ॥ देवा कां जी ॥६१॥

तें ऐकोनियां वचन ॥ त्यातें बोले यदुनंदन ॥

ह्मणे मज हें द्वारकाभुवन ॥ न सांडवे जी ॥६२॥

आतां खुंटला मनोरथ ॥ उद्धवा तूं परमभक्त ॥

वैकुंठा जाणें निभ्रांत ॥ आपणासी ॥६३॥

तंव उद्धव ह्मणे गा मुरारी ॥ मज संगें न्यावें श्रीहरी ॥

तुजवांचोनि संसारीं ॥ न धरवे जीव ॥६४॥

सफल जे कां तरुवर ॥ फलें पुष्पें जाहले मधुर ॥

तयां सांडितां पक्षिभ्रमर ॥ सुखावती केवीं ॥६५॥

तैसे आह्मी तुझे आश्रित ॥ जळमीनाचा न्याय येथ ॥

तरी त्वां टाकितां जीवित ॥ उरों न शके ॥६६॥

तुझिया कृपेनें थोरपण ॥ जीवांसि प्राप्त होय पूर्ण ॥

ह्मणोनि तुझेचि धरावे चरण ॥ हें उचित ॥६७॥

कीं गगन दाटलें नक्षत्रीं ॥ असंख्यात परोपरी ॥

परि चंद्राविणें निर्धारीं ॥ प्रकाश नोहे ॥६८॥

तैसें तुजविणें गा मुरारी ॥ सर्व मिथ्या या संसारीं ॥

पतिविणें जैसी नारी ॥ श्रृंगारयुक्त ॥६९॥

तंव तयासि श्रीकृष्ण ह्मणे ॥ ऐसेंचि मृत्युलोकींचें जिणें ॥

अकस्मात पडे जाणें ॥ परलोकासी ॥७०॥

आकाशीं चमके विद्युत ॥ क्षणामाजी होय गुप्त ॥

तैसें येथील जीवित ॥ उद्धवा जाण ॥७१॥

देह पडलिया क्षितितटीं ॥ पक्षिश्वापदां होय लुटी ॥

ऐसी प्रपंचाची रहाटी ॥ असे देखा ॥७२॥

श्रवणां नेतील गा दिशा ॥ तत्व मिळेल आदिपुरुषा ॥

नेत्र भेटतील दिनेशा ॥ दशन वरुणा ॥७३॥

मेदिनीं मिळतील चरण ॥ वाचा ग्रासील हुताशन ॥

हस्त प्रहरील प्रकंपन ॥ रोम वनस्पती ॥७४॥

हृदय मिळेल त्रिविक्रमां ॥ लिंगदेह प्रजापती ब्रह्मा ॥

अंतःकरण जाईल व्योमा ॥ चित्त अहंकारीं ॥७५॥

स्थूळदेह मिळेल धरणी ॥ पंचविसां होईल वांटणी ॥

रक्त मिळेल जीवनीं ॥ सत्य जाण ॥७६॥

आतां उरलिया शेषा ॥ तें मिळेल गा आकाशा ॥

तेथें शत्रुमित्र परियेसा ॥ नसे भेद ॥७७॥

ह्मणोनि हें शरीर असार ॥ तेथें कैसा आन विचार ॥

परि पापपुण्याचा प्रकार ॥ घडे येथें ॥७८॥

शेष मिळेल वैकुंठा ॥ हे वेगळी गा असे निष्ठा ॥

जो ब्रह्मकर्माचिया वाटा ॥ निवडील ज्ञानी ॥७९॥

कर्म ज्ञान उपासन ॥ हें गुरुमुखींचें वचन ॥

जन्ममरणासि कारण ॥ कर्म होय ॥८०॥

कर्मानुसार जन्ममरण ॥ भोक्ता जीव तरी आपण ॥

परि जाहलिया दिव्य ज्ञान ॥ उद्धरे प्राणी ॥८१॥

कोशकीटकाची झोळी ॥ आपणिया आपण गुंडाळी ॥

परि ज्ञान झालिया अंतराळीं ॥ निघोनि जाय ॥८२॥

ह्मणोनि श्रेष्ठ असे ज्ञान ॥ परि कर्म अभिन्न देहालागुन ॥

यास्तव करावें उपासन ॥ दोहीं मार्गीं ॥८३॥

भक्तीनें आचरितां कर्म ॥ प्राप्त होय ज्ञान निःसीम ॥

ऐसें करितां पद उत्तम ॥ पाविजे प्राणी ॥८४॥

कर्म ज्ञान उपासन ॥ हेंचि प्राणियां अनुष्ठान ॥

ह्मणोनि नवविध लक्षण ॥ भक्ती असे ॥८५॥

श्रवन कीर्तन आणि स्मरण ॥ पादसेवन वंदन अर्चन ॥

दास्य सख्य आत्मनिवेदन ॥ ऐसे प्रकार ॥८६॥

आतां असो हा परमार्थ ॥ गुरुशिष्यांचा एकांत ॥

सांगितला संकलित ॥ प्रसंगवशें ॥८७॥

कृपेनें ह्मणे श्रीरंग ॥ जंव सरेल कर्मभोग ॥

तंव आपणचि उद्वेग ॥ होईल तुज ॥८८॥

आतां असोत हीं वाक्यें ॥ सिंधु केवीं उपसूं नखें ॥

हें सांगितलें उन्मेखें ॥ तुजप्रती ॥८९॥

ऐसा अनेकां उत्तरीं ॥ उद्धवा बोलिला श्रीहरी ॥

तें सांगतां सविस्तरीं ॥ वाढेल ग्रंथ ॥९०॥

ऐसा एकादशीं भागवतीं ॥ मंत्र उपदेशी श्रीपती ॥

हें नाही न ह्मणावें संतीं ॥ कदाकाळीं ॥९१॥

मग उद्धवाप्रति श्रीपती ॥ पाठवी बदरिकाश्रमाप्रती ॥

आणि सांडिली द्वारावती ॥ श्रीकृष्णदेवें ॥९२॥

ते जाणोनि मुक्तिपुरी ॥ कीं उद्धरतील अनाचारी ॥

ह्मणोनि बुडविली सागरीं ॥ तयेवेळीं ॥९३॥

उद्धवातें ह्मणे श्रीपती ॥ पवित्र हे द्वारावती ॥

तरि तोचि भाग गोमती ॥ जाणिजे तुवां ॥९४॥

प्रभासा आले गोपिनाथ ॥ बोलाविला गद मन्मथ ॥

आणि जांबुवंतीचा सुत ॥ सांब तोही ॥९५॥

येथें मांडेल महामारी ॥ यादव आटतील समग्रीं ॥

तुह्मीं जावें वज्रपुरीं ॥ वेगवत्तर ॥९६॥

तेथें असावें चंद्रार्कवरी ॥ सुखें नांदावें पुत्रपौत्रीं ॥

स्वर्गा यावें समयांतरीं ॥ तेणेंचि शरीरें ॥९७॥

मग वंदोनि कृष्णचरण ॥ उत्तरे निघाले वेगेंकरुन ॥

आपुले घेवोनि स्त्रीजन ॥ तिघे वीर ॥९८॥

हे हरिवंशींची कथा ॥ तुज कथिली गा भारता ॥

श्रीभागवतींची योग्यता ॥ अनारिसी असे ॥९९॥

कृष्ण होता अश्वत्थतळीं ॥ तंव यादवीं मांडिली जळकेली ॥

सरस्वतीसागरमेळीं ॥ उन्मत्तपणें ॥१००॥

घेवोनि पाणीचीं कणसें ॥ तेणें पाडिलीं शिरें बहुवसें ॥

एकमेकाम पाडिती विलासें ॥ धरणीवरी ॥१॥

ऐसे आटले यादव सकळ ॥ एक उरला अनिरुद्धबाळ ॥

तया वज्रावेगळें यदुकुळ ॥ निमालें सर्व ॥२॥

ऐसा देखोनि अनर्थ ॥ दुःखें हरि जाहला निद्रिस्थ ॥

तंव चरण देखिला झळकत ॥ जरा पारधीयें ॥३॥

देखोनि पदपद्माचें किरण ॥ पारधी ह्मणे मृगवदन ॥

मग कानाडी वोढोनि संधान ॥ भेदिलें तेणें ॥४॥

आणि धांवत गेला त्वरित ॥ दृष्टीं पाहे तंव वैकुंठनाथ ॥

ह्मणोनि जाहला दुःखित ॥ अपराधभयें ॥५॥

मनीं परम शंकला कोळी ॥ परि नाभी ह्मणे वनमाळी ॥

तुज म्यां वधिलें रे वाळी ॥ येणेंचि उपायें ॥६॥

तें फेडावया देहऋण ॥ ह्मणोनि राखिला होता प्राण ॥

तरी तया संबंधें उत्तीर्ण ॥ जाहलों आतां ॥७॥

हा लोकां दाविला प्रबोध ॥ ऐसा आहे ऋणानुबंध ॥

येर्‍हवीं ममचरण अभेद ॥ भेदवे केवीं ॥८॥

असो स्वर्गा धाडिला अश्वरथ ॥ तंव आला वीर पार्थ ॥

कृष्णासि देखोनि मूर्छित ॥ जाहला तेव्हां ॥९॥

पार्थ ह्मणे गा अनंता ॥ उदरीं काय असे व्यथा ॥

हरि ह्मणे इच्छा तत्वतं ॥ गंगोदकाची ॥११०॥

मग तो वीरशिरोमणी ॥ पाताळ भेदोनि प्रथमबाणी ॥

आणिता जाहला पुण्यपाणी ॥ भोगावतीचें ॥११॥

तें दीधलें कृष्णाहातीं ॥ तंव हरिली अर्जुनाची शक्ती ॥

देवें निरवोनि सकळ स्थिती ॥ सांडिला देह ॥१२॥

परि अनारिसें ऋषिमातें ॥ स्पर्श केला धनुष्यातें ॥

तैं शक्ति हरिली गोपिनाथें ॥ अर्जुनाची ॥१३॥

मग तया अचेतना ॥ स्पर्श नसतां हुताशना ॥

ऊर्मीसंगें समुद्रजीवना ॥ भीतरीं गेलें ॥१४॥

आणिक असे पुराणांतरीं॥ वाहात गेलें पूर्वसागरीं ॥

तोचि स्थापिला ऋषेश्वरीं ॥ जगन्नाथ ॥१५॥

भागवतींचें अन्य मत ॥ अदृश्य जाहलें कृष्णतत्व ॥

परि हें नेणती समस्त ॥ लोक पैं ॥१६॥

मग गोपिका कृष्णवनिता ॥ पार्थें बैसविल्या रथीं समस्ता॥

तयां घेवोनि होय निघता ॥ मथुरापुरीसी ॥१७॥

तंव चोरीं लुटिला पार्थ ॥ ह्मणोनि धनुष्या घातला हात ॥

परि नुचले गांडीव सत्य ॥ तयालागीं ॥१८॥

ह्मणे तोचि मी धनुर्धर ॥ इंद्राचा आणिला कुंजर ॥

परि कृष्णाविणें अपवित्र ॥ जाहलों आजी ॥१९॥

मग पावला मथुरापुरी ॥ तेथें अवघ्या नेल्या सुंदरी ॥

हा असे पुराणांतरीं ॥ कथाभाग ॥१२०॥

जाहलें और्ध्वदैहिक समस्त ॥ राज्यीं बैसवोनि अनिरुद्धसुत ॥

अर्जुन हस्तनापुरीं जात ॥ तयेवेळीं ॥२१॥

तेणें कथिली धर्मासि कथा ॥ वैशंपायन ह्मणे गा भारता ॥

यदुवंश वाढला तो आतां ॥ सांगेन मी ॥२२॥

यादव आटले समस्त ॥ परि अनिरुद्धाचें होतें अपत्य ॥

तयासही वज्रनाभ ह्मणत ॥ सकळ लोक ॥२३॥

तो अर्जुनें केला मथुरापती ॥ आणि हस्तनापुरीं परिक्षिती ॥

ययातिवंश वाढला क्षितीं ॥ जंबुद्वीपीं ॥२४॥

आणि मेरुचे पाठारीं ॥ मदन असे वज्रपुरीं ॥

सांब गद पुत्रपौत्रीं ॥ नांदती ते ॥२५॥

त्वां मागां पुसिली कथा ॥ कीं यादवां नाहीं पिंडदेता ॥

तरि कृष्णवंश उभयतां ॥ पृथ्वीवरी असे ॥२६॥

राया करितां हरिकीर्तन ॥ महादोषांचें होत हरण ॥

श्रोतावक्ता दोन्ही जाण ॥ उद्धरती कीं ॥२७॥

आतां स्तबकाचे अंतावनीं ॥ ब्रह्मप्रळय वर्णील मुनी ॥

तें श्रवण कीजे सज्जनीं ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥२८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ प्रथमस्तबक मनोहरु ॥

श्रीकृष्णनिर्याणप्रकारु ॥ चतुर्दशोऽध्यायीं कथियेला ॥१२९॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ओंव्या ॥१२९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP