॥ श्रीगणेशाय नमः ॥
इंद्र विचारी मानसीं ॥ वज्र येईल कटकेसीं ॥
कश्यप तंव तापसी ॥ झुंजो न शके ॥१॥
तो असे महाअसुर ॥ त्याहीवरी ब्रह्मयाचा वर ॥
समरीं जिंकोनि निर्धार ॥ घेईल राज्य ॥२॥
कश्यप दोघांचा पिता ॥ परि दृष्टीं नाणी हे वार्ता ॥
अनुष्ठानीं तत्पर सर्वथा ॥ न बोले तो ॥३॥
तरी पृथ्वीचा फेडावया भार ॥ द्वारके अवतरला श्रीधर ॥
त्यासि सांगों हा विचार ॥ जावोनियां ॥४॥
मग तेथूनि निघाला इंद्र ॥ द्वारके आला सत्वर ॥
तंव देखिला समोर ॥ श्रीकृष्ण तो ॥५॥
कृष्णें देखोनियां इंद्र ॥ सामोरा आला श्रीकरधर ॥
सन्मान केला थोर ॥ इंद्रासी ॥६॥
झालें आलिंगन प्रेमळ ॥ देवें पुसिलें कुशळ ॥
गृहीं कुटुंब सकळ ॥ क्षेम असे कीं ॥७॥
मग इंद्र म्हणे मुरारी ॥ तुझेनि सुख निरंतरीं ॥
परि एक उदेला वैरी ॥ वज्रनाभ ॥८॥
तया प्रसन्न चतुरानन ॥ रणीं जिंकूं न शके कवण ॥
वर लाधला संपूर्ण ॥ नानाप्रकारीं ॥९॥
तो मागतो अमरावती ॥ त्यासि कवण झुंजती ॥
तया मृत्यु नाहीं हस्तीं ॥ प्राणियाचे ॥१०॥
देवा सकळही दिक्पाळ ॥ आणि पृथ्वीचे भूपाळ ॥
आज्ञा त्याची केवळ ॥ मानिती सर्व ॥११॥
वज्रपुरीचा राव दैत्य ॥ मजसीं अमरावती मागत ॥
त्यासि कश्यपें निवांत ॥ ठेविलासे ॥१२॥
मिळाला जो अवघड वर ॥ तो ऐकावा जी विचार ॥
परम दुःखे सुरेश्वर ॥ श्रीहरीसि बोलिला ॥१३॥
अंगावीण जो कां नर ॥ त्यावांचोनि हा असुर ॥
न मरे ऐसा निर्धार ॥ नारायणा ॥१४॥
मग म्हणे कृष्णनाथ ॥ वर अवघड दीसत ॥
मज न कळे गा निश्चित ॥ सुरेश्वरा ॥१५॥
अंगाविण तरी नर ॥ कोणीच नसे निर्धार ॥
आणि न मरे तो असुर ॥ तयाविण ॥१६॥
इंद्र म्हणे गा मुरारी ॥ तूं सर्वाचिया अभ्यंतरीं ॥
तुजवीण गा श्रीहरी ॥ काय असे ॥१७॥
मागां ऐसेंचि सांकडें ॥ हिरण्यकश्यपाचें बिरडें ॥
हिरण्यकश्यपाचें बिरडें ॥ तो त्वां वधिला कोडें विकटरुपें ॥१८॥
समुद्रमंथनी गोपाळा ॥ दैत्यभार जाहला गोळा ॥
मही जातां रसातळा ॥ रक्षिली तुवां ॥१९॥
जाहलें श्रुतींचे हरण ॥ तें तुज कळलें कैसें न ॥
तैं शंखासुर वधोन ॥ आणिल्या श्रुती ॥२०॥
हिरण्याक्षाचें स्मरण ॥ तें कैसें झालें अज्ञान ॥
वराहरूप धरोन ॥ नाशिला तुवां ॥२१॥
बलीनें घेतली अमरावती ॥ ते त्वां सोडविली मागुती ॥
तुज न कळे श्रीपती ॥ ऐसें काय असे ॥२२॥
तुझीं सांगतां चरित्रें ॥ आम्हां न कळती विचित्रें ॥
शेषासही सहस्त्र वक्रें ॥ न वर्णवती ॥२३॥
मग म्हणे कृष्णराणा ॥ आतां आलें माझिये मना ॥
याचें मरण मदना ॥ हातीं असे ॥२४॥
मदन होय अनंग ॥ हा त्याच्या वधासि योग्य ॥
आतां तेथें करावा रीघ ॥ कवणेपरी ॥२५॥
ऐशा तंव करितां गोष्टी ॥ हंसजोडा देखिला दृष्टीं ॥
जे बोलके मुखपाठी ॥ सत्यलोकींचे ॥२६॥
एक हंस एक हंसिणी ॥ तीं विधात्याचीं दोन्ही ॥
येवोनि कृष्णांगणीं ॥ बैसलीं तेथें ॥२७॥
ते हंसिणी सूचीमुखी ॥ देखोनि देव जाहला सुखी ॥
मग बोले कौतुकीं ॥ हंसांप्रती ॥२८॥
तुमचें कवण वसतिस्थान ॥ कोठें करितां गमन ॥
येथें यावया कारण ॥ काय सांगा ॥२९॥
नमस्कारूनि म्हणे हंस ॥ आमुचा सत्यलोकीं वास ॥
आह्मीं ब्रह्म्याचे दास ॥ हिंडों त्रिभुवनीं ॥३०॥
माझे मनींची उत्कंठा ॥ तुज पहावें श्रीवैकुंठा ॥
आणि मुक्तीचा दारवंटा ॥ द्वारका हे ॥३१॥
मग तयांतें ह्मणे हरी ॥ कीं तुह्मीं हिंडतां देशांतरीं ॥
तरी एखादि नोवरी ॥ देखिली असे कीं ॥३२॥
आमुचा पुत्र प्रद्युम्न ॥ पैल हा रुपें मदन ॥
यासि योग्य विचारोन ॥ पहा नोवरी ॥३३॥
तंव हंस ह्मणे अवधारीं ॥ मी गेलों होतों वज्रपुरीं ॥
तेथें कन्या असे सुंदरी ॥ वज्रनाभाची ॥३४॥
तिचें नांव प्रभावती ॥ चंद्रप्रभे ऐशी दीप्ती ॥
तें कन्यारत्न क्षितीं ॥ असे देखा ॥३५॥
ते लावण्ताची लतिका ॥ तिसी घडित अंबिका ॥
पाहतां या तिहीं लोकां ॥ ऐसी नाहीं ॥३६॥
तिची वर्णितां रूपरेखा ॥ ती सौंदर्याची कूपिका ॥
उपमेस आणिका ॥ देतां नये ॥३७॥
पृथ्वीमाजी एक रत्न ॥ तें कंदर्पाचें भुवन ॥
तुह्मा योग्य असे सून ॥ कृष्ण देवा ॥३८॥
परि एकदा तो असुर ॥ वज्र करूं पाहे सौवंर ॥
कन्या जाहली उपवर ॥ ह्मणोनियां ॥३९॥
तिचे रूपा योग्य ऐसा ॥ वर नाहीं गा परियेसा ॥
ह्मणोनि जो येईल मानसा ॥ तोचि वरील ॥४०॥
ऐसी केली वज्रें गोष्टी ॥ स्वयंवराची हळुवटी ॥
कीं वर देखोनि दृष्टीं ॥ घालील माळ ॥४१॥
हेंचि रायें धरिलें मनीं ॥ तों जाहली आकाशवाणी ॥
इच्या पतिहातें रणीं ॥ पावसी मरण ॥४२॥
इयेचा जो कांत ॥ तो तुझा करील रे घात ॥
ऐसा तो शब्द ऐकत ॥ दैत्यराव ॥४३॥
मग दैत्यें बुध्दि करोनी ॥ ठेविली मंदिरीं रक्षणीं ॥
पुरुष संचरेल कोणी ॥ ह्मणोनियां ॥४४॥
कन्येसि योजावा वर ॥ तोचि आपुला दावेदार ॥
या चिंतेंत असुर ॥ राहिलासे अजूनी ॥४५॥
ह्मणोनि सैवंर राहिलें ॥ तयेसि रक्षण असें केलें ॥
ऐसें हंसें कथिलें ॥ कृष्णाप्रती ॥४६॥
मग ह्मणे मुरारी ॥ त्वां सांगीतली नोवरी ॥
आमुचा सखा तूं निर्धारीं ॥ निरंतर ॥४७॥
तरि ते मदनातें वरी ॥ हंसा ऐसा प्रयत्न करीं ॥
बोधावी ते सुंदरी ॥ जावोनियां ॥४८॥
मदनाच्या गुणकळा ॥ तुवां वानाव्या सकळा ॥
या श्रोत्रपुण्याच्या फळा ॥ घेई हंसा ॥४९॥
सहस्त्र असत्य बोलावें ॥ परि एक कलत्र जोडावें ॥
तेणें होय पुण्य बरवें ॥ सत्य जाण ॥५०॥
मग भावें ह्मणें हंस ॥ मी तुमचा असें दास ॥
हें करीन विश्वास ॥ धरा तुह्मी ॥५१॥
देवासि करोनि नमन ॥ हंस स्त्रीसह तेथून ॥
गेला असंख्य देश टाकोन ॥ वज्रपुरासी ॥५२॥
इकडे कश्यपापाशीं ॥ इंद्र आणि हृषीकेशी ॥
भेटावया तयासी ॥ गेले दोघे ॥५३॥
तो हंस गेला वज्रपुरा ॥ राहिला बाह्य वनांतरा ॥
बरवें वन अवधारा ॥ देखोनियां ॥५४॥
तैं वनस्थळी गोमटी ॥ हंसें देखिली ते दृष्टीं ॥
उतरला तळवटीम ॥ तया वनीं ॥५५॥
तृषें होता पीडिला ॥ ह्मणोनि सरोवरी उतरला ॥
उदक घेवोनि जाहला ॥ सावचित्त ॥५६॥
मग तया सरोवरीं ॥ कमळें देखिलीं नेत्रीं ॥
चारा घेतला पोटभरी ॥ कमळांचा ॥५७॥
हंस आणि हंसिणी ॥ संतोषलीं दोघें मनीं ॥
मग राहिलीं तपोस्थानीं ॥ घटिका एक ॥५८॥
भोंवते चांफे बकुळ ॥ आम्र फणस रसाळ ॥
आणि सुगंध शीतळ ॥ चंदन ते ॥५९॥
जाई जुई मालती ॥ द्राक्षी आणि शेवंती ॥
फळीं पुष्पीं डोलती ॥ तरुवर ॥६०॥
जांभळी नारिंगी निंबोणी ॥ रायआंवळी टेंबुरणी ॥
केतकी कल्हार नलिनी ॥ खर्जूरिया ॥६१॥
मधुमंदार रायकेळी ॥ नाना पोफळी नारळी ॥
लवताती सदा फळीं ॥ फळभारें ॥६२॥
तळीं वाहती निरुंद पाटा ॥ आणि भोंवती राहाट ॥
पवनासि रिघावया कष्ट ॥ होती तेथें ॥६३॥
नृत्य करिती मयूर ॥ कोकिळा बोलती सुस्वर ॥
भ्रमरांचे झणत्कार ॥ होती बहु ॥६४॥
उदकें पूर्ण सरोवर ॥ भ्रमती सारसमधुकर ॥
कमळांचे विहार ॥ करिताती ॥६५॥
केलें कृत्रिम सरोवर ॥ राहाट लाविले मनोहर ॥
उद्यान शोभलें परिकर ॥ उत्तम अती ॥६६॥
जाणोनि तें शोभावन ॥ वसंतें श्रृंगारिलें पूर्ण ॥
तो मदनाचा जाण ॥ संवगडा ॥६७॥
मदन ईश्वरें जाळितां ॥ तो तयासंगेंचि होता ॥
कीं मदनाची भेटी आतां ॥ येथें होईल ॥६८॥
ह्मणोनिया कीं वसंतें ॥ श्रृंगारिलें या वनातें ॥
होईल भेटी मदनातें ॥ ह्मणोनिच कीं ॥६९॥
तेथें आली प्रभावती ॥ सवें चंद्रिका गुणवती ॥
आणखीही बहुती ॥ परिचारिका ॥७०॥
मग सकळ कन्या मिळोनी ॥ गौरीचिये पूजेलागुनी ॥
फुलें वेंचावया वनीं ॥ संचरती त्या ॥७१॥
एकी तोडिताती फुलें ॥ एकी निंबुवें रसाळें ॥
दाळिंब करकमळें ॥ झेलिताती ॥७२॥
नाना विनोद करिती ॥ फळें पुष्पें तोडिती ॥
कौतुकें वाण देताती ॥ एकमेकी ॥७३॥
एकीची पुष्पीं जडली प्रीती ॥ एकीस फळें आवडती ॥
मग सरोवरीं खेळती ॥ येवोनियां ॥७४॥
कोणी उदकीं प्रवेशती ॥ एकी कमळें तोडिती ॥
तंव प्रभावती जाहली देखती ॥ त्या हंसासी ॥७५॥
ज्यांची सुवर्णमय कांती ॥ सरोवरीं क्रीडा करिती ॥
कौतुकें चालिली प्रभावती ॥ धरावया ॥७६॥
पक्षियांची सुवर्णकळा ॥ देखे प्रभावती डोळां ॥
मग वारिल्या सकळा ॥ पुढें जातां ॥७७॥
ह्मणे न करा वो गजर ॥ ऐकतां उडेल द्विजवर ॥
मी धरितें साचार ॥ पक्षियासी ॥७८॥
मग सांचळ न करित ॥ प्रभावती जवळी येत ॥
धरावयासि त्वरित ॥ तया हंसा ॥७९॥
त्वरें आली हळुवटी ॥ हात घालावा जंव कंठीं ॥
तंव उडोनि राहाटीं ॥ बैसला हंस ॥८०॥
हंस करी कलकला ॥ हंसिणी वरी घाली गळा ॥
प्रियेसि क्षेम वेळोवेळां ॥ देत असे ॥८१॥
हंसिणी आणि हंसासी ॥ कंठ लाविती कंठासी ॥
कीं धरिला हातासीं ॥ ह्मणोनियां ॥८२॥
हंस हंसिणी दोघांप्रती ॥ शृंगारभोग प्रकट होती ॥
चुंबन आलिंगन प्रीतीं ॥ होत दोघां ॥८३॥
तें देखोनि प्रभावती ॥ मनीं होय दुश्चित्ती ॥
ह्मणे पतिविण युवती ॥ न रचीं देवा ॥८४॥
हा पक्षियांचा जोडा ॥ दोघें करिती क्रीडा ॥
तयांसि सुखभोग गाढा ॥ रात्रंदिवस ॥८५॥
ऐसें ह्मणें प्रभावती ॥ कीं पतिविण न शोभे युवती ॥
काय करावी रूपवती ॥ पुरुषेंविण ॥८६॥
धिग् धिग् माझेम जाहलें ॥ वायां रूप हें दीधलें ॥
ऋषिवाक्य वृथा गेलें ॥ दुर्वासाचें ॥८७॥
ही पक्षिणी पतिसरिसें ॥ रात्रंदिवस सुखें तोषे ॥
परि मज देवें कैसें ॥ दंडियेलें ॥८८॥
तारुण्य जातसे वायां ॥ हें रूप दीधलें कासया ॥
आतां काय वांचोनियां ॥ हतभग्येनें ॥८९॥
तेंचि रूप बरवें देखा ॥ जे पतीसि देखतां सुखा ॥
हें लावण्य परि विखा ॥ ऐसें केलें ॥९०॥
सुंदर अथवा कुरूप ऐसा ॥ वर मिळो भलतैसा ॥
परी रात्रि आणि दिवसा ॥ आनंद मनीं ॥९१॥
रायाउदरीं जन्मणें ॥ आणि स्वरूपप्राप्ति होणें ॥
परि तें लावण्य पुरुषाविणें ॥ व्यर्थ होय ॥९२॥
पतिविण असे जे नारी ॥ ते भूमिभार या संसारीं ॥
जन्मा घाली श्रीहरी ॥ पापिणी ते ॥९३॥
पूर्वीं दुष्ट कर्म करिती ॥ त्या पुरुषाविण जन्मती ॥
आपुले संचित भोगिती ॥ पूर्वकर्म ॥९४॥
मृगी आणि पक्षिणी ॥ जन्मासि येती काननीं ॥
तरी पतिसवें नित्यानीं ॥ क्रीडा करिती ॥९५॥
वायां आली मनुष्ययाती ॥ झाली दुःखाची प्राप्ती ॥
ऐसें कांहो उमापती ॥ केलें मज ॥९६॥
बापें द्यावें वरासी ॥ तंव मरण प्राप्त तयासी ॥
तेनें घातलें बंदीसी ॥ मृत्युभयें ॥९७॥
आतां ऐसा हा संसार ॥ किती भोगावा दुस्तर ॥
मरण होईल शीघ्र ॥ तरी बरवें ॥९८॥
म्यां पूर्वीं कर्म केलें ॥ कीं पतिपत्नीतें विघडिलें ॥
तेंचि आजि फळा आलें ॥ पूर्व संचित ॥९९॥
ऐसी ते चिंता करितां ॥ प्रभावती दुश्चित्तता ॥
उभी असे तटस्था ॥ हंसांपाशीं ॥१००॥
तियेचें अंतर जाणोनी ॥ बोलतसे ती हंसिणी ॥
तुझे मनींचे साजणीं ॥ कळलें मज ॥१॥
तया शब्द मंजुळा ॥ विस्मित झाली ते अबळा ॥
स्पष्ट वाचा पक्षिकुळा ॥ देखोनियां ॥२॥
वाचा शुध्द देखोनी ॥ तयेसि बोले वचनीं ॥
तंव आला तयेस्थानीं ॥ वज्रनाभ ॥३॥
तेणें राहिली ते कथा ॥ प्रभावतीस लागली अवस्था ॥
वज्र आला अवचितां ॥ ह्मणोनियां ॥४॥
दृष्टीं देखोनियां हंसें ॥ मग राव तयातें पुसे ॥
तुह्मीं कवण ऐसें ॥ सांगा मज ॥५॥
तुह्मां असे कवण स्थान ॥ कोठें जाल येथोन ॥
जातां कोठें सांगा कथन ॥ आपुलें तुह्मीं ॥६॥
मग ह्मणे राजहंस ॥ आह्मां ब्रह्मलोकीं वास ॥
मी ब्रह्मयाचा दास ॥ हिंडें त्रिभुवनीं ॥७॥
तंव राव पुसे वचनीं ॥ तुह्मीं हिंडतां त्रिभुवनीं ॥
काय अपूर्व नयनीं ॥ देखिलेसें ॥८॥
मग ह्मणे राजहंस ॥ एक अपूर्व तो कैलास ॥
सर्व प्रकारें संतोष ॥ तेथें असे ॥९॥
आणि भद्रनाम नट ॥ तो सर्वकाळ सुभट ॥
सर्वशास्त्र मुखपाठ ॥ जाण त्यासी ॥१०॥
मी हिंडतां द्वीपांतरीं ॥ ऐसा न देखिला नटधारी ॥
वज्र ह्मणे परस्परीं ॥ ऐकिलासे ॥११॥
यापरी हंसाचिया वचनें ॥ तयासि वज्रनाभ ह्मणे ॥
हंसा तुझिया संभाषणें ॥ निवालों मी ॥१२॥
आतां हिंडतां तुह्मां ॥ जरि भेटेल भद्रनामा ॥
तरि कृपा करोनि आह्मां ॥ भेटवींजे ॥१३॥
आणीक दुसरें ऐक हंसा ॥ तुह्मी येथें सुखी असा ॥
यावें निर्भय राणिवसां ॥ खेळावयासी ॥१४॥
ऐसें तयातें सांगोन ॥ वज्रनाभ निघे तेथुन ॥
मंदिरीं केलें गमन ॥ आनंदेसीं ॥१५॥
मग तया हंसिणीसी ॥ प्रभावती बोले कैसी ॥
माझे मनींचे तुह्मासी ॥ जाणवलें जी ॥१६॥
ऐसीं तुह्मीं सज्ञानें ॥ जाणतां पुढील चिन्हें ॥
तरि तुह्मांसि बोलणें ॥ एक मात ॥१७॥
चला आमुचे मंदिरा ॥ बोलों पुढील विचारा ॥
येथें अंतरींचे पक्षींद्रा ॥ बोलों नये ॥१८॥
तें मानवलें हंसांसी ॥ आली कुमारी गृहासी ॥
कौतुकें आणिलीं मंदिरासी ॥ प्रभावतीनें ॥१९॥
स्नेहें मंदिरीं आणोनी ॥ हंस आणि हंसिणी ॥
मग एकांतवचनीं ॥ पुसे त्यांसी ॥२०॥
माझिये मनींचे गुज ॥ कैसें कळलें वो तुज ॥
हें सर्व सांगावें मज ॥ कृपाकरोनी ॥२१॥
हंसिणी ह्मणे वो सुंदरी ॥ तूं लावण्य चातुरी ॥
मज न दिसे सरी ॥ तुज ऐसी ॥२२॥
बाई धन्य तुझें रूप ॥ दृष्टीं न देखों ऐसें स्वरूप ॥
तुज देखतां कुसुमचाप ॥ भूलोनिजाय ॥२३॥
ऐसी तुझी स्वरूपता ॥ आणि तारुण्याची भरिता ॥
परि ते वायां जातां ॥ दिसे मज ॥२४॥
हें तारुण्य जातसे वृथा ॥ तें परतोनि नये सर्वथा ॥
जैसी सरिता वाहतां ॥ परतेचिना ॥२५॥
चतुरे आणिक ऐक एक ॥ हें तारुण्य असे क्षणिक ॥
सुख भोगणेम सम्यक ॥ याचि वेळीं ॥२६॥
तंव बोले कुमारिका ॥ तूं माझी हो अंबिका ॥
माझिये मनींचे दुःखा ॥ जाणिलेंस ॥२७॥
तंव ते ह्मणतसे देखा ॥ माझें नाम सूचीमुखा ॥
ब्रह्मलोकीं वास निका ॥ आह्मा असे ॥२८॥
तयेसि प्रभावती बोलत ॥ सूचीमुखा नाम साजत ॥
तुझे मुखांत अमृत ॥ वाणिरूप ॥२९॥
सखिये वो सूचीमुखे ॥ मी तुजसीं बोलतां शंकें ॥
मजजोगा रूपरेखें ॥ सांग वर ॥१३०॥
तुह्मी त्रिभुवनीं हिंडतां ॥ देखिलें असेल रूपवंता ॥
तो सांगा वर तत्त्वतां ॥ मजप्रती ॥३१॥
मग ते ह्मणे हंसिणी ॥ एक रत्न असे मेदिनीं ॥
जैसी तारांमाजी अग्रगणी ॥ चंद्रमा तो ॥३२॥
तैसा उत्तम सोमवंशी ॥ जन्म श्रीकृष्ण रुक्मिणीकुशी ॥
प्रद्युम्न असे गुणराशी ॥ तुज योग्य वर ॥३३॥
सांगतां कृष्णाची कथा ॥ तरि विस्तार होईल ग्रंथा ॥
कीं सहस्त्रमुखें वर्णितां ॥ श्रमे शेष ॥३४॥
साक्षात् वो मदन ॥ श्रीकृष्णाचा नंदन ॥
तो द्वारकेंत प्रद्युम्न ॥ जन्मलासे ॥३५॥
तो तुजयोग्य असे वर ॥ जोडा दिसतो मनोहर ॥
त्यावांचोनि अन्य नर ॥ कोणी न दिसे ॥३६॥
तो सांवळा निमासुर ॥ अंगीं तारुण्याचा भर ॥
संग्रामीं महावीर ॥ जिंकीतसे ॥३७॥
त्याचे गोत्रज अपार ॥ छपन्नकोटी यादववीर ॥
एकलक्ष साठसहस्त्र ॥ बंधु तया ॥३८॥
तयांमाजी तो मदन ॥ हरीचा वडील नंदन ॥
प्रसन्न करूनि त्रिनयन ॥ मागीतला ॥३९॥
त्वां पूजिलीसि गे गौरी ॥ तरि तो मदन तूतेंचि वरी ॥
तेणें तूं साजिरी ॥ मग जगामाजी ॥१४०॥
तो मदन महाक्षत्री ॥ जैसा गजावरी केसरी ॥
शौर्यें बाळपणीं मारी ॥ शंबरातें ॥४१॥
तो कृष्णासि निर्धारें । दीधलासे कर्पूरगौरें ॥
सागरीं टाकिला शंबरें ॥ परि न मरे ॥४२॥
तंव प्रभावती पुसत ॥ तो सांगा वो वृत्तांत ॥
कैसा कृष्ण मागत ॥ ईश्वरासी ॥४३॥
कैसें देवें तप केलें ॥ कैसें इश्वरें दीधलें ॥
तें सांगावें वहिलें ॥ मजलागीं ॥४४॥
कैसा वधिला शंबर ॥ सांगा त्याचा विचार ॥
मग माझा विचार ॥ सांगेन तूतें ॥४५॥
कैसा जन्मला वीर ॥ कां वधिला शंबर ॥
मदनवीरा शंबर ॥ कोपला कां ॥४६॥
मग ह्मणे हंसिणी ॥ म्यां जाणितलें साजणी ॥
तूं हो प्रीतीच्या लक्षणीं ॥ पुससी मज ॥४७॥
परमार्थ नाडवे पाखंडियासी ॥ तैसेंचि सत्य असत्यासी ॥
प्रीतीविण कथा तैशी ॥ अव्हेरिती ॥४८॥
आतां जाहलें कृष्णकाजा ॥ हे अवश्य मदनाची भाज ॥
ह्मणोनि पुसतसे चोज ॥ प्रीती करूनी ॥४९॥
जाहला पुसण्याचा प्रसंग ॥ सांडूं नये तो सन्मार्ग ॥
आतां ऐका कथारंग ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१५०॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ प्रथम स्तबक मनोहरू ॥
प्रभावतीआख्यान विस्तारू ॥ तृतीयोध्यायीं कथियेला ॥१५१॥
श्रीगोपाल कृष्णार्पणमस्तु ॥ ओव्या ॥१५१॥