॥ श्रीगणेशाय नमः ॥
अनुकुल असतां जगन्नाथ ॥ सहज सांपडे सुपंथ ॥
दुर्घट असतांही मनोरथ ॥ पूर्ण होती त्वरेनें ॥१॥
पूर्वाध्यायीं कृष्णसंकेत ॥ हंसमुखें ऐके मन्मथ ॥
कीं दैत्यासि वधोनि त्वरित ॥ द्वारके यावें ॥२॥
मग सांब आणि गद ॥ करिती मदनासि अनुवाद ॥
कीं आतां वज्रनाभाचा वध ॥ कीजे कैसा ॥३॥
स्त्रियापुत्रांचें करोनि रक्षण ॥ कैसें करावें युध्दकदन ॥
पडिलें चिंतावर्तीं मन ॥ तया वीरांचें ॥४॥
तंव वाचा जाहली गगनीं ॥ तुह्मीं न धरावी चिंता मनीं ॥
वज्र वधावा समरंगणीं ॥ अनंगा तुवां ॥५॥
सावध होई गा मन्मथा ॥ पितृआज्ञा मानीं सर्वथा ॥
हे आकाशवानी मिथ्या ॥ मानूं नको ॥६॥
ऐसी जाहली गगनवाणी ॥ ती ऐकिली सकळजनीं ॥
तो वज्रनाभ दचकूनि मनीं ॥ सावध होय ॥७॥
खळबळलें सर्व नगर ॥ तत्काळ दैत्यें पाठविलें हेर ॥
आणि सकळ दळभार ॥ सिध्द केला ॥८॥
हेर फिरती घरोघरीं ॥ आलें प्रभावतीच्या मंदिरीं ॥
तंव तेथें देखिलें नेत्रीं ॥ सहा वीर ॥९॥
मग जाऊनि सांगती रायासी ॥ ह्मणती दैत्येंद्रा परियेसीं ॥
सहा वीर तेजोराशी ॥ प्रभावतीसदनीं ॥१०॥
ऐसें सांगितलें हेरीं ॥ ऐकतां कोपला इंद्रारी ॥
मग दैत्यनाथ काय करी ॥ वज्रनाभ तो ॥११॥
सैन्यासि केला हाकार ॥ बाहिला सुनाभ सहोदर ॥
ह्मणे धरोनि आणारे चोर ॥ साहीजण ॥१२॥
तेथें आली परिचारिका ॥ ते सांगे दैत्यनायका ॥
ह्मणे प्रभावतीनें वर्हाडिका ॥ केली तयांसी ॥१३॥
त्या तिघी तुमच्या कुमरी ॥ तिघांवीरांच्या जाहल्या नारी ॥
आणि जन्मले त्यांचे उदरीं ॥ तिघे पुत्र ॥१४॥
ऐसें वृत्त वज्रनाभासी ॥ जंव सांगती जाहली दासी ॥
तंव तो कोपला मानसीं ॥ अधिकची ॥१५॥
इतुक्यांत कश्यपयागींचा हेर ॥ तोही आला वेगवत्तर ॥
ह्मणे पूर्णाहुतीचा मंत्र ॥ आरंभिला तेथें ॥१६॥
रायें तें ऐकोनि वचन ॥ अत्यंत क्रोधावलें मन ॥
मग हाकारिलें सैन्य ॥ दैत्यनाथें ॥१७॥
परम कोपा चढला वज्र ॥ मंदिरा धाडिला सैन्यभार ॥
ह्मणे वेढारे आवार ॥ प्रभावतीचें ॥१८॥
प्रसंग देखोनि प्रभावती ॥ बहु येतसे काकुळती ॥
ह्मणे काय करूंजी पती ॥ वोढवलें दुःख ॥१९॥
ह्मणोनि गळ्यासि वेंघत ॥ आतां मारितील तुह्मां दैत्य ॥
कीं मजकारणें जीवित ॥ गेलें तुमचें ॥२०॥
हा कोपलिया वज्रनाभ दैत्य ॥ राखों नशके विश्वनाथ ॥
निश्चयें आतां पुरला अंत ॥ प्राणेश्वरा जाणिजे ॥२१॥
मग तीस सांत्विलें मन्मथें ॥ ह्मणे चिंता नकरीं कांते ॥
हीं मारील गजयूथें ॥ सांबसिंह आमुचा ॥२२॥
सैन्य आलें दारवंटा ॥ टाकिती धोंडे आणि विटा ॥
एक शिडिया लावोनि वाटां ॥ वोळंगती तेथें ॥२३॥
मदनासि ह्मणे प्रभावती ॥ संकटीं चिंतावा श्रीपती ॥
मग तोचि पावेल आकांतीं ॥ देव आह्मां ॥२४॥
परमावेशें बोले गदु ॥ हे तुमचे पिताबंधु ॥
नातरी मी करितों वधु ॥ समस्तांचा ॥२५॥
मग बोले प्रभावती ॥ कीं हे दैत्य दुष्टयाती ॥
यांसि वधिलियाविण निर्गती ॥ आह्मां कैंची ॥२६॥
तुह्मी जरी राखाल त्यांतें ॥ तरि ते वधितील आह्मातें ॥
ह्मणोनि करावें युध्दातें ॥ हेंचि सत्य ॥२७॥
एकत्र मिळतां अग्नीजीवन ॥ एका निश्चयें होय मरण ॥
तरी आतां पितृनिधन ॥ होईल सत्य ॥२८॥
तैं चंद्रावती आणि गुणवंती ॥ दोघींस उद्भवली भीती ॥
मग त्वरें आल्या प्रभावती ॥ जवळी देखा ॥२९॥
येरी बोलती प्रभावतीसी ॥ दैत्य मारितील आह्मासी ॥
तरि पुत्रांसहित पतींसी ॥ रक्षावें कैसें ॥३०॥
प्रभावती ह्मणे स्थिर ॥ मज ऋषीचा आहे वर ॥
कीं अमर होईल भ्रतार ॥ अक्षय चुडे ॥३१॥
मग त्या खङ्गे आणिती ॥ आणि तिघांचे करीं देती ॥
तंव युध्दा सेनापती ॥ सुनाभ आला ॥३२॥
हंस येवोनि ह्मणे त्वरितीं ॥ मदना चालावें द्वारावती ॥
तंव हांसे रतिपती ॥ हंसा सवें ॥३३॥
ह्मणे कापुराचें बाणें ॥ केवीं घडे अग्नीचें विझणें ॥
तैसें येथोनि पळणें ॥ मज घडे केवीं ॥३४॥
वनासि ग्रासी हुताशन ॥ तमा ग्रासी सूर्यकिरण ॥
तैसें हें दिसे दैत्यसैन्य ॥ मज मदनासी ॥३५॥
सागरावरी जैसा अगस्ती ॥ कीं राहुवरी मारुती ॥
तैसा असें मी रतिपती ॥ दैत्यांवरी या ॥३६॥
तंव क्रोधावला गदवीर ॥ सिंहनादें गाजवी अंबर ॥
उघडूनि मंदिराचें द्वार ॥ निरखी सैन्य ॥३७॥
सैन्यामाजी घातली उडी ॥ खङ्गप्रहारें शिरें तोडी ॥
तेव्हां वीराची प्रतापप्रौढी ॥ जाणवली सकळां ॥३८॥
सैन्यें केला हाहाःकार ॥ ह्मणती धराधरारे चोर ॥
परि तो यादवीयवीर ॥ अजिंक्य सर्वां ॥३९॥
जैसा कोपोनि केसरी ॥ कुंजरां मारी एकसरीं ॥
तैसी मांडिली सैन्यबोहरी ॥ तया वीरें ॥४०॥
वीर सोडिती असंख्यबाण ॥ येरू निवारी शस्त्रेंकरून ॥
कोलाहलें तेव्हां गगन ॥ दुमदुमिलें सर्व ॥४१॥
ऐसें युध्द मांडिलें तुंबळ ॥ गद येकला दैत्य सकळ ॥
मग घेवोनियां अर्गळ ॥ चालिला वीर ॥४२॥
फोडी गजांचीं कुंभस्थळें ॥ माजी उसळती मुक्ताफळें ॥
असंख्य दैत्यांचीं शिरकमळें ॥ करी चूर्ण ॥४३॥
ऐसा केला अनिवार मार ॥ वाहविले शोणिताचे पुर ॥
अस्थिमांसांचे डोंगर ॥ रणीं पडले ॥४४॥
तयासि पुसे सुनाभवीर ॥ ह्मणे कोठील रे तूं झुंजार ॥
कां मांडिलासि हा प्रकार ॥ यमपंथाचा ॥४५॥
मग तयासि गद बोलत ॥ असुरा सोमवंश विख्यात ॥
द्वारके श्रीकृष्ण नांदत ॥ महाप्रतापी ॥४६॥
त्याचा असें मी भद्रजाती ॥ करूं आलों तुमची शांती ॥
आतां सर्व दैत्यांसि मुक्ती ॥ क्षणें देतों ॥४७॥
ऐकतां कोपला दैत्यनाथ ॥ गरगराम गदा भोवंडित ॥
धांवूनि आला अकस्मात ॥ गदावरी ॥४८॥
कीं मेरु आणि मंदराचळ ॥ तैसे दोघेही प्रबळ ॥
हाणिताती वक्षस्थळ ॥ एकमेकांचें ॥४९॥
सुनाभें हाणितां यदुनंदन ॥ मूर्छित पडिला अचेतन ॥
परि सवेंचि सांवरून ॥ उठवला गद ॥५०॥
दैत्य हाणोनि वक्षस्थळीं ॥ मूर्छित पाडिला भूमंडळी ॥
मुखीं अशुध्दाची गुरळी ॥ सांडिली दैत्येम ॥५१॥
तंव धांविन्नला कुंभवीर ॥ आपुला घेवोनि दळभार ॥
कीं संकटीं पडिला वीर ॥ ह्मणोनियां ॥५२॥
तो येतां जंव देखत ॥ तंव उठिला जेवीं धूमकेत ॥
श्रीकृष्णाचा प्रियसुत ॥ सांबवीर ॥५३॥
ह्मणे रे कुंभका दुराचारा ॥ एकावरी आलासि दुसरा ॥
तरि परतें रे माघारा ॥ मजवरी आतां ॥५४॥
ऐकतां परतला कुंभवीर ॥ महाबलाढ्य धनुर्धर ॥
तेणें वेढिला सांबकुमर ॥ प्रतापबळें ॥५५॥
येरू घेतसे हातोफळी ॥ धडमुंडे करी वेगळीं ॥
कित्येक वीर महीतळीं ॥ आपटिलें सांबें ॥५६॥
गजांवरी गज हाणित ॥ मुष्टिघातें दंत पाडित ॥
रथांवरी रथ फेंकित ॥ महाप्रतापी ॥५७॥
तो जांबुवंतीचा सुत ॥ शिरीं हाणी कुंभदैत्य ॥
जैसा घडे वज्रपात ॥ पर्वतासी ॥५८॥
प्रचंडवीर कृष्णसुत ॥ जांबुवंतनातू विख्यात ॥
तेणें मांडिला असे घात ॥ दैत्यसैन्याचा ॥५९॥
लोटले अशुध्दांचे पुर ॥ मूर्छित पडतां कुंभवीर ॥
पळों पाहे दैत्याभार ॥ तये वेळीं ॥६०॥
तंव मावेचिया रथीं ॥ बैसता जाहला रतिपती ॥
आणि शेष जाहलां सारथी ॥ मन्मथाचा ॥६१॥
मदन ह्मणे आपुल्या कुमरा ॥ तुह्मीं रक्षावें घरदारा ॥
सावधानपणें समग्रां ॥ सांभाळावें ॥६२॥
मोडावला जाणोनि कुंभ ॥ उठावला वज्रनाभ ॥
मग पाठीसि घातला सांब ॥ मदनवीरें ॥६३॥
गर्वें मदनासि ह्मणे वज्र ॥ तूं कालचें रे लेंकुर ॥
तरी मजसीं महारुद्र ॥ भिडुं नशके ॥६४॥
तयासि ह्मणे मन्मथ ॥ तुझा कळला रे पुरुषार्थ ॥
कीं जो आपणासि वानित ॥ तो यातिहीन ॥६५॥
जो विद्येनें असे हीन ॥ तो बहुत बोले वचन ॥
आणि भला तरि तो सज्ञान ॥ न बोले कांहीं ॥६६॥
ऐसें ऐकतां कोपला असुर ॥ वेगेम सोडी महाशर ॥
कीं विंधावा महावीर ॥ एकेचि बाणें ॥६७॥
तो अनिवार मदनें देखोन ॥ केलें त्याचें निवारण ॥
परि सोडी आणखी बाण ॥ दैत्यनाथ ॥६८॥
ऐसा दोघांचा निर्वाण ॥ संग्राम होतसे दारुण ॥
बाणें करिती निवारण ॥ एकमेकांसी ॥६९॥
इकडे कश्यपयागसमाप्ती ॥ जाहली असे पूर्णाहुती ॥
चिंतातुर जाहला सुरपती ॥ तये वेळीं ॥७०॥
ह्मणे आतां वज्र येईल ॥ आणि अमरावती घेईल ॥
तरि संकटीं कोण वारील ॥ त्या दैत्यासी ॥७१॥
ऐसी इंद्र चिंता करित ॥ तंव आला ब्रह्मसुत ॥
उठोनियां इंद्र नमित ॥ नारदासी ॥७२॥
इंद्र पुसे नारदासी ॥ स्वामी करावी युक्ती कैसी ॥
करूं पाहे युध्द आह्मासी ॥ वज्रनाभ ॥७३॥
तंव ह्मणे ब्रह्मसुत ॥ तुझा कैंवारी अनंत ॥
वज्रनाभाचा करील घात ॥ सत्य जाण देवेंद्रा ॥७४॥
तिकडे वज्रपुरीम मन्मथ ॥ वज्रासि असे झुंजत ॥
तो करील दैत्याचा अंत ॥ मदनवीर ॥७५॥
ऐसी ऐकतां मात ॥ इंद्र होय आनंदभरीत ॥
मग निघता होय त्वरित ॥ वज्रपुरीसी ॥७६॥
वेगें निघे सुरेश्वर ॥ संगें घेतला जयंत कुमर ॥
तैसाचि ब्राह्मणपरिवार ॥ देव समस्त ॥७७॥
येवोनि राहिले अंतराळीं ॥ तंव संग्राम दाटला भारी ॥
अशुध्दें वोहळली धरित्री ॥ पाहती देव ॥७८॥
गदासि देखोनि विरथ ॥ इंद्रें धाडिला दिव्य रथ ॥
सारथी मातली समवेत ॥ रणभूमीसी ॥७९॥
सांबा धाडिला ऐरावत ॥ त्याचा प्रवीर महात ॥
मग वज्रनाभासि झुंजत ॥ यादवी वीर ॥८०॥
रणभूमिसि आला जयंत ॥ तो इंद्राचा ज्येष्ठ सुत ॥
मदना जाणविली मात ॥ द्वारकेची ॥८१॥
कीं श्रीहरींचें आज्ञोत्तर ॥ वज्रनाभ वधावा सत्वर ॥
हें तुह्मीं करावें साचार ॥ अविलंबेंसीं ॥८२॥
तंव उठावले दैत्य सकळ ॥ जैसे अग्नीवरी टोळ ॥
तैसें झुंज मांडिलें तुंबळ ॥ उभयवर्गीं ॥८३॥
मग लोटले यादववीर ॥ घेघे ह्मणोनि करिती मार ॥
गदाघातीं दैत्यभार ॥ चूर्ण केला ॥८४॥
युध्द जाहलें अपरिमित ॥ धडमुंडांचे पाडिले पर्वत ॥
रणनदी घोर वहात ॥ अशुध्दाची ॥८५॥
आरक्त जाहलें भूमंडळ ॥ कुंजर वारू झाले बंबाळ ॥
यादव योध्दे अतिप्रबळ ॥ नाटोपती कवणा ॥८६॥
मग दैत्यें टाकोनि तमास्त्र ॥ रणीं पाडिला अंधकार ॥
क्षणैक व्यापले यादववीर ॥ तेणें तमें ॥८७॥
तंव मदनें जपोनि सूर्यास्त्र ॥ त्यावरी टाकिलें सत्वर ॥
तेणें पळविला अंधकार ॥ क्षणामाजी ॥८८॥
जयंत ह्मणे गा रतिपती ॥ या दैत्याची करीं शांती ॥
हा आमुची अमरावती ॥ घेऊं पाहे ॥८९॥
मदनें जंव करावें तुंबळ ॥ तंव जाहला सायंकाळ ॥
तेणें योगें युध्द सकळ ॥ राहिलें पैं ॥९०॥
मग सोडोनि दिव्यबाण ॥ आणिलें पाताळिंचें जीवन ॥
अतिरम्य केलें निर्माण ॥ गंगातटाक ॥९१॥
तेथें गंगा भोगावती ॥ संध्या सारी रतिपती ॥
संपादिलें सांबजयंतीं ॥ मानसिक सर्व ॥९२॥
मग क्रमिलिया रजनी ॥ उदय पावला वासरमणी ॥
सकळीं नित्यनेम सारोनी ॥ रणीं उभे राहिले ॥९३॥
सुनाभ ह्मणे रे गदा ॥ मजसीं रीघपां द्वंद्वा ॥
गदा घेवोनियां युध्दा ॥ ऊठ वेगीं ॥९४॥
मग हातींचीं धनुष्यें क्षितीं ॥ ठेवोनि उठिले गदाघातीं ॥
जेवीं मदोन्मत्त हस्ती ॥ चौदंतांचे ॥९५॥
दोघे मिळाले समान वीर ॥ अंबरीं पाहती सुरवर ॥
दुंदुभीनादें अंबर ॥ दणाणत सर्वही ॥९६॥
एकमेकां पाचारून ॥ घेघे ह्मणोनि फेडिती उसणें ॥
मग हाणिती सत्राणें ॥ एकमेकांसी ॥९७॥
जैसे ऐरणीवरी घण ॥ तैसे हाणिती उसणपण ॥
तंव सुनाभें यदुनंदन ॥ हाणितला उरी ॥९८॥
घायें पाडिली मुरकुंडी ॥ अशुध्दगुरळी मुखें सांडी ॥
परि सावध होवोनि प्रौढीं ॥ लक्षिला दैत्य ॥९९॥
मग तो दैत्य वक्षस्थळीं ॥ हाणोनि पाडिला भूमंडळीं ॥
गदें वधिला महाबळीं ॥ सुनाभवीर ॥१००॥
सैन्यामाजी हाहाःकार ॥ ह्मणती वधिला सुनाभवीर ॥
तंव कोपोनि धांवला असुर ॥ कुंभदैत्य ॥१॥
आल देखोनि कुंभासुर ॥ मग उठावला सांबवीर ॥
ऐरावता सम कुंजर ॥ पाडिले भूमीं ॥२॥
दोघे मिळाले युध्दा अचळ ॥ घायीं थरारे भूमंडाळ ॥
सांबें हाणिलें वक्षस्थळ ॥ कुंभवीराचें ॥३॥
घाव लागतां कुंभासुरा ॥ तेणें जाहला पाठिमोरा ॥
पळोनि गेला माघारा ॥ मौनपणेंची ॥४॥
मग धांवला वज्रनाभ ॥ मनीं धरोनियां क्षोभ ॥
तंव पाठीं घातला सांब ॥ मदनवीरें ॥५॥
मदन ह्मणे रे असुरा ॥ तूं माझा असती सासरा ॥
ह्मणोनि केलेम उपकारा ॥ आजवरी ॥६॥
पिता गुरू श्वशुर युवती ॥ वधूं नये ही धर्मनीती ॥
आणि प्रभावतीचे प्रीतीं ॥ रक्षिलें तुज ॥७॥
आवेशें ह्मणे दैत्यनाथ ॥ मशका द्वारके जाईं पळत ॥
घेवोनि ये तुझा गोपिनाथ ॥ झुंजावया येथें ॥८॥
ऐकतां मदनें प्रेरिला रथ ॥ बाणीं झांकिला दैत्यनाथ ॥
जैसा तृणें व्यापिला पर्वत ॥ पर्जन्यकाळीं ॥९॥
पहिलाच तो रतिपती ॥ आणि शेष जाहला सारथी ॥
मग सैन्या लाविली ख्याती ॥ मदनवीरें ॥११०॥
दैत्य करी घोर संधान ॥ तें निवारी मदन आपण ॥
आणी दैत्याचे वारू पाडोन ॥ केला विरथ ॥११॥
मग सोडिती महा शस्त्रें ॥ निवारण करिती परस्परें ॥
वज्र धांवे क्रोधें थोरें ॥ मदनावरी ॥१२॥
तयासि देखोनि विरथ ॥ त्वरें चालिला मन्मथ ॥
गदा घेवोनि धांवत ॥ दैत्यावरी ॥१३॥
दोघे मिळाले विर्वाणीं ॥ देखोनि भ्याला वज्रपाणी ॥
हृदयीं स्मरिला चक्रपाणी ॥ तयेवेळीं ॥१४॥
ह्मणे धांवधांव गा अनंता ॥ दोघे प्रवर्तले घाता ॥
हा दुष्ट नावरे मन्मथा ॥ महा असुर ॥१५॥
तूं कृपाळू जगज्जीवना ॥ आतां साह्य यावें मदना ॥
दुष्ट दैत्यप्राणहरणा ॥ पाव वेगीं ॥१६॥
तंव मदनें गदाप्रहारीं ॥ दैत्य हाणिला शिरावरी ॥
सुस्नात केला रुधिरीं ॥ तयेवेळीं ॥१७॥
घेईं रे मन्मथा उसणें ॥ ह्मणोनि दैत्यें हाणिला बाणें ॥
तेव्हां अशुध्द वमिलें मदनें ॥ रणामाजी ॥१८॥
देव करिती हाहाःकार ॥ ह्मणती गांजिला मदनवीर ॥
तंव तेथें आले श्रीधर ॥ इंद्रस्मरणें ॥१९॥
देवा भेटला सुरनाथ ॥ सांगे युध्दाचा वृत्तांत ॥
मग कृष्णें अंतरीं रथ ॥ थांबविलासे ॥१२०॥
आणि स्फुरिला पांचजन्य ॥ पुत्रा जाणवलें आला कृष्ण ॥
मग दंडवता गेला मदन ॥ श्रीपतीजवळी ॥२१॥
कृष्णें दीधलें गरुडवाहन ॥ आणि हातींचें सुदर्शन ॥
तें सहस्त्रधारा गहन ॥ सूर्याऐसें ॥२२॥
कृष्ण ह्मणेगा अनंगा ॥ आतां वज्र वधीं वेगा ॥
तो जाईल निश्चयें भंगा ॥ तुझिये हस्तें ॥२३॥
पित्यासि करोनि नमस्कार ॥ रणा आला रतिवर ॥
तंव धांवला असुर ॥ वज्रनाभ ॥२४॥
मदन ह्मणे रे असुरा ॥ आतां सांभाळीं या शस्त्रा ॥
अंतरीं पाहें श्रीधरा ॥ दृष्टीभरी ॥२५॥
वज्र करी अवलोकन ॥ तंव देखे जगन्मोहन ॥
चतुर्भुज श्रीवत्स चिन्ह ॥ दैदीप्यरूप ॥२६॥
कांसे दिसे पीतांबर ॥ कमलनयन सुंदर ॥
वैजयंतीमाळा गदाधर ॥ देखिला दैत्यें ॥२७॥
दैत्य करित ऊर्ध्ववदन ॥ मदनें आठविलें कृष्णचरण ॥
आणि सोडावया सुदर्शन ॥ प्रवृत्त होय ॥२८॥
तैं जाहला मदन अनंग ॥ कोणा त्याचें अंग ॥
मग हाणितसे चांग ॥ दैत्यासि तो ॥२९॥
ऐसा अंगेंविण होय नर ॥ मग सांडिलें चक्र ॥
तयासि उदकाचा आकार ॥ प्राप्त जाहला ॥१३०॥
चक्र चालिलें धगधगीत ॥ धुंधुवातें थोर गर्जत ॥
आकाशीं खणखणाट होत ॥ असंभाव्य ॥३१॥
न मानितां शस्त्रास्त्रांसी ॥ चक्र धांवत आलें वेगेंसीं ॥
बैसलें येवोनि कंठासी ॥ दैत्याचिया ॥३२॥
तेणें कापिलें दैत्यशिर ॥ धरणीं पडलें कलेवर ॥
अशुध्दांचे लोटले पूर ॥ रणामाजीं ॥३३॥
दैत्य पडतां समरंगणीं ॥ आनंदली सकळ मेदिनी ॥
पुष्पें टाकिलीं सुरगणीं ॥ मदनावरी ॥३४॥
मग कृष्ण आणि सुरनाथ ॥ आलिंगिती प्रीतीं मन्मथ ॥
तैसेचि गद सांब जयंत ॥ भेटते जाहले ॥३५॥
तेथोनि आले राजभुवना ॥ कृष्णा नमिती तिघी सुना ॥
आशीर्वाद त्यांचिये नंदना ॥ दीधला देवें ॥३६॥
रणीं पडिले महा वीर ॥ त्यांचे करविले संस्कार ॥
और्ध्वदैहिकें समग्र ॥ दौहित्र करिती ॥३७॥
आतां बोलो नये विशेष ॥ कृष्णें स्थापिला आपुला वंश ॥
जयाचे दृष्टीनें सौरस ॥ सकळां होय ॥३८॥
मेल्यावरी वज्रनाभ ॥ इंद्र आनंदला स्वयंभ ॥
यशवंत पद्मनाभ ॥ जाहला तो ॥३९॥
ऐसा अनंगें वज्र वधिला ॥ मदन विजयी जाहला ॥
ऐका आतां ग्रंथ पुढिला ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१४०॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ प्रथम स्तबक मनोहरू ॥
वज्रनाभवधविस्तारू ॥ त्रयोदशोऽध्यायीं कथियेला ॥१४१॥
॥ श्री रुक्मिणीरमणार्पणमस्तु ॥