कथाकल्पतरू - स्तबक १ - अध्याय ११

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

श्रीकृष्णकथा अगाध जीवन ॥ माजी संचरे मानसमीन ॥

अंत नकळे परि वर्णन ॥ करुं लागे ॥१॥

मागां नैषधकथेचे अंतीं ॥ तुज करुं मदन प्राप्ती ॥

हेचि सांगितली वचनोक्ती ॥ हंसिणीनें ॥२॥

मग ह्मणे प्रभावती ॥ त्वां जावें द्वारावती ॥

माझी लावावी प्रीती ॥ मदनापाशीं ॥३॥

नानाप्रयत्‍नेंसीं ॥ वानावें माझे स्वरुपासी ॥

मज घालावें मानसीं ॥ मदनाचिया ॥४॥

ऐसा होतांचि हेतुआभास ॥ मग निघालीं हंसिणी हंस ॥

घेवोनीच कीं तयेचें मानस ॥ आलीं द्वारके ॥५॥

आधीं भेटलीं मन्मथा ॥ थोर वानिली दैत्यसुता ॥

तयासि लाविली अवस्था ॥ प्रभावतीची ॥६॥

नंतर भेटलीं कृष्णनाथा ॥ सांगितली समूळ कथा ॥

ह्मणती कार्य करोनि सर्वथा ॥ आलों आह्मी ॥७॥

देवा वज्रनाभाची कन्या ॥ अनुसरली या प्रद्युम्ना ॥

आतां त्वरा करोनि लग्ना ॥ जावें तुह्मीं ॥८॥

तंव वसुदेव होवोनि यजमान ॥ आरंभिला महायज्ञ ॥

जेथें श्रीकृष्ण आपण ॥ साहित्य पुरवी ॥९॥

इकडे कश्यप यज्ञाहुनी ॥ मागुता आला वज्रपाणी ॥

तया आधींच चक्रपाणी ॥ आला होता ॥१०॥

कृष्ण ह्मणे गा सुरेश्वरा ॥ मदन न्यावा वज्रपुरा ॥

मग तुमचें कार्य सत्वरा ॥ होईल सर्व ॥११॥

असो यज्ञा आले ऋषेश्वर ॥ महातपस्वी द्विजवर ॥

कृपामात्रें उद्धाणार ॥ अखिल जगासी ॥१२॥

विशेष असती ज्ञानवंत ॥ अग्निहोत्री महा पंडित ॥

कीं शापानुग्रहसमर्थ ॥ तेचि ऐका ॥१३॥

विश्वामित्र वसिष्ठ गौतम ॥ भारद्वाज आणि कंठलोम ॥

अत्रि कश्यप वरिष्ठ परम ॥ जमदग्नी तो ॥१४॥

वामदेव गर्ग देवल ॥ भृगु मार्कंडेय आणि पैल ॥

ऋषिश्रृंग जैमिनी शांडिल ॥ पराशरादी ॥१५॥

नाकीक्रतु आणि बृहस्पती ॥ सारातात अग्निदीप्ती ॥

सकळ आले यज्ञक्षितीं ॥ तयेवेळीं ॥१६॥

नारद नउदक कौशिक ॥ सांतपन मेद उद्दालक ॥

गौरमुख दुर्वास विभांडक ॥ कौंडिण्यादी ॥१७॥

बकदाल्‌भ्य पुल्कस वामन ॥ शैल्यक शुक द्वैपायन ॥

मांडव्य आणि रोमहर्षण ॥ आले यज्ञा ॥१८॥

अष्टावक्र दधीचिक ॥ बृहदश्च आणि वाल्मिक ॥

धौम्य कात्यायन सकळिक ॥ गालवादी ॥१९॥

ऐसे तापसी महामुनी ॥ आले वसुदेवाचे यज्ञीं ॥

वसुदेव जातसे लोटांगणीं ॥ भूदेवांसी ॥२०॥

मग सकळ ऋषेश्वरां ॥ भेटला परात्पर सोयरा ॥

तैसेंचि वंदिलें समग्रां ॥ शचीपतीनें ॥२१॥

ऋषि आशीर्वाद देती ॥ कृष्ण इंद्र आसनीं बैसती ॥

कुंडवेदिका मंडपस्थिती ॥ जाहली सर्व ॥२२॥

तंव तेथें भद्रनाम नट ॥ प्राप्त जाहला महासभुट ॥

तेणें मांडिला खेळपाट ॥ यज्ञाजवळी ॥२३॥

बोले नाना कळा कौतुकीं ॥ शास्त्रचर्चा सांगे श्र्लोकीं ॥

ऋषि जाहले संतोषी ॥ तेणें योगें ॥२४॥

तयासि ह्मणती ऋषेश्वर ॥ प्रसन्न जाहलों आह्मी समग्र ॥

तरी कांहीं मागावा वर ॥ आह्मां पाशीं ॥२५॥

नट प्रार्थोनि ह्मणे त्यांप्रती ॥ द्याजी भोजन तुमचे पंक्ती ॥

आणि असावी सरस्वती ॥ प्रसन्न मज ॥२६॥

उमा आणि विश्वनाथ ॥ मज प्रसन्न असावे नित्य ॥

आणि कराजी यशवंत ॥ मज लागीं ॥२७॥

सकळ पृथ्वीचे भूपाळ ॥ मज मानितील सकळ ॥

ऐसी वशीकरण विद्या प्रबळ ॥ द्यावी मज ॥२८॥

ऋषि ह्मणती तथास्तु ॥ तूं पावसील रे मनोरथु ॥

मग बोलिला गोपिनाथु ॥ नटाप्रती ॥२९॥

गौरवूनि भद्रनामासी ॥ सांगता झाला हृषीकेशी ॥

ह्मणे त्वां जावें वज्रपुरीसी ॥ मदनासंगें ॥३०॥

सांब आणि मदन कुमरां ॥ तैसेंचि आमुचे सहोदरा ॥

घेवोनि जावें वज्रपुरा ॥ सत्वरगतीं ॥३१॥

नट ह्मणे गोपिनाथा ॥ विद्या सांगाजी त्यांसि बहुता ॥

मग मी नटरुपें मन्मथा ॥ नेईन तेथें ॥३२॥

ऐसें उत्तर बोलिला ॥ ऐकोनि श्रीकृष्ण संतोषला ॥

मग मदनासि बोलाविला ॥ सांबगदांसह ॥३३॥

तया तीघां वीरांप्रती ॥ वाचन बोलिला श्रीपती ॥

कीं तुह्मीं जावें त्वरितीं ॥ वज्रपुरासी ॥३४॥

त्या वज्रनाभाच्या कुमरी ॥ जाऊनि पर्णाव्या पैं सत्वरीं ॥

आणि दैत्यासि वधोनि झडकरी ॥ यावें तुह्मीं ॥३५॥

ऐसें तिघांसि सांगितलें ॥ आणि नटासि निरविलें ॥

विजयी होईं ह्मणितलें ॥ नारायणें ॥३६॥

मग त्या नटासंगतीं ॥ तिघे तेथोनि निघती ॥

मार्ग क्रमोनि आले त्वरितीं ॥ वज्रपुरासी ॥३७॥

मग भेटले दैत्यनाथा ॥ हंसें सांगितला जो होता ॥

दैत्य होय संतोषिता ॥ देखोनि त्यांतें ॥३८॥

मग दैत्यें त्या नटासी ॥ बोलाविलें मंदिरासी ॥

खेळ नेमोनियां तयांसी ॥ दीधला असुरें ॥३९॥

ऐसा त्या सिद्धसाधक नटीं ॥ खेळ मांडिला राजमठीं ॥

रावणशापाची हतवटी ॥ दाविली स्पष्ट ॥४०॥

भद्रनामा नटला रंगीं ॥ खेळत असे सुरंगी ॥

शास्त्रश्लोक ह्मणोनि वेगीं ॥ सांगत असे ॥४१॥

मदन झाला नृत्यकर ॥ सांब जाहला तालधर ॥

मृदंगाचा झणत्कार ॥ होता जाहला ॥४२॥

शास्त्रकळेची पेखण ॥ देव गंधर्व गायन ॥

सभेसि मांडिलें मोहन ॥ विनोदाचें ॥४३॥

कृष्णकथा पवित्र जाण ॥ खेळतो मदन आपण ॥

तें देखे जवनिकेंतुन ॥ प्रभावती ॥४४॥

आधींच मदन सुरेख ॥ त्यांत धरिला नट वेष ॥

मग जैसा रत्‍नाचा प्रकाश ॥ शोभा मिरवी ॥४५॥

उर्वशीनें शापिन्नला रावण ॥ तें खेळिन्नला संपूर्ण ॥

मग रायें पाठवनी देउन ॥ पाठविला बिढारा ॥४६॥

तंव साक्षेपें पुसे भारत ॥ कैसा शापिला लंकानाथ ॥

तो सांगाजी सकल वृत्तांत ॥ कृपा करोनी ॥४७॥

मग ह्मणती वैशंपायन ॥ विमानीं बैसोनि रावण ॥

जातहोता भेटी लागुन ॥ कुबेराचे ॥४८॥

तया कुबेराचा पुत्र ॥ त्याचें नाम नलकूबर ॥

तेणें केला संभोग निर्धार ॥ उर्वशीशीं ॥४९॥

ते रात्रि भागीं सुंदरा ॥ जात असतां त्याचे मंदिरा ॥

तंव भेटी झाली दशशिरा ॥ मार्गावरी ॥५०॥

तयेसि ह्मणे लंकापती ॥ सुंदरी मज देईं रती ॥

ते ह्मणे नळकूबराप्रती ॥ जातसें मी ॥५१॥

पहा पां मनीं विचारोन ॥ मी आजि तुमची सून ॥

तुमचे बंधूचा नंदन ॥ नलकबूर ॥५२॥

ऐसें सांगतां उर्वशी ॥ रावण न मानी गर्वराशी ॥

धरिता झाला पदरेंसीं ॥ तये लागीं ॥५३॥

रावण मदांध जाहला ॥ पदर न सोडी वहिला ॥

मग उर्वशीनें शापिला ॥ तयेवेळीं ॥५४॥

ह्मणे झोंबतां पतिव्रते ॥ तुझे शतचूर्ण होतील माथे ॥

ऐसें ऐकतां लंकानाथें ॥ सोडिली ते ॥५५॥

शापिला ऐसा दशशिर ॥ पतिव्रतेचा शाप थोर ॥

ह्मणोनि न करी बलात्कार ॥ सीतेवरी ॥५६॥

ऐसा खेळतां नाटयरंग ॥ प्रेक्षक पाहूनि जाहले दंग ॥

मग मांडिला शापप्रसंग ॥ नलकूबराचा ॥५७॥

कुबेरपुत्र दोघे जण ॥ विषयांध जाहले पूर्ण ॥

नारद शापें विमळार्जुन ॥ झाले देखा ॥५८॥

तंव भारतें ऋषीसि पुसिलें ॥ नारदें कांहो शापिलें ॥

तें सांगाजि वहिलें ॥ मजप्रती ॥५९॥

मुनि ह्मणे गा भारता ॥ कुबेरपुत्र बंधु उभयतां ॥

ऐक तयांची पूर्वकथा ॥ सांगतों तुज ॥६०॥

मणिग्रीव आणि नलकूबर ॥ सवें युवतींचा संभार ॥

मद्य प्राशन करोनि थोर ॥ मातले ते ॥६१॥

स्त्रियांसह खेळतां जळीं ॥ नारद आले तयेस्थळीं ॥

तंव नारी लज्जित होवोनि सकळी ॥ घेतलीं वस्त्रें ॥६२॥

मदिरामदें दोघे बंधु ॥ अंतरीं नाहींत सावधु ॥

तयांसि नग्न देखोनि नारदु ॥ बोलिले शाप ॥६३॥

शाप देती नारदमुनी ॥ तुह्मी द्रुम व्हारे दोन्ही ॥

जैं स्पर्श करील शार्ङगपाणी ॥ तैं उद्धराला ॥६४॥

तेथोनि गेले नारदमुनी ॥ तैं ते वृक्ष झाले दोन्ही ॥

यमुनेच्या तटपुलिनीं ॥ विमळार्जुन ॥६५॥

होते सहस्त्र संवत्सर ॥ तंव द्वापारीं झाला कृष्णावतार ॥

वसुदेवाचा तनय श्रीधर ॥ देवकी उदरीं ॥६६॥

कंसें मारिलीं बाळकें ॥ ह्मणोनि पळविला गोकुळीं धाकें ॥

पालट दीधला चोरवेषें ॥ यशोदेसी ॥६७॥

तंव कोणे एके सुदिनीं ॥ मंथन करितां जननी ॥

धांवूनि आला चक्रपाणी ॥ स्तनप्राशना ॥६८॥

रविदंड करें धरोनी ॥ स्तन घातलें असे वदनीं ॥

तंव दुग्ध आलें उतोनी ॥ देखे माता ॥६९॥

ह्मणोनि माता सोडवी स्तना ॥ येरु अधिकचि घेई पान्हा ॥

परि ते लोटोनि मनमोहना ॥ गेली धांवत ॥७०॥

तेणें रागें चक्रपाणी ॥ चरणीं हाणे माथणी ॥

भक्षोनियां सकळ लोणी ॥ विखुरलें तक्र ॥७१॥

मग शिक्याचिया नवनीता ॥ देव विचारी योग्यता ॥

उडी घेवोनि भक्षिता ॥ होय तेव्हां ॥७२॥

उडीचा जाहला थोर ध्वनी ॥ तें जाणिवलें जननी ॥

कीं नवनीत वेचितो चक्रपाणी ॥ निश्चयेंसीं ॥७३॥

मग ते रागें आली जननी ॥ पाहे तंव उलथी माथणी ॥

आणि शिक्याचें सर्व लोणी ॥ विखुरलें असे ॥७४॥

भेणें पळाला मुरारी ॥ धरुं धांवली यशोदा सुंदरी ॥

शिणली जाणोनियां हरी ॥ सांपडला स्वेच्छें ॥७५॥

मग धेनूचा कंठदोरा ॥ तेणें उखळीं बांधिलें उदरा ॥

तंव अंगुळें दोन अंतरा ॥ न पुरे दावें ॥७६॥

मग आणिक दावें आणोनी ॥ गांठवीतसे मागुतेनी ॥

तेंही न पुरे ह्मणवोनी ॥ आणिक बांधे ॥७७॥

ऐसीं आणिलीं सहस्त्रभरी ॥ परि न पुरतीच मुरारी ॥

कष्टली जाणोनि सुंदरी ॥ बांधोनि घेतलें ॥७८॥

जैं बांधिलीं दावीं उदरीं ॥ तैं दामोदर जाहला हरी ॥

उखळ वोढितां बाहेरी ॥ आला देखा ॥७९॥

मग त्या वृक्षांच्या मध्यवासीं ॥ रिघाव करी हृषीकेशी ॥

तंव तें उखळ वृक्षांसी ॥ अडकलें असे ॥८०॥

दोन्ही हात दोन वृक्षांसी ॥ टेंकोनि उखळ वोढी बळेंसीं ॥

तंव वृक्ष पडिले भूमीसी ॥ विनावातें ॥८१॥

हात लागतां तेचि क्षणीं ॥ वृक्ष लोटले मेदिनी ॥

विमळार्जुन उन्मळोनि ॥ झाले पुरुष ॥८२॥

त्यांहीं देखिलें चतुर्भुजा ॥ आयुधेंसीं गरुडध्वजा ॥

मग स्तवोनि नंदात्मजा ॥ स्वस्थानीं गेले ॥८३॥

ऐकोनि वृक्षांचा महाशब्द ॥ द्वारीं धांवूनि आला नंद ॥

मग उचलिला गोविंद ॥ सत्वरगती ॥८४॥

स्नेहें आलिंगिला कोडें ॥ ह्मणे रक्षीं वो चामुंडे ॥

माते आजि टाळिलें येवढें ॥ विघ्न तुवां ॥८५॥

ऐसें उद्धरण श्रीहरीसी ॥ नंदें केलें ह्मणे ऋषी ॥

भारता आतां पूर्वकथेसी ॥ देईं चित्त ॥८६॥

भद्रनामा खेळला रंगणीं ॥ असुरें दीधली पाठवणी ॥

तंव ते प्रभावती मनीं ॥ विस्मित होय ॥८७॥

प्रभावती आदि सकळा ॥ वानिती मदनाची नृत्यकळा ॥

ह्मणती नट सुंदर सांवळा ॥ अपूर्व दिसे ॥८८॥

लोकीं सुंदर मदन ह्मणती ॥ परि त्याहोनि याची अधिक दीप्ती ॥

नटपण आणि अंगकांती ॥ अति सुंदर ॥८९॥

ऐशा वानोनियां मदना ॥ गेल्या आपुलिये स्थाना ॥

तंव हंसिणी आली ते क्षणा ॥ प्रभावती जवळी ॥९०॥

येरी ह्मणे हंसिणीये ॥ मज क्षेम देईं बाइये ॥

आलीस रिती किंवा भरलिये ॥ सांगें आधीं ॥९१॥

मग ते सांगे हंसिणी ॥ भरली आलें वो साजणी ॥

आतां तूं पावसी कामिनी ॥ कांतसुख ॥९२॥

हर्षें प्रभावती ह्मणत ॥ तो दाखवींगे त्वरित ॥

मी जाहलें अवस्थाभूत ॥ तयालागीं ॥९३॥

आजी नट एक नाचिन्नला ॥ तो म्यां दृष्टीनें देखिला ॥

स्वरुप सुंदर चांगला ॥ मदन जेवीं ॥९४॥

म्यां तो देखोनि नयनीं ॥ मदन आठविला निजमनीं ॥

सखये वेधलें त्या लागोनी ॥ कामतत्वें ॥९५॥

हांसोनि बोले हंसिणी ॥ नट देखिला जो नयनीं ॥

तैसाचि मदन वो साजणी ॥ श्रीकृष्णकुमर ॥९६॥

मागुती प्रभावती बोले ॥ तुझें उत्तर गे चांगलें ॥

परि निश्चयें सत्य मानिलें ॥ न गमे मज ॥९७॥

सत्वर भेटवीं प्राणनाथा ॥ ह्मणोनि चरणीं ठेविला माथा ॥

नातरी साजणी जीविता ॥ आतां त्यजीन ॥९८॥

ऐसें ह्मणोनि प्रभावती ॥ विरहें जाहली मूर्छागती ॥

जैसी कर्दळी पडे क्षितीं ॥ चंडवातें ॥९९॥

प्रभावतीच्या कटाक्षबाणीं ॥ मदन विंधिला होता मनीं ॥

तैसीच मदनें ते कामिनी ॥ विंधिली बाणें ॥१००॥

मग बोलिली हंसिणी ॥ तोचि मदन गे साजणी ॥

सभेसि नटवेष धरोनी ॥ खेळला जो ॥१॥

ऐसें ऐकोनि प्रभावती ॥ उत्कंठित जाहली चित्तीं ॥

मग उठोनि बोलती ॥ होय देखा ॥२॥

आतां न लावीं उशीर ॥ वेगें आणीं प्राणेश्वर ॥

गृहीं येवोनि बिढारकर ॥ कांवो जाहला ॥३॥

तो सुकुमार सोमवंशी ॥ कष्टत असेल प्रवासीं ॥

तरि त्वरित जावोनि तयासी ॥ आणीं येथें ॥४॥

मग ते निघाली हंसिणी ॥ आली मदनाचे भवनीं ॥

सर्व वृत्तांत तया लागुनी ॥ वदती जाहली ॥५॥

ते ह्मणे गा तूं मन्मथा ॥ उशीर न लावीं आतां ॥

नातरी त्यागील जीविता ॥ सत्य जाण ॥६॥

इकडे प्रभावती जवळी ॥ माळीण जात सायंकाळीं ॥

दुर्डी भरोनियां कमळीं ॥ पुष्पें नेत ॥७॥

कोणा न पुसतां विचार ॥ मदन जाहला मधुकर ॥

कमळीं रिघोनि संचार ॥ केला तेथें ॥८॥

माळीण जाय त्वरितीं ॥ पुष्पें वोपि प्रभावतीप्रती ॥

तीं देखोनि अंतरीं खंती ॥ जाहली बहुत ॥९॥

जैं पुष्पें देखिलीं नयनीं ॥ तैं मदन आठवला मनीं ॥

मग दीधली पाठवणी ॥ माळिणीसी ॥११०॥

तंव जया कमळाभीतरीं ॥ मदन गुप्त असे निर्धारीं ॥

तेंचि कमळ शिरीं सुंदरी ॥ खोंविती जाहली ॥११॥

मग खोंपा भरोनि बकुळीं ॥ माथां मालती तुरंबिली ॥

आणि मुख भरिलें तांबूलीं ॥ नेत्रीं अंजन ॥१२॥

कौसुंभरंगी पातळ ॥ नेसली असे पायघोळ ॥

दीपक करोनिया उज्ज्वळ ॥ बैसलीसे ॥१३॥

अंगीं मदवीची ल्याइली चोळी ॥ वरी पुष्पांची जडविली जाळी ॥

वोवर्‍या धुपविल्या सकळी ॥ आनंदेंसीं ॥१४॥

रत्‍नजडित मंचक पवित्र ॥ वरी आच्छादिलें अंबर ॥

आणि पासोडा न्याहार ॥ सुमनांचा तो ॥१५॥

पहातसे पतीची वाट ॥ श्रृंगार करोनि अवीट ॥

सुखसौभाग्य आलें निकट ॥ ह्मणोनियां ॥१६॥

तंव हंसिणी देखिली येतां ॥ सवें न देखे प्राणनाथा ॥

मग दुणावली अवस्था ॥ वियोगाची ॥१७॥

अंग टाकिलें धरणीं ॥ जैसी जळाविण कमळिणी ॥

पतिविरहें ते कामिनी ॥ होय तैसी ॥१८॥

ह्मणे गे सखे हंसिणी ॥ कैसी क्रमेल आजिंची रजनी ॥

मदन आणीन ह्मणोनी ॥ गेलिस तूं कीं ॥१९॥

तुझा बोल न दिसे साचार ॥ आला नाहीं तो रतिवर ॥

लटकाचि देसी मज धीर ॥ असत्यपणें ॥१२०॥

आतां मी सांडीन प्राण ॥ दुःख न सोसवे दारुण ॥

येरी ह्मणे भेटेल मदन ॥ सत्वर तुज ॥२१॥

ऐकतां अधिक मूर्छागती ॥ विकळ जाहली प्रभावती ॥

तंव प्रकट झाली मदनमूर्ती ॥ कमलांतुनी ॥२२॥

मग हर्षोनि बोले हंसिणी ॥ सावध होईं गे साजणी ॥

तुज संतुष्टली भवानी ॥ भेटें भ्रतारा ॥२३॥

येरी दृष्टी उघडोनि पाहे ॥ तंव मदनमूर्ती देखती होय॥

मग वर्णून हंसिणीये ॥ करी नमन ॥२४॥

चरण झाडिले कुरळ केशीं ॥ ह्मणे मी तुमचि असें दासी ॥

मग आनंदें क्षेम तयेसी ॥ देतसे मदन ॥२५॥

सुकुमार ते खंजरीट दृष्टी ॥ मदनें न्याहाळिली गोरटी ॥

रुप देखोनि संतुष्टी ॥ होय मदन ॥२६॥

प्रभावती पाहे भ्रतार ॥ शाम सुंदर मनोहर ॥

कांसे झळके पीतांबर ॥ धनुष्य हातीं ॥२७॥

जैसें कमळ विकासलें ॥ तैसे तयाचे नेत्र देखिले ॥

मुखामाजी मिरवले ॥ दशनहिरे ॥२८॥

ऐसा देखिला मदन ॥ जैसा आकाशीं वळला घन ॥

मग नाचे मयूरी होवोन ॥ प्रभावती ते ॥२९॥

घातली तयासि आंघोळी ॥ तिलक रेखिला कपाळीं ॥

वस्त्रें दीधलीं नानापरिमळीं ॥ अत्यानंदें ॥१३०॥

दीधले नाना अलंकार ॥ कनकपाटीं बैसोनि रतिवर ॥

अंतरीं आठवी श्रीधर ॥ तये वेळीं ॥३१॥

मग मदन ह्मणतसे मंत्र ॥ प्रभावती घाली कंठसूत्र ॥

ऐसें जाहलें विचित्र ॥ गंधर्वलग्न ॥३२॥

तंव जाहला सूर्योदय ॥ लग्नाचा असे समय ॥

पाटीं बैसलीं उभय ॥ वधुवरें तीं ॥३३॥

मग जाहली आरोगणा ॥ स्त्री जोडली तया मदना ॥

होत सुखसंभोग नाना ॥ दोघांजणांसी ॥३४॥

आतां असो हे मदनकथा ॥ फिटली दोघांची अवस्था ॥

पुढें चित्त दीजे ग्रंथा ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥३५॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ प्रथम स्तबक मनोहरु ॥

प्रभावतीआख्यानविस्तारु ॥ एकादशोऽध्यायीं कथियेला ॥१३६॥

श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP