कथाकल्पतरू - स्तबक १ - अध्याय ६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

हंसीण ह्मणे प्रभावतीये ॥ तूं ऐक हो बाईये ॥

कथा उरवाहरणाचिये ॥ सांगों तुज ॥१॥

हिरण्यकश्यपाचा सुत ॥ दैत्यवंशीं प्रर्‍हादभक्त ॥

तया प्रर्‍हादाचा सुत ॥ विरोचन ॥२॥

विरोचनाचा बलि सुत ॥ बळीचा बाण विख्यात ॥

तो शिवाचा परम भक्त ॥ महाथोर ॥३॥

पाताळा जावोनि बाणासुर ॥ कमळें आणी एक सहस्त्र ॥

यापरी शतवर्षें रुद्र ॥ पूजिला तेणें ॥४॥

प्रसन्न होतां पार्वतीवर ॥ असुर मागे भुजा सहस्त्र ॥

आणि पुत्रा ऐसा अधिकार ॥ मागे आपणा ॥५॥

रुद्र बोले प्रसन्नोत्तर ॥ तुज होतील सहस्त्र कर ॥

दीधलें शोणितापुर ॥ राज्य तुज ॥६॥

आणि देतसे दुसरा वर ॥ पुत्राठाईंचा अधिकार ॥

तोहि तयासि परिकर ॥ दीधला देवें ॥७॥

कीं कमळीं पूजिला ईश्वर ॥ ह्मणोनि दीधले सहस्त्र कर ॥

पद्मपुराणींचा विचार ॥ ऐसा असे ॥८॥

तो बाणासुर सुंदरी ॥ राज्य करी शोणितापुरीं ॥

त्याची उरवा नामें कुमरी ॥ अनुपम्य असे ॥९॥

ते उरवा परम सुंदरी ॥ नित्य पूजीतसे गौरी ॥

तयेची चित्ररेखा खेचरी ॥ सांगातिण ॥१०॥

लोटता कितिएक दिवसां ॥ बाणासुर गेला कैलासा ॥

सेवा करुनियां महेशा ॥ तोषविलें तेणें ॥११॥

त्याची सेवा देखोन ॥ प्रसन्न जाहला उमारमण ॥

पुनः द्यावयासि वरदान ॥ सिद्ध जाहला ॥१२॥

शंभू ह्मणे माग बाणा ॥ जें तुझिया आलें मना ॥

तें देईन येचक्षणा ॥ संतोषोनी ॥१३॥

तंव मागता जाहला बाण ॥ युद्ध द्यावें मज दारुण ॥

जेणें भुजाचें होय कंदन ॥ माझिया देवा ॥१४॥

तयासि बोले ईश्वर ॥ हा बरवा नव्हे विचार ॥

कीं समर्थाचें लेंकुर ॥ दैन्य भाकी ॥१५॥

नातरी गंगेच्या तीरीं ॥ तृषार्त मूर्खत्वें खणी विहिरी ॥

कीं कामधेनु असतां घरीं ॥ मागे भिक्षा ॥१६॥

परि शंभु ह्मणे तथास्तु ॥ तूं पावसील मनोरथु ॥

ध्वजस्तंभा होय पातु ॥ तंव अंत घडे ॥१७॥

ऐसा तो पावला वर ॥ नागरा आला बाणासुर ॥

मन जाहलें निर्भर ॥ तया दैत्याचें ॥१८॥

येवोनि सिंहासनीं बैसला ॥ आपुल्या भुजा पाहों लागला ॥

मग प्रधानासि सांगों लागला ॥ वृत्तांत सर्व ॥१९॥

पुसे कुंभक प्रधान ॥ हर्ष जाहला काय कारण ॥

शंकरें कैशियापरीचा मान ॥ दीधला तुह्मां ॥२०॥

ईश्वर जाहला प्रसन्न ॥ काय दीधलें वरदान ॥

तें सांगावें जी संपूर्ण ॥ आह्मालागीं ॥२१॥

मग तो बोले बाणासुर ॥ प्रसन्न जाहला रुद्र ॥

तैं म्यां मागितला झुंजार ॥ समरंगणीं ॥२२॥

प्रधान ह्मणे कटकटा ॥ वर मागीतला वोखंटा ॥

रत्‍न सांडोनि गारगोटा ॥ घेतला राया ॥२३॥

कल्पतरुचिये तळवटीं ॥ झोळीलागीं दीधली गांठी ॥

भिक्षेची आवडी मोठी ॥ दैवहतासी ॥२४॥

पिता मारोनि पिंड देणें ॥ घर जळतां आंत जाणें ॥

मेलियासी धर्म करणें ॥ तैसें हें केलें ॥२५॥

आतां असो हें बोलणें ॥ होणार तें टाळावें कवणें ॥

काळें नेलिया धांवणें॥ कोण करील ॥२६॥

तंव कोणे एके वेळीं ॥ सभेसि आली उरवाबाळी ॥

रायें बैसविली जवळी॥ आपुली कन्यका ॥२७॥

राव तियेसि पाहे दृष्टीं ॥ तंव तारुण्यें चित्त वेष्टी ॥

जाहली पयोधर उंचवटी ॥ तेजागळी ॥२८॥

प्रधान जाणवि अवसर ॥ कीं उखेसि पाहिजे वर ॥

मग बोले बाणासुर ॥ स्वयंवर कीजे ॥२९॥

मेळवूं सर्व भूपाळ ॥ पाहोनियां हे घालील माळ ॥

तंव अशरीरिणी तत्काळ ॥ बोलिली नभीं ॥३०॥

अरे बाणा अवधारीं ॥ इचा पति तो तुझा वैरी ॥

तुझिये भुजांची कांडोरी ॥ करील तो ॥३१॥

ऐसी बोले गगनवाणी॥ रायें ती ऐकिली श्रवणीं ॥

मग पडिला चिंतावनीं ॥ बाणासुर ॥३२॥

कुंभक प्रधानासि पुसे ॥ यासि आतां कीजे कैसें ॥

ऐकोनि प्रधान सांगतसे ॥ युक्ति तया ॥३३॥

राया ईस भ्रतार मेळ ॥ न कीजे हा उपाय सबळ ॥

इचा पति तो तुह्मासि काळ ॥ असे ह्मणोनी ॥३४॥

मग ते सप्तखणांची उपरी ॥ तेथें ठेविली रायें कुमरी ॥

संगें चित्ररेखा खेचरी ॥ ठेविलीसे ॥३५॥

ते कुंभकाची कन्यका ॥ तिचें नाम चित्ररेखा ॥

नामा ऐशीच करणी देखा ॥ चित्रें लिही ॥३६॥

उरवेसि कैलासीं न्यावें ॥ आणि राया जवळी आणावें ॥

ऐसें करी रक्षण बरवें ॥ चित्ररेखा ॥३७॥

तंव दिवसा कोणिएका ॥ गौरीदर्शना गेली उरवा ॥

सवें होती चित्ररेखा ॥ सांगातिणी ॥३८॥

विमानीं बैसोनि राजनंदिनी ॥ पावली कैलासभुवनीं ॥

तंव देखती जाहली नयनीं ॥ शिवगौरी ॥३९॥

शिवा सांगातें ते अवसरीं ॥ सारीपाट खेळतसे गौरी ॥

प्रेमें हास्य क्रीडा करी ॥ शंकरासी ॥४०॥

तें देखोनि बाणकुमरी ॥ दुःखित जाहली अंतरीं ॥

मनामाजी विनंति करी ॥ भवानीची ॥४१॥

ह्मणे वो माते अंबिके ॥ कैं मी ऐसीच खेळेन कौतुकें ॥

पतीचिया अंगसुखें ॥ मंचकावरी ॥४२॥

तें मनींचें जाणली गौरी ॥ जे सर्वाचे अभ्यंतरीं ॥

तंव तेथोनि गेले त्रिपुरारी ॥ उठोनियां ॥४३॥

मौनेंचि बोलावूनि उरवा ॥ तयेसि प्रेमें बोले अंबिका ॥

तुज वर देईन वो निका ॥ मनेप्सित ॥४४॥

गिरिजा ह्मणे परियेसीं ॥ वैशाखशुद्धद्वादशीं ॥

स्वप्नामाजी पुरुष देखसी ॥ तोचि पति ॥४५॥

मग ते उरवा कुमरी ॥ माथा ठेवी चरणावरी ॥

तंव गौरी उठवी करीं ॥ आपुलिया ॥४६॥

प्रेमें उरवा उचंबळत ॥ नेत्रीं आनंदाश्रु ढाळित ॥

उमा तियेसि आश्वासित ॥ स्नेहभरें ॥४७॥

मग मातेचा निरोप घेऊन ॥ उरवा निघाली तेथून ॥

आली आनंदेंकरुन ॥ मंदिरासी ॥४८॥

हर्षें पुसे चित्ररेखेसी ॥ कधीं येईल गे द्वादशी ॥

धीन न धरवे मानसीं ॥ विरहज्वरें ॥४९॥

येरी ह्मणे न करीं चिंता ॥ उमावचन नव्हे अन्यथा ॥

पति पावशी त्वरिता ॥ सखिये तूं ॥५०॥

मग तो आला संकेतदिवस ॥ सुंदरीस जाहला उल्हास ॥

अभ्यंग करुनि सुरस ॥ चंदन चर्चिलें ॥५१॥

नेसलिसे दिव्य पाटोळा ॥ चोळी घातली इंद्रनीळा ॥

खोपा भरुनि बकुळा ॥ घेतलें तांबूल ॥५२॥

अंगीं तारुण्य प्रबळ ॥ श्रृंगार केला अळुमाळ ॥

तंव झाला सायंकाळ ॥ प्रभावतीये ॥५३॥

चंदनाची पातळ उटी ॥ नेत्रीं अंजनरेखा गोमटीं ॥

पुष्पगुंफित हार कंठीं ॥ शोभे सुंदर ॥५४॥

ते भ्रमरमंचकावरी ॥ बैसली अनुपम्य सुंदरी ॥

भोंवती शोभे झालरी ॥ मंचकासी ॥५५॥

चित्ररेखा बोले वचन ॥ स्वप्नीं असावें सावधान ॥

जागृतीं पुरुष पाहोन ॥ वोळखावा ॥५६॥

त्या पुरुषातें न ओळखशी ॥ तरि मग संकटीं तूं पडशी ॥

ह्मणोनि सावधान मानसीं ॥ असावें तुवां ॥५७॥

तियेचें ऐकोनि वचन ॥ केलें भवानीचें स्मरण ॥

मग मंचकीं करी शयन ॥ बाणतनया ॥५८॥

भरला प्रथम प्रहर ॥ तंव स्वप्न झालें साचार ॥

चित्ररेखा गुप्तहेर ॥ पाहूं आली ॥५९॥

खांबा आड लपोनियां ॥ बैसली चेष्टा पहावया ॥

वर्म जाणे सर्व माया ॥ चित्ररेखा ॥६०॥

स्वप्नीं पुरुष प्राप्त जाहला ॥ उरवेनें पाय आवरिला ॥

कीं बैसावया दीधला ॥ ठाव तया ॥६१॥

तयेसि पुरुषें धरिलें करीं ॥ कर ठेविला उरावरी ॥

उरवा हास्यवदन करी ॥ स्वप्नामाजी ॥६२॥

ते हास्यमुख करुनी ॥ आलिंगिलें हातीं धरुनी ॥

क्षणएक निश्चळ राहुनी ॥ विकळ पडे ॥६३॥

विकळ पडती हात पाय ॥ अंगीं भरलें विरहभय ॥

ह्मणे जाहला काय ॥ प्राणप्रिय ॥६४॥

लगबगां उठोनि येरी ॥ पाहों लागली सुंदरी ॥

तंव चित्ररेखा बोलिली ॥ काय झालें ॥६५॥

स्वप्न नव्हे हो साचार ॥ येथेंचि लपाला चोर ॥

येरी ह्मणे आठवीं वर ॥ भवानीचा ॥६६॥

मग ते कुमारी काय करी ॥ अंग टाकी धरणी वरी ॥

ह्मणे स्वप्नींचें साच करी ॥ कोण माये ॥६७॥

आतां मज नाहीं जिणें ॥ हें भवानीनें केलें दुणें ॥

तरि स्वप्नींचें साच होणें ॥ घडे केवीं ॥६८॥

मेघ वोळला अंबरीं ॥ तळीं दुर्दैवी मयूरी ॥

मग तो वितळोनि क्षणाभीतरीं ॥ जाय जैसा ॥६९॥

तैसें प्रियानें मज दाविलें ॥ मागुती आपण अदृश्य जाहले ॥

उमादेवीनें काय केलें ॥ दुःख मज ॥७०॥

तंव चित्ररेखा ह्मणत ॥ सखये शोक न करीं व्यर्थ ॥

कवण देखिला स्वप्नांत ॥ तो सांग मज ॥७१॥

तिहीं लोकां माझारी ॥ भलता असो आठवण करीं ॥

तोचि आणीन गे सुंदरी ॥ पति तुझा ॥७२॥

येरी ह्मणे देखिल्या ओळखें ॥ स्वप्नींचा केविं सांगों शकें ॥

नांव नाहीं गे ठाउकें ॥ गांव त्याचें ॥७३॥

मग बोले चित्ररेखा ॥ तरि अवघड झालें देखा ॥

तूं न ओळखसीच एका ॥ आपुल्या प्रिया ॥७४॥

ह्मणे मरमर गे उरवा ॥ तुज पति कैसा अनोळखा ॥

सर्व पुरुषां माजी देखा ॥ नकळे कैसा ॥७५॥

तूं जरि तो वोळखेसी ॥ तरि मी आणीन त्यासी ॥

असोंदे भलतेहि ठायासी ॥ वकणेपरी ॥७६॥

तिहीं लोकां माझारी ॥ आणि अष्टदिशां भीतरीं ॥

तरि मी क्षणा माझारी॥ आणूं शकें ॥७७॥

आतां कोण ऐसा जाणावा ॥ न सांगसी तो कैसा आणावा ॥

त्वां नाहीं वोळखिला बरवा ॥ वोखटें केलें ॥७८॥

ऐसा तिचा बोल ऐकोनी ॥ उरवा मूर्छित पडली धरणीं ॥

मग येरीनें उचलोनी ॥ सावध केली ॥७९॥

चित्ररेखा विचारी जीवीं ॥ यासि बुद्धि कैसी करावी॥

तंव आठवली बरवी ॥ युक्ति एक ॥८०॥

ह्मणे चित्रीं लिहोनि त्रैलोक्य ॥ उरवेसि दावावें सकळिक ॥

मग दाखवील त्यांत एक ॥ तोचि आणीन ॥८१॥

चित्र लिहूं जाणे सुरेखा ॥ ह्मणोनि नाम चित्ररेखा ॥

तिणें संबोखोनि उरवा ॥ बैसविली ॥८२॥

रंगपात्रें सर्व भरुनी ॥ भिंती घोंटीव सुढाळ करुनी ॥

ल्याहावया बैसली शहाणी ॥ चित्ररेखा ॥८३॥

प्रथम लिहिला विघ्नहरु ॥ सर्वसिद्धि लंबोदरु ॥

त्यासि करी नमस्कारु ॥ कार्यसिद्धीसी ॥८४॥

स्वर्गलोक लिहिला सकळ ॥ अष्ट कुळाचळ लोकपाळ ॥

इंद्र गंधर्व देवकुळ ॥ लिहिले समग्र ॥८५॥

मग ह्मणे चित्ररेखा ॥ यांत पाहें तया सारिखा ॥

वर निरखोनि पाहे उरवा ॥ मनीं उत्कंठा धरोनी ॥८६॥

उरवा असे वर पाहत ॥ परि तया ऐसा न दीसत ॥

ह्मणोनि दुःखा दुणावत ॥ राजतनयेचें ॥८७॥

मग लिहिलें सकळ भूतळ ॥ आणि राजकुळें सकळ ॥

यांत पाहें ह्मणे निर्मळ ॥ आपुला पती ॥८८॥

उरवा पाहे तयांतें ॥ परि न देखे प्राणपतीतें ॥

मागुती पडलीसे व्यथें ॥ विरहाच्या ॥८९॥

उरवा ह्मणे हो बाई ॥ प्रयत्‍न न चाले तुझा कांहीं ॥

तरि आतां कष्ट कांहीं ॥ करुं नको ॥९०॥

तो पति नव्हे गे माझा काळ ॥ मज न्यावया आला उताविळ ॥

तत्काळ झाला मरणमूळ ॥ तोचि मज ॥९१॥

ऐसें उरवा बोलोनी ॥ अंग टाकीतसे धरणी ॥

येरी ह्मणे हो साजणीं ॥ धरीं धीर ॥९२॥

मग लिहिलें पाताळ ॥ अतळ वितळादि सुतळ ॥

आणि समस्तही नागकुळ ॥ लिहिलें देखा ॥९३॥

मग ह्मणे चित्ररेखा ॥ यांत पाहें तयासारिखा ॥

मग पाहती झाली उरवा ॥ धीर धरुनी ॥९४॥

तयामाजी न देखतां ॥ सकळ त्रिभुवन जाहलें ह्मणतां ॥

ह्मणे त्यजीन हो तत्वतां ॥ प्राण आपुला ॥९५॥

पुनः ह्मणे चित्ररेखा ॥ बाई धीर धरीं क्षणयेका ॥

राहिली असे द्वारका ॥ यादवांची ॥९६॥

म्यां त्रिभुवनींचीं चित्रें लिहिलीं ॥ परि द्वारका असे राहिली ॥

तंव उरवा बोलिली ॥ चित्ररेखेसी ॥९७॥

उरवा ह्मणे हो चित्ररेखे॥ कां शिणसी बाई आइकें ॥

स्वप्नींचे जागृतीं केंवि निके ॥ प्रत्यक्ष दृष्टीं ॥९८॥

स्वप्नींचें साच न होये ॥ दर्पणींचें हातां नये ॥

तरि आतां नको माये ॥ करुं धावणी ॥९९॥

ह्मणोनि अंग टाकी सुंदरी ॥ येरीनें धरिलि वरिच्यावरी ॥

ह्मणे हो बाई सांवरीं ॥ जीवित्व आपुलें ॥१००॥

आतां लिहितें द्वारावती ॥ क्षणभरी स्वस्थ असें चित्तीं ॥

मग होणार जे गती ॥ ते होवो दैवें ॥१॥

सकळ यादव आणि श्रीपती ॥ परिवारेंशीं पुण्यकीर्ती ॥

जो रायांमाजी प्रतापमूर्ती ॥ नारायण ॥२॥

तोही लिहिला श्रीविष्णू ॥ चतुर्भुज पीतवसनु ॥

मेघश्याम कमळनयनु ॥ गळां वैजयंती ॥३॥

उरवेनें पाहिला श्रीपती ॥ ह्मणे याचीच गे आकृती ॥

सोय धरीं हो निगुती ॥ माझी सखये ॥४॥

याचाचि असावा आश्रयित ॥ मज हाचि भाव भासत ॥

दृष्टीसि सादृश्य दिसत ॥ परि तो नव्हे ॥५॥

तंव ह्मणे चित्ररेखा ॥ बापबापरे दैवरेखा ॥

तूं यादववंशासि देखा ॥ अनुसरलीस ॥६॥

मग लिहिला मन्मथ ॥ जो कृष्णाचा ज्येष्ठ सुत ॥

त्यासि देखोनि निवांत ॥ हासिन्नली ॥७॥

होय नव्हे ऐसें ह्मणत ॥ लाजेनें अंचळ सांवरित ॥

श्वशुर असावा ऐसें वाटत ॥ तिये प्रती ॥८॥

मग ह्मणे चित्ररेखेसी ॥ याखालीं दुसरा लिहिसी ॥

तरि झणीच दुःखासी ॥ होय विसर ॥९॥

या ऐसाचि सकोमळ ॥ निमासुर आणि वेल्हाळ ॥

या खालता वयें निर्मळ ॥ पाहीन सखये ॥११०॥

मनीं जाणी तैं चित्ररेखा ॥ तो अनिरुद्ध होईल देखा ॥

मग लिहिला वोळखा ॥ प्रद्युम्नपुत्र ॥११॥

उरवेसि लागला ज्याचा वेध ॥ तोचि लिहितां अनिरुद्ध ॥

मग ते उरवा नेमें सकळ ॥ आनंदली ॥१२॥

त्यासि पाहे उरवा सुंदरी ॥ जैसा साक्षांत दिसे नेत्रीं ॥

ऐसी मदनाची परी ॥ प्रभावतीये ॥१३॥

चोरदृष्टीनें पाहत ॥ प्रीतीनें जवळी बैसत ॥

अंतरीं आनंद बहुत ॥ होत सखये ॥१४॥

तयेसि दीसतो साचार ॥ येवढा मदनाचा विस्तार ॥

मग मुखावरील पदर ॥ आड केला ॥१५॥

चित्ररेखा ह्मणे सुंदरी ॥ तूं दैवाची अससी खरी ॥

तुजसीं जोडला मुरारी ॥ येणें प्रसंगें ॥१६॥

होता उखेसि आनंद ॥ तंव सवेंचि जाहला खेद ॥

ह्मणे हा कैसा संबंध ॥ घडेल मज ॥१७॥

मृगजळ असे भरलें ॥ तेथें कैसें निवे तान्हुलें ॥

सखये तैसें हें बाहुलें ॥ दिसे मज ॥१८॥

तो असे द्वारकेसी ॥ मी असें या अवस्थेसी ॥

तरि आह्मां दोघांसी ॥ कैंची भेटी ॥१९॥

जरी पितयासि करुं श्रुत ॥ तरि तेणें बंधन प्राप्त ॥

चोरोनि करितां उचित ॥ नव्हे मज ॥१२०॥

अहो माये चित्ररेखे ॥ मज त्वां दुणाविलें दुःखें ॥

घृतें शिंपितां अधिकें ॥ वाढे अग्नी ॥२१॥

स्वप्नींचा पडता विसर ॥ परि त्वां दाखविला समोर ॥

आतां करीन त्याग सत्वर ॥ जीवित्वाचा ॥२२॥

धरणीं पडे कुमारी ॥ येरी सांवरि वरिच्यावरी ॥

आणीन वो क्षणाभीतरीं ॥ घेईं भाक ॥२३॥

सखये हे नसरतां निशी ॥ मी जाईन द्वारकेसी ॥

अनिरुद्ध आणीन तुजपासीं ॥ रात्रीमध्यें ॥२४॥

पुरुषार्थी मी तुझी सखी ॥ हें कार्य असे माझे नखीं ॥

त्यासि आणोनि कौतुकीं ॥ देईन तुज ॥२५॥

जों मी येतें मागुती ॥ तंव तूं राहें निवांती ॥

ऐसी निरविली सखी प्रीतीं ॥ तये चित्ररेखेनें ॥२६॥

करोनियां शिवचिंतन ॥ चित्ररेखा करी गमन ॥

चिंतामणिपादुका लेवून ॥ आकाशमार्गें जातसे ॥२७॥

क्षणामाजी अनंत गगन ॥ मार्ग क्रमिला वेगें करुन ॥

मग पावली द्वारका भुवन ॥ श्रीशंकरप्रसादें ॥२८॥

दृष्टीं देखिली द्वारावती ॥ कनकाचे कळस झळकती ॥

जेथें नांदे तो श्रीपती ॥ ते मी काय वर्णूं ॥२९॥

ते सर्वतीर्थांची माउली ॥ चित्ररेखेनें साष्टांग नमिली ॥

राजद्वारा जवळि आली ॥ भीतरीं जावया ॥१३०॥

नगरीं जंव प्रवेशावें ॥ तंव सुदर्शन घरटी भोंवे ॥

तेथें पवनास ही रीघ नव्हे ॥ चक्रांतूनि जावया ॥३१॥

गरगरां भोंवे निरंतरी ॥ मग चिंतावली सुंदरी ॥

ह्मणे कैसें जावें भीतरीं ॥ महा संकटीं ॥३२॥

डोळियाचें पातें लवे ॥ तंव येकविस वेळां भोंवे ॥

तरि कैसें यांतूनि जावें ॥ ह्मणे चित्ररेखा ॥३३॥

मग सव्य प्रदक्षिणा नगरा ॥ सवें घाली ते सुंदरा ॥

आली गोमतीच्या तीरा ॥ त्वरें करुनी ॥३४॥

तंव त्या गोमतीच्या तीरीं ॥ नारद अनुष्ठान करी ॥

ध्यान धरोनि ब्रह्मचारी ॥ बैसलासे ॥३५॥

त्रिभुवनीं नाहीं कळि भांडण ॥ ह्मणोनि धरिलें असे ध्यान ॥

याकारणें उपवास लंघन ॥ पडिलेंसे ॥३६॥

जरी स्वर्गीं नाहीं कळी ॥ तरी शेंडीतें खांडोळी ॥

जरि न देखे पाताळीं ॥ तरी तळवा घांसे ॥३७॥

कळी मृत्युलोकीं न देखे ॥ तरी त्याचें पोट दुखे ॥

वीणा घेवोनि निघे भिक्षे ॥ नगरामाजी ॥३८॥

प्रयत्‍नें अन्न मेळवी ॥ मग श्वानांसि बोलावी ॥

आणि त्यांसी भांडण लावी ॥ पाहे आनंदें ॥३९॥

त्याचिया अन्नाकारणें ॥ श्वानां होती भांडणें ॥

तेव्हां अंतरीं सुख होणें ॥ त्या नारदासी ॥१४०॥

ऐसा तो मुनी बैसला ॥ चित्ररेखेनें नयनीं देखिला ॥

मनीं आनंद जाहला ॥ कृपा करील ह्मणोनि ॥४१॥

जवळी जाऊनि लागे चरणीं ॥ कार्यसिद्धी जाहली ह्मणोनी ॥

मग संतोषोनि पुसे मुनी ॥ काय कार्यार्थ ॥४२॥

येरी सांगे सर्व वृत्तांत ॥ तेणें हरिखला ब्रह्मसुत ॥

ह्मणे आतां मी होईन तृप्त ॥ हिचें कार्य झालिया ॥४३॥

मुनि ह्मणे कार्य तथास्तु ॥ तुझा पुरेल मनोरथु ॥

मस्तकीं ठेविला हस्तु ॥ कृपा करोनी ॥४४॥

आणिक ह्मणे नारदमुनी ॥ आलीस दूरी मार्ग क्रमुनी ॥

तरी आह्मां आजि भोजनीं ॥ मेळविलें त्वा ॥४५॥

ईश्वर आणि श्रीकृष्णासी ॥ भांडण लावीन दोघांसी ॥

त्वां ऐसे बरवे कळीसी ॥ रचिलें असे ॥४६॥

युद्ध होईल तुंबळ ॥ विष्णु रुद्र आणि सकळ ॥

अशुद्धांचे खळाळ ॥ वाहती रणीं ॥४७॥

भांडण होईल घोरांदरी ॥ मज तें जेवण पोटभरी ॥

कीं लग्न दिवस चारी ॥ घडलें असे ॥४८॥

आतां तृप्ती वरी जेवणें ॥ बरवें घडलेंसे पारणें ॥

हें मिळविलें नारायणें ॥ मज लागीं ॥४९॥

नारद ह्मणे चित्ररेखे ॥ त्वां मांडिलें अति निकें ॥

तरि घेवोनि जाईं सुखें ॥ अनिरुद्धासी ॥१५०॥

येरी बोले विनंतिवचन ॥ म्यां नगरीं जावें कैसेन ॥

भोंवतें फिरे सुदर्शन ॥ रीघ नाहीं ॥५१॥

नारद ह्मणती तियेसी ॥ मी देईन तुज मंत्रासी ॥

तेणें भीतरीं जावयासी ॥ आयास नसे ॥५२॥

मग तयेसि दीधला मंत्र ॥ मस्तकीं ठेविला वरद कर ॥

ह्मणे जायहो सत्वर ॥ निर्विघ्नपणें ॥५३॥

चक्र नये तुजपाशीं ॥ ही दीक्षा माझी परियेसीं ॥

हा निरोप चक्रासी ॥ ऐसा असे ॥५४॥

उत्तरद्वारीं यादवेश्वर ॥ पैल मदनाचा आवार ॥

उदरींचा पुत्र महाथोर ॥ श्रीहरीचा ॥५५॥

तयामागें सप्तखणी ॥ शोभे कनकबालार्कवर्णी ॥

तेथें असे प्रतापतरणी ॥ कृष्णपौत्र ॥५६॥

माझें करावें स्मरण ॥ तेणें निवारेल सर्व विघ्न ॥

तुज जातां सुदर्शन ॥ न करी कांहीं ॥५७॥

त्याचा आणखी ऐक विचार ॥ जो हरिभक्तीसि तत्पर ॥

त्यासि सुदर्शनचक्र ॥ स्पर्शों न शके ॥५८॥

मग ते निघाली तेथोन ॥ तत्काल उमपली गगन ॥

वेगें आलीसे ठाकोन ॥ सुदर्शन जेथें ॥५९॥

नारदाचा दिव्य मंत्र ॥ चक्रावरी टाकिला शीघ्र ॥

चक्रें अवघें ब्रह्मसूत्र ॥ जाणितलें ॥१६०॥

गुरुवर्यानारदासी ॥ हरिभक्ती जडली अहर्निशीं ॥

ह्मणोनि त्याच्या वचनेसीं ॥ प्रवेशली ते ॥६१॥

सकळ पहावी द्वारावती ॥ तरि थोडी उरली राती ॥

कीं उरवा त्यजील त्वरितीं ॥ प्राण देखा ॥६२॥

मग अनिरुद्धाचे आवारीं ॥ प्रवेशली ते खेचरी ॥

तंव नृत्यगायन रंग रात्रीं ॥ होत तेथें ॥६३॥

नृत्य गायन संपलें ॥ लोक सर्व शेजे पहुडले ॥

तैसेंचि अनिरुद्धेंहि केलें ॥ द्वारीं शयन ॥६४॥

तेणें पूर्वरात्रीं स्वप्नीं ॥ देखिली अंगसंगीं मृगनयनी ॥

ते अवस्थेनें विरही होवोनी ॥ भ्रमित असे ॥६५॥

विडा खोविला मस्तकीं ॥ सुमनें घालूं पाहे मुखीं ॥

ऐसी अवस्था विशेखीं ॥ नये निद्रा ॥६६॥

चित्ररेखेनें वोळखिला ॥ चिंतेनें तो पूर्ण व्यापिला ॥

ह्मणोनि एकांतीं बैसला ॥ असे देखा ॥६७॥

मग ती गेली तया जवळी ॥ येरु पुसे तये वेळीं ॥

तूं आलीस कवण वेल्हाळी ॥ सांग मज ॥६८॥

तंव बोले चित्ररेखा ॥ मी उखेची असें दूतिका ॥

तयेनें स्वप्नीं तुज नायका ॥ देखिले असे ॥६९॥

तुझीच अवस्था झाली तिशीं ॥ स्वप्नीं भोगिलें तुजसी ॥

ह्मणोनि वेधु बहुवशीं ॥ लागला तुझा ॥१७०॥

तंव मिळाली खुणे खुण ॥ चातका जैसें प्राप्त जीवन ॥

तेणें बैसावया आसन ॥ घातलें तयेसी ॥७१॥

अनिरुद्ध ह्मणे वो सुंदरी ॥ ते कवणाची असे कुमरी ॥

आणि कवणे नगरीं ॥ वास तुह्मां ॥७२॥

तंव आदरें सांगे येरी ॥ बाणासुर शोणितापुरीं ॥

तयाची असे ते कुमरी ॥ उरवा नामें ॥७३॥

त्यासि तेवढीच कन्यका ॥ माझें नाम चित्ररेखा ॥

तिची सखी आणि दूतिका ॥ आल्यें येथें ॥७४॥

या त्रिभुवनामाझारी ॥ तें स्त्रीरत्‍न एक अवधारीं ॥

तुज भोगावया सुंदरी ॥ इच्छी मनीं ॥७५॥

स्वप्नीं घडला आचार ॥ तेणें उपजला विरहज्वर ॥

प्राण सांडील निर्धार ॥ वेगें चला जी ॥७६॥

तुह्मांसि करावया भेटी ॥ मी आलेंसे उठाउठी ॥

आतां चला मार्गीं गोष्टी ॥ करीत जाऊं ॥७७॥

मी जाईन तुजविण ॥ तरि ते त्यजील आपुला प्राण ॥

ह्मणोनि धरिले चरण ॥ अनिरुद्धाचे ॥७८॥

उठा बैसा माझिये खांदीं ॥ जाऊं ऐसेचि रात्रिसंधीं ॥

नाहीं तरी गुणनिधी ॥ पावेल मरण ॥७९॥

अनिरुद्ध विचारी मनीं ॥ खुणा बोलते साच वचनीं ॥

परि स्त्रियांची करणी ॥ नकळे कवणा ॥१८०॥

द्रौपदीनें केलें कीचका ॥ भीम नटला स्त्रीरुपका ॥

तैसें स्त्रीचरित्र जालिया देखा ॥ कैसें करावें ॥८१॥

परि हें पुसावें गोपालकृष्णा ॥ आणि तैसेंचि पितया मदना ॥

त्यांच्या आलिया मना ॥ मग जावें ॥८२॥

तें जाणोनि येरी मानसीं ॥ ह्मणे याचि बोली अनारिसी ॥

ह्मणोनि विद्या तामसी ॥ घातली त्यावरी ॥८३॥

तेणें तो जाहला निद्रिस्थ ॥ मग मंचकातळीं घातला हस्त ॥

उचलोनि निघाली त्वरित ॥ चित्ररेखा सुंदरी ॥८४॥

उडोनि जातसे गगनपंथीं ॥ अकरा सहस्त्र योजन गणती ॥

येरीनें तो क्रमिला त्वरितीं ॥ मार्ग सातां घटिकांत ॥८५॥

हें असे ग्रंथाभीतरीं ॥ तंव जाहली मध्यरात्री ॥

मंचक उतरिला द्वारीं ॥ उखेचिया ॥८६॥

ते विरहाचेनि शोकें ॥ अणुमात्र निद्रा नये उखे ॥

इतुकियांत सांचळ ऐके ॥ द्वारिं देखा ॥८७॥

सत्वर आली बाहेरी ॥ तंव मंचक देखिला नेत्रीं ॥

आणि जवळी सुंदरी ॥ चित्ररेखा ॥८८॥

उरवा देखे तया मंचका ॥ वरी शयनी पुरुष निका ॥

मग पावली अत्यंत सुखा ॥ तें वाचे न वर्णवे ॥८९॥

जैसा सिंधु चंद्रदर्शनीं ॥ कीं रवितेजें कमळिणी ॥

मयूर ऐकतां मेघध्वनी ॥ नाचे जैसा ॥१९०॥

मग करोनियां कुरवंडी ॥ मूद वोंवाळूनि सांडी ॥

वेगें नेला लवडसवडी ॥ मंदिरीं तो ॥९१॥

चित्ररेखेचिया चरणा ॥ भावें उरवा करी नमना ॥

बाई तुझिया सखिपणा ॥ जाणवलें मी ॥९२॥

आतां मी काय वानूं तुज ॥ कीं जीवदान दीधलें मज ॥

अथवा दाविलें भोज ॥ आनंदाचें ॥९३॥

येरी ह्मणे असो स्तुती ॥ आतां यासि होईल जागृती ॥

मग तामसी विद्या परती ॥ केली तयेनें ॥९४॥

उरवे त्वां असावें जवळी ॥ जागा होईल तये वेळीं ॥

मग बोलावें मंजुळीं ॥ शहाणपणें ॥९५॥

आणि ह्मणे हांसत हांसत ॥ कोरदृष्टीनें असावें पाहत ॥

श्रृंगारयुक्त उत्तर शांत ॥ मग बोलावें ॥९६॥

ऐसें तयेसि सांगोनि येरी ॥ आपण आली बाहेरी ॥

जवळ राहिली सुंदरी ॥ उरवा तेथें ॥९७॥

उरवा घाली विंझणवारा ॥ न्याहाळीतसे प्राणेश्वरा ॥

प्रीतीनें मुखकमळचंद्रा ॥ पाहातसे ॥९८॥

जागा नव्हे प्राणेश्वर ॥ तिच्या मनीं नव्हे धीर ॥

मग दीप करि थोर ॥ पहावया ॥९९॥

तंव जाहला प्रातःकाळ ॥ जागृत होय मदनबाळ ॥

उठोनि करी न्याहाळ ॥ मंदिराचा ॥२००॥

यदुवंशजें देखिली उरवा ॥ ह्मणे स्वप्नींची हे नायिका ॥

मग वस्त्रें झांकी मुखा ॥ निद्रेस्तव ॥१॥

तंव भ्रमरांचे झणत्कार ॥ कोकिळांचे पंचम स्वर ॥

कानीं वेदध्वनी मंत्र ॥ ऐकत असे ॥२॥

मग तो मनीं विचारी ॥ मी कवणाचे असें मंदिरीं ॥

हा मंचक पाहों तरी ॥ आपुलाचि ॥३॥

ऐसा मनीं होवोनि दुश्चित ॥ क्षणक्षणां उखेसि पाहत ॥

कांहींच न बोले परि गुप्त ॥ दृष्टिंपाहे ॥४॥

मग उरवा ह्मणे स्वामी ॥ कां विस्मित होतां तुह्मी ॥

आतां निद्रेचिया भ्रमीं ॥ न पडावें प्रिया ॥५॥

घ्यावें दांतवण आणि पाणी ॥ बैसा मुखमार्जन करुनि ॥

अंगीं चंदन लावूनी ॥ पहावें दर्पण ॥६॥

यापरीते मधुरवचनीं ॥ उरवा बोले हास्यवदनी ॥

तंव आली तत्क्षणीं ॥ चित्ररेखा ॥७॥

अनिरुद्ध ह्मणे हो नारी ॥ तूं तंव रात्रीची सुंदरी ॥

आणि आतां हे दूसरी ॥ कोण येथें ॥८॥

मग बोले चित्ररेखा ॥ म्यां जे सांगीतली उरवा ॥

तेचि हे तुमची नायिका ॥ पत्‍नी जाणा ॥९॥

तुह्मीं बोलतां जाहलां निद्रिस्थ ॥ म्यां मंचकातळीं घालोनि हात ॥

रात्रीमाजी आणिलें त्वरित ॥ शोणितपुरा ॥२१०॥

येथोनि अकरा सहस्त्र ॥ योजनें असे द्वारकापुर ॥

इतुकें दूर आणिलें शीघ्र ॥ सात घटिकेंत ॥११॥

आतां काहीं नकरीं विचार ॥ ईस भवानीचा ऐसा वर ॥

कीं स्वप्नीं भोगिशील जो नर ॥ तोचि पती ॥१२॥

हे उरवा लावण्यराशी ॥ प्रीतीनें भाळली सुंदरा तुजसी ॥

तरि सोडोनियां चिंतेसी ॥ भोगीं भोग ॥१३॥

ऐसा करोनि अनुवाद ॥ तयेनें बोधिला अनिरुद्ध ॥

ह्मणे आतां करुं संबंध ॥ वर्‍हाडिकेचा ॥१४॥

मग अभ्यंग सुस्नातपणें ॥ टिळा तांबूल वस्त्रें भूषणें ॥

बैसावया वोहरां कारणें ॥ मांडिले पाट ॥१५॥

बैसवूनि वोहरें मनोहर ॥ चित्ररेखा बोले मंत्रोच्चार ॥

अनिरुद्धाचे कंठीं माळ ॥ घाली उरवा ॥१६॥

सूर्य साक्षीस ठेवोनी ॥ तैसे अग्नि आणि धरणी ॥

दोघां गांठी देवोनी ॥ पदर पदराशीं ॥१७॥

ऐसें जाहलें गंधर्वलग्न ॥ उभयतांचें येक मन ॥

जोडलें उरवा कामिनीरत्‍न ॥ अनिरुद्धासी ॥१८॥

मग झालें प्रीतिभोजन ॥ चित्ररेखा गेली आपण ॥

नंतरें संभोग शयन ॥ दोघां जणासी ॥१९॥

प्रीतीनें ते उरवा बाळा ॥ हा मदनाचा पुतळा ॥

होत संभोग तया वेळा ॥ नित्य दोघां ॥२२०॥

ऐसें सुख भोगितां ॥ आणि नाना गोष्टी करितां ॥

विसरला आपुलिया समस्ता ॥ गणगोतासी ॥२१॥

आतां असोहे आवडी ॥ सांगतां होईल सीमा थोडी ॥

दोघांसि लागली गोडी ॥ प्रेमस्थिती ॥२२॥

ती उरवा स्त्रीनिधान ॥ हा मदनाचा नंदन ॥

जाहले दोघांचे पूर्ण ॥ मनोरथ ॥२३॥

मत त्या शोणितपुरीं ॥ कैसी वर्तली नवलपरी ॥

ते आतां ऐकावी चतुरीं ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥२४॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ प्रथम स्तबक मनोहरु ॥

अनिरुद्धआख्यान विस्तरु ॥ षष्ठोऽध्यायीं कथियेला ॥२२५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP