निवृत्तं कर्म सेवेत प्रवृत्तं मत्परस्त्यजेत् ।
जिज्ञासायां संप्रवृत्तो नाद्रियेत् कर्मचोदनाम् ॥४॥
चित्तीं वासनांचे मळ । तेणें भेदु भासे सबळ ।
तो नाशावया चित्तमळ । कर्म निर्मळ सेवावें ॥९२॥
मागां सांगीतलें निश्चित । जें कां नित्यनैमित्य ।
तेंचि कर्म गा निवृत्त । साधकीं प्रस्तुत सेवावें ॥९३॥
जो प्रवर्तला माझ्या भजनीं । तेणें काम्य सांडावें निपटूनी ।
हें मागां सांगितलें विवंचूनी । कामना मनीं न धरावी ॥९४॥
धरोनि मदर्पणाचें बळ । नित्ये आचरतां निर्मळ ।
चित्ताचे चैत्यमळ । जाती तत्काळ नासोनि ॥९५॥
कृषीवळु करी शेतासी । यथार्थ द्रव्य दे राजयासी ।
तो न भी ग्रामकंटकांसी । तेवीं कृष्णार्पणेंसीं होतसे ॥९६॥
जाहल्या चित्तमळक्षाळणें । नित्यविवेकु उपजे तेणें ।
इहामुत्रां लाता हाणे । अनित्य त्यजणें वैराग्यें ॥९७॥
एवं वैराग्य झालिया अढळ । तेणें सत्त्व होय प्रबळ ।
तेव्हां मज जाणावया केवळ । वृत्ति निर्मळ ते काळीं ॥९८॥
करितां माझीं चिंता । कामक्रोध नाठवती चित्ता ।
थोर लागली माझी अवस्था । न राहे सर्वथा अणुभरी ॥९९॥
हो कां ऐशिये अवस्थेसी । कर्मक्रिया नावडे ज्यासी ।
तेणें संन्यासूनि सर्व कर्मांसी । ब्रह्मज्ञानासी रिघावें ॥१००॥
श्रवण मनन करितां । कर्मासी झालिया विगुणता ।
बाधक नव्हे माझ्या भक्तां । कर्मकिंकरता त्यां नाहीं ॥१॥
स्वधर्म केलिया फळ काये । चित्ताचा मळमात्र जाये ।
भक्तु भजनें निर्मळ आहे । बाधूं न लाहे स्वकर्म ॥२॥
एवं कर्माची चोदना । मद्भक्तासी नाहीं जाणा ।
करितां श्रवणकीर्तना । कर्मबंधना नातळती ॥३॥
ऐशिया जिज्ञासावस्थेसी । कर्मबाधा नाहीं त्यासी ।
मुख्य तात्पर्य ब्रह्मज्ञानासी । हेंचि उद्धवासी सांगतु ॥४॥