एकनाथी भागवत - श्लोक २ रा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अन्वीक्षेत विशुद्धात्मा देहिनां विषयात्मनाम् ।

गुणेषु तत्त्वध्यानेन सर्वारंभविपर्ययम् ॥२॥

यापरी स्वधर्म जाण । ज्यांचें विशुद्ध अंतःकरण ।

ते विषयीं उदासीन । हें वोळखण तयांचे ॥७४॥

तयांसी विषयाची आस्था । नाहीं नाहीं गा सर्वथा ।

परी सर्वार्थविपरीतता । विषयासक्तता देख ती ॥७५॥

भरलीं मृगजळाचीं तळीं । तेणें न पिकती साळी केळी ।

तैसी विषयबुद्धी जवळी । स्वसुखफळीं फळेना ॥७६॥

पाहें पां विषयासक्त । कर्मारंभीं संकल्प करित ।

आयुःकामार्थ क्षेमार्थ । धनधान्यार्थसमृद्धी ॥७७॥

या हेतू कर्म आरंभित । तें स्वकर्म नव्हे निश्चित ।

स्वधर्ममिषें मनोरथ । उपासित सर्वदा ॥७८॥

बैलाची कांस दुहितां । शिंपीभरी दूध न ये हाता ।

तेवीं मनोरथ उपासितां । न लभे सर्वथा निजसुख ॥७९॥

कर्मचि तें नव्हे । केल्याही सिद्धी न पवे ।

तें विघ्नबाहुल्यें नाश पावे । विघ्न संभवे देवांचें ॥८०॥

विषयसेवनीं आहे सुख । या बुद्धीं शिणशिणोनि मूर्ख ।

पावले परम दुःखें दुःख । मुख्य याज्ञिक घालूनि ॥८१॥

वेदत्रयी जाणूनि सकळ । यज्ञकर्मी अतिकुशळ ।

वांछितां स्वर्गादिक फळ । पतन केवळ अधोमुखें ॥८२॥

ऐसेनि विवेकें निपुणदृष्टी । जो स्वर्गु नेघे तृणासाठीं ।

वैराग्य लागे त्यापाठीं । उठाउठी घर रिघे ॥८३॥

तो वैराग्याचें माहेर । विश्रांतीचें विसावतें घर ।

तो नररूपें साचार । विवेकु साकार पैं झाला ॥८४॥

ऐसेनि विवेकें विवेकदृष्टी । स्वर्गादि विषय मिथ्या सृष्टी ।

ते मिथ्यात्वाची गोठी । ऐक जगजेठी उद्धवा ॥८५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP