श्रीभगवानुवाच ।
मयोदितेष्ववहितः स्वधर्मेषु मदाश्रयः ।
वर्णाश्रमकुलाचारमकामात्मा समाचरेत् ॥१॥
पूर्वीं वेदरूपें वर्णाश्रम । मीचि बोलिलों स्वधर्म ।
पंचरात्रादि वैष्णवधर्म । हें उपासनावर्म गुह्य माझें ॥४४॥
जो वर्ण जो आश्रम । तेणेंचि ते करावे स्वधर्म ।
आचरतां परधर्म । दुःख परम पाविजे ॥४५॥
उद्धवा येथ जाण । कर्ता पाहिजे सावधान ।
ते सावधानतेचें लक्षण । अतिविचक्षण जाणती ॥४६॥
कर्म चतुर्विध येथ । 'नित्य' आणि नैमित्त ।
काम्य आणि प्रायश्चित्त । जाण निश्चित विभाग ॥४७॥
येथ कर्म आचर निश्चिती । सावधान राखावी वृत्ती ।
आचरावयाची व्युत्पत्ती । विचित्र स्थिती सांगेन ॥४८॥
नित्य आणि नैमित्तिक । हें कर्म जाण आवश्यक ।
सांडोनियां फलाभिलाख । विधिप्रमुख आचरावें ॥४९॥
नित्यकर्म अधिक वाढे । तैं नैमित्तिकाचे आंग चढे ।
काम्य उचंबळलें विषयचाडें । तैंचि पडे निषिद्धी ॥५०॥
फलाभिलाषेंविण । नित्य नैमत्तिक जाण ।
करावें गा कृष्णार्पण । अर्पिती खूण जाणोनि ॥५१॥
काम्य कर्म आवश्यक । त्यजावें गा निःशेष ।
जेवीं कां वमिलें वमक । परतोनि लोक न पाहती ॥५२॥
समूळीं कामनेतें दंडावें । तैंचि काम्य कर्म सांडावें ।
येर्हवीं कार्मत्यागु न संभवे । कामना जीवें राखतां ॥५३॥
अंतरीं अनिवार कामना । बाह्य विरक्ती दावी जना ।
ते सविया विटंबना । त्यागु विचक्षणा तो नव्हे ॥५४॥
कामाचेनि अधिक मदें । कर्में निपजती निषिद्धें ।
समूळ कामनेचेनि छेदें । सर्व निषिद्धें मावळती ॥५५॥
अथवा देखतांचि निषिद्ध दिठीं । जो हरिनामें गर्जत उठी ।
निषिद्ध पळे बारा वाटीं । प्रायश्चित्तकोटी हरिनामें ॥५६॥
जेथ हरिनामाचे उमाळे । तेथ निषिद्ध तत्काळ जळे ।
निषिद्ध अभक्तां आदळे । भक्तांजवळें तें न ये ॥५७॥
काम्यनिषिद्धाची कथा । भक्तांसी नातळे सर्वथा ।
भगवंतु रक्षी निजभक्तां । दोषु तत्त्वतां त्यां नाहीं ॥५८॥
नामें प्रायश्चित्तांच्या कोटी । हे म्यां सांगितली गुह्य गोठी ।
प्रकट न करावी सृष्टीं । गुप्त पोटीं राखावी ॥५९॥
काम्यनिषिद्धाचे त्याग । तुज म्यां सांगीतले सांग ।
नित्यनैमित्तविभाग । तोही विनियोग परियेसीं ॥६०॥
मदर्पणें आवश्यक । करावें नित्यनैमित्तिक ।
तेंचि चित्ताचें शोधक । साधन मुख्य परमार्थी ॥६१॥
एक म्हणती स्वधर्म निर्फळ । वर्म नेणतीच ते बरळ ।
स्वधर्में होय जन्म सफळ । परमार्थफळ स्वधर्मीं ॥६२॥
किडाळ झाडावया दृष्टीं । रज देऊनि पाठींपोटीं ।
सुवर्ण घालितां पुटीं । झळकत उठी निजतेजें ॥६३॥
तैसा मज अर्पितां स्वधर्म । त्याचें सफळ होय निजकर्म ।
ऐसें नेणोनियां निजवर्म । कर्मभ्रम कर्मठां ॥६४॥
मज अर्पिती हातवटी । अवघड वाटेल जगजेठी ।
त्यासी माझी आवडी मोटी । त्याची दृष्टी मदर्पण ॥६५॥
कृष्णीं निश्चळ ज्याचें मन । त्याचें कर्म तितुकें कृष्णार्पण ।
त्यासी न अर्पितांही जाण । सहजें मदर्पण होतसे ॥६६॥
जो रथीं निश्चळ होऊनियां बैसे । तो न चळतांही चालतु दिसे ।
जाण स्वकर्म त्याचें तैसें । अनायासें मज अर्पे ॥६७॥
यापरी होऊनि अकामात्मा । सुखें आचरावें स्वधर्मा ।
तेणें सांडूनि रजतमा । सत्त्वें पुरुषोत्तमा पावती ॥६८॥
वर्णाश्रमसमुद्भवा । मूळ आश्रयो मी वोळ्खावा ।
कळकर्मनिजस्वभावा । उपासावा मी एकु ॥६९॥
वर्णासी आश्रयो मी प्रसिद्ध । जे जन्मले मुखबाहूरुपाद ।
आश्रमा आश्रयो मी विशद । गर्जती वेद ये अर्थीं ॥७०॥
देवो देवी कुळाचार । यांचें वस्तीचें मी घर ।
एवं मी सर्वाधार । हा कर्मी विचार देखावा ॥७१॥
गुज परियेसीं उद्धवा । कर्माध्यक्षु मी जाणावा ।
कर्मी मीचि अभिलाषावा । क्रियेनें धरावा मी एकु ॥७२॥
एवं कर्मआदिमध्यअंतीं । मी अविनाशु धरितां चित्तीं ।
तीं कर्मेंचि निष्कर्में होतीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥७३॥